' रेल्वे स्थानकं स्वच्छ हवी आहेत...? मग गाड्या एसी करा...!

रेल्वे स्थानकं स्वच्छ हवी आहेत…? मग गाड्या एसी करा…!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

रेल्वे स्टेशन स्वच्छ हवी आहेत, मग मेल-एक्सप्रेस गाड्या एसी करा असं म्हटलं तर तुम्हाला वाटेल की, रोगापेक्षा इलाज भयंकर आहे. निमित्त आहे, ११ मे ते १७ मे या कालावधीत रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेबाबत करवून घेण्यात आलेले सर्वेक्षण. या सर्वेक्षणानुसार देशातील १० सर्वात जास्त अस्वच्छ स्थानकांत मुंबई महानगरक्षेत्रातील तब्बल तीन स्थानकं आहेत.

सर्वात अस्वच्छ स्थानक कानपूर असून तसं म्हटलं तर सर्वच्या सर्व अस्वच्छ स्थानकं एक तर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील उदा- कानपूर, पटणा, वाराणसी, प्रयाग, लखनऊ आहेत किंवा मग या दोन राज्यांतील प्रवासी मोठ्या संख्येने येणाऱ्या स्थानकांवरील उदा – कल्याण, कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस, जुने दिल्ली, चंदीगड, ठाणे आहेत. हा अहवाल पाहून आपल्यापैकी अनेकांना ‘भैय्या’ लोकांबद्दल आपला राग व्यक्त करायची संधी मिळाली आहे. त्यात तथ्य असले तरी संपूर्ण सत्य नाही.

 

railway-anauncement-inmarathi03
financialexpress.com

दुसरी एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे या सर्व स्थानकांवर खूप मोठ्या संख्येने मेल-एक्सप्रेस गाड्या थांबतात. ही गोष्टं मुंबईतील अस्वच्छ रेल्वे स्थानकांच्या उपनगरीय आणि बाहेरगावच्या गाड्यांसाठी असलेल्या फलाटांबाबत प्रकर्षाने जाणवते. सगळ्यात पहिले आपल्याला मान्य करायला हवे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारतचा नारा दिल्यापासून रेल्वे स्थानकांवरील तसेच गाड्यांमधील स्वच्छतेबाबत अनेक चांगल्या गोष्टी होताना दिसत आहेत.

अनेक ठिकाणी फलाटांवरील स्वच्छतेत वाढ झाली आहे. गणवेश घातलेले कंत्राटी कामगार अनेक ठिकाणी रेल्वे रूळांमधील कचरा उचलताना दिसतात. पूर्वी हे काम स्टेशन परिसरात रहाणारी आणि कचरा-भंगार गोळा करणारी मुलं करायची. फलाटांवर कचऱा कुंड्या दिसतात, प्रतिक्षागृहांची स्थिती सुधारलेली दिसते. प्रसाधनगृहं अपुरी आणि अस्वच्छच असली तरी थोडासा फरक पडल्याचे जाणवते.

एवढे प्रयत्न होऊनही अपेक्षित परिणाम दिसत नाही, यामागे काही प्रमुख कारणं आहेत.

ठाणे तसेच कल्याण स्थानकांवर नियमितपणे जाणारा प्रवासी म्हणून ती मी मांडू इच्छितो. पहिले म्हणजे, कितीही प्रचार केला तरी लोकांच्या सवयी बदलायला वेळ लागणार आहे.

लहानपणापासून रेल्वे रूळ हे फलाटावर उभे राहून मुलांना लघवी करणे, पान-तंबाखू खाऊन किंवा न खाताही थुंकणे आणि खाऊन झाल्यावर कचरा किंवा पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकण्याची हक्काची जागा आहे असा आपला समज करून दिला गेला आहे. त्यामुळे फलाटावरील कचरापेटी न शोधता आपण अनेकदा कचरा रूळांवर फेकतो. फलाटावर गाडीची वाट पाहात असलेले लोक, आलटून पालटून रूळांमध्ये पिचकाऱ्या मारताना दिसतात. यावर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फलाटांवरील; खाद्य पदार्थांचे स्टॉल हटवले पाहिजेत.

या स्टॉलमुळे कचरा होण्यास मोठ्या प्रमाणावर हातभार लागतो. नवी मुंबईतील कोणत्याही स्थानकावरील फलाटावर असे स्टॉल नाहीत. स्थानकाबाहेर फूड कोर्ट असून त्यात खाण्याचे बरेच पर्याय उपलब्ध असल्याने तुलनेने ही स्थानकं अधिक स्वच्छ राहातात. दुसरं म्हणजे लवकरात लवकर सर्व गाडयांमध्ये हरित-शौचालयं बसवावीत. रेल्वे मंत्रालय युद्ध पातळीवर हे काम करत असलं तरी त्याला काही काळ लागणार आहे.

गाडी स्थानकांवर उभी असताना शौचालयांचा वापर करू नका असे लिहिले असून लोक त्याचे पालन करत नाहीत. याबाबत प्रवाशांचे प्रबोधन करण्यासाठी रेल्वेने अधिक प्रयत्न करावेत.

 

railway-inmarathi

गरज भासल्यास स्थानकांवर शौचालयांचा वापर केल्याने निर्माण होणारे स्वच्छता तसेच आरोग्याचे प्रश्न याबाबत व्हिडिओ बनवावेत. तिसरा आणि रोगापेक्षा इलाज भयंकर वाटणारा मुद्दा जसा स्वच्छतेबाबत आहे तसाच तो रेल्वेच्या आर्थिक स्वावलंबनाबाबतही आहे.

द्वितीय श्रेणीच्या डब्यात प्रवासादरम्यान बहुतेक प्रवासी खाऊन झाले की, कचरा आणि बाटल्या खिडकीतून बाहेर फेकतात. यामुळे मुंबई-पुण्यासारखे गजबजलेले रेल्वे मार्ग एका अर्थाने खुल्या कचरापेट्या झाल्या आहेत. आपण फेकलेला कचरा आणि रूळांवर पडणारा मैला वाऱ्यामुळे धुळीच्या माध्यमातून खिडकीतून पुन्हा आपल्याच अंगावर येतो.

उपाय : आता आर्थिक स्वावलंबनाकडे वळूया.

रेल्वे विभागाला मालवाहतूकीतून सुमारे २/३ उत्पन्न मिळते. तर प्रवासी वाहतूकीतून आणि अन्य स्त्रोतांतून सुमारे १/३ उत्पन्न मिळते. २०१६-१७मध्ये प्रवासी वाहतूकीतून सुमारे ३३००० कोटींचा तोटा रेल्वेला झाला.

रस्त्यांची सुधारणारी स्थिती तसेच रेल्वेने लागणाऱ्या अतिरिक्त वेळामुळे माल वाहतूकीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून फार वाढीची अपेक्षा नाही. प्रवासी वाहतूकीकडे बघितल्यास असे दिसते की, तृतीय वातानुकुलीत शयनयान दर्जाचे तिकीट आणि द्वितीय शयनयान तिकीटापेक्षा आडीचपटहून जास्त असते. द्वितीय वातानुकुलीत दर्जाचे तिकीट पावणेचार पट महाग असते. विमान प्रवास स्वस्त झाल्यामुळे अनेक ठिकाणी विमानाचे तिकीट लवकर बुक केल्यास द्वितीय वातानुकुलित तिकिटाएवढे पडते.

बसच्या प्रवासाकडे लक्ष दिल्यास असे दिसते की, वातानुकुलित आणि बिन वातानुकुलित तिकिटामध्ये केवळ २५% चा फरक आहे. याचा अर्थ काहीही कारण नसताना, केवळ राजकीय दबावापोटी रेल्वेने बिन वातानुकुलित आरक्षित तिकिटं काहीच्या काही स्वस्त ठेवली आहेत. त्यात आवश्यक ती वाढ करण्याचे धैर्य मोदी सरकारही दाखवू शकलं नाहीये.

अर्थात त्यांनी ते दाखवल्यास सरकार कसे गरीबविरोधी आहे हे विरोधी पक्ष आणि वृत्तमाध्यमं ओरडून ओरडून सांगतील. यावर उपाय म्हणून रेल्वेने हळू हळू एसी डब्यांची संख्या क्रमाक्रमाने वाढवत न्यावी. किंवा मग सगळेच डबे एसी करून सध्याचे भाडे आणि तृतीय वातानुकुलितचे भाडे यांच्या मध्यावर भाडे आणावे.

असे झाल्यास सामान्य प्रवाशांनाही तृतीय वातानुकुलितपेक्षा थोड्या कमी खर्चात सुखाचा प्रवास करता येईल आणि रेल्वेला होणाऱ्या तोट्यात घट होईल. अनारक्षित डबे वातानुकुलित नसल्यामुळे सामान्य प्रवाशांना आणखी स्वस्त प्रवासाचा एक तरी पर्याय उपलब्ध असेल. एसी डब्यांमुळे खिडकीतून कचरा फेकण्याचे प्रमाणही कमी होईल.

रेल्वे फलाटांवर रात्री झोपणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यात लांब अंतरावर प्रवास करणारे प्रवासी असतात तसेच परिसरात राहाणारे लोकही असतात. त्यांच्याकडूनही फलाटांवर अस्वच्छता केली जाते. त्यांच्याकडे मानवीय दृष्टीकोनातून पाहाणे आवश्यक असले तरी रेल्वे फलाटं हा काही कायमस्वरूपी निवारा होऊ शकत नाहीत. या बाबत रेल्वेने थोडी सक्ती दाखवायला हवी. स्वच्छ स्थानकांप्रमाणेच कोणती गाडी स्वच्छ आहे याबाबत रेल्वे मंत्रालय स्पर्धा आयोजित करत आहे. अशा उपक्रमांचे स्वागतच आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “रेल्वे स्थानकं स्वच्छ हवी आहेत…? मग गाड्या एसी करा…!

 • May 28, 2018 at 6:52 pm
  Permalink

  अगदी यथायोग्य निरीक्षण करून त्यावरील तोडगे वास्तविकता जपणारे असून श्री. अनय यांनी लिहिलेला लेख नक्कीच स्वागतार्ह आहे.

  Reply
 • May 29, 2018 at 8:12 pm
  Permalink

  गाड्या एसी केल्या तर फलाट स्वच्छ राहतील (कदाचित) पण गाड्या अस्वच्छ होतील (नक्की)…. सवयी आणि मानसिकता बदलणे हाच खरा उपाय.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?