' भाजपच्या आजच्या सर्व मुद्द्यांचा उगम असणारं : “राजीव पर्व” (जोशींची तासिका) – InMarathi

भाजपच्या आजच्या सर्व मुद्द्यांचा उगम असणारं : “राजीव पर्व” (जोशींची तासिका)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : अनिरुद्ध जोशी

===

“राजीव गांधी”. दिवंगत माजी पंतप्रधान. भारताला २१ व्या शतकाचे विकासाचे स्वप्न दाखवणारे तरुण व कल्पक पंतप्रधान विज्ञान व तंत्रज्ञानाला चालना देणारे व दूरसंचार क्रांती घडवून आणणारे नेते. तसेच पेपरलेस भारताचे आद्य जनक.

केवळ अपघाताने राजकारणात यावे लागलेल्या राजीव गांधी यांचा शेवटही अपघातानेच व्हावा, यासारखे दुर्दैव नसेल. भारताचे पहिले तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांचे राजकारणातील पदार्पण तसे खळबळजनकच ठरले. ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असे त्यांचे एका ओळीत वर्णन केले तर ते चुकीचे ठरणार नाही.

 

rajiv-gandhi-inmarathi
politicalwallpaper.blogspot.in

डिजिटल इंडिया, मेक इन इंडियाचा नारा देणारे मोदी सरकार जेव्हा सिलिकॉन व्हॅलीत डरकाळ्या फोडते, तेव्हा खरंच आमचीही छाती ५६ इंचाची होते. परंतु भारतात ज्यावेळी संगणक म्हणजे काय हे सर्वसामान्यांना माहिती नव्हते, तेव्हा राजीवजींनी ९० च्या  दशकात संगणक शक्तीची खरी ताकद ओळखली आणि प्रखर विरोधाला न जुमानता सर्वांना संगणक वापरता यावा यासाठी प्रयत्न केले़.

विशेष म्हणजे, त्यावेळी भाजपचे आधारस्तंभ असलेले अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी संगणकीकृत भारताच्या मार्गातील सर्वात मोठे अडसर होते.

खरे पाहता अपघाताने राजकारणात आलेले राजीव केंब्रिज विद्यापीठात अभियांत्रिकी पदवीच्या अभ्यासक्रमास होते़. मात्र, १९६६ मध्ये जेव्हा इंदिराजी पंतप्रधान झाल्या, तेव्हा त्यांना शिक्षण अर्धवट टाकून परतावे लागले़. नंतर १९७० मध्ये अधिकृतरित्या वैमानिकाचे प्रशिक्षण घेऊन ते एअर इंडियामध्ये रूजू झाले. एव्हाना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात पूर्वाश्रमीच्या एडविग अँटोनीया अल्बिना माईंनो म्हणजेच सोनिया गांधी आल्या होत्या. १९७० साली राहुल आणि १९७२ साली प्रियांका हे दोन फुले राजीव व सोनियांच्या संसारवेलीवर फुलले.

 

rajiv sonia rahul priyanka gandhi family inmarathi

 

या सर्व काळात भारतात प्रचंड राजकीय उलथापालथ होत होत्या़ पुढे इंदिराजींनी संजय गांधी यांच्या हट्टापायी आणीबाणी लादली़. नंतर विमान अपघातात संजय गांधींचा गूढ मृत्यू झाला़, तरीही राजीव कुठेच राजकीयदृष्टया सक्रिय नव्हते.

असे म्हटले जाते़ संजय गांधींच्या मृत्युपश्चात अनिच्छेने १७ आॅगस्ट १९८१ रोजी प्रथमच अमेठीतून लोकसभेची निवडणूक लढवून खासदार म्हणून राजीवजींनी संसदेत प्रवेश केला, परंतु त्यांचा राजकारणातला निरूत्साह बघून इंदिराजींंनी १९८२ साली भारतात झालेल्या एशियन गेम्सची धुरा राजीवजींवर टाकली आणि इथेच खरी सत्तेची ताकद त्यांनी अनुभवली.

आजही ज्या हिरव्या पांढऱ्या निमआराम बसेस रस्त्यावर फिरताना दिसतात, त्या ‘एशियाड गाडी’ म्हणून ओळखल्या जातात. कारण त्यांचा वापर एशियन गेम्समध्ये वाहतुकीसाठी केला गेला होता, आणि या सर्व एशियन गेम्सच्या व्यवस्थेवर राजीव गांधी मन लावून लक्ष घालत होते.

पुढे ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची ‘आॅपरेशन ब्लू स्टार’च्या पार्श्वभूमीवर निर्घृण हत्या करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने “राजकारणी राजीव गांधीं”चा जन्म इंदिराजींच्या चितेवरच झाला. देशात सगळीकडे शीख विरोधी दंगली उसळल्या असताना नुकतेच काळजीवाहू पंतप्रधान झालेल्या राजीवजींनी कायदा व सुव्यवस्थेविषयी बोलताना ‘हा जनक्षोभ कसा थांबवावा, हे तुम्हीच सांगा?’ असा पत्रकारांनाच केलेला प्रतिप्रश्न त्यांच्यातील सुप्त राजकारण्याचे दर्शन घडवण्यास पुरेसा होता.

त्यानंतर डिसेंबर १९८४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला ५४२ पैकी ४११ जागांवर विजय मिळवून भारताला आजवर लाभलेला सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून राजीव गांधींच्या नेतृत्वाला जनतेने स्वीकारले.

तिथून सुरू झाले ते खरे ‘विकासपर्व’ सर्वात पाहिले. राजकारणातला घोडेबाजार रोखण्यासाठी राजीवजींनी Anti Defection Law पास करवून घेतला जेणेकरून निवडून आल्यानंतर पुढील निवडणुकांपर्यंत कोणीही दलबदल करू शकणार नव्हते़. यामुळे भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला. तसेच देशात १९८६ ला सर्वप्रथम राष्ट्रीय शिक्षा धोरण जाहीर केले़, ज्याअंतर्गत देशात जवाहर नवोदय विद्यालये स्थापन झाले, तसेच उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावला जाईल यासाठी तरतुदी केल्या गेल्या.

आर्थिक नीतीबाबत देशात आता ‘ग्लोबलायझेशन’ हा शब्द आपण सर्रास वापरतो. परंतु मुक्त अर्थव्यवस्था हा शब्द देशाने प्रथम ऐकला तोही राजीवजींकडूनच. यात त्याकाळी रुजलेल्या लायसन्स राजला त्यांनी संपविण्याचे ठरवले़. आज मोदी नेहमी म्हणतात की, ‘मैं अनावश्यक कायदे बंद कर रहा हुँ’, पण त्याची खरी सुरुवात राजीवजींनी केली होती.

सामाजिक बाबतीतदेखील शहाबानो प्रकरणात राजीव गांधींनी स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून सुरुवातीला प्रयत्न केले़. घटस्फोटीत मुस्लिम महिलांना पोटगी मिळावी असेच त्यांचे मत होते़, पण त्यांच्याच पक्षातील तीव्र विरोधापुढे त्यांना झुकावे लागले.

तसेच आजही अधूनमधून ‘मंदिर वही बनायेंगे…’ अशा आरोळ्या ठिकाणाऱ्यांना हे माहीत नसावे की, अयोध्याप्रकरणी सर्वात प्रथम कोणी पाऊले उचलले असतील तर ते राजीव गांधींनीच.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार असे कळते की, राजीव गांधी १९८६ साली मालदिवमध्ये कुटुंबीयांसमवेत सुटीवर होते. तेव्हा त्यावेळच्या ब्रिफींग पद्धतीप्रमाणे गुप्तहेर यंत्रणा राजीवजींना देशातील घडामोडी सांगत असे. त्यात एका ब्रिफींगमध्ये अधिकाऱ्याने सहजपणे सांगितले की, जिल्हा सत्र न्यायालयाने राम मंदिराचे बंद दरवाजे उघडावेत असा निकाल दिला आहे़. राजीवजींनी हे ऐकून फोन ठेवला. थोड्याच वेळात गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांना फोन करून आदेश दिले की ‘कारवाई करून मंदिर दर्शनासाठी खुले करा आणि मी परत येईपर्यंत सर्व व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळा’.

आजही ‘राम मंदिर’ हा मुद्दा भाजप गोंजारते़, पण मुळात राजीव गांधीच यात सक्रिय होते, हे आज किती भाजपेयींना माहीत असेल?

 

rajiv-gandhi-portrait-inmarathi

 

राजीवजींनी नेहमी कडक परराष्ट्र धोरण राबवले – ज्यात LTTE विरुद्ध श्रीलंकेत Indian Peace Keeping Force (भारतीय शांतीसेना) श्रीलंकन सरकारच्या समर्थनार्थ पाठवली़, ज्याचे पर्यवसन त्यांच्या हत्येत झाले.

आज राजीवजींच्या हत्येला २७ वर्षे पूर्ण होत आहेत़ देशात भाजपचे कमळ अनेक ठिकाणी विकासाच्या नावावर फुलत असताना त्यांच्या मुख्य प्रचार-प्रसाराचे मुद्दे हे राजीवजींनीच निर्माण केलेले आहेत हे आज किती मोदीभक्तांना माहीत असेल?

संस्कृतमध्ये ‘राजीव’ म्हणजे ‘कमळ’च…! तेव्हा काँग्रेसने कमीत कमी दिवंगत नेते ‘विकासपुरुष राजीव’ यांच्या मार्गावर चालल्यास त्यांचेही भवितव्य नि:संशयपणे उज्ज्वल असेल.

आधुनिक भारताचे स्वप्न अधुरे सोडून गेलेल्या दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?