' गांधी घराण्याचा खुर्दा, इतर कॉंग्रेसी चिल्लर अन भाजपची बेडकी : भाऊ तोरसेकर – InMarathi

गांधी घराण्याचा खुर्दा, इतर कॉंग्रेसी चिल्लर अन भाजपची बेडकी : भाऊ तोरसेकर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

झुंडीतली माणसं   (लेखांक एकविसावा)

===

कर्नाटकात भाजपाने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नेमून घेण्याचा आततायीपणाच केला होता. कारण त्यांच्यापाशी बहूमत नव्हते आणि अन्य दोन मोठ्या पक्षाचे आमदार फ़ोडल्याशिवाय येदीयुरप्पांना बहूमत सिद्ध करणेच अशक्य होते. पक्षांतर विरोधी कायद्यामुळे अशा रितीने आमदार फ़ोडणे सोपे राहिलेले नाही. निकाल लागताच कॉग्रेसने घाईगर्दी करून सेक्युलर जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठींबा घोषित केलेला होता.

थोडक्यात त्यानंतर भाजपाने उचललेले पाऊल जुगार होता आणि तो यथावकाश फ़सलेला आहे. त्यात नवे काही नाही. अनेक मुख्यमंत्र्यांना व पक्षांना अशी नाचक्की सहन करावी लागलेली आहे.

म्हणूनच भाजपाने आपली अब्रु गमावलेली असली, तरी त्याचे देशव्यापी राजकीय आव्हान संपुष्टात आले, असे समजणे मुर्खाच्या नंदनवनातील वास्तव्य आहे. पण विचारवंत वा पत्रकारही भाजपाच्या पराभवासाठी इतके उतावळे झालेले होते, की जे काही घडले त्याची योग्य मिमांसा होऊ शकलेली नाही. प्रामुख्याने अशा झटपट आघाड्या यापुर्वी काय परिणाम देणार्‍या ठरलेल्या आहेत? त्याचा संदर्भ जोडून विचार करण्याचीही गरज विश्लेषक म्हणवणार्‍यांना होऊ नये, ही बाब गंभीर आहे. बस्स!

आजचा सामना कॉग्रेसने जिंकला वा भाजपाचे नाक कापले गेले, यावरच प्रत्येकजण खुश आहे. असायलाही हरकत नाही. कारण विजय हा विजय असतो आणि आजचा विजय अवर्णनीय असतो.

पण त्याचे दुरगामी परिणाम खेळात नसले तरी राजकारणात मोठे विचित्र असतात आणि त्याची मिमांसा म्हणूनच आवश्यक असत्ते. तर ती मिमांसा दुर राहिली आणि भलतेसलते निष्कर्ष काढण्यापर्यंत अभ्यासकांची मजल गेली असेल, तर त्यांची हजेरी अगत्याने घ्यावी लागते. कर्नाटकातून आता मोदीलाट वा भाजपाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे निष्कर्ष काहीसे असेच आहेत.

 

modi-inmarathi
ndtv.com

शनिवारी हे नाट्य रंगलेले होते आणि येदींनी राजिनामा दिला, तेव्हा मी एबीपी माझा वाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झालेला होता. इतरांच्या सोबत त्यात राज्यशास्त्र विषयाचे अभ्यासक प्राध्यापक सुहास पळशीकरही सहभागी झालेले होते. त्यांनीही कर्नाटकाचा प्रभाव डिसेंबर महिन्यात होणार्‍या तीन विधानसभा मतदानावर पडण्याचा निष्कर्ष अतिरेकी असल्याची ग्वाही दिलीच. पण लोकसभेच्या मतदानावर प्रभाव पडेल, असे मान्य करण्यास नकार दिला. बहूधा अनुभवातून पळशीकर खुप काही शिकले असावेत.

तब्बल दोन दशकापुर्वी हे भाजपा विरोधाचे नाट्य भारतीय राजकारणात सुरू झाले, बिगरभाजपा हे पुरोगामी राजकारणाचे सुत्र कधीच नव्हते किंवा समविचारी राजकीय पक्षांची आघाडी, असा भारतीय राजकारणाचा प्रवाह कधीच नव्हता.

१९९० पुर्वी भारतातील राजकारण कॉग्रेसी व बिगरकॉग्रेसी अशाच रितीने चालत होते. तेव्हा भाजपा अस्पृष्य नव्हता. राजीव गांधी व कॉग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्यासाठी तमाम पुरोगामी पक्षांनी भाजपाशी जागावाटप करून १९८९ च्या लोकसभा निवडणूका लढवल्या होत्या. तर महान पुरोगामी संत विश्वनाथ प्रताप सिंग यांनी डावी आघाडी व भाजपा अशा दोन कुबड्या घेऊनच सरकार बनवलेले होते.

त्यावेळी सर्व पुरोगाम्यांच्या मतांची वा निवडून आलेल्या जागांची बेरीज कोणी मांडली नव्हती, की आज पुरोगामी बेरजा मांडणार्‍यांना तसले गणित अवगत झालेले नव्हते.

पुढे १९९६ सालात भाजपा स्वबळावर लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष झाला. मग त्याला सत्तेपासून रोखण्याच्या नादात पुरोगामी मतांच्या बेरजेच्या नव्या गणितशास्त्राचा शोध भारतीय राजकीय अभ्यासकांनी लावला,. पुढे ते गणित अधिक विकसित होत गेले आणि आजकाल कोणीही भुरटा अभ्यासक त्याची समिकरणे मांडून भाजपाला पन्नास टक्के मते नसल्याचे नवनवे सिद्धांत मांडत असतो.

या निमीत्ताने भाजपाचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा कालखंड आठवला. १९९८ सालात भाजपाने दुसर्‍यांदा वाजपेयी सरकार स्थापन केले, तेव्हा त्यात अनेक पुरोगामी पक्षांचा सहभाग होता. एनडीए आघाडी स्थापन झाली तरी तिच्यापाशी बहूमत नव्हते आणि त्यांना पडणारी तुट भरून काढण्यासाठी पुरोगामी तंबूला टांग मारूनच चंद्राबाबू नायडू एनडीएत दाखल झालेले होते. मात्र तेही सरकार फ़ारकाळ चालू शकले नाही. १९९८ सालात लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली असताना सोनिया गांधी पुढे सरसावल्या व घरकाम सोडून त्यांनी राजकारणात उडी घेतली.

 

sonia-gandhi-inmarathi
4to40.com

प्रथमच त्या कॉग्रेसी मंचावर आल्या आणि आपल्या मोडक्या हिंदीत काही भाषणे त्यांनी केली होती. इंदिराजींच्या सुनेचा प्रभाव जनमानसावर होता आणि त्यामुळे मते मिळाली नाहीत तरी सोनियांविषयीचे कुतूहल लक्षात आले. लवकरच त्यांनी पक्षाची सुत्रे हाती घेतली व सीताराम केसरी यांना अक्षरश: ढुंगणावर लाथ मारून पक्षाच्या मुख्यालयातून पळवून लावण्यात आले. सोनियांच्या अराजकीय प्रवेशाने देशातले अनेक विचारवंत व राजकीय अभ्यासक असेच सुखावले होते आणि आता पुन्हा कॉग्रेसचा जिर्णोद्धार झाल्याचे भास त्यांना झालेले होते.

मोदी नावाचा कोणी नेता राजकीय क्षितीजावर उगवलाही नव्हता तेव्हाची ही गोष्ट आहे. हा काळ इतक्यासाठी आठवतो, की सोनियांना बंदा रुपया ठरवताना गोविंदराव तळवलकर यांच्यासारख्या अभ्यासू संपादकाची बुद्धीही काम करीनाशी झाली होती.

त्यांनी सोनियांच्या स्वागतासाठी तेव्हा लिहीलेल्या प्रदिर्घ लेखाचे शीर्षकही बोलके व नेमके होते, ‘खुर्दा आणि चिल्लर!’ महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार मैफ़ल पुरवणीत तो लेख प्रसिद्ध झाला होता आणि त्याचा आशय सोनियांच्या कॉग्रेस समोर बाकीचे सर्व पक्ष वा नेते म्हणजे चिल्लर असाच होता. अर्थात त्यामुळे कॉग्रेसला १९९९ ची लोकसभा जिंकता आली नाही, की संसदेत मोठा पक्ष होणेही शक्य झाले नव्हते.

१९९९ या तेराव्या लोकसभा निवडणूकीत भाजपाला १८२ जागा मिळाल्या होत्या आणि कॉग्रेसला अवघ्या १२२ जागा जिंकणे शक्य झालेले होते. सोनियांना त्यापुर्वीच्या नरसिंहराव किंवा केसरींच्या कारकिर्दीत मिळाल्या तितक्या, म्हणजे १४० जागाही कॉग्रेसला मिळवून देता आल्या नाहीत. थोडक्यात सोनियांनी कॉग्रेसलाच चिल्लर करून टाकले होते. तळवलकरांविषयी कितीही आदर असला, तरी तेही इतके भरकटत गेले हे इथे मुद्दाम नमूद करणे भाग आहे.

नेहरू खानदानातच भारताचा नेता जन्माला येतो, अशा पुरोगामी विचारधारेचा तो प्रभाव होता. त्याचेच असले विचारवंत बळी असतात. एकदा तो प्रभाव स्विकारला, मग त्यातल्या सर्व प्रकारच्या खुळेपणाला युक्तीवादाने समर्थन देणे शक्य होत असते.

गोविंदरावही तसेच भरकटलेले होते. मात्र तेच एकटे नव्हते. शनिवारच्या एबीपी कार्यक्रमात सहभागी असलेले पळशीकरही त्यापैकीच एक आहेत. आता ते मोदीलाट वा भाजपाप्रभावाला पायबंद घालण्याच्या चर्चेत सहभागी होत असतात. पण १९९९ च्या सुमारास त्यांचे भाजपा वा राजकीय घडामोडींविषयी काय आकलन होते? १९९८ च्या निवडणूका लागल्या, तेव्हा निवडणूकांचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्र टाईम्सने त्याचाही प्रदिर्घ लेख प्रकाशित केला होता. त्याचे शीर्षक आठवत नाही. पण एकाजागी त्यांनी विस्तारणार्‍या भाजपाविषयी केलेली टिप्पणी पक्की स्मरणात राहिलेली आहे.

तेव्हा विसर्जित लोकसभेत भाजपाची सदस्यसंख्या १८० च्या आसपास होती आणि कितीही आटापिटा केला तरी भाजपाच्या विस्ताराला मर्यादा असल्याचे विश्लेषण करताना पळशीकरांनी वापरलेले शब्द नेमके लक्षात राहुन गेलेले आहेत. बेडकी फ़ुगून फ़ुगणार किती? तिचा बैल होऊ शकत नाही, असेच शब्द त्यांनी लिहीले होते आणि शनिवारी तेच पळशीकर २०१९ मध्ये त्या बैलाला कसा व कोण रोखणार, याविषयी चर्चा करीत होते.

 

vasant-palshikar-inmarathi
indianexpress.com

जेव्हा ही चवली-पावली चिल्लर किंवा बेडकी बैलाची गोष्ट आळवली जात होती, तेव्हा नरेंद्र मोदी नावाचा माणूस कुठली निवड्णूकही लढलेला नव्हता, की त्यासाठी उत्सुकही नव्हता. तो संघाचा प्रचारक म्हणून भाजपात दाखल होऊन संघटनात्मक कामात गर्क होता. गुजरात विधानसभेत बहूमत असूनही भाजपाचे नेते गुजरात चालवू शकले नाहीत. म्हणून तीन वर्षानंतर मोदींना जबरदस्तीने मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले आणि पुढला इतिहास नव्या पिढीलाही तोंडपाठ आहे.

बघता बघता त्याने गुजरात आपल्या प्रभावाखाली आणला आणि भाजपाच्या जुन्याजाणत्या नेत्यांना मागे टाकून भारताचा जबरदस्त प्रभावशाली नेता होण्यापर्यंत मजल मारली.

त्याची राजकीय वाटचाल देशाचा नेता होण्याच्या दिशेने चालली आहे, त्याचा थांगपत्ता ज्यांना लागू शकला नाही, त्यांना या कालावधीत राजकीय विश्लेषक अभ्यासक म्हणून ओळखले गेले किंवा नावाजले गेले. किंबहूना अशा दिडशहाण्यांमुळे व त्यांच्या आहारी गेलेल्या राजकीय पक्ष व नेत्यांमुळे मोदींचा प्रभाव देशव्यापी होत गेला. भाजपाला बेडकी म्हणून हिणवणार्‍यांना आता त्याच बेडकीचा मस्तवाल बैल कसा आवरावा, त्याची चिंता शांतपणे झोपूही देईनाशी झाली आहे. खरोखरच या शहाण्यांना राजकीय अभ्यास करता आला असता, किंवा योग्य विश्लेषण करता आले असते, तर एकविसाव्या शतकाच्या आरंभीच नवा तारा राजकीय क्षितीजावर उगवल्याचे कशाला कळू शकले नाही?

कारण यापैकी कोणीही खरा अभ्यासक नाही, तर पत्करलेल्या राजकीय विचारधारेत प्रवाहपतित झालेल्यांचा हा कळप आहे.

त्यांना आधीचे आठवत नाही की भविष्यातल्या दिशाही उमजत नाहीत. म्हणून मग कर्नाटकात एक किरकोळ घटना घडली तर त्यावरून देशाच्या राजकीय भविष्याची भाकिते उथळपणे केली जात असतात. अकस्मात कॉग्रेसने कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद दिले, तर त्यात त्यांना राष्ट्रीय बिगरभाजपा आघाडी स्थापन झालेली दिसू लागते.

खरेतर स्वातंत्र्योत्तर साठ वर्षात अशा आघाड्य़ांचे शेकड्यांनी प्रयोग झाले आहेत आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या अशा लहानसहान पक्ष व नेत्यांनी जनतेचा विश्वास प्रत्येकवेळी उधळून लावलेला आहे. पुर्वी त्यात भाजपाचाही समावेश होता आणि मोदींच्या आगमनानंतर त्यांनी कॉग्रेसमुक्त म्हणत आपणच कॉग्रेसची जागा व्यापण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे आजची परिस्थिती आलेली आहे. भाजपा विरोधातील आघाडी याचा अर्थच १९६०-८० च्या कालखंडातील बिगरकॉग्रेस आघाडीचा जुना प्रयोग आहे. त्यातले नेते व पक्षांची नावे बदललेली असली, तरी तशीच्या तशीच मानसिकता कायम आहे. तेव्हा कॉग्रेसला एकत्र येऊन हरवण्याच्या आणाभाका घेतल्या जात असत आणि आजकाल भाजपाला पायबंद घालण्याच्या गमजा केल्या जातात. नेहरू इंदिराजींचा अश्वमेध रोखण्याच्या डरकाळ्या नव्या नाहीत. मग मोदी विरोधात फ़ोडल्या जाणार्‍या डरकाळ्यांचा परिणाम कितीसा असेल?

 

gandhi-inmarathi
dawn.com

ते शक्य असते तर नितीशकुमार यांना मोदींच्या वळचणीला येऊन बसावे लागले नसते, की कर्नाटकात सुद्धा भाजपा सर्वात मोठा पक्ष होऊ शकला नसता. निवडणूकपुर्व आघाडी कॉग्रेस व देवेगौडांमध्ये झाली असती, तर भाजपा तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला गेला असता.

परंतु मोदी विरोधाच्या आधी आपले नजिकचे प्रतिस्पर्धी मोठे होण्याचा भयगंड या पक्षांना वा नेत्यांना सतावत असतो. कॉग्रेस देवेगौडांना भाजपाची बी टीम म्हणून हिणवत होती आणि निकाल लागल्यावर तीच बी टीम पुरोगामी असल्याचा साक्षात्कार कॉग्रेसला झाला. त्यात चमत्कार कुठलाच नाही, सत्तालोलूप नेत्यांना असे साक्षात्कार नेहमी होत असतात. पण त्या पुरोगामी चमत्कारांनी भारावलेल्या पत्रकार विचारवंताची बुद्धीही गहाण पडते त्याचे काय?

काही महिन्यात हे भुरटे एकमेकांच्या उरावर बसणार, हे ओळखण्याची ज्यांची कुवत नाही, त्यांना आपण अभ्यासक समजलो तर आपलीही दिशाभूल होणारच ना?

त्या काळात नेहरू इंदिराजींना पराभूत करण्याच्या इर्षेने पेटलेल्या नेते व पक्षांच्या पायजम्याची नाडी नेहरू इंदिराजींचा विरोध इतकीच होती. जोवर ती नाडी घट्ट बांधलेली असायची, तोपर्यंतच अशा आघाड्या वा एकजुटीचा पायजमा जागेवर असायचा. ती नाडीची गाठ सुटली, मग केव्हाही पुरोगामी विरोधाचे नाटक उघडे पडायचे, आजही पडतच असते. फ़रक फ़क्त मुख्य राष्ट्रीय पक्षामध्ये झालेला आहे. तेव्हा बिगरकॉग्रेसी आघाडी असायची आणि आता तिला पुरोगामी समविचारी आघाडी म्हटले जाते. तेव्हा त्यात जनसंघ किंवा आजचा भाजपाही एक भागिदार असायचा. आज ती जागा कॉग्रेसने घेतली आहे.

सहाजिकच कॉग्रेस पुरोगामी झाली आहे आणि त्या काळात भाजपा वा जनसंघ प्रतिगामी वगैरे नसायचा. हा सगळा भंपकपणा आहे. आपापल्या राजकीय मतलबासाठी हे पक्ष व नेते राजकीय लाचार विचारवंतांशी खेळत असतात आणि आपल्याला अभ्यासक विचारवंत म्हटले जाण्यासाठी असे दिवाळखोर शहाणे पुरोगामीत्वाची झुल पांघरून बुजगावणी होऊन शेतात उभी असतात.

कर्नाटकच्या राजकीय नाट्यानंतर अशा बुजगावण्यांचे विश्लेषण म्हणूनच २०१९ पर्यंत टिकणारे नाही. कारण देवेगौडा असोत किंवा कॉग्रेस असो, त्यांना या विचारवंत अभ्यासकांच्या अब्रुची फ़िकीर नाही. त्यांचे आपापले राजकीय स्वार्थ साधून घेण्याला प्राधान्य आहे. सहाजिकच जेव्हा त्या स्वार्थाला धक्का लागताना दिसेल, तेव्हा अशा आघड्य़ांचा बोजवारा उडायला वेळ लागत नसतो. हे नितीशकुमार यांनी बारा तासात सत्तांतर घडवून सिद्ध केलेले आहेच ना?

रिपब्लिकन नेते ददासाहेब गायकवाड वा नंतरच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, युती आघाडी ही गाजराची पुंगी असते. वाजली तर ठिक नाहीतर मोडून खायची. कर्नाटकची पुंगी अभ्यासकांनी कितीही जीव ओतून फ़ुंकली, म्हणून फ़ार काळ वाजण्याची बिलकुल शक्यता नाही.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

bhau-torsekar has 26 posts and counting.See all posts by bhau-torsekar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?