' आपल्याला एखाद्या पदार्थाची ऍलर्जी का होते? ऍलर्जी म्हणजे नक्की काय? जाणून घ्या… – InMarathi

आपल्याला एखाद्या पदार्थाची ऍलर्जी का होते? ऍलर्जी म्हणजे नक्की काय? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही वर्षांपूर्वी ऍलर्जी हा आरोग्याच्या क्षेत्रातला अज्ञात प्रदेश होता. ती नेमकी कशी होते हे माहीत नव्हते म्हणून तिला अल्लाकी मर्जी असे म्हटले जात असे. पण आता हा विकार आटोक्यात आला आहे. त्याची चांगली माहितीही झाली आहे.

ऍलर्जी अन्नाची, कुत्र्या-मांजरांची, धुळीची, धुराची, फुलांमध्ये असलेल्या परागकणांची, सेंटची, सौदर्य प्रसाधनांची, झुरळांची, एखाद्या विशिष्ट किड्याची, स्वयंपाकघरातल्या बुरशीची अशी कशाचीही असू शकते.

तसेच ती एखाद्या खाद्यपदार्थाला किंवा एखाद्या औषधाला एखाद्या इंद्रियाने किंवा शरीराने दिलेली प्रतिक्रिया असू शकते.

ही प्रतिक्रिया सामान्य नाही. इंद्रियांमध्ये या घटकांचा सामना करता येईल एवढी प्रतिकार शक्ती नसते. ती इंद्रिये त्या विशिष्ट घटकाप्रती अती संवेदनशील असतात. त्यामुळे या घटकांचा त्या विशिष्ट अवयवावर जो काही परिणाम होतो तो म्हणजे ऍलर्जी.

त्या विशिष्ट माणसाला इतर कोेणतीही प्रतिकूलता सहन होते पण त्या विशिष्ट गोष्टीचेच वावडे असते.सर्वसामान्यपणे ऍलर्जी नाक, डोळे, श्वसनप्रणाली, त्वचा आणि खाण्यापिण्याच्या सवयींशी निगडित असते.

काही लोकांना त्वचेवर काही डाग दिसायला लागतात. मात्र कधीकधी संपूर्ण शरीराला कशाची तरी ऍलर्जी होऊ शकते. ती गंभीर ठरू शकते.

Allergy-inmarathi

अवयवांनुसार ऍलर्जीची लक्षणे –

नाकाची ऍलर्जीनाकात खाज सुटणं, शिंका येणं, नाक वाहणं, नाक बंद होणं किंवा वारंवार सर्दी होणं.

डोळ्यांची ऍलर्जी : डोळे लाल होणं, डोळ्यातून पाणी येणं, जळजळ होणं, डोळे खाजणं.

श्वसनसंस्थेची ऍलर्जी : यामध्ये खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, आणि अस्थमा असे गंभीर आजार होऊ शकतात.

त्वचेशी निगडित ऍलर्जी : त्वचेची ऍलर्जी खूप कॉमन आहे आणि पावसाळा त्वचेच्या ऍलर्जीसाठी खूप पोषक असतो. यात अंगाला खाज येणं, एक्झिमा, पित्त उठणं, पुरळ येणं याचा समावेश होतो.

संपूर्ण शरीराची ऍलर्जी : कधीकधी काही लोकांमध्ये ऍलर्जीचा गंभीर परिणाम दिसून येतो. सर्व शरीर विविध खुणा दाखवू लागते.अशा रुग्णाच्या घशावर लक्ष ठेवा. तिथे त्रास सुरू झाला की, त्याची वाटचाल गंभीरतेकडे होत असते. अशा वेळी रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाणे उत्तम.

 

hives-inmarathi

 

ऍलर्जीची कारणे –

खाद्यपदार्थांची ऍलर्जी : खूप लोकांना खाण्यापिण्याच्या विशिष्ट गोष्टींची जसे की अंडे, दूध, मासे, कॅडबरी, चॉकलेट अशा पदार्थांची ऍलर्जी असते.

औषधांची ऍलर्जी : कितीतरी विदेशी औषधे काही जणांच्या ऍलर्जीचं कारण बनू शकतात. काही जणांना पेनिसिलिनचं इंजेक्शन चालत नाही. त्यावर त्यांचे शरीर गंभीर प्रतिक्रिया देऊ शकते.

याशिवाय पेन किलर म्हणून वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, अँटी बायोटीक गोळ्यादेखील काहींना चालत नाहीत. या गोळ्या घेतल्यास त्यांना गंभीर स्वरूपाच्या ऍलर्जीला तोंड द्यावे लागते.

धुळीची ऍलर्जी : भारतात सर्वसामान्यत: आढळणारी ऍलर्जी आहे ती धुळीची. दर हजार लोकांमागे एकाला ही ऍलर्जी असते. असे लोक घर झाडायला काढतात तेव्हा त्यांनी झाडताना नाकाला घट्ट रुमाल बांधला नाही तर झाडणे संपल्यावर त्यांना सटासट शिंका यायला लागतात.

घरातले पडदे बरेच दिवस झाले तरी झटकले नसतील आणि ते काम हाती घेतले असेल तर त्यांना त्या झटकण्यानेही त्रास सुरू होतो.

काही लोकांना तर उशांच्या खाली साचलेल्या किरकोळ धुळीनेही त्रास व्हायला लागतो.

बुरशीची ऍलर्जी : आपल्या घरात काही जागा कायम ओलसर आणि दमट असतात. त्या जागांवर काही प्रमाणात बुरशी साचलेली असते. अशा बुरशीचीही काही लोकांना ऍलर्जी असते

 

dust-ellergy-inmarathi

 

मधमाशी किंवा कीटक चावल्याने होणारी ऍलर्जी : यामुळे सुद्धा काही लोकांना ऍलर्जी होते. काही लोकांच्या अंगावर सूज चढते, तर काहींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते.

पाळीव प्राण्यांची ऍलर्जी : काही लोकांना पाळीव प्राण्यांची फार हौस असते. काही जण कुत्रे पाळतात. काही मांजरी पाळतात. अशा प्राण्यांच्या शरीरातल्या काही प्रथिनांमुळे किंवा त्यांच्या शरीरावरील केसांमुळे त्यांच्या मालकांना त्रास होऊ शकतो.

घशाची खवखव होणे आणि क्वचित अस्थमा होणे हे या प्रकाराच्या ऍलर्जीचे परिणाम असतात.

फुलांची ऍलर्जी :  काही लोकांना फुलांंची ऍलर्जी असते. पण ती खरे तर फुलांची ऍलर्जी नसून फुलातल्या परागकणांची ऍलर्जी असते. या ऍलर्जीत शिंका येतातच पण डोकेदुखी आणि घशात खवखव होेणे हे त्यांचे वैशिष्ट्य असते.

सौंदर्यप्रसाधनांची ऍलर्जी : काही महिलांना सौंदर्यप्रसाधनांची ऍलर्जी असते. वावडे असलेले सौंदर्य प्रसाधन वापरले की त्या भागावर लाल चट्टा पडणे, सूज येणे किंवा तो भाग कोरडा पडणे असे त्रास सुरू होतात.

काही वेळा खाजही सुटते. काही सेंट काही लोकांना त्रासदायक ठरतात. त्यांचा सुगंध येताच त्यांना ढास लागते. काही वेळाने डोकेही दुखायला लागते.

साबणाची/ पावडरची ऍलर्जी : वावडे असलेला साबण किंवा पावडर वापरली की अंगावर पुरळ येते किंवा हाताची साले निघतात. त्वचा कोरडी होते.

 

rashes-inmarathi

 

ऍलर्जी पासून कसे वाचाल :

आपल्याला ज्या गोष्टींची ऍलर्जी आहे त्या गोष्टी टाळणे हाच ऍलर्जीपासून वाचण्याचा मार्ग आहे.

★ जर तुम्हाला ऍलर्जी असेल तर ती कसली आहे हे सर्वप्रथम कळायला हवं. त्यासाठी आपण काय केल्यावर किंवा खाल्ल्यावर किंवा कुठे गेल्यावर आपल्याला काय त्रास होतो हे पहा.

★ घराच्या आसपास घाण नाहीये ना यावर लक्ष ठेवा. असल्यास ती दूर करण्यासाठी योग्य त्या अधिकाऱ्यांना सूचना द्या.

★ घरात अधिकाधिक मोकळी आणि ताजी हवा येईल असे पहा.

★ज्या खाद्यपदार्थांची ऍलर्जी आहे ते खाऊ नका.

★ बाईक चालवताना तोंडावर आणि नाकावर रुमाल बांधा. गॉगल घाला..

★ चादरी, उशांचे अभ्रे, पांघरूण नियमितपणे गरम पाण्याने धुवुन घेत जा.गाद्या, तक्के, रजई याना वेळोवेळी ऊन दाखवा.

★पाळीव प्राण्यांची ऍलर्जी असल्यास ते घरात आणू नका.

★ फुलांच्या परागकणांची ऍलर्जी असल्यास त्या फुलझाडांपासून दूर रहा.

★ घरात कोळीष्टके लागू देऊ नका. नियमितपणे जळमटे काढा.

★ धुळीची ऍलर्जी असेल आणि तुम्हाला धुळीच्या वातावरणात काम करावे लागत असल्यास फेस मास्क घालूनच काम करा.

★ नाकाची ऍलर्जी : ज्या लोकांना नाकाची ऍलर्जी सतत होते त्यांनी सकाळी अनशेपोटी एक चमचा गुळवेल सत्त्व किंवा गुळवेलीचा काढा आणि 2 चमचे आवळ्याचा रस एक चमचा मध घालून काही काळ घ्यावा.

याने नाकाच्या ऍलर्जी पासून मुक्ती मिळते. थंडीत घरी बनवलेला किंवा कोणत्याही चांगल्या कंपनीचा च्यवनप्राश खाणेसुद्धा नाक आणि श्वासाच्या ऍलर्जीपासून वाचवण्यास मदत करतो.

तसेच सितोपलादि चूर्ण आणि गुळवेल सत्त्व 1-1 ग्राम सकाळ संध्याकाळ उपाशी पोटी घेण्याने सुद्धा नाक आणि श्वसनसंस्थेची ऍलर्जी बरीच कमी होते.

ऍलर्जीजन्य रोगांना विदेशी औषधे प्रतिबंध तर करतात, पण त्या आजाराला मुळापासून बरं करू शकत नाहीत. मात्र आयुर्वेदिक औषधे नित्यनियमाने घेतली तर त्यांच्यात रोगांचे समूळ उच्चाटन करण्याची क्षमता असते.

सर्व ऍलर्जीक रोगांमध्ये तुमचा आहार योग्य असणे हे आवश्यक आहे. त्यामुळे शरीर सुदृढ राहते आणि शरीराची प्रतिकारशक्ती जास्त असते. यामुळे ऍलर्जीशी लढण्याची ताकद शरीरात असते आणि आपण तशा रोगांचा सामना करू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?