' अचाट अफाट "वंडर" रिक्षा चालवणारा सलमान-संजयचा लाडका "बांद्र्याचा राजा"

अचाट अफाट “वंडर” रिक्षा चालवणारा सलमान-संजयचा लाडका “बांद्र्याचा राजा”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

असं म्हणतात की,

“तुमची काम करण्याची वेगळी पद्धत तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवत असते. तुमची वेगळी ओळख घडवत असते. आणि मग ती तुमच्या नावाशी जोडली जाते ती कायमचीच. ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनते.”

मुंबईतील रिक्षाचालक संदीप बच्चे यांचं व्यक्तिमत्त्व या वाक्याला साजेसं आहे.

ते खार आणि बांद्रा दरम्यान रिक्षा चालवतात. इथे राहणारा प्रत्येक जण त्यांच्याच रिक्षाने प्रवास करू इच्छितो, यातच त्यांचं यश सामावलेलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एवढंच नाही तर सलमान खान आणि संजय दत्तसारखे मोठे अभिनेते सुद्धा त्यांच्या रिक्षातून प्रवास करतात.

 

Sb-inmarathi

 

आपण जसं टॅक्सी किंवा कॅबचं ऍडव्हान्स बुकिंग करतो तसंच यांच्या रिक्षाचं सुद्धा ऍडव्हान्स बुकिंग केलं जातं. तर अशा या संदीप बच्चेची गोष्ट….

१९५० च्या दशकातील एखाद्या ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाला साजेशी आहे.

वयाच्या १३ व्या वर्षी काम करायला सुरुवात :

संदीप बच्चे यांचा जन्म ३१ डिसेंबर १९७८ ला बांद्रा येथे झाला. पाच भावंडांमध्ये हे चौथे.

शरीरयष्टी चांगली असल्याने दिसायला सगळ्यात मोठे वाटत असत. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.

इतकी की प्रत्येकाला शाळेत जाताना घालायला वेगवेगळी चप्पल सुद्धा नसायची.

मग एक ठिकाण ठरवून ते आणि त्यांची बहीण भेटत. शाळेत जाणाऱ्याला घालायला चप्पल मिळे आणि घरी परतणार व्यक्ती अनवाणी जाई.

त्यांनी शाळेत असताना National Cadet Corps (NCC) चं दोन वर्षं प्रशिक्षण घेतलं होतं. पण तिसऱ्या वर्षासाठी भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते.

त्यामुळे त्यांना ते सोडावं लागलं. पण ते म्हणतात, की “मला रिक्षा चालवणं देखील आवडतं. ही सुद्धा माझ्या दृष्टीने समाजसेवाच आहे.” वडील मिल रिटायर्ड.

त्यामुळे त्यांनी दहावीनंतर शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि घरखर्चाचा काही भाग आपल्या शिरावर घेत एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत शिपायाची नोकरी धरली.

१९९१ ते १९९८ तिथे नोकरी केल्यानंतर १९९९ ला ती कंपनी बंद पडली. त्यामुळे त्यांना काही काळ बेरोजगारीचा सामना करावा लागला.

त्यांनी काही ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण मनासारखी नोकरी मिळेना.

तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण स्वतःच काहीतरी नवीन काम करायला सुरुवात करावी.

त्यातच एक प्रसंग असा घडला की तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेला. आणि त्यांनी रिक्षाचालक होण्याचा निर्णय घेतला.

 

sandeep bacche inmarathi

 

झालं असं की, त्यांच्या वडिलांचं गुडघ्याचं ऑपरेशन केलं होतं. त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी खूप तारेवरची कसरत करावी लागे.

त्यात एक दिवस दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं घडलं. रिक्षावाल्यांचा संप होता आणि वडिलांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. कोणतीच रिक्षा त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला तयार होईना.

त्यांनी खूप मिनतवाऱ्या केल्या. अनेक रिक्षावाल्यांच्या समोर हात जोडले की माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेऊन परत घरी आणून सोडा.

काही रिक्षावाले तयार झाले पण – तोंडाला येईल ते भाडं सांगायला लागले…!

शेवटी चारेक तास रस्त्यावर उभं राहिल्यावर त्यांना अखेर योग्य दरात सोडेल अशी रिक्षा मिळाली. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या वडिलांवर इलाज करता आले.

हे ही वाचा रिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट ‘मातोश्री’वर असलेलं वजन! एक प्रेरणादायी प्रवास

हा प्रसंग घडला आणि त्यांच्या मनात एक विचार चमकून गेला की तशीही नोकरी गेलीच आहे तर आपणच रिक्षा चालवायला घेतली तर?

त्यांना वाटलं, आज माझ्यावर ओढवलेला प्रसंग किती जणांच्या बाबतीत होत असेल…

आपण खूप मोठा बदल घडवून आणू असं नाही पण आपल्या परीने आपण लोकांना रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारापासून वाचवू शकू आणि त्यांनी रिक्षा चालवायचा निर्णय घेतला.

आणि जन्म झाला “वंडर ऑटो रिक्षा” चा…!

 

 

अशी आली वंडर ऑटो रिक्षाची आयडिया

संदीप आधी ज्या ट्रॅव्हल्स कंपनी मध्ये शिपायाची नोकरी करत, तिथले त्यांचे बॉस त्यांच्या कामावर खूष असायचे. जर कोणत्या अधिकाऱ्याला बाहेर जायचे असेल तर ते त्यांनाच घेऊन जात.

त्यामुळे त्यांना घरी पोचायला खूप उशीर होत असे.

अधिकारी आपापल्या गाड्यांतून घरी जात. संदीप यांना तेव्हा रुपये चाळीस इतका प्रवास+रात्रीच्या जेवणाचा भत्ता मिळत असे. शिवाय त्यांना सकाळी लवकर येऊन ऑफिस उघडावे सुद्धा लागत असे.

त्यावेळी कंपनीच्याच काही लक्झरी बसेस रात्री ऑफिसच्या बाहेर लागत असत. मग असा उशीर झाला की ये-जा टाळण्यासाठी आणि पैसे वाचविण्यासाठीे संदीप त्या बसमध्येच रात्रीचे झोपत असत.

सकाळी उठून वेळेत ऑफिस उघडत. ते ज्या बसमध्ये झोपत त्यामध्ये टीव्ही, वर्तमानपत्र, चहा, इंटरनेट आणि फोन,अशा सुविधा होत्या.

त्यामुळे जेव्हा त्यांची कंपनी बंद पडल्याने त्यांनी रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला त्यांनी ठरवलं की या सगळ्या सोयी सुविधा आपल्याही रिक्षात असतील.

या आहेत वंडर ऑटो रिक्षातील सोयी :

तुम्ही या रिक्षामध्ये शिरत नाहीत तोच तुम्हाला आपण कोणीतरी VIP असल्याचा फील ही रिक्षा तुम्हाला देते. कारण यात काहीच इतर सर्वसामान्य रिक्षांसारखं तुमच्या नजरेस पडत नाही.

तुम्हाला जायचं त्या ठिकाणी या रिक्षामधून पोहचेपर्यंत तुम्ही या रिक्षाचे फॅन झालेला असता.

कारण तुमचा हा प्रवास संस्मरणीय झालेला असतो. असं नेमकं आहे तरी काय या 7 स्टार ऑटो रिक्षात? खरंतर काय नाहीये ते विचारा…

 

yourstory-sandeep-bacche-inmarathi

●  या रिक्षात एक एलसीडी टीव्ही, रेडिओ, दैनंदिन वर्तमानपत्रे, मासिके, पीसीओ, वाय फाय, मोबाइल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक, मोबाइल रिचार्ज करण्यासाठी रिचार्ज कूपन, थकवा दूर करण्यासाठी पाच रुपयांत गरमागरम चहा या गोष्टी आहेत.

●  मुलांसाठी/अगदी मोठ्यांना सुद्धा काही गोड खावंसं वाटलं तर इथे तुम्ही ड्रॉप बॉक्समध्ये पैसे टाकून चॉकलेट पण विकत घेऊ शकता.

●  इथे हात पुसण्यासाठी टिशू पेपर, चेहरा पाहण्यासाठी आरसा लावलेला आहे.

●  स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी झालेला कचरा टाकण्यास कचरापेटी, हात साफ करण्यासाठी सॅनिटायझर, कान साफ करण्यासाठी कॉटन बड्स आहेत.

●  वेळ कळावी यासाठी घड्याळ लावलंय. कॅलेंडर आहे.

 

sandeep-bacche-inmarathi

 

●  आतमध्ये लावलेला एक बोर्ड देखील आपलं लक्ष वेधून घेतो.

कारण त्यावर त्या दिवशीचे स्टॉक एक्सचेंजचे अपडेट्स, महत्त्वाच्या विदेशी चलनाचे त्या त्या दिवशीचे भाव, सोन्या-चांदीचा भाव आणि त्या दिवशीच्या हवामानाचा अंदाज या गोष्टी नमूद केलेल्या असतात.

●  संदीप रमजान, दिवाळी, ईद, गुड फ्राइडे आणि इतरही अनेक सणांच्या दिवशी वेगवेगळ्या धर्मांच्या पद्धतीनुसार आपली रिक्षा सुशोभित करतात.

ती गुलाबाच्या फुलांनी सजवतात. या रिक्षात सगळ्या धर्मांचे देवदेवता आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय त्यांची पूजा करण्याची सोयही त्यांनी केलेली आहे.

●  दुर्घटना घडल्यास वाचण्यासाठी रिक्षात एक फायर एक्स्टिंगविशर, फर्स्ट एड बॉक्स आणि पाण्याची बाटली कायम तयार असते.

इतकंच नाही, तर रस्त्यावर कोणी जखमी अवस्थेत असल्याचं संदीप यांना दिसलं तर ते त्यालासुद्धा मलमपट्टी केल्याशिवाय राहत नाहीत.

●  तुम्ही तुमचा फोन घरी विसरून आला आहात ? टेन्शन नॉट ! इथे एक STD PCO सर्व्हिस सुद्धा आहे. ज्याने प्रति मिनिट एका रुपयात तुम्ही घरी फोन करून फोन घरी राहिल्याचे चेक करू शकता.

किंवा इतर काही महत्त्वाचे फोनसुद्धा करू शकता.

 

std-pco-inmarathi

 

●  तुम्हाला काही रक्कम दान करायची इच्छा असेल तर इथे एक डोनेशन बॉक्सची पण सोय करण्यात आली आहे. जमा झालेलं सर्व डोनेशन ते कॅन्सर रिलीफसाठी काम करणाऱ्या संस्थेला देतात.

●  ते स्वतःच्या प्रत्येक भाड्यामागील दोन रुपये दान करतात. आणि जमा झालेल्या पैशातून गरिबांना औषधे पुरवतात. शिवाय जमा झालेल्या पैशातून सामान विकत घेऊन ते कैक वृद्धाश्रमात स्वतः नेऊन देतात.

●  जग बदलण्यात आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी त्यांनी त्यांच्या रिक्षामध्ये ‘Save Girl Child First’ आणि ‘Stop Pollution’ अशी पोस्टर्स सुद्धा लावलेली आहेत.

त्याचप्रमाणे ते सेलिब्रिटींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा पण लिहितात.

●  आणि एवढं करूनसुद्धा भाडं इतर रिक्षावाले आकारतील तेवढंच घेतात.

 

Sandeep-auto-inmarathi

 

इतर सवलती/ ऑफर्स :

★  संदीप एखादी व्यक्ती दृष्टिहीन असेल तर त्यांना ५०%, अपंग असल्यास २५%, आणि नवविवाहित दाम्पत्याला १०% अशी सूट देतात.

★  रक्षाबंधनाच्या दिवशी ते फक्त महिलांनाच रिक्षात बसवतात. आणि त्यांच्याकडून पैसेही घेत नाहीत.

★  ते किडनी डिसीज असलेल्यांना, कॅन्सर झालेल्यांना मोफत सोडतात.

★  त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच ३१डिसेंबरला आणि गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबरला कोणाकडूनही भाड्याचे पैसे न घेता सर्वांना फुकट सोडतात.

संजय दत्त आणि सलमान खानचे चाहते :

– संदीप यांच्या आईला १९९१ मध्ये कॅन्सर झाला होता. तेव्हा संजय दत्त यांना कोणीतरी ही गोष्ट सांगितली. तेव्हा संजय दत्त यांनी त्यांना घरी बोलावून आईच्या इलाजासाठी मदत केली होती.

तेव्हापासून ते संजय दत्त यांचे मोठे चाहते बनले.

तसंच ते cancer survivor लोकांसाठी जे काम करतात त्याबद्दल सलमानला कळल्यानंतर त्याने त्यांना घरी बोलावून त्यांची स्तुती केली होती. त्यानंतर ते सलमानचे सुध्दा चाहते बनले.

आता त्यांच्या एका हातावर संजय दत्त याचा टॅटू आहे आणि दुसऱ्या हातात सलमान खानचं ब्रेसलेट कायम असतं. त्या दोघांच्या वाढदिवशी सुद्धा ते कोणाकडून रिक्षाचे भाडे घेत नाहीत.

 

sanjay-dutt-meets-his-fan-rickshaw-driver-sandeep-bacche-inmarathi

 

संदीप यांना मुंबईत ‘मुन्नाभाई एसएससी’ या टोपणनावाने ओळखलं जातं. त्यांच्या रिक्षावर लिहिलंय “Any problem, call Munnabhai SSC.” ते संजय दत्तचे निस्सीम चाहते आहेत. आणि दहावी पास आहेत. म्हणून हे नाव.

बॉलीवुड स्टार संजय दत्त, सलमान खान, अभिषेक बच्चन, अजय देवगण अशा मोठमोठया अभिनेत्यांनी त्यांच्या रिक्षातून प्रवास केलाय.

संदीप बच्चे यांचा कॅन्सर बरा झालेल्या लोकांसाठी काम करणाऱ्या V Care Foundation ने १७ फेब्रुवारी २०१८ रोजी सत्कार केला.

या आधी सुद्धा त्यांना रोटरी क्लब अवॉर्ड, आईबीएन अवॉर्ड, गीतम यूनिवर्सिटी अवॉर्ड, सेंट झेवियर्स कालेज अवॉर्ड, शिवगुरु अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

sandeep bacche v care inmarathi

 

त्यांच्या आयुष्यावर अनुराग कश्यप यांनी ‘इंडिया इन ए डे’ नावाची एक डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली आहे. त्यांची गोष्ट हिस्ट्री चॅनेल वर दाखवण्यात आली.

तसेच सेंट झेविअर्स कॉलेज, अहमदाबाद तर्फे आयोजित टेड टॉक मध्येही त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

महाराष्ट्र पोलीस विभागाचे रोल मॉडेल :

■  विनम्र व्यवहार आणि विशेषकरून ऑटो रिक्षाचालक असून, यामुळे संदीप आता महाराष्ट्र पोलिसांचे रोल मॉडल म्हणून पुढे येत आहेत.

■  देशातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतील ठाणे आणि कल्याणमध्ये ऑटो रिक्षावाल्यांची मनमानी चालू असते.

■  पोलिसांकडे तक्रारींचा पाढा वाचायला कित्येक लोक येतात. माणसांची रीघ लागलेली असते. गेल्या काही महिन्यांतच साठ हजार तक्रारी आल्या आहेत. बहुतेक तक्रारी या रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराबद्दल आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल असतात.

■  काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर संदीप आणि त्यांच्या रिक्षाबद्दलच्या चर्चा वाचून ठाण्याच्या डेप्युटी ट्रॅफिक कमिशनर रश्मी करंदीकर यांनी संदीप यांच्याशी संपर्क साधला.

आता ते पोलिसांच्या वर्कशॉपमध्ये ठाणे आणि कल्याणच्या ऑटो रिक्षा ड्रायव्हर्सना मॅनर्स आणि ईमानदारी राखून आपली कमाई कशी वाढवू शकतो याचे पाठ देत आहेत.

 

ते म्हणतात,

“चांगुलपणा दाखवण्यासाठी आणि परोपकारी वृत्ती असण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही. आपल्या चांगल्या वर्तणुकीतूनही आपण समोरच्याला जिंकून घेऊ शकतो.”

तर ही होती संदीप बच्चे यांची प्रेरणादायी गोष्ट ! एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी!

===

हे ही वाचा टाटा सुमो हे नाव महाकाय सुमोंमुळे पडलं आहे की आणखी काही, वाचा रंजक इतिहास!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “अचाट अफाट “वंडर” रिक्षा चालवणारा सलमान-संजयचा लाडका “बांद्र्याचा राजा”

  • February 6, 2019 at 6:34 am
    Permalink

    Pl send or open his cotact mobile no .

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?