' शुक्रतारा मावळला…भातुकलीच्या खेळा मधली राजा-राणी रडू लागली… – InMarathi

शुक्रतारा मावळला…भातुकलीच्या खेळा मधली राजा-राणी रडू लागली…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

दिनांक ६ मे २०१८ हा रविवारचा दिवस फारच दुःखद बातमी घेऊन उजाडला. आपल्या हळुवार, भावनाविभोर आवाजाने लाखो मराठी संगीत प्रेमींच्या मनाला भुरळ घालणारे अरुण दाते सकाळी ६ वाजता त्यांच्या कांजूरमार्ग येथील निवास स्थानी निवर्तले.

===

दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्ता नुसार :

अरुण दाते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज पहाटे ६ वाजता त्यांनी कांजुरमार्ग येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. सध्या ते मुलगा अतुल दाते यांच्यासोबत राहत होते. दोन वर्षापूर्वी त्यांचा मुलगा संगीत दाते यांचं निधन झालं होतं. ४ मे रोजी अरुण दाते यांचा ८४ वा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र तब्येत ठिक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नव्हते.

===

 

arun date inmarathi

 

सुगम संगीत क्षेत्रात अत्यंत भरीव कार्य करणाऱ्या दिग्गजांमध्ये अरुण दातेंचं नाव नेहेमीच अग्रक्रमाने घेतलं जाणार आहे. कित्येक गाणी त्यांनी अजरामर केली आहेत.

आमच्यासारख्या ८० ते ९० च्या दशकांत जन्मलेल्या, आज तिशी पस्तिशीत असणाऱ्या कित्येकांना भावगीत म्हणजे अरुण दाते हेच माहिती आहे. लहानपणी शाळेत, लग्न-समारंभात “गाणं म्हण” म्हटलं की डोळ्यासमोर जी जी मराठी सुरेल, भावविभोर गाणी उभी राहायची त्यातील बहुतांश अरुण दातेंचीच!

शुक्रतारा मंद वारा हे गाणं तसं किशोर वयीन तरुणाईला भावून जाणाऱ्या गद्यावर. परंतु अरुण जींच्या आवाजातील मोहिनीने ते शाळकरी विद्यार्थ्यांपासून वरिष्ठ संगीत रसिकांपर्यंत पोहोचवलं. वय वाढत गेलं, गाणं उलगडत, कळत गेलं. परंतु त्या उलगडत जाण्यात वयानुसार येणारी शब्दांची समज कमी – अरुण दातेंच्या गायकीचा, लकबीचा, हळुवार घेतलेल्या भावनेच्या ठावाचा लागलेला कानोसा अधिक गहिरा होता.

 

 

भातुकलीच्या खेळामधली बद्दल तर बोलावं तेवढं कमीच! मी शाळेत असताना हे गाणं अनेकदा म्हटलं आहे. घरी रियाज करताना बाबा (जे स्वतः अप्रतिम गातात) नेहेमी म्हणायचे की तुझ्या आवाजात ह्या गाण्याची भावना उतरत नाही. अरुणजी जेव्हा “अर्ध्यावरती डाव मोडला” गातात – त्या “मोडला” मध्ये भयंकर दुःख, वेदना आहे – ती माझ्या गाण्यात उतरावी ह्यासाठी भयंकर प्रयत्न केले होते. पण कधी जमलंच नाही.

त्यासाठी गाण्याशी समरस व्हावं लागतं…एकरूप व्हावं लागतं…ते पट्टीच्या गायकांनाच जमतं!

 

 

मला हे कधी जमणार नव्हतं बहुतेक. म्हणूनच पुढे गाणं सुटलं ते कायमचंच. पण अरुण दातेंनी आवाज दिलेली गाणी “खास” का असतात हे कोडं मला कधीच पडलं नाही. कारण मी त्या प्रवासातून गेलो होतो.

या जन्मावर, या जगण्यावर – हे गाणं आजही शांतपणे ऐकावं आणि आपल्या जीवनाचा पटल डोळ्यासमोरून फिरवावा. मन भरून आल्याशिवाय रहातच नाहीत.

 

 

अशीच कित्येक गाणी आहेत…अश्या कित्येक आठवणी आहेत…

अरुण दातेंनी आमचं भावविश्व फार फार प्रभावीपणे घडवलं आहे.

आमच्या भावविश्वातील हा शुक्रतारा आज मावळला आहे. आज आमच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जपून, लपवून ठेवलेली भातुकलीची राजा राणी रडत आहेत…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?