' कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने : राजकीय नेत्यांच्या अंधश्रद्धा – InMarathi

कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने : राजकीय नेत्यांच्या अंधश्रद्धा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक : राजेश कुलकर्णी

===

कर्नाटकची निवडणूक भाजप जिंकणार असे दिसते. मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला आहे तसे काँग्रेस दीनवाणी होत चालल्याचे दिसत आहे. पण आजवर कर्नाटक निवडणूक जो जिंकतो, तो केन्द्रात कधीच सत्तेत येत नाही असे सांगितले जाते.

म्हणजे कर्नाटकात तुम्ही तर २०१९मध्ये केन्द्रात आम्हीच : असा दावा काँग्रेसी पक्षाध्यक्ष कर्नाटक निवडणुकीनंतर करू शकतील.

तंजावरमधील बृहदीश्वराचे मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा अतिशय सुंदर नमूना आहे. मात्र या मंदिराचे राजकारण्यांसाठीचे अनुभव वेगळे आहेत. राजा चोलाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास १९८४मध्ये इंदिरा गांधी व एमजीआर तेथे गेले, त्याच वर्षी इंदिरा गांधी यांची हत्या झाली, तर एमजीआर यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यानंतर तेथे गेलेल्या शंकरदयाळ शर्मा यांची राजकीय कारकीर्दही उतारास लागली.

भारताचा पंतप्रधान होणार्‍याच्या नावामध्ये ‘र’ हे अक्षर असलेच पाहिजे असे एक निरीक्षण होते. अगदी देवेगौडा यांच्या नावात र कोठे आहे असे विचारले गेले, तेव्हा त्यांच्या हरदणहळ्ळी या नावात र होताच. त्यांच्याप्रमाणेच पंतप्रधानपदाची लॉटरी लागलेले इंद्रकुमार गुजराल यांच्या नावातही र होताच. अगदी अनेकदा हंगामी पंतप्रधान झालेले गुलझारीलाल नंदा यांनाही र ने पारखे केले नव्हते.

त्यामुळेच डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान झाले तेव्हा हा नियम मोडला गेला. मात्र आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत ते पंतप्रधान नव्हतेच तर निव्वळ कळसुत्रीबाहुले होते हे त्यांनी स्वत:च दाखवत हा अलिखित नियम सिद्ध केला.

 

indianexpress.com

उत्तरप्रदेशचा जो मुख्यमंत्री नोयडाला भेट देतो तो पराभूत होतो अशीही वदंता आहे. त्याची पर्वा न करता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथे भेट दिली. म्हणजे आता योगींचे काही खरे नसावे. भलत्याच गोष्टींवर विश्वास न ठेवता नोयडाचा दौरा केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदनही केले.

पांढर्‍या रंगाचे कपडे हा राजकारण्यांचा व त्यातही काँग्रेसवाल्याचा ट्रेडमार्क विषय. मात्र प्रत्येकाचा शुभ रंग वेगळा. मग त्यावर उपाय कसा काढायचा? निवडणुकीचा अर्ज भरतेवेळी त्यांनी उपाय काढला तो आपले आतले कपडे आपल्या शुभरंगाचे वापरण्याचा…!

काहींचा अर्ज भरताना आपले आवडते पेन वापरण्याकडे तर कोणत्या तरी दिशेकडे तोंड करून सही करण्याकडे कटाक्ष असतो. निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी जाहीर करेपर्यंत काहीजण दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्याला शुभ असलेल्या व्यक्तीचेच दर्शन घेण्याचाच म्हणजे सर्वप्रथम त्या व्यक्तीचाच चेहरा पाहण्याचा आग्रह धरतात. कदाचित स्वत:चा चेहरा आरशात पाहणेही त्यांना चालत नसेल.

सोनिया गांधीही रायबरेलीतून आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तेथील एका विशिष्ट व्यक्तीच्या घरी जाऊन एक पूजा करतात.

 

SONIA_RAIBARELI
thehindu.com

देवेगौडा कुटुंबियांमध्ये पाच हा शुभअंक असल्यामुळे त्यांनी १२२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. निवडणुकीदरम्यान ते स्वत: व त्यांचा थोरला मुलगा यांचा वास्तुकंप्लायंट घरांमध्ये राहण्याचा आग्रह असतो. त्यांनी खास निवडणुकीसाठी तशी घरे बांधून घेतली आहेत.

महाराष्ट्र विधानमंडळात सर्वप्रथम आणला गेलेला अंधश्रद्धाविरोधी कायद्याचे प्रत्यक्षात काय मातेरे झाले हे आपण पाहिले. मात्र त्यातून काहीतरी निष्पन्न झाल्याचे समाधान मानणारे काहीजण तरी आहेत. कर्नाटकात मात्र या कायद्याला एवढा विरोध होत आहे की सिद्धरामैयांनी त्याला कायद्याचे स्वरूप मिळू न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

गंमत म्हणजे जवळजवळ सगळेच उमेदवार चांगला मुहूर्त पाहून अर्ज भरतात. एरवी देव वगैरे न मानणारे द्रमुकचे अनेक उमेदवारही त्यात सामील असतात. उमेदवारी अर्ज अमुक दिवशी व तोही अमुक वेळेच्या आत भरा असा सल्ला कोणी दिला असेल आणि काही कारणांनी उशीर होत असल्याचे दिसल्यास असे उमेदवार रांग मोडण्याचाही प्रयत्न करतात.

अखेर आपला समाजच अंधश्रद्धांनी भरलेला आहे. त्याचे प्रतिबिंब सर्वच पक्षांमधील राजकारण्यांमध्ये उमटणे साहजिक आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?