'GSTवर बोलू काही - भाग ५: कसं असेल GST चं स्वरूप?

GSTवर बोलू काही – भाग ५: कसं असेल GST चं स्वरूप?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पूर्वीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

पहिल्या चार भागांमध्ये आपण सध्याची indirect tax सिस्टीम चालते कशी आणि या सिस्टीममधल्या त्रुटी काय आहेत ते बघितलं. पहिल्या चार भागांमधली चर्चा हा GST समजून घेण्यासाठी आवश्यक असलेला ‘कच्चा माल’ होता. आता भागापासून पुढचे दोन तीन भाग GST नक्की आहे कसा, ही नवीन करप्रणाली अंमलात आल्यावर कोणकोणते चांगले-वाईट बदल घडतील त्याबद्दल आणि ही प्रणाली अंमलात आणताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतील त्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.

२००६साली जेव्हा ‘GST प्रणाली भारतात लागू करण्याचा सरकारचा विचार आहे’, असं त्या वेळच्या आपल्या अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं तेव्हापासून GST बद्दल अनेक उलटसुलट चर्चा लोक करू लागले. हे नवीन प्रकरण नक्की काय असेल याबद्दल सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता होती. पण नंतर २००८ साली उद्भवलेलं आर्थिक संकट, या प्रणालीसाठी आवश्यक असलेली राज्यांची संमती, घटनादुरुस्ती अशा अनेक अडचणींचा सामना करत आपण आता २०१७च्या एप्रिलपासून GST लागू करण्याचा निर्णयाप्रत येऊन पोहोचलो आहोत.

मध्यंतरीच्या काळात GST वर अनेक पुस्तकं छापली गेली, अनेक तज्ञांनी वेगवेगळ्या सेमिनार्स मधून आपापली मतं व्यक्त केली. पण या सगळ्या GST कसा असेल याबद्दलच्या शक्यता होत्या. नक्की त्याचं प्रारूप कसं असेल याबद्दलची निश्चित अशी माहिती आज ड्राफ्ट GST बिलच्या स्वरूपात आपल्यासमोर उपलब्ध आहे. त्या ड्राफ्टच्या आधारावर आपण GST कसा असेल ते आता बघूया.

gst-marathipizza

 

GST चं स्वरूप:

GST चा विषय जोरदार चर्चेत आल्यापासून लहानातला लहान लोकल दुकानदार सुद्धा “आता काय GST येणार! GST आला की सगळे टॅक्स जाणार” अशी चर्चा करताना आपल्यापैकी अनेकांनी ऐकलेलं असेल. हे GSTचं अगदी ढोबळ स्वरूप आहे. GST आल्यावर सगळे टॅक्स “जाणार” नाहीयेत; तर आत्ता अस्तित्वात असलेले सगळे टॅक्स “रिप्लेस” होणार आहेत हा मुद्दा आपण सगळ्यांनीच लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की सध्याचे बहुतेकसे सगळे अप्रत्यक्ष कर बंद होऊन त्यांच्या जागी GST का एकच अप्रत्यक्ष कर असणार आहे. यात आपण सध्या जी Value Added Tax System अंमलात आहे तीच सिस्टीम GSTमधे अधिक सुटसुटीतपणे अंमलात येणार आहे. याबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे असे:

 • आधीच्या पद्धतीमध्ये काही transactions केंद्र सरकार कर वसूल करत होतं आणि काही transactionsवर राज्य सरकार कर वसूल करत होतं. GSTप्रणालीमध्ये प्रत्येक transactionवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोघेही कर वसूल करतील. हा मोठ्ठा बदल करण्यासाठीच घटनादुरुस्ती गरजेची होती हे आपण आपल्या सिरीजच्या दुसऱ्या भागात बघितलं आहेच.
  • GST प्रणालीमध्ये तीन प्रकारचे कर आकारले जातील ते असे:
  • CGST (Central GST): हा कर केंद्र सरकार वसूल करेल.
  • SGST (State GST): हा कर राज्य सरकारं वसूल करतील. हा कर फक्त एकाच राज्यात होणाऱ्या व्यवहारावर आकारला जाईल. (उदा. खरेदीदार आणि विक्रेता दोघंही महाराष्ट्रातच असतील तर अशा व्यवहारांवर)
  • IGST (Integreted GST): हा कर केंद्र सरकार वसूल करेल पण या कराची व्याप्ती फक्त “आंतरराज्य’ व्यवहारांपुरतीच मर्यादीत असेल. (उदा. खरेदीदार महाराष्ट्रातला आणि विक्रेता कर्नाटकातला असेल तर त्या व्यवहारावर IGST लागू होईल.)

म्हणजेच प्रत्येक बिलात आता आपल्याला दोन प्रकारचे कर लावलेले दिसतील. CGST आणि SGST किंवा IGST यांपैकी कोणतातरी एक असे दोन कर लावलेले आपल्याला बघायला मिळतील. (प्रत्येक व्यवहार हा एक तर एकाच राज्यात होईल किंवा दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये. त्यामुळे एकाच बिलात SGST आणि IGST एकाचवेळी लागणं शक्य नाही. त्यामुळे या दोन्हींपैकी कोणतातरी एकच कर लागेल)

 • सध्या केंद्र सरकार जे अप्रत्यक्ष कर वसूल करतं ते सगळे CGST या एकाच कराने रिप्लेस होतील. सध्या केंद्र सरकार उत्पादन शुल्क, अतिरिक्त उत्पादन शुल्क, Medical आणि Toilet Preprations वर आकारण्यात येणारं उत्पादन शुल्क, सेवाकर आणि कस्टम ड्युटीमध्ये आकारण्यात येणारी CVD (कौंटरव्हेलिंग ड्युटी) आणि SAD (स्पेशल ऍडीशनल ड्युटी) आणि या सर्व करांवर लागणारे वेगवेगळे सेस आणि अधिभार असे वेगवेगळे कर वसूल करतं. यातल्या CVD आणि SAD वगळता इतर आणि अधिभारांऐवजी फक्त एकच CGST वसूल केला जाईल. CVD आणि SADच्या जागी IGST आकारला जाईल.
 • राज्य सरकारच्या सर्व अप्रत्यक्ष करांऐवजी फक्त एकच SGST वसूल केला जाईल. VAT, खरेदी कर (Purchase Tax), करमणूक कर, एन्ट्री टॅक्स, लक्झरी टॅक्स, लॉटरी आणि gambling वरचे कर आणि या सर्व करांवर आकारले जाणारे सेस आणि अधिभार; जे आजच्या घडीला राज्य सरकार वसूल करतंय ते SGSTने रिप्लेस होतील.

multiplicity-of-taxes-marathipizza

 • आंतरराज्य खरेदी-विक्रीवर सध्या जो CST (Central Sales Tax) आकारला जातो त्याऐवजी IGST आकारला जाईल.
 • वस्तूंच्या खरेदी विक्रीवर लावण्यात येणाऱ्या GSTसाठी ५%, १२%, १८% आणि २८% असे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. यामध्ये दैनंदीन गरजेच्या वस्तू, चैनीच्या वस्तू अश्या वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण करण्यात येऊन गरजेच्या वस्तूंवर कमी दराने आणि चैनीच्या वस्तूंवर जास्त दराने GST आकारण्यात येणार आहे. अन्नधान्याच्या वस्तू ह्या ‘झीरो रेटेड गुड्स’ ठरवण्यात आलेल्या आहेत.
 • चैनीच्या वस्तू, उच्च किमतीच्या मोटार गाड्या, पान मसाला, aerated drinks, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर २८% कर वसूल करण्यात येणार आहे. शिवाय यात काही वस्तू ह्या ‘डीमेरीट गुड्स’ म्हणून ठरवण्यात आलेल्या आहेत त्यावर ४०%-६५% या रेंजमधे एकूण कर आकारणी होईल अशा हिशोबाने अतिरिक्त कर वसूल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
 • GST हा ‘destination based’ टॅक्स असणार आहे. म्हणजेच ज्या राज्यात वस्तू आणि सेवांचा ‘पुरवठा’ होईल GST च्या भाषेत ज्या राज्यात वस्तू/सेवेचा पुरवठा होईल त्या राज्याला संबंधित व्यवहारावरचा टॅक्स मिळणार आहे. वस्तू/सेवेचा पुरवठा नक्की कोणत्या राज्यात झाला ते ठरवण्यासाठी “Place of supply rules” ठरवण्यात आलेले आहेत.
 • GST कायद्याअंतर्गत नोंदणीसाठी २० लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच ज्यांचा वार्षिक टर्नओव्हर रुपये २० लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल त्यांना GSTच्या नोंदणीमधून सूट देण्यात आली आहे. उत्तर-पूर्व भारतातली राज्य वगळता बाकी संपूर्ण भारतासाठी २० लाखांची मर्यादा लागू असेल. उत्तर पूर्व भारतातल्या राज्यांसाठी हीच मर्यादा १० लाख असेल.
 • या गोष्टी GST प्रणालीच्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत.
  • मानवी उपभोगासाठीचं मद्य (यावर राज्य उत्पादन शुल्क आणि VAT जसा आत्ता वसूल केला जातो तसाच यापुढेही केला जाईल.)
  • इलेक्ट्रिसिटी (यावर वेगळी इलेक्ट्रिसिटी ड्युटी वसूल केली जाते)
  • स्टॅम्प ड्युटी आणि मिळकत कर
  • पेट्रोलिअम प्रोडक्ट्स (ही तात्पुरती वेगळी ठेवण्यात आलेली आहेत. पण GST कौन्सिलने शिफारस केलेल्या तारखेपासून पेट्रोलिअम प्रोडक्ट्सवरही GST वसूल केला जाईल.)

साधारण असं स्वरूप असेल आपल्याकडे येऊ घातलेल्या GST चं.

आता या सगळ्याचा वस्तू आणि सेवांच्या किमतीवर कसा आणि काय परिणाम होईल ते आपण पुढच्या भागात उदाहरण घेऊन बघूया.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?