' अहवालाचे निष्कर्ष व ठोस मागण्या : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ५) – InMarathi

अहवालाचे निष्कर्ष व ठोस मागण्या : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ५)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संपादकीय निवेदन :

२०१८ ह्या वर्षाची सुरुवात महाराष्ट्रासाठी, आणि खरंतर देशासाठी अत्यंत निराशाजनक झाली. आपणा सर्वांना विमनस्क करणाऱ्या घटना नूतन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात घडल्या. आजही सदर घटनेचे पडसाद उमटत आहेतच. परंतु आजपर्यंत हे सर्व घटनाक्रम नेमके कसे घडत गेले, त्यामागे आधीच्या घटनांची कोणती पार्श्वभूमी होती ह्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला गेला नाही.

दंगलींसारख्या सामाजिक गुन्ह्यांच्या बाबतीत केवळ त्यावेळी दगडफेक करणाऱ्या गुन्हेगारांना अटक होणं पुरेसं नसतं. दंगल “घडविणाऱ्या” पडद्यागच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचणं, त्यांचे चेहरे समोर आणणं आवश्यक असतं. हेच काम करण्याच्या उद्देशाने, सदर रिपोर्ट, विवेक विचार मंच तर्फे, तयार करण्यात आला आहे.

समाजात अभूतपूर्व दुही माजवणाऱ्या ह्या काळ्याकुट्ट घटनाक्रमांसाठी नेमके कोण जबाबदार आहेत हे महाराष्ट्रासमोर आणण्याच्या भूमिकेतून इनमराठी परिवाराने सदर अहवाल ५ भागांत प्रसिद्ध करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

टीम इनमराठी

===

रिपोर्ट प्रकाशक : विवेक विचार मंच, महाराष्ट्र

===

आपल्या देशात लोकशाही असून विविध राजकीय, सामाजिक विचाराचे लोक एकमेकांना संविधानिक मार्गाने विरोध करतात, टीका करतात, निवडणुका लढवितात आणि तसेच अपेक्षितच असते. मात्र असे करताना जाणीवपूर्वक ढड, उइख, ठथ या तपास यंत्रणाविरोधात उठाव करण्याची प्रक्षोभक मांडणी करणे आक्षेपार्ह व संशयास्पद आहे.

माओवादी चळवळीचा अंतिम हेतू (रक्तरंजित लाल क्रांतीतून लोकशाही सरकार उलथवून लावणे) पाहता, ही चळवळ समाजाला अराजकतेकडे नेते हे उघड आहे.

एल्गार परिषदेत अशा माओवादी विचारांच्या समर्थकांचा विशेष सहभाग दिसून येतो. लोकशाही व्यवस्थेला ‘नवी पेशवाई’ म्हणून त्याविरोधात विरोधात हिंसक उठाव घडवून आणण्यासाठी, समाजात तीव्र जातीय तेढ वाढून संघर्ष व अराजक निर्माण करण्याचा माओवादी विचारांच्या संशयित गटांचे षडयंत्र असू शकते. या गटांच्या साहित्यातून, पत्रकातून, भाषण व मांडणीतून ही शंका अधिकच बळावते.

‘आपले लक्ष्य साध्य करण्याकरीता कोणताही सकारात्मक मार्ग न स्वीकारता जातीअंत संसदीय मार्गाने नव्हे तर रस्त्यावरच्या लढाईतून होईल’ अशी घातकी मांडणी अशा गटांकडून केली जाते व त्यामुळे जातीअंत न होता उलट जातीय तेढ अधिक वाढून हिंसाचार होईल असे वातावरण तयार केले जाते आहे.

तसेच या ‘नव्या पेशवाई’ विरोधातील (रस्त्यावरच्या) लढाईसाठी प्रतीक म्हणून १८१८ साली इंग्रज मराठा युद्धाच्या इतिहासाचा आपल्या सोयीने गैरवापर करून आजच्या काळात जातीय तेढ वाढविण्यासाठी कोरेगाव भीमा युद्धाच्या विजयस्तंभावर या फुटीरतावादी गटांकडून लक्ष केंद्रित केले असण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी १ जानेवारीच्या हिंसाचाराच्या अनुषंगाने सखोल तपास करण्याची गरज आहे. तसेच, सर्व समाजाने एकत्र येऊन फुटीरतावादी गटांचे मनसुबे हाणून पडण्याची गरज आहे.

दैनिक सकाळ वृत्तपत्रात १८ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीमागे नक्षलवादी संघटनांचा हात या बातमीनुसार कोरेगाव भीमा प्रकरण व त्यानंतर परिस्थिती भडकवण्यासाठी चार महिन्यांपूर्वीपासून राज्यभर नक्षलवादी विचारसरणीच्या संघटनांनी सभा घेतल्याचे गुप्तचर विभागाच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबईत त्यासाठी सुमारे २३ छोट्या मोठ्या सभा झाल्या होत्या.

वढू बुद्रुक येथे घडवण्यात आलेला प्रकार, त्यानंतर कोरेगाव भीमा प्रकरण व त्याला देण्यात आलेला जातीय रंग यासाठी चार महिन्यांपूर्वीपासूनच राज्यभर सभा घेण्यात आल्या होत्या.

या बैठकांमध्ये २०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाबद्दलची माहिती वारंवार तरुणांच्या मनात बिंबवण्यात आली. मुंबईत अशा सुमारे १५ मोठ्या बैठका, परिषदा झाल्या. तसेच सात-आठ छोट्या बैठकाही झाल्या होत्या.

माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने हा सर्व प्रकार कसा वाढवण्यात येईल, याचेही नियोजन करण्यात आले होते, असे म्हटले आहे.

 

सकाळ वर्तमानपत्रातील बातमी

दरम्यान, जानेवारी महिन्यात एटीएस  ने सात संशयित माओवादी वादी अटक केले व त्यापैकी काहीजण १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा परिसरात आले होते, तसेच एल्गार परिषद आयोजक सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार यांच्या संपर्कात काही वर्षांपासून होते, असे उघड झाले आहे.

 

हे ही वाचा – जयभीम साबण, बहुजन मसाले आणि बहुजन डिश वॉशर: उद्योगातून दलित उत्थानाचा मार्ग!

दि. १७ एप्रिल २०१८ रोजी पोलिसांनी कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथरशी संबंधित लोकांच्या घर व कार्यालयांवर छापे टाकेले आहेत)

बामसेफचे विलास खरात यांचे प्रक्षोभक लिखाण असेलेले पुस्तक :

३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेला विलास खरातांची जवळीक असलेल्या बामसेफचे समर्थक उपस्थित होते. (एल्गार परिषदेत बामसेफचे समर्थन असल्याचे घोषित करण्यात आले). शनिवारवाड्यावर १३ डिसेंबर २०१७ ला विलास खरात यांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ व परिसंवाद झाल्याचे कळाले.

या निमित्त पत्रके, पुस्तके प्रकाशित केली. १ जानेवारी १८१८ चे ‘स्वातंत्र्याचे बंड’ (लेखक विलास खरात, प्रस्तावना – वामन मेश्राम) हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात दिशाभूल करणारी ऐतिहासिक तथ्यांना सोडून इतिहास सांगितलेला आहे व विद्वेषी मांडणी केलेली आहे. पेरणे येथील विजयस्तंभासंदर्भात वादग्रस्त मांडणी या पुस्तकात केली.

 

बामसेफचे विलास खरात यांचे भडकाऊ लिखाण असलेले पुस्तक

या स्तंभावर सैन्याने १९६५ व १९७१ मध्ये शहीद झालेल्या सैनिकांचे नावे असलेली पाटी ‘रोल ऑफ ऑनर’ म्हणून लावली आहे. या पाटीला विरोध करत सदर पुस्तकात ती पाटी सरकारने काढावी अन्यथा लोक ती पाटी काढतील आणि तो गुन्हा ठरणार नाही, अशा प्रकारे आव्हान दिले आहे. तसेच, ब्राह्मणांच्या विरोधात दंगली उसळतील, देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत यांच्या विरोधात जनउद्रेक उसळेल, अशा प्रकारची प्रक्षोभक मांडणी केलेली आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना ब्राह्मणांनी मारले, छत्रपती संभाजी महाराज यांना ब्राह्मणांनी औरंगजेबाकरवी मारले, अशा चुकीचा व दिशाभूल करणारा इतिहास लिहून द्वेषमूलक, प्रक्षोभक लिखाण केलेले आहे. या संदर्भात वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध झालेले आहे. अशा प्रकारच्या प्रक्षोभक मांडणीमुळे जातीय विद्वेषी वातावरण तयार होते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

या संदर्भात कोरेगाव भीमाच्या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी रोजी पेरणे गावात विजयस्तंभ जवळच बामसेफ – भारत मुक्ती मोर्चा या संघटनेने तेथे येणार्‍या कार्यकर्त्यांच्या एकत्री करणासाठी व कार्यक्रम आणि भाषणांसाठी भव्य मंडप उभारला होता.

तसेच, वढू बुद्रुक ग्रामपंचायतने ३० डिसेंबर रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशनला १ जानेवारी रोजी अधिक पोलीस संरक्षण मागणारे पत्र दिले त्यात बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा व इतर संघटनेचे लोक येतात… मागील वर्षाचा अनुभव पाहता छात्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी तसेच कवी कलश व शंभूराजांचा पुतळा या ठिकाणी इजा व नुकसान विटंबना करण्याची दाट शक्यता आहे असा मजकूर लिहिला आहे, हे या ठिकाणी विचारात घेणे महत्त्वाचे ठरते.

वढू बुद्रुक येथे ज्या वादग्रस्त फलकावरून दोन समाजात वाद झाला, तो फलक लावण्यासाठी गावाबाहेरून आलेली माणसे ही बामसेफ शी संबंधित असल्याचा गावकर्‍यांचा संशय आहे. त्याबाबत तपास व्हावा.

जयस्तंभ येथील जागेचा वाद

कोरेगाव भीमा परिसरात १८१८ च्या युद्धात पेशवाई विरोधात लढताना मरण पावलेल्या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटीश सरकारने पेरणे जयस्तंभ उभारला. ब्रिटीश सरकारने सदर लढाईत जखमी झालेले शूर सैनिक खंडोजी बिन गणोजी जमादार (माळवदकर) यांना सनद व इनाम जमीन दिली व जयस्तंभ व आसपासच्या परिसराच्या बंदोबस्त व देखरेखीसाठी नेमणूक केली. आजही खंडोजी बिन गणोजी जमादार (माळवदकर) यांचे वंशज जयस्तंभाजवळ राहतात.

जयस्तंभ व आसपासची सुमारे १० एकर जमीनच्या ७/१२ वर जमादार कुटुंबाचे नाव आहे. मात्र, जमादार यांनी या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम, अतिक्रमण केल्याची तक्रार सप्टेंबर २०१५ महिन्यात मुंबई येथील कोरेगाव भीमा विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीने श्री. राजकुमार बडोले, सामाजिक न्याय मंत्री (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडे केली. त्यानुसार शासनाने येथे कारवाई केली व जमादार कटुंबाचे नाव ७/१२ वरून कमी करणे बाबत प्रक्रिया सुरू केली.

जमादार कटुंबाचा मात्र आपल्यावर अन्याय होतोय असा दावा असून, त्यांनी न्यायालयात महाराष्ट्र शासन, बार्टी संस्था व कोरेगाव भीमा विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती विरोधात खटला दाखल केला.

डिसेंबर २०१७ मध्ये सदर खटल्याचा निकाला दिवाणी न्यायालयात जमादार कुटुंबाच्या विरोधात लागला. मात्र, जमादार कुटुंबांनी त्याविरोधात वरच्या दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे.

तसेच न्यायालयाने विरोधात निकाल दिला असला तरी आदेश जारी केल्याने जयस्तंभ परिसरात वादग्रस्त जागेवर पार पडलेले कार्यक्रम न्यायालयाचे अवमान करणारे आहे, असे जमादार यांचे म्हणणे आहे. सध्या हा जमिनीचा वाद न्याय प्रविष्ट आहे.

दरम्यान, जमादार कुटुंबाने शासनास पत्रव्यवहार करून १८१८ कोरेगाव भीमा युद्धाचा नेमका इतिहास काय, १ जानेवारी १८१८ रोजी नेमके काय घेडले, याचा सखोल अभ्यास करून ऐतिहासिक पुराव्यानिशी समाजासमोर वास्तव मांडण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी अशी मागणी केली आहे.

हे ही वाचा – “जय श्रीराम” विरुद्ध “जय भीम” : भारत विरोधी लोकांचं युद्ध पेटविण्याचं षडयंत्र?

समारोप :

कोरेगाव भीमा येथील हिंसाचार म्हणजे सामाजिक बंधूभावनेला तडा देणारी दुर्दैवी घटना होय. तत्कालिक घडामोडी आणि कारणे तपासली तरी या घटनेमागे मोठी वैचारिक, सामाजिक, राजकीय गुंतागुंत आहे हे ही लक्षात येते.

वैचारिक वाद होणे ठिक, परंतु हेच वाद जेव्हा हिंसक वळण घेतात तेव्हा ते समाजाला परवडणारे नसतात. समाजात जातीय युद्ध व्हावे व अराजकता निर्माण व्हावी अशी मांडणी काही जहाल गट करताना दिसतात. क्रिया-प्रतिक्रियेतून वाद निर्माण होतो. इतिहासाचा आधार वाद निर्माण करण्यासाठी घेतला जाताना दिसत आहे. असेच काही या सर्व प्रकरणात झालेले दिसते.

या सर्व घटनाक्रमात पोलीस प्रशासानाच्या मोठ्या चुका झालेल्या आढळतात. या घटनेला अनेक बाजू आहेत, त्यामुळे तपास यंत्रणेने सर्व बाजूने तपास करणे आवश्यक आहे.

पोलिसांनी सबळ पुराव्याच्या आधारावर कारवाई करावी. कोणावर तरी खापर फोडून मोकळे होऊ नये. तसेच भविष्यात असे प्रसंग घडणार नाही याकरिता शासन-प्रशासने योग्य ती खबरदारी घ्यावी.

जातिवादाची समस्या गंभीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना, संविधानाच्या माध्यमातून जातीवादाविरोधात लढण्याचे एक प्रभावी शस्त्र आपल्याला दिले आहे. या संविधान नामक शस्त्राचा प्रभावी वापर करून जातिभेद दूर करण्यासाठी समाजामध्ये प्रत्येक स्तरावरील सुजाण नागरिकांनी समता, बंधुभाव, सामाजिक न्याय, समान संधी या संविधानिक मूल्यांच्या संरक्षणाकरिता पुढे येऊन सामाजिक सुसंवाद करणे आवश्यक आहे.

निष्कर्ष, निरीक्षणे व मागण्या

१. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी, २०१८ रोजी झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना, तसेच खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणारे गट यांचा पूर्वनियोजित कट आहे. यामध्ये अनेक वर्ष प्रेम, बंधुभावाने राहणार्‍या दोन समाजात तेढ निर्माण करून, जातीयुद्ध घडवून देशात अराजक निर्माण करणे व लोकशाही व्यवस्था नष्ट करणे असे षडयंत्र आहे व त्यासाठी माओवादी व फुटीरतावादी गट गेली काही वर्ष कार्यरत आहेत.

मात्र कोणत्याही आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटांनी कोरेगाव भीमा हिंसाचाराचा पूर्वनियोजित कट रचल्याचे दिसून येत नाही.

कोरेगाव भीमा हिंसाचारामागील खरे सूत्रधार शोधण्याच्या अनुषंगाने ३१ डिसेंबर रोजी शनिवारवाड्यावरील एल्गार परिषद आयोजित करण्यात पुढाकार घेतलेले कबीर कला मंच व रिपब्लिकन पँथर या संशयित माओवादी गटांची सखोल चौकशी करण्यात यावी. हे दोन्ही गट गेल्या तीन ते चार वर्षांपासून कोरेगाव भीमा शौर्यादिनाचे औचित्य साधून १ जानेवारीला पेरणे येथील जयस्तंभ परिसरात व समाजात प्रक्षोभक मांडणी करीत असल्याचे समजले आहे.

एल्गार परिषद आयोजित करतानाही या गटांनी अशीच प्रक्षोभक व जातीय तेढ निर्माण करणारी मांडणी आपल्या पत्रक, पुस्तिका व कार्यक्रमांच्या माध्यमातून केली आहे. याचा सखोल तपास पोलिसांनी करायला हवा.

२. हिंसाचाराचा घटनाक्रम पाहता २८ डिसेंबर रोजी वढू बुद्रुक येथे रात्री ग्रामपंचायतची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ‘वादग्रस्त व खोटा इतिहास’ असणारा फलक लावण्यावरून निर्माण झालेला वाद मुख्य निमित्त ठरते.

हा फलक कोणी लावला? गावा बाहेरील कोण लोक, संघटना त्यात सामील होते? त्यांचा उद्देश काय होता, त्यांचा जातीवादी, फुटीरतावादी व जहाल विचारांच्या गटांसोबत लागेबांधे आहेत काय? – याचा सखोल तपास करण्यात यावा.

३. वढू गावात २८ डिसेंबरला रात्री ‘वादग्रस्त व खोटा इतिहास’ लागत असतानाच गावच्या पोलीस पाटील यांनी खबरदारीने सायंकाळी ७.३२च्या सुमारास पोलिसांना कळवले होते. मात्र पोलीस तत्काळ घटनास्थळी आले नाहीत, तर २९ डिसेंबर रोजी आले.

या वेळी पोलिसांनी त्याची वेळेत दाखल का घेतली नाही याची सखोल चौकशी व्हावी व पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये सर्व दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जावी.

४. ‘वादग्रस्त व खोटा इतिहास’ सांगणारा फलक पाहून २९ ला सकाळी ११ च्या दरम्यान वादास सुरुवात झाली, बोर्ड काढला गेला व समाधीवरील छत्री पाडण्यात आली व संध्याकाळी केसेस झाल्या. ४९ व्यक्तींवर (त्यापैकी काहीजण गावात नव्हते) अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत केसेस झाल्या.

यामुळे वाद अधिक चिघळून परिसरात असंतोष निर्माण झाला व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोरेगाव भीमा व परिसरातील गावांनी ग्रामपंचायत निर्णयानुसार १ जानेवारी रोजी बंद पाळला. तरीही सणसवाडी व अन्य ठिकाणची गावे, दुकाने व हॉटेल चालू होते.

५. वढू बुद्रुक येथे ‘वादग्रस्त व खोटा इतिहास’ सांगणार्‍या फलकावरून चिघळलेल्या वादामुळे १ जानेवारीला वढू ते कोरेगाव दरम्यान दोन गट समोरासमोर येणार नाहीत याची खबरदारी घेण्यात पोलिसांना अपयश आले.

वढू बु. ते कोरेगाव भीमा जवळपास ३ कि.मी. अंतरात भगवे झेंडे घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांच्या रॅलीला पोलिसांनी रोखून धरले नाही. तसेच कोरेगाव भीमा चौकात एक तरुण निळा झेंडा नाचवत लांबून पळत येतो व भगवा झेंडा घेतलेल्या गटात शिरतो, इथे वादावादी होते व मारामारी सुरू होते.

याठिकाणी निळा झेंडा नाचवत आलेल्या तरुणास कोणीही पोलीस थांबवत नाहीत. यामुळे हिंसाचार ज्या ठिकाणी सुरू झाला तेथे पोलीस सतर्क नव्हते.

पुढे ही मारामारी थांबली व तब्बल तासभर शांतता होती व नंतर अचानक एका स्थानिक गणेश मंदिरावर हल्ला होऊन पुन्हा हिंसाचार भडकला; याबाबत सखोल तपास व्हावा.

६. वढू बुद्रुक गावात संभाजी महाराज समाधीस्थळाजवळ गावकरी शांताराम भंडारे यांना दि.१ जानेवारी २०१८ रोजी दिल्लीचा पत्ता असलेले कादिर खान नामक व्यक्तीचे आधारकार्ड सापडले आहे. ते ग्रामस्थांनी पोलिसांना दिले आहे.

ते आधारकार्ड बनावट असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. हे अतिशय गंभीर असून याबाबत गुन्हा दाखल होऊन सखोल चौकशी व्हायला हवी.

७. वढू बुद्रुक गावात १ जानेवारीला दर वर्षी काही संघटनाचे लोक येतात व आक्षेपार्ह घोषणा देतात. त्यामुळे गावात तणाव निर्माण होऊ नये म्हणून संरक्षण व खबरदारी साठी वढू बुद्रुक ग्रामपंचायत दर वर्षी पोलिसांना पत्र देते.

१९ डिसेंबर २०१७ ला (घटना घडण्याच्या ९ दिवस अगोदर) असे पत्र दिले होते. तसेच ३० डिसेंबर २०१७ ला दिलेल्या पत्रकात बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा या संघटनेचा उल्लेख आहे. तसेच बामसेफशी संबंधित प्रा. विलास खरात यांच्या १ जानेवारी १८१८ स्वातंत्र्याचे बंड या पुस्तकात ‘महाराष्ट्रात ब्राह्मण विरोधी दंगली उसळतील’ असे प्रक्षोभक लिखाण असल्याने, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, वामन मेश्राम यांची पोलीस चौकशी व्हायला हवी.

८. कोरेगाव भीमा दंगली दरम्यान काही टोळक्यांकडे शस्त्रे होती. (उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तसेच व्हिडिओ क्लिप्समध्ये दिसते आणि जखमी विशाल जाधव याने शस्त्राने हल्ला झाल्याचे म्हटले आहे.) अशा प्रकारे धारदार शस्त्रे घेऊन हल्ल्याच्या तयारीने कोण आले होते, त्यांच्या संघटना कोणत्या, त्यामागे नियोजित षडयंत्र होते का, याचा सखोल तपास व्हावा.

९. हिंदुत्ववादी गटांचे नेते मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मात्र हे दोघेही १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा परिसरात गेलेच नव्हते असे निष्पन्न झाले आहे. यामुळे तक्रारदार अनिता सावळे यांनी या दोघांना प्रत्यक्ष दंगलीत पाहिले ही तक्रारच संशयास्पद ठरते. (याबबत पोलिसांनी योग्य तपास करून भिडे व एकबोटे यांच्यासह साळवे यांचीही चौकशी करावी.)

१०. तक्रारदर सुषमा अंधारे यांच्या तक्रारीतील भिडे व एकबोटे यांनी स्थानिक गणेश फडतरे व योगेश गव्हाणे यांच्या करवी कोरेगाव भीमा १ जानेवारीला बंद ठेवून दंगल घडविली हा आरोप केला आहे.

गव्हाणे स्थानिक व्यवसायिक असून, १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे नव्हते व त्यांचे हॉटेल व गाड्या दंगलखोरांनी जाकून टाकल्या. फडतरे तर राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असून त्यांचा भिडे व एकबोटे यांच्याशी काही संबंध नाही. यामुळे अंधारे यांची तक्रारही संशयास्पद ठरते.

११. संभाजी ब्रिगेडशी संबंधित अमोल मिटकरी याने १ जानेवारी आधी व नंतर जहाल, भडक अशा पोस्ट कोरेगाव भीमा युद्ध व वढू बुद्रुक येथील वादाला धरून सोशल मीडियावर टाकल्याचे आढळून आले आहे.

तसेच, वढू बुद्रुक संबंधित गोविंद गोपाल महार यांच्याबाबत खोटा इतिहासही ते आपल्या भाषणातून मांडतात. यामुळे मिटकरी यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. (एल्गार परिषदेत संभाजी ब्रिगेड मुख्य संयोजकापैकी एक आहे.)

१२. वढू बुद्रुक येथील गोविंद गोपाळ यांची समाधी तसेच संभाजी महाराज अंत्यसंस्कार वाद तसेच १ जानेवारी १८१८चे युद्ध व विजयस्तंभाचा नेमका इतिहास काय? या विषयी भविष्यात वाद होण्याची शक्यता विचारात घेता, या संदर्भात ‘सत्य इतिहास’ समजण्यासाठी शासनाने इतिहास संशोधकांची समिती नियुक्त करावी व निश्चित कालावधीत या समितीने आपला अहवाल प्रसिद्ध करावा.

१३. कोरेगाव भीमा परिसरात हिंसाचार सुरू झाल्यावर पुणे ग्रामीण पोलीस व अन्य पोलीस पथकांनी पेरणे येथे जयस्तंभ परिसरात हिंसाचार पसरू दिला नाही. हे पोलीस यंत्रणेचे यश आहे. आपले कर्तव्य बजावताना काही पोलीस जखमी झाले आहेत.

मात्र, वढू बुद्रुक येथे २८ डिसेंबर रोजी वादग्रस्त फलकाबाबत वेळेत माहिती मिळूनही पोलिसांनी तत्काळ लक्ष घातले नाही, तसेच १ जानेवारी रोजी दोन गट समोर येणार नाहीत याबाबत योग्य खबरदारी घेतलेली दिसून येत नाही.

त्यामुळे संबंधित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची कसून चौकशी कररून आवश्यक ती कडक कारवाई करावी.

१४. ATS ने अटक केलेले काही संशयित माओवादी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे गेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यापैकी काही जण काही वर्षांपासून एल्गार परिषद आयोजक सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार यांच्या संपर्कात होते. यामुळे माओवाद्यांचे, एल्गार परिषदेचे व कोरेगाव भीमा हिंसाचाराचे लागेबांधे आहेत काय याचा सखोल तपास व्हावा.

१५. जिग्नेश मेवानी, उमर खालिद व अन्य यांनी विजयस्तंभ २०० वर्षे निमित्त आयोजित एल्गार परिषदेत ३१ डिसेंबर रोजी अत्यंत प्रक्षोभक भाषणे केली.(त्यांच्यावर पुण्यात गुन्हे दाखल झाले.) परंतु दुसर्‍या दिवशी दि.१ जानेवारीला हे वक्ते कोरेगाव भीमा – विजयस्तंभ येथे का गेले नाही?

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा युद्धाला २०० वर्ष पूर्ण होत असताना या दिवसानिमित्त एल्गार परिषद झाली, पण यातील मुख्य व्याख्याते १ जानेवारी रोजी जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी न जाता माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांच्या बंगल्यावर बसले होते. हे अत्यंत संशयास्पद असून मेवाणी व खालिद यांची सखोल चौकशी व्हावी.

१६. गुन्हे दाखल झालेले कबीर कला मंचचे कलाकार व सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार हे एल्गार परिषदेत मुख्य आयोजक म्हणून सहभागी होते. बंदी घातलेल्या माओवादी पार्टीशी संबंध या आरोपाखाली यातील काही जणांना अटक झाली होती व खटले चालू आहेत.

विजयस्तंभला दर वर्षी हे गट गाणी म्हणतात, पुस्तके, पत्रके वाटतात. परंतु यावर्षी हे स्तंभाजवळ दिसलेच नाही. मग हे कोठे होते? यांची पार्श्वभूमी बघता या विषयी त्यांना अटक करून त्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

तसेच या संशयित माओवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एल्गार परिषदेपूर्वी भीमा कोरेगाब ‘शौर्यदिन प्रेरणा अभियान’ अंतर्गत महाराष्ट्रभर प्रक्षोभक कार्यक्रम घेतले व जातीय संघर्षाची बीजे रोवली व त्यातून १ जानेवारीचा हिंसाचार घडून आला का याची सखोल चौकशी व्हावी.

१७. एल्गार परिषदेत माओवादी विचारांचे, तसेच यासंबंधित गुन्हे दाखल झालेले कार्यकर्ते मुख्य आयोजक म्हणून सहभागी आहेत हे माहित असतानाही या परिषदेस पोलिसांनी परवानगी नाकारली का नाही याबाबत चौकशी व्हावी. तसेच, ज्या अटींवर परवानगी दिली त्या अटींचा भंग झाला.

भडकाखू भाषणे, गीते झाली. त्यावर पोलिसांनी स्वतःहून काय कारवाई केली याचा अहवाल शासनाकाडे सदर करावा व जनतेसाठी प्रसिद्ध करावा.

१८. हिंसाचारामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण झाली आहे हे स्पष्ट दिसत असतानाही, खॠ विश्वास नांगरे पाटील यांनी एकाच समाजाची समन्वय समिती स्थापन केली व या समितीने शासकीय अधिकार प्राप्त नसतानाही ‘सत्यशोधन अहवाल’ प्रसिद्ध करून तो पोलीस नियुक्त समितीचा अहवाल असे भासवल्याने गृहखात्याला तातडीने स्पष्टीकारण द्यावे लागले की, अशी कोणतीही समिती सत्यशोधन अहवाल करण्यासाठी नेमली नव्हती. यामुळे समाजात पोलीस व गृहखात्याबद्दल बदनामी झाली.

१९. पोलिसांवर हल्ला झाला. याविषयी खूनाचा प्रयत्न अशा गुन्ह्यात काही स्थानिक दलित व मराठा तरुणांना अटक केली आहे. पोलिसांवर हल्ला करणारे नेमके कोण होते? त्यांचा शोध घ्यावा व त्यांच्यावरच कलम ३०७ खझउ अंतर्गत कारवाई व्हावी.

स्थानिकांनी पोलिसांवर हल्ला केला नाही, काही निर्दोष स्थानिकांवर खोटे गुन्हे टाकण्यात आले, असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी व नेमके हल्लेखोर पकडले जावेत.

२०. ‘शिवाजीचे उदात्तीकरण’सारख्या पुस्तकातून व अशा प्रकारच्या मांडणीतून आज राष्ट्रपुरुष शिवाजी राजे यांच्याबद्दल समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. याचीच परिणीती कोरेगाव भीमा हिंसाचारात दिसून आली, जिथे राहुल फटांगडेच्या कपड्यांवर शिवाजी महाराजांचा फोटो पाहून त्याचा खून केला गेला; तर आंबेडकरी झेंडा पाहून गाड्या फोडल्या गेल्या.

हे अत्यंत चुकीचे व गंभीर आहे. ‘शिवाजीचे उदात्तीकरण’ या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक यांच्यावर गुन्हा दाखल करून सदर पुस्तकावर बंदी घालण्यात यावी.

२१. कोरेगाव भीमा परिसरात १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणात दलित-सवर्ण जातीं तेढ निर्माण झाली आहे.

एकोपा निर्माण करण्यासाठी शासन व सामाजिक पातळीवर विविध उपक्रम आयोजित करण्याची गरज आहे. सर्व समाजाने मिळून फुटीरतावादी गटांचे मनसुबे उधळून लावायला हवेत.

२२. भारत देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान स्वीकारले. विविध चळवळीतील महापुरुष व त्यांच्या अनुयायांच्या कष्टामुळे भारत देश प्रगती करीत आहे. असे असताना देशात आजही जातीवादातून नितीन आगे हत्यासारख्या गंभीर व दुर्दैवी घटना घडतात, ज्यामुळे दलित समाजात प्रचंड असंतोष निर्माण होतो व तो योग्यही आहे.

अशा प्रसंगी जातीय अत्याचार करणार्‍याला कठोर शिक्षा होण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करावी. तसेच, जातीभेद आणि अत्याचार मुक्त, समतापूर्ण समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे.

२३. लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याची मानसिकता तयार करण्याचे काम काही फुटीरतावादी, संशयित माओवादी विचारांचे गट करीत आहेत. अशा गटांवर योग्य कारवाई न केल्यास कोरेगाव भीमा हिंसाचारासारखे प्रसंग पुन्हा घडू शकतात. यामुळे सरकार, प्रशासन व समाजाने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

===

सदर रिपोर्ट तयार करण्यासाठी ग्राऊंड लेव्हल रिसर्च, संबंधितांच्या मुलाखती, अभ्यास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या सत्यशोधन समितीतील सदस्यांची नावे:

१. कॅप्टन स्मिता गायकवाड, (माजी लष्करी अधिकारी, मुंबई)
२. श्री. सागर शिंदे, (समन्वयक, लोकशाही जागर मंच, पुणे)
३. प्रा. सुभाष खिलारे, (अध्यक्ष, मातंग क्रांती सेना, महाराष्ट्र)
४. श्री दत्ता शिर्के,(मराठा युवा संघ, नागपूर)
५. श्री. प्रदीप पवार, (सामाजिक कार्यकर्ते, पुणे)
६. अॅड. सत्यजित तुपे, (माजी सदस्य, पुणे बार असोसिएशन)

===

हे ही वाचा – “जय भीम हा नारा इस्लामच्या विरोधात” वाचा इस्लामच्या अधिकृत भूमिकेमागचं सत्य!

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?