पांढरपेशा “सुजाण” नागरिकांनो : मलेरिया पासून “सुरक्षित” आहात असं वाटतं? पुन्हा विचार करा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखक: संजय सदानंद भोंगे, समाज कार्यकर्ता, परिवार कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, मुंबई (भारत सरकार)

===

मनुष्याच्या रक्ताचे निरनिराळे गट का आहेत?

एका मुलाने उत्तर दिले, डासांना पण निरनिराळ्या चवीचे रक्त प्यायला मिळावे म्हणून…!

विनोदाचा भाग सोडा…पण एक वस्तुस्थिती आपण सर्वच मान्य करू की देशात असे खूप कमी लोक असतील ज्यांना कधीच डास चावला नसेल किंवा ज्यांनी मलेरिया अथवा डेंग्यू चा अनुभव घेतला नसेल.

कधीही, कुठेही आणि कुणालाही थंडी वाजून ताप आला असेल तर पहिला प्रश्न मनात येतो, तो म्हणजे ह्याला मलेरिया तर झाला नसेल न? किंवा हा ताप डेंग्यू चा तर नाही न? अगदी डॉक्टर कडे गेल्यावर पण आपल्या ओठी हीच शंका येते. एवढी धास्ती इवल्याश्या डासांनी आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण केली आहे.

तुम्ही म्हणाल… अचानक हे मलेरिया पुराण कशासाठी…?

मलेरियाची इतकी चर्चा सुरु असते की त्याविषयी माहिती नसलेला व्यक्ती शोधून सापडणार नाही. आज मलेरिया बद्दल लिहितोय… निमित्त आहे जागतिक मलेरिया दिनाचे…

२५ एप्रिल सर्वत्र मलेरिया दिन म्हणून पाळला जातो…!

सर्वसाधारणपणे पांढरपेशा मध्यमवर्ग आणि आणि उच्च वर्गामध्ये एक गैरसमज आहे की “आमची घरे स्वच्छ असतात, आम्ही सर्व प्रकारची आधुनिक साधनांचा वापर करून घरापासून डासांना दूर ठेवतो, त्यामुळे आम्हाला हे आजार होणारच नाहीत, किंवा हे असले आजार न फक्त झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्यांना होतात” वगैरे वगैरे. म्हणून अनेकदा महापालिकांचे कर्मचारी या आजाराविषयी माहिती घेण्यासाठी जातात किंवा तपासणी साठी जातात तेव्हा, या मोठमोठ्या बिल्डींग मधील लोक त्यांना अपमानास्पद वागणूक देवून घालवून देतात.

पण जेव्हा प्रसिद्ध सिने अभिनेता डेंगूने आजारी पडतो, मंत्री महोदयांना मलेरिया होतो तेव्हा लक्षात येते, डासांच्या दरबारी गरीब- श्रीमंत, सामान्य – असामान्य, गगनचुंबी इमारती – असा काही भेदभाव नाही डास सगळ्यांना चावतात.

 

mosquitoes malaria dengue inmarathi

 

सगळ्यांनाच माहितीये की मलेरिया हा सर्व सामान्य आजार आहे. त्या विषयीच्या माहितीचा प्रचार आणि प्रसार खूप वर्षां पासून केला जातोय. दूरचित्रवाणी वाहिन्या असोत किंवा वर्तमान पत्रे सर्वत्र डासांवर नियंत्रण करण्यासाठीच्या साधनांची जाहिराती पाहायला मिळतात. शासनही राष्ट्रीय कीटक जन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांच्या माध्यमातून मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करतेच आहे. तरीही डास आणि मलेरिया हे आपल्या जीवनातील अविभाज्य भाग बनून राहिले आहेत.

डास नियंत्रणाच्या साधनांच्या जाहिरातींचा प्रभाव आणि माहिती यांच्या आधारे आपण, कॉइल, रिपेलंट, मच्छरदाणी यांचा वापर करतो आहोत, त्यांचा परिणाम हि काही प्रमाणात दिसतो आहे पण, आपण या आजारांना पूर्णपणे थांबवू शकलेलो नाही. असे का व्हावे….? याचे कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे, पण ती काहीशी अपूर्ण असावी किंवा आपल्याला पूर्ण माहिती आहे, पण आपण त्या माहिती प्रमाणे वर्तनात बदल करण्यास तयार नसू… किंवा आपल्या मनात संभ्रम आहे की आपण वर्तनात बदल केला तरी आपल्याला निश्चीत फायदा होईल किंवा नाही.

काहीही असो. खरे सांगायचे तर, सर्वांच्या सामायिक आणि एकत्रीत प्रयत्नाने आपल्याला मलेरिया आणि डेंग्यू ला हद्दपार करणे सहज शक्य आहे.

प्रथमत: आपल्याला असलेल्या माहितीची उजळणी करायला हवी.

मलेरिया, डेंगू आणि चिकन गुनिया हे सर्व आजार हे डासांच्या चाव्याने पसरणारे आजार आहेत. यातील मलेरिया होतो तो एनाफेलीस डासाच्या मादीच्या चाव्याने तर डेंगू होतो तो एडीस एजीप्तो मुळे, चिकन गुनिया होण्यास कारणीभूत ठरतात ते एडीस एजीप्तो किंवा एडीस एल्बोपिकटस.

मलेरिया चा परजीवी एनाफेलीस डासाच्या मादीच्या शरीरातून तिच्या डंखातील लाळे तून मानवी शरीरात प्रवेश करतो आणि त्याला मलेरिया ची बाधा होते. मलेरिया होण्यास चार प्रकारचे परजीवी कारणीभूत असतात. १. प्लाझमोडीअम मलेरी 2. प्लाझमोडीअम ओवेल 3 प्लाझमोडीअम व्हायवेक्स आणि 4 प्लाझमोडीअम फाल्सेफेरम.

मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर हे परजीव तत्काळ आपले अस्तित्व दाखवत नाहीत. आधी ते आपले संख्याबळ वाढवतात आणि मग हळूच रक्तात शिरतात. एकदा का ते रक्तात शिरले की लाल रक्त कोशिकांना नष्ट करण्यास सुरुवात करतात. यालाच आपण मलेरिया झाला आहे असे म्हणू शकतो.

तसे पहिले तर डास तर वर्षभर आपल्या अवती भवती असतात पण पावसाळ्यात किंवा दमट वातावरण असेल तेव्हा डास खूप प्रमाणात वाढतात, त्या काळात हे आजार पसरण्याचे प्रमाण खूप जास्त असते. अनेकदा इतर मोसमात सुद्धा मलेरिया आणि डेंगू आढळून येतोच.

जसे आधी सांगितले, एकदा का शरीरातील रक्त वाहिन्यामध्ये पसरलेल्या प्लाझोडीअमने लाल रक्त कोशिका नष्ट करण्यास सुरुवात केली की व्यक्ती मध्ये मलेरिया ची लक्षणे आढळून येतात.

त्याला खूप थंडी वाजून कापरे भरते, अगदी अंगावर जाडजूड पांघरुणे घेतली तरी थंडी वाजत राहते. खूप ताप येतो. डोके दुखते, डोके जड झाल्यासारखे वाटते. थोडी थंडी कमी झाली तरी ताप राहतो, वांती पण होते, दरदरून घाम येतो.

या सर्व लक्षणां मुळे व्यक्ती अशक्त होऊन जाते. ही लक्षणे नियमित अंतराने दिसत राहतात. काही रुग्णामध्ये मात्र या लक्षणांची त्रीव्रता एवढी दिसत नाही. त्यामुळे मलेरिया झालाय की सामान्य ताप आहे ते कळत नाही यामुळे चटकन निदान करणे शक्य होत नाही. विशेषतः फाल्सेफेरम मलेरिया च्या बाबतीत असे घडते. म्हणूनच आपण सावध असणे गरजेचे आहे. कारण सर्वच डास हे एनाफेलीस नसतात.

काही डास हे एडीस एजीप्तो पण असतात, ज्यांना टायगर डास म्हणून पण ओळखले जाते. ते डेंगू होण्यास कारणीभूत ठरतात. आणि मागील काही वर्षातील डेंगू चे वाढते प्रमाण आपल्याला माहिती आहेच. या आजारांची लक्षणे ही सर्वसाधारण सारखीच असल्याने लवकर निदान होत नाही आणि निदान होई पर्यंत खूप उशीर झालेला असतो.

खूप घरातून असे दिसून येते की ताप आला की लगेच आपल्या औषध गोळ्या ठेवण्याच्या डब्यातून, आई, ताई, भाऊ, बाबा यांच्या साठी या आधी कधीतरी आणलेल्या औषधाच्या गोळ्यातून एखादी पैरासीटामोल किंवा एन्टीबायोटीक गोळी घेवून वेळ मारून नेली जाते. या गोळ्यांनी तात्पुरता ताप कमी होतो पण शरीरातील मलेरिया चा परजीवी तसाच राहतो.

मग आजार गंभीर रूप धारण करतो, अगदी रुग्णाला तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करायची वेळ येते. त्यातच जर फाल्सेफेरम किंवा डेंगू असेल तर तो जीवावर बेतू शकतो.

वर वर्णन केलेली लक्षणे दिसली की ताबडतोब डॉक्टर कडे जायलाच हवे. त्यांनी सांगितलेल्या रक्ताच्या तपासण्या करायला हव्यात.

मलेरिया च्या या तपासण्यामध्ये रक्तात मलेरिया चे परजीवी आहेत किंवा नाहीत ते तपासले जाते. जर असे परजीवी आढळले तर ते कुठल्या प्रकारचे आहेत ते पहिले जाते. काही वेळा मलेरियाचे परजीव रक्तात लगेच दिसून येत नाहीत, अश्यावेळी डॉक्टर लक्षणांची समीक्षा करून योग्य उपचार सुरु करतात. परिणामी अधिक धोका निर्माण होण्यापूर्वीच आपण आजारावर नियंत्रण मिळवून स्वतः ला सुरक्षित करू शकतो.

मलेरिया आणि डेंगू हे आजार शरीरावर खूप परिणाम करतात, लाल रक्त कोशिका नष्ट होतात ते तर आपण पाहिलेच. पण हे आजार मानवी मेंदू, फुफ्फुस, यकृत, आतडे या इतर अवयवांवर पण परिणाम करतात अनेकदा मुत्यू ही होतो.

मलेरिया चे निदान झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण औषधोपचार घेणे आवश्यक आहे. ही औषधे थोडी उष्ण असल्याने रुग्णाने आहारात दुध घेणे तसेच डॉक्टर च्या सल्ल्याने आहारात आवश्यक बदल करणे गरजेचे असते. थोडे बरे वाटले की रुग्ण औषध घेण्याचा कंटाळा करतात, तसे करणे योग्य नाही. मलेरिया झाल्यास पूर्ण औषधे घेतली पाहिजे. त्याने आजार पुन्हा उलटून येत नाही.

आतापर्यत आपण पहिले की मलेरिया कसा होतो, त्याची लक्षणे काय, तपासणी कशी करतात, आणि उपचार कसे व्हायला हवेत. पण आजच्या दिवशी या माहितीसोबत अत्यंत महत्वाची माहिती आपण घेतली पाहिजे ती म्हणजे प्रतिबंधाची.

सगळेच म्हणतात की या आजारापासून सगळ्यांना कायमची सुरक्षा मिळू शकते. हा आजार नेहमी साठी हद्दपार करता येवू शकतो. ते कसे करता येईल त्याविषयीच्या उपायांची माहिती आपण घ्यायलाच हवी.

एखादी गोष्ट समुळ नष्ट करण्यासाठी तिच्या मुळाशी घाव घालायला हवा. डासांची सातत्याने होणारी उत्पत्ती ही मलेरिया आणि डेंगू च्या वाढत्या प्रसाराचे कारण आहे. जर आजाराचे परजीवी पसरवणारे डास कमी किंवा नष्ट झाले तर आपण आपला परिसर मलेरिया मुक्त करू शकू.

हे काम एका दिवसात होणे शक्य नाही. जोपर्यंत डासांची उत्पत्ती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत सगळ्यांनी मच्छरदाणी, कॉइल, रिपेलंट, क्रीम या डासांना आपल्या पासून दूर ठेवणाऱ्या साधनांचा वापर करायला हवा. मलेरिया चे डास हे रात्री च्या वेळी क्रियाशील असतात, तर डेंगू चे डास हे सकाळच्या वेळी जास्त क्रियाशील असतात. या वेळी आपल्याला डासापासून बचावाची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

ज्या ग्रामीण भागात मलेरिया चे प्रमाण खूप जास्त आहे, तिथे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कीटकनाशक भारीत मच्छरदाण्या भारत सरकारने पुरवल्या आहेत त्यांचा उपयोग नित्यनेमाने व्हायला हवा.

मलेरिया आणि डेंगू चे डास से स्वच्छ साठून राहिलेल्या पाण्यात आपली अंडी घालत असतात. डासांच्या उत्पत्तीस आळा घालण्यासाठी करायच्या उपायांमध्ये सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपण राहत असलेल्या घराच्या गच्चीवर, खिडकीत, आजूबाजूला जिथे जिथे स्वच्छ पाणी साठून राहू शकते अश्या अडगळीच्या भंगार वस्तू, डबे, रिकाम्या कुंड्या, माठ, जुने टायर, नारळाच्या करवंट्या, या नष्ट करायला हव्यात.

परिसरात कुठेही पाणी साठून राहणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. अंगणात पाण्याच्या नळाजवळ कुठेही खड्डे असतील तर ते बुजवून टाकावे.

पाण्याच्या टाक्या या दर दोन दिवसांनी पूर्ण पणे स्वच्छ आणि कोरड्या करून मगच पुन्हा भराव्या. आठवड्याला एक दिवस कोरडा दिवस पाळावा, म्हणजेच सर्व पाणी साठवणूकीची भांडी टाक्या पूर्ण रिकाम्या करून, घासूनपुसून स्वच्छ कराव्या, त्यांना कोरडे करावे.

आपल्या घरातील इतरही अनेक जागा आहेत जिथे डासांची उत्पत्ती होत असते. त्यात प्रामुख्याने आपल्या घराच्या खिडकीत ठेवलेल्या कुंड्या, आणि त्याखाली असणाऱ्या तबकड्या, झाडांना नियमितपणे आपण पाणी घालून जागवतो टवटवीत ठेवतो पण त्याखालच्या तबकडीत साठून राहणाऱ्या पाण्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही. आणि मग डेंगू मलेरिया चे डास अत्यंत आनंदाने तिकडे आपली पिलावळ निर्माण करतात आणि मग ही पिलावळ आपल्या जीवावर उठते. म्हणून खिडकीतील कुंड्या मध्ये नियमित पाणी घालायला हवे सोबतच, रोज त्या स्वच्छ करायला हव्यात जेणे करून तिथे डासांची वसाहत तयार होणार नाही.

सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात उन्हाची काहीली वाढली आहे. अजून मे महिना यायचा बाकी आहे, सगळेच हैराण झालेत. मग उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी घराघरातून कुलर वापरले जात आहेत. कुलरची पाण्याची टाकी फुल केली की मग दिवस रात्र गार गार हवा खायला आपण मोकळे होतो. छान वाटते, पण आपण त्या छान वाटण्यात अजून एक डासांच्या उत्पत्ती स्थानात भर घालत नाहीत ना याचा विचार करायला हवा. कारण एकदा भरलेले पाणी कुलर मध्ये तसेच साठून राहिले तर दोन-चार दिवसात, डासांना अंडी घालण्यासाठी पोषक जागा निर्माण होते आणि पर्यायाने डासांची संख्या वाढण्यास आपणच अप्रत्यक्षपणे हातभार लावतो.

आतापर्यंतच्या वाचनात लक्षात आले असेलच की डासांच्या वाढीला आणि प्रसाराला अप्रत्यक्षपणे आपले अज्ञान आणि आणि अनेकदा निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो. घरातील आणि परिसरातील साफ सफाई, परिसरातील डबके नष्ट करणे, घरात कोरडा दिवस पाळणे या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला डासांपासून वाचवू शकतात.

घरासमोरून जाणाऱ्या गटारी, मोठे पाण्याचे हौद, तलाव, या मध्ये गप्पी मासे सोडायला हवेत. हे मासे डासांची अंडी खातात आणि डासांच्या निर्मुलनासाठी मदत करतात.

या वर्षीच्या जागतिक मलेरिया दिनाचे घोषवाक्य आहे, “मलेरिया निर्मुलनासाठी तयार…!”

तेव्हा चला! आपण पण आपले घर, आणि परिसर डासांपासून मुक्त करण्यासाठी आणि मलेरिया मुक्त आयुष्य जगण्यासाठी एकत्रित येवू आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करून मलेरिया ला पराभूत करू.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “पांढरपेशा “सुजाण” नागरिकांनो : मलेरिया पासून “सुरक्षित” आहात असं वाटतं? पुन्हा विचार करा!

  • April 25, 2018 at 12:04 pm
    Permalink

    really useful information

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?