' 'पहिला दगड कुणी फेकला?' - कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट आणि घटनाक्रम (भाग २)

‘पहिला दगड कुणी फेकला?’ – कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट आणि घटनाक्रम (भाग २)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हे ही वाचा : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : पडद्यामागचे सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग १)

===

संपादकीय निवेदन :

२०१८ ह्या वर्षाची सुरुवात महाराष्ट्रासाठी, आणि खरंतर देशासाठी अत्यंत निराशाजनक झाली. आपणा सर्वांना विमनस्क करणाऱ्या घटना नूतन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात घडल्या. आजही सदर घटनेचे पडसाद उमटत आहेतच. परंतु आजपर्यंत हे सर्व घटनाक्रम नेमके कसे घडत गेले, त्यामागे आधीच्या घटनांची कोणती पार्श्वभूमी होती ह्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला गेला नाही.

दंगलींसारख्या सामाजिक गुन्ह्यांच्या बाबतीत केवळ त्यावेळी दगडफेक करणाऱ्या गुन्हेगारांना अटक होणं पुरेसं नसतं. दंगल “घडविणाऱ्या” पडद्यागच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचणं, त्यांचे चेहरे समोर आणणं आवश्यक असतं. हेच काम करण्याच्या उद्देशाने, सदर रिपोर्ट, विवेक विचार मंच तर्फे, तयार करण्यात आला आहे.

समाजात अभूतपूर्व दुही माजवणाऱ्या ह्या काळ्याकुट्ट घटनाक्रमांसाठी नेमके कोण जबाबदार आहेत हे महाराष्ट्रासमोर आणण्याच्या भूमिकेतून इनमराठी परिवाराने सदर अहवाल ५ भागांत प्रसिद्ध करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

टीम इनमराठी

===

रिपोर्ट प्रकाशक : विवेक विचार मंच, महाराष्ट्र

===

१ जानेवारी २०१८ घटनाक्रम

गोविंद गोपाळ (महार) समाधीवरील छत्री तोडण्याचा प्रसंग व मराठा समाजावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा व खोटा इतिहास पसरविण्याचा प्रयत्न या विषयांची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रक्षोभक व भडक स्वरूपात पसरल्याने दोन्ही समाजात राग निर्माण झाला होता. अनेक अफवा पसरविल्या गेल्या.

यामध्ये वढू बुद्रुक येथे संभाजी भिडे यांची १ जानेवारी २०१८ रोजी जाहीर सभा होणार असे खोटे मेसेज सोशल मीडियावर पसरविण्यात आले. तसेच १ जानेवारी २०१८ रोजी गोविंद गोपाळ यांच्या समाधीवरील छत्री पाडणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी काही लोकांनी वढू बुद्रुकला जाण्याचे आव्हान करणारे भडक भाषेतील मेसेज ही सोशल मीडियावर फिरवले गेले.

तर वढू बुद्रुक येथे खोटा इतिहास पसरविला जाऊ नये व काही गडबड होऊ नये म्हणून १ जानेवारी २०१८ रोजी संभाजी महाराज समाधीस्थळी येण्याचे आव्हान करणारे मेसेज काही तरुणांनी फिरवले.

यामुळे एकीकडे १ जानेवारीला विजयस्तंभाला मानवंदना देण्यास आलेले दलित बांधव (प्रामुख्याने नवबौद्ध, महार) वढू बु. येथे येऊ लागले असताना दुसरीकडे आसपासच्या गावातील प्रामुख्याने विविध सामाजिक व राजकीय विचारधारेचे मराठा समाजाचे तरुणही जमू लागले. त्यापैकी अनेकांनी भगवे झेंडे हाती घेतले होते. संभाजी महाराजांच्या समाधीला इजा पोहोचू नये या उद्देशाने ते समाधीस्थळी एकत्र आले होते.

त्या वेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाली, पण पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यामुळे वढू बुद्रुकमध्ये कोणताही हिंसाचाराचा प्रकार झाला नाही.

पुढे कोरेगाव भीमा व सणसवाडी या परिसरातील भगवे झेंडे घेऊन आलेले तरुण परत जाताना कोरेगावच्या दिशेने निघाले. तसेच विविध ठिकाणाहून वढू बुद्रुक येथे निळे झेंडे घेऊन जमलेले लोकही कोरेगाव भीमाच्या दिशेने जात होते.

वढू बुद्रुक ते कोरेगाव भीमा अंदाजे ३ कि.मी. अंतर आहे. या ३ कि.मी. पट्ट्यात कुठेच हिंसाचार झाला नाही.

मात्र या ३ कि.मी. पट्ट्यात पोलिसांनी खबरदारी घेऊन भगवे झेंडे घेऊन निघालेली ‘रॅली’ थांबवून धरली नाही. यामुळे पुढे कोरेगाव भीमा येथे चौकात भगवे झेंडे हाती घेतलेले अंदाजे २०० जण व जयस्तंभाच्या दिशेने हाती निळा झेंडा घेऊन निघालेले लोक समोरसमोर आले.

या वेळी हातातील झेंडे फिरवण्यावरून वाद निर्माण झाल्याचे कोरेगाव भीमाच्या ग्रामस्थांनी सांगितले (एका उपलब्ध व्हिडिओमध्येही तसे स्पष्ट दिसते). या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले.

एका व्हिडिओमध्येही स्पष्ट दिसते की, सुमारे २०० फूट लांबून एक निळा झेंडा घेतलेला तरुण धावत भगवे झेंडे घेतलेल्या गटात घुसतो. हा तरूण निळा झेंडा नाचवत असताना समोरचा तरुण भगवा झेंडा नाचवतो व पुढे यातून वाद होऊन मारामारी सुरू होते. निळा झेंडा घेऊन पळत येणार्‍या तरुणास एकाही पोलिसाने खबरदारीने समोरच्या भगव्या झेंडा घेतलेल्या गटात जाऊ नये म्हणून अडविले नाही, हे विशेष. हीच घटना दंगलीची सुरुवात आहे, असे कोरेगाव भीमाचे ग्रामस्थ म्हणतात. याठिकाणी पोलिसांनी विशेष खबरदारी घेऊन दोन्ही गट समोरसमोर येऊ दिले नसते, तर हा हिंसाचार टळला असता.

 

 

कोरेगाव भीमा चौकातील ही मारामारी दुपारी १२ च्या सुमारास सुरू झाली व थोड्याच वेळात (अंदाजे अर्ध्या तासात) आटोक्यात आली. पुढे जवळपास पाऊण तास काही झाले नाही. मात्र नंतर कोरेगाव भीमा परिसरातील एक गणपतीच्या मंदिरावर हल्ला झाला (फोटो उपलब्ध आहेत), गणेश मूर्तीची विटंबना झाली व पुढे हिंसाचार पुन्हा सुरू झाला.

 

Koregaon Bhima Report 17 - Ganesh Mandir inmarathi
कोरेगाव भीमा येथील गणेश मंदिर

या वेळी मोठी दगडफेक झाली, ज्यात दोन्ही समाजाचे नुकसान झाले. तसेच तलवार, कोयते घेतलेल्या बाहेरून आलेल्या काही सशस्त्र व्यक्तींच्या गटांनी परिसरातील दुकाने फोडली, गाड्या फोडल्या, ज्वलनशील पदार्थ वापरून जाळपोळ केली, स्थानिक माणसांवर हल्ला केला. काही व्हिडिओमध्ये या सशस्त्र गटांनी जोरदार हल्ला केल्यामुळे पोलिसांना पलायन करावे लागले इतकी गंभीर स्थिती स्पष्ट दिसून येते.

या बाहेरून आलेल्या काही सशस्त्र व्यक्तींच्या हाती निळे व पंचशीलचे झेंडे विविध उपलब्ध व्हीडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत. यामुळे बाहेरून काही गट हल्ला करण्याच्या तयारीत आले होते, असा स्थानिकांचा आरोप आहे. तर, स्थानिक घरांवरून दलितांवर दगडफेक करण्यात आली व घरांवर दगड साठवून ठेवले म्हणून हा दलितांवर हल्ला करण्याचा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप केला जातोय.

मात्र बाहेरून आलेल्या काही लोकांनी स्थानिक घरांवर जोरदार दगडफेक केली आणि त्यास प्रतिउत्तर देताना तेच दगड काही स्थानिकांनी आपल्या घरावरून खाली मारले, असे कोरेगाव भीमा, सणसवाडी परिसरातील गावकरी म्हणतात.

दरम्यान, पेरणे गावातील नदीकाठी विजयस्तंभाजवळील परिसरात कोणताही हिंसाचार झाला नाही. मानवंदना देण्यासाठी येणारे लाखो बांधव येत-जात होते. हिंसक घटना प्रामुख्याने नदी पुलाच्या पलीकडच्या कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, चाकण परिसरात घडल्या. पुलाच्या अलीकडे तसेच, पुण्याहून जयस्तंभ दिशेने जाणार्‍या कोणावरही हल्ला झाला नाही.

कोरेगाव भीमा, सणसवाडी परिसरात दलित बांधवांनी वाहने पार्क केली होती. त्यात ज्यांची वाहने जाळली गेली त्यांना परत घरी जाण्यास मोठा त्रास झाला. त्यात आणखी ट्रॅफिकची समस्या निर्माण झाल्याने लोकांचे हाल झाले. ट्रॅफिक जाम झाल्याने पुण्याहून जे बांधव बसने आले होते, त्यांची पायपीट झाली.

दंगल जवळपास साडेचार तास चालली. दंगलीमध्ये राहुल फटांगडे नामक मराठा तरुणाचा सणसवाडी परिसरात खून झाला. राहुलने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले टी-शर्ट घातले होते म्हणून त्याच्यावर हल्ला केल्याचे वृत्त आहे (संदर्भ लिंक). या दंगलीत अनेकजण जखमी झाले, तर काहीजण गंभीर जखमी झाले.

नवबौद्ध समाजातील अमित भोंगाडे हा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील तरुणाला दगडफेकीत दगड मारल्याने तो गंभीर जखमी झाला. अमित हा समता सैनिक दलात असून १ जानेवारी २०१८ रोजी पूर्ण गणवेषात जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आला होता. मानवंदना दिल्यानंतर परत जाताना अंदाजे सायंकाळी ६ वाजता शिक्रापूरजवळ त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याने, दगड लागल्याने अमित गंभीर जखमी झाला. तो ससून रुग्णालयांत अ‍ॅडमिट होता. जवळपास २ महिने उपचार घेतल्यानंतर त्याला सोडण्यात आले. (संदर्भ लिंक)

विशाल जाधव या जखमी तरुणाची पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. हा लातूर जिल्ह्यातील मराठा तरुण रांजणगाव येथे नोकरी करत होता.

१ जानेवारीला आपल्या मित्रासोबत तो मोटारसायकलवर कोरेगाव भीमा मार्गे आळंदी देवस्थानला जात होता. पण, भीमा कोरेगावला त्याच्या कपाळावर टिळा व गाडीवरील शिवाजीराजांचा फोटो पाहून दंगलीतील काही आंबेडकरी घोषणा देणार्‍या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर त्यामागे तलवारी कोयते घेऊन धावले, जीव वाचविण्यासाठी विशाल जवळच्या दोन मजली इमारतीच्या गच्चीवर धावत गेला. हल्लेखोर त्याच्यामागे आल्याने त्याने गच्चीवरून उडी मारली.

खाली पडल्यावरही त्याच्यावर हल्ला केला गेला. अनेक दिवस उपचार घेतल्यानंतर त्याची त्याची स्थिती आता सुधारत आहे. (संदर्भ लिंक)

सुमारे २०० पेक्षा अधिक गाड्या, १०० पेक्षा अधिक दुकाने, घरे, हॉटेल यांची जाळपोळ झाली. आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाची गाडी पेटवली गेली, पोलिसांच्या गाडीवरही हल्ला झाला. कोरेगावातील जयेश शिंदे या तरुणाचे ‘छत्रपती ऑटो’ नावाचे चार चाकी गाड्यांचे मोठे शोरूम व दुचाकीचे सर्व्हिस सेंटर होते. हे हल्लेखोरांनी पूर्णतः जाळून खाक केले.

जीवनात जितके कमावले सर्व गेल्याचे दुःख जयेश शिंदे व्यक्त करत होते. हल्ला करणारे लोक धारदार शस्त्र, ज्वलनशील पदार्थ असलेला स्प्रे घेऊन तयारीने आले होते, तर काहींना स्थानिकांनी शस्त्र पुरवली असे जयेश शिंदे सांगतात. छत्रपती ऑटो, जयभवानी हॉटेल, सोमेश्वर… अशा विशिष्ट नावाचे बोर्ड बघून तीच दुकाने जाळण्यात व फोडण्यात आली, मंदिरांवरही हल्ले करण्यात आले असे जयेश शिंदे सांगतात. (संदर्भ लिंक)

अतिशय गरीब असलेले मुथा दांपत्य व त्यांची मतिमंद मुलगी या कुटुंबाची अशीच कथा. त्यांच्या घराच्या पुढील हॉलमध्ये त्याचे दुकान व मागील बाजूस ते राहत होते. त्यांच्या दुकानाला आग लावली गेली. खूप धूर आत आल्याने त्यांना ते कळाले. मागच्या खोलीतून जिन्याने ते कुटुंब गच्चीवर गेले व लोकांनी शीडी आणून त्यांच्या कुटुंबाला खाली उतरवल्याने त्यांचे प्राण वाचले.

 

 

कोरेगावातील स्थानिक व्यवसायिकांचे मोठे नुसकान झाल्याचे निदर्शनास आले. या हल्लेखोरांना काही स्थानिक दलित लोकांनी ठरवून मदत केली, शस्त्र पुरविली; तसेच एका स्थानिक पेट्रोल पंपाकडून हल्लेखोरांना आग लावण्यासाठी पेट्रोलही पुरविण्यात आले, असे कोरेगाव भीमामधील स्थानिक गावकरी आरोप करतात. व त्यामुळे हे दलितांवर हल्ला करण्याचे पूर्वनियोजित षडयंत्र आहे असे म्हणणे पूर्णपणे खोटे असून, उपलब्ध व्हिडिओचा आधार घेऊन बाहेरून आलेल्या हल्लेखोरांना मदत करणार्‍या स्थानिक संशयितांची नावे देऊनही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याचे गावातील काही हिंसाचार पीडितांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काही स्थानिक लोकांनी बाहेरून आलेल्या दलितांच्या गाड्या फोडल्या, तसेच काही दलित बांधवांची घरे/दुकाने जाळली. तसेच सणसवाडी गावातील बौद्धविहारावर दगडफेक झाली. या बौद्धविहाराचे संस्थापक सुदाम पवार सांगतात की, ‘अनेक वर्षे आम्ही येथे गुण्यागोविंदाने, सहकार्याने राहतो, पण असे पहिल्यांदा घडले.’

घटनेसंदर्भात समितीतील सदस्यांनी पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, शिक्रापूर यांची भेट घेतली व चर्चा केली. पोलीस बंदोबस्त संदर्भात ते म्हणाले की, दर वर्षीपेक्षा या वर्षी जास्त बंदोबस्त होता. वढू बुद्रुक गाव व पेरणे गाव विजयस्तंभ या ठिकाणी जास्त पोलीस बंदोबस्त होता. पण घटना कोरेगावात घडली, लोकांची संख्या खूप असल्याने नियंत्रण मिळवणे अवघड झाले.

बराच वेळ दंगल चालली व मोठ्या संख्येत गाड्या जळाल्या – असे का? याविषयी ते म्हणाले की, एका ठिकाणी जमावाला शांत केले की दुसरीकडे जाळपोळ व्हायची. गाड्या जास्त लवकर पेट घेत होत्या. परंतु एक महत्त्वाची बाब अशी की, पोलिसांनी दंगलीचे लोण नदीच्या पलीकडे – म्हणजे विजयस्तंभाकडे – जाऊ दिले नाही आणि त्यामुळे मोठी हानी टळली. त्यांनी अनेक पोलीस जखमी झाल्याचे देखील म्हटले.

दंगल पूर्वनियोजित होती का?
गावातील लोकांनी घरावर दगडगोटे नेऊन ठेवले होते का?
१ जानेवारीला गावे का बंद होती?

ग्रामस्थांनी सांगितले की, हिंसाचारात स्थानिक गावकर्‍यांच्या अनेक गाड्या, दुकाने व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः रस्त्याच्या कडेला, दुकानालगत लावलेल्या बर्‍याच गाड्या जाळल्या गेल्या. याबद्दल ग्रामस्थ म्हणतात की, जर जाळपोळ होणार हे नियोजित असते तर, गावकर्‍यांनी त्यांच्या गाड्या गावात कशाला ठेवल्या असत्या?

तसेच गच्चीवर दगडगोटे साठवले व वरून दगडफेक झाली आणि हे सर्व पूर्वनियोजित होते यात काहीही तथ्य नसल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. स्थानिक घरांवर दगडफेक झाल्यावर तेच दगड स्थानिकांनी खाली फेकून मारले, मात्र एकही स्थानिकाने घरात दगडांचा साठा करून ठेवला नव्हता, असे ग्रामस्थ म्हणतात.

याबाबत पोलीस निरीक्षक गलांडे म्हणतात की, दंगल सुमारे पाच तास चालली, तेव्हा दंगल सुरू झाल्यानंतर काहींनी दगड घरावर नेले असतील व वरून दगड मारले असतील. परंतु अगोदरच दगडगोटे गच्चीवर नेले असे म्हणता येत नाही.

दोन्ही बाजूने, म्हणजेच, रस्त्यावरून स्थानिक घरांवर व स्थानिक घरांवरून दगड मारले गेल्याचे उपलब्ध व्हिडिओजमधून दिसून येते, मात्र नियोजनपूर्वक कोणी दंगलीत मारण्यासाठी घरात दगडगोटे साठवून ठेवल्याचा कोणताही पुरावा समिती सदस्यांना आढळून आलेला नाही.

कोरेगाव भीमा व परिसरातील गावे १ जानेवारी रोजी बंद होती. याबाबत माहिती घेतली असता समजले की, वढू बुद्रुकचा खोटा इतिहास सांगणारा फलक लावण्यावरून वाद झाल्याने गोविंद गोपाळ (महार) यांच्या समाधीवरील छत्री पडल्याने व ४९ मराठा तरुणांवर अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने दोन समाजात तणाव निर्माण झाला होता.

१ जानेवारी २०१८ रोजी गावात लाखो लोक येणार तेव्हा गावात कोणत्याही कारणावरून वाद होऊ नये व कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कोरेगाव भीमा ग्रामपंचायतने पोलिसांना रीतसर पत्र देऊन गाव बंद ठेवत असल्याचे सांगितले. विजयस्तंभ असलेले पेरणे गावसुद्धा बंद होते. तरी अनेक लोक पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स; तसेच हरबरा, खाद्य पदार्थ रस्त्यालगत विकत होते.

हिंसाचाराचा घटनाक्रम पाहिला की, वढू बुद्रुक येथील वाद निमित्त ठरले असे म्हणता येईल. वढू बुद्रुक येथे ग्रामपंचायातची परवानगी न घेता २८ डिसेंबर २०१७ रोजी वादग्रस्त फलक लावण्यात काही गावाबाहेरील लोक, संघटना सक्रीय होते, असे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. हा फलक लागला नसता तर पुढील दोन समाजात वाद होऊन १ जानेवारीचा हिंसाचार टळला असता असेही काही ग्रामस्थ म्हणतात. हा फलक हिंदुत्ववादी संघटनांनी लावलेला नाही. उलट फलक लावण्यावरून वाद होऊ नये यासाठी पोलीस पाटील वेळेत शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यास कळविले होते.

वढू बुद्रुक येथील एक ग्रामस्थ, दीपक आहेर, यांनी हा वादग्रस्त फलक लावणारे कोण, त्यांचा सखोल तपास होऊन त्यावर खटला दाखल करावा व १ जानेवारी हिंसाचाराचा काही पूर्वनियोजित कट आहे का याचा सखोल तपास करावा म्हणून तक्रार अर्ज शिक्रापूर पोलीस ठाण्यासह अन्य कार्यालयात दिला आहे.

 

Koregaon Bhima Report 18 - Complaint by Deepak Aher 1 inmarathi
ग्रामस्थ दीपक आहेर ह्यांची वादग्रस्त बोर्ड संदर्भातील तक्रार

 

Koregaon Bhima Report 18 - Complaint by Deepak Aher 2 inmarathi
ग्रामस्थ दीपक आहेर ह्यांची वादग्रस्त बोर्ड संदर्भातील तक्रार

 

यामध्ये पोलिसांनी खबर मिळताच कारवाई का केली नाही याचा तपास व्हावा अशीही मागणी केली आहे.

तसेच, गोविंद गोपाळ (महार) यांच्या बाबत नेमका इतिहास काय याचा सखोल अभ्यास करून ऐतिहासिक पुराव्यानिशी समाजासमोर वास्तव मांडण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी अशी मागणी वढू बुद्रुक येथील मराठा समाजाने केली आहे.

कादिर खान नावाचे बनावट आधार कार्ड कोणाचे ?

 

Koregaon Bhima Report 19 - Kadir Khan ADHAR card inmarathi
कादिर खान, बनावट आधार कार्ड

 

Koregaon Bhima Report 19 - Kadir Khan News inmarathi
कादिर खान, पोलिसांचा शोध

दरम्यान १ जानेवारी रोजी वढू बुद्रुक ग्रामस्थ शांताराम भंडारे यांना संभाजी महाराज समाधी स्थळी कादिर खान नावाचे आधारकार्ड सापडले. यावर पितमपुरा, दिल्ली येथिल पत्ता आहे. पोलीस तपासात हे आधारकार्ड बनावट असल्याचे वृत्त आहे.

सदर आधारकार्ड शिक्रापूर पोलिसांना ७ जानेवारी रोजी देण्यात आले. पुढे ग्रामपंचायत वढू बुद्रुक व शांताराम भंडारे यांनी या आधारकार्डच्या अनुषंगाने संशयित कादिर खान आसपासच्या परिसरात कोणाच्याही ओळखीचा नाही असे आढळून आल्याने त्याचा तपास करून १ जानेवारी हिंसाचाराशी काही संबंध आहे का, याचा शोध घ्यावा म्हणून शिक्रापूर पोलीस ठाण्यात पत्र दिले आहे.

===

हे ही वाचा : आरोप प्रत्यारोप अन षडयंत्रामागचे खरे गुन्हेगार : कोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट (भाग ३)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?