' थेट हिटलरला विरोध करण्यासाठी या व्यक्तीने केलेलं धाडस पाहून तुम्हालाही धक्का बसेल – InMarathi

थेट हिटलरला विरोध करण्यासाठी या व्यक्तीने केलेलं धाडस पाहून तुम्हालाही धक्का बसेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तुम्ही खाली दिलेला हा जो फोटो पाहत आहात तो काही वर्षांपूर्वी फारच चर्चेत होता. त्याला कारणच तसे होते – १३ जून १९३६ रोजी हिटलरने नौदल सैन्य प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी हा फोटो घेण्यात आला होता.

या फोटोमधील सर्व मंडळी नाझी असून नाझी रिवाजाप्रमाणे ती हिटलरला सॅल्युट करत आहेत. परंतु यामधील एक व्यक्ती मात्र हाताच्या घड्या घालून शांतपणे उभी असल्याची दिसते.

हिटलर शिस्तीच्या बाबतीत किती कडक होता हे वेगळे सांगायची गरज नाही. त्याला सेल्युट न करणे म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखे कृत्य होते. या कृत्याची शिक्षा म्हणून हिटलरला सेल्युट न करणाऱ्या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा देखील फर्मावली जाऊ शकत होती. म्हणूनच की काय भीतीने का होईना प्रत्येकजण हात पुढे करून नाझी रिवाजाप्रमाणे हिटलरला सेल्युट करतोय.

परंतु हिटलरला सेल्युट न केल्यास इतकी गंभीर स्थिती आपल्यावर ओढवू शकते हे माहित असून देखील इतक्या शांतपणे हिटलरचा अभिमान पायदळी तुडवणारी ही फोटोमधील व्यक्ती आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

 

august-landmesser-no-salute-marathipizza01

ह्या धाडसी माणसाचे नाव होते – ऑगस्ट लॅण्डमेसर.

२४ मे १९१० रोजी त्याचा जन्म झाला. १९३० मध्ये जर्मनीची आर्थिकस्थिती डबघाईला आली होती. अर्थव्यवस्था अगदीच खिळखिळी होऊन बसली होती. याचाच फायदा घेऊन विद्यमान सत्ताधाऱ्यांविरोधात बंड पुकारणाऱ्या एका नव्या नेत्याचा जन्म झाला. त्याचेच नाव ऍडॉल्फ हिटलर.

हिटलरने जर्मनीची सत्ता हाती येताच सर्वप्रथम आर्थिक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. त्याच्या याच अजेंड्यामुळे कित्येक तरुण हिटलरला आपला आदर्श मानु लागले आणि त्यापैकीच एक होता ऑगस्ट लॅण्डमेसर. हिटलर आपल्याला नोकरी मिळवून देईल या आशेने तो नाझी पक्षात सामील झाला.

परंतु त्याला हे माहित नव्हते की ज्या नाझीवादाच्या आधारावर तो आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न रंगवत होता तोच नाझीवाद त्याच्या स्वप्नांची राखरांगोळी करणार आहे.

 

august-landmesser-no-salute-marathipizza02

१९३४ मध्ये इर्मा एक्लर या ज्यू महिलेशी लॅण्डमेसरची ओळख झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडून गेले.

 

august-landmesser-no-salute-marathipizza03

हिटलरचा नाझीवाद आणि नाझी पक्ष  ज्यू लोकांच्या पूर्णत: विरोधात होता, त्यामुळे जेव्हा लॅण्डमेसरचे एका ज्यू महिलेशी संबंध आहेत हे कळताच त्याची नाझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तसेच लॅण्डमेसरने इर्मा एक्लरशी लग्न करता यावे यासाठी सरकार दरबारी सादर केलेला अर्ज देखील धुडकावून लावण्यात आला.

हकालपट्टी झाल्यावर Blohm + Voss शिपयार्डवर त्याने नोकरी स्वीकारली.

त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑगस्ट आणि इर्मा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. दोन वर्षानंतर लॅण्डमेसरने संपूर्ण कुटुंबासोबत डेन्मार्कला पलायन करण्याची योजना आखली, पण दुर्दैवाने त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यांना जर्मनी आणि डेन्मार्कच्या बॉर्डरवरच पकडण्यात आले.

सरकारी आदेश असताना देखील एका ज्यू महिलेशी संबंध ठेवल्याने आणि तिच्या सोबत देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने ऑगस्ट लॅण्डमेसरवर ‘वंशाचा अवमान’ (dishonoring the race) केल्याचा ठपका ठेवण्यात आला. आणि त्याला मोठ्या काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

दोन्ही दाम्पत्यांना न्यायालयात हजर केले असता लॅण्डमेसरने असा पावित्रा घेतला की त्याची पत्नी इर्मा एक्लर ज्यू वंशाची आहे, याबद्दल त्याला काहीही कल्पना नव्हती. कारण तिच्या आईने दुसरे लग्न केल्यानंतर चर्चमध्ये जाऊन इर्माने ख्रिश्चन धर्माचा बप्तिस्मा स्वीकारला होता. १९३८ मध्ये सबळ पुराव्याअभावी ऑगस्ट लॅण्डमेसरची सुटका झाली.

“परंतु पुन्हा त्याने ‘वंशाचा अवमान’ करणारे कृत्य केल्यास त्याला कडक शासन केले जाईल” असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले आणि पुढच्या तीन महिन्यातच न्यायालयाने आपला शब्द खरा करून दाखवला.

आपल्या पत्नीसोबत पुन्हा संबंध ठेवल्यामुळे लॅण्डमेसरला पुन्हा अटक करण्यात आली आणि ‘वंशाचा अवमान’ करणारे कृत्य केल्याप्रकरणी ३० महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावत त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले. यानंतर मात्र तो आपल्या पत्नीला पुन्हा कधीही पाहू शकला नाही.

याचवेळी जर्मनीमध्ये तो कायदा संमत झाला ज्यानुसार एखाद्या जर्मन नागरीकाने ‘वंशाचा अवमान’ करत एखाद्या ज्यू महिलेशी संबंध ठेवले तर त्या ज्यू महिलेला देखील शिक्षा केली जाईल. या कायद्या अंतर्गत इर्मा एक्लरला देखील अटक करण्यात आली आणि तिला अनेक वर्षे विविध कोठड्यांमध्ये डांबण्यात आले.  ऑगस्ट लॅण्डमेसर आणि इर्मा एक्लर यांच्या दोन्ही मुलींना अनाथालयात पाठवण्यात आले.

इर्माचा अंत अतिशय दुर्दैवी होता. हिटलरने ज्यू लोकांच्या कत्तलीसाठी १९४२ मध्ये बेर्नबर्गमध्ये जो गॅस चेंबरमध्ये तयार केला होता, त्यात इर्मा एक्लरने इतर ज्यू नागरीकांसोबत अखेरचा श्वास सोडला.

 

august-landmesser-no-salute-marathipizza04

तर १९४१ मध्ये ३० महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा पूर्ण करून ऑगस्ट लॅण्डमेसर बाहेर पडला.  दोन वर्षानंतर हिटलरने सर्व नागरिकांना सैन्यात भरती होण्याची सक्ती केली होती. त्यानुसार लॅण्डमेसरला देखील हजारो नागरिकांसोबत सैन्यात भरती व्हावे लागले. त्यांची एक तुकडी क्रोएशिया येथे पाठवण्यात आली होती.

तेथे ऑगस्ट लॅण्डमेसर मारला गेल्याची नोंद सैन्यातर्फे करण्यात आली.

आता वळूया वरील फोटो कडे.

१३ जून १९३६ रोजी हा फोटो घेण्यात आला आहे. म्हणजेच ऑगस्ट लॅण्डमेसरची इर्मा एक्लरशी ओळख झाल्यानंतर दोन वर्षांनी! या दरम्यान त्यांना पहिली मुलगीही झाली होती. या दोन वर्षात नाझी पार्टीकडून आणि विशेषत: हिटलरच्या फतव्यावरून लॅण्डमेसरला, त्याच्या पत्नीला आणि मुलीला खूप त्रास देण्यात आला होता. त्याचा राग लॅण्डमेसरच्या मनात होताच.

नाझी पक्षातून हकालपट्टी झाल्यावर Blohm + Voss शिपयार्डवर काम करताना त्याला कळले की नौदल सैन्य प्रशिक्षण शिबीर हिटलरने आयोजित केले आहे आणि स्वत: हिटलर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

हिटलर आल्यावर सर्वांनी त्याला सेल्युट करावे असा नियमच होता, परंतु ज्या व्यक्तीने आपल्या कुटुंबाला देशोधडीला लावले त्या व्यक्तीसमोर मी लाचारासारखे का झुकावे या विचाराने ऑगस्ट लॅण्डमेसर हिटलरला सेल्युट करण्यास तयार नव्हता व शांत चेहऱ्याने हाताची घडी घालून तो उभा राहिला.

योगायोगाने यावेळी फोटोग्राफरकडून हा फोटो अनावधाने काढला गेला.

फोटोग्राफर फोटो काढत आहे याची लॅण्डमेसरला पुसटशी कल्पना देखील नव्हती. बहुधा त्यावेळी केवळ त्याच्या कुटुंबाचाच विचार त्याचा मनात सुरु असावा ज्यामुळे इतरत्र कोठेही त्याचे लक्ष नव्हते.

हा फोटो पाहिल्यानंतर ऑगस्ट लॅण्डमेसरने हिटलरचा केलेला अपमान वरिष्ठांच्या लक्षात आला व त्यांनी या कुटुंबाचा अधिकच छळ केला. (त्यांनी हा छळ ज्यूद्वेषी हिटलरच्या सांगण्यावरून देखील केला असावा असे अनेकांचे मत!) आणि त्यानंतर ऑगस्ट लॅण्डमेसर व त्याच्या कुटुंबासोबत वरील सर्व प्रकार घडले…!

हा फोटो आणि लॅण्डमेसर कुटुंबाची दुर्दशा, हिटलरच्या छळवादाचा अस्सल नमूना म्हणून लक्षात ठेवता येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?