राजा शंतनूची पत्नी गंगा आणि गंगापुत्र भीष्मांच्या जन्माची “मानवी” कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

महाभारतामध्ये वर, शाप, अनिर्बंध स्वेच्छाचारी (तरीही नीतीमान आणि पुण्यात्मे!) अशी कैक तर्हेची पात्रे वगैरे अमानवी मालमसाला खच्चून भरलेला आहे. यातला अमानवी किंवा अतिमानवी भाग काढून टाकून एकेक घटनेचे मानवीकरण गरजेचे आहे. उत्तरकालीन पुराणांनी तर अद्भुत रस भारंभार भरून वास्तविक ऐतिहासिक माणसे अतिमानवी बनविण्याचे काम उत्तम केले.

पुराणकाली गंगा ही पुण्यप्रद आणि पापे धुणारी मोक्षदायिनी झाली. पुराणकाळातच महाभारतातील पात्रांना अद्भुताचे भरजरी कपडे चढविण्याचे काम सुरू झाले. कारण मूळ ‘जय’ ही मौखिक संहिता हळूहळू ‘भारत’ बनत होती आणि ती संहिता ऐतिहासिक निश्चित आहे, हे मधली एकही पिढी विसरलेली नव्हती!

वेदकाळापासून भारतियांनी गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांची स्तुतीच केलेली आहे. पैकी फक्त सरस्वती ही पश्चिम वाहिनी होती. वेदांमधली सरस्वती ही वाङ्मय निर्माण करणाऱ्यांना पहिली माहिती झालेली जीवनदायी नदी असल्याने ऋग्वेदामध्येच तिचे समावेशन देवता स्वरुपात झालेले होते.

 

Saraswati-river-InMarathi

 

या लुप्त सरस्वतीचे खोरे आज उपग्रहाच्या माध्यमातून शोधले गेले आहे. या खोऱ्यामध्ये खूप पुरातत्त्वीय पुरावे सापडू शकतील. जे कदाचित भविष्यकाळात सिंधु संस्क्रुती आणि वैदिक संस्क्रुतीमध्ये आजवर न सापडलेले दुवे उपलब्ध करून देतील.

मुख्य मुद्दा हा आहे की, महाभारत काळात सरस्वतीचे नदी म्हणून उल्लेख आढळत नाहीत. ती फक्त एक वैदिक देवता आहे.
म्हणजे महाभारत हे सरस्वती नदी लुप्त होऊन तिच्या खोऱ्यात वाळवंट तयार व्हायची नैसर्गिक प्रक्रिया सुरू असताना घडले. एवढेच ऐतिहासिक विधान निश्चित करता येते.

म्हणजेच, महाभारतापूर्वीच काहीतरी विलक्षण मोठी नैसर्गिक आपत्ती आली आणि ३ महान नद्यांपैकी एक सरस्वती ही नदीच भारतातून लुप्त झाली.

 

 

ganga and yamuna river InMarathi

 

महाभारतात गंगा ही मानवी रूपात अवतरते का? तर अष्टवसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळतो.

त्यांना पृथ्वीवरचे जीवन कष्टप्रद वाटत असल्याने ते गंगेला विनंती करतात की – तू मानवी रूपात प्रकट हो, आम्हाला एकेकाला तुझ्यातच जन्मल्या जन्मल्या बुडवून टाक आणि आमच्या पृथ्वीवरील जीवनाची इतिश्री कर! (या चमत्कारिक विनंतीतच भीष्म हा आठांपैकी एक वसु आणि चिरंजीवही आहे. या अंधश्रद्धेची बीजे आपोआप रोवली जातात.)

 

Ganga and ashta-vasu InMarathi

 

गंगा त्यांची विनंती मान्य करते! आणि सुंदर स्त्रीच्या रूपात अवतरून महाराज शंतनुंना आकर्षित करते. महाराज अनुरक्त होऊन विवाह करण्याची इच्छा प्रकट करतात. त्या वेळी ती अट घालते –

माझ्या कुठल्याही कृतीला तुम्ही, “का?” असा प्रश्न विचारता कामा नये!

जरा विचार करून बघा. कुठला पति अशा विपरित इच्छेला मान्य करेल? निदान आज तरी वधूपरिक्षेत किंवा अगदी प्रेमविवाहातही कुठलाही पुरुष अशा स्त्रीला अविचारी किंवा मूढ म्हणून धुडकावून लावेल. विवाहाची गोष्ट तर दूरच!

वास्तव तथ्य एवढेच शिल्लक राहील, की शंतनुच्या पत्नीचे नाव गंगा असे होते.

 

ganga_shantanu-marathipizza-featured

 

गंगेच्या ‘कुलीनपणाविषयी’ महाभारत एकदा तिला ‘पुराणकालीन गंगा’ मानले की काहीही बोलत नाही!

राजपुरुषाला त्याच्या पसंतीने आणि त्याचे प्रेम जिच्यावर बसेल अशा स्त्रीशी विवाह करण्याचा अधिकार होता. आणि अशा स्त्रीच्या कुलीनपणाविषयी निदान महाभारत काळात तरी कुणीही आक्षेप घेत नसे.

गंगावतरणासाठी भगिरथाने केलेले तप वगैरे मिथक कथा तयार झाल्यावर मूळ भारत गाथेतली गंगा ही शंतनुपत्नी देवी गंगा बनली असावी असे म्हणण्यास साधार वाव आहे. कारण प्रथम पत्नीच्या वियोगानंतर, पुत्राला यौवराज्याभिषेक केल्यानंतर महाराज शंतनुचा जीव जडतो तो एका कोळिणी आणि नावाड्याचा व्यवसाय करणाऱ्या सत्यवतीवर!

 

shantnu and kolin InMarathi

 

महाभारत प्रक्षिप्त करणारे आणि महाभारताचे उदात्तीकरण करणाऱ्यांची मुख्य अडचण म्हणजे मूळ कथाच इतकी रेखीव आणि लोकांच्या सदास्मरणात होती की, असल्या प्रक्षिप्तपणाची फोलकटे आपण प्रयत्नपूर्वक दूर करू शकतो.

ऐतिहासिक सत्य एवढेच उरते की, भीष्मांच्या मातेचे नाव गंगा होते. ती महाराजांची विलक्षण आवडती महाराणी होती. तिचे काही पुत्र वारले! सगळ्यात शेवटच्या पुत्राचा जन्म झाल्यावर ती काही कारणाने वारली!

शंतनुचे वेगळेपण हे की, त्याला पत्नी इतकी प्रिय होती की, त्याने तत्कालीन रूढींनुसार दुसरा विवाह केला नाही! (असा विवाह शक्य तितक्या लवकर करणे हे उचित समजले जाई.) निदान महाभारतात, कुणीही पुरुष, मुलगा सोळा वर्षांचा होईपर्यंत, असा बिनबाईचा राहिलेला नाही! शंतनुचे हे वास्तव थोरपण थेट कुठे ही मूळ महाभारतात कौतुकास प्राप्त नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?