' …म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर – InMarathi

…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“You can avoid reality, but you cannot avoid the consequences of avoiding reality.” – Ayn Rand

माणसाला निसर्गाने बुद्धी दिली आहे आणि प्रतिकुल परिस्थितीत सर्वात मोठे तेच साधन माणसाला उपलब्ध होते. तेवढ्या बळावर मनुष्य प्राण्याने निसर्गालाही आपला अंकित करून टाकण्यापर्यंत झेप घेतली आहे. निसर्गाची रहस्ये हुडकून त्याचे नियम बनवणे व त्यालाही शह देऊन पुढली झेप घेणारा एकमेव सजीव प्राणी मनुष्य आहे. पण कुठल्याही शक्तीचे रहस्य असे असते, की तिचा योग्य वापर झाला नाही वा उलटाच उपयोग केला तर ती शक्ती हानिकारक असते.

माणसातही असे तारतम्य नसलेले खुप लोक असतात आणि मग त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा त्यांनाच त्रास होत असतो. प्रामुख्याने बुद्धीने निसर्गालाही मात देता येण्याची मस्ती चढली, म्हणजे माणूस आत्मघाताला प्रवृत्त झाला असे समजावे. कारण माणसाची बुद्धी कितीही कुशाग्र असली, तरी त्याला ह्जारो वर्षांच्या प्रयत्नानंतरही निसर्गाची सर्व रहस्ये उलगडलेली नाहीत. सहाजिकच, जिथे त्याची बुद्धी तोकडी पडते, तिथे परिस्थितीला शरण जाऊन संकटाला सामोरे जाण्यात शहाणपणा असतो. त्याऐवजी सत्य नाकारून आपलाच हट्ट पुढे रेटला, मग भावनाशून्य निसर्ग निष्ठूर होत असतो. हे सामान्य लोकांना कळत असले तरी अतिशहाण्यांना कळत नाही आणि ते आपल्या कुशाग्र पण अल्पमतीच्या अहंकाराने विनाश ओढवून आणत असतात.

निसर्गाची रहस्ये उलगडताना माणसाच्याही अनेक चुका झालेल्या आहेत आणि त्याची मोठी किंमत माणसाने मोजलेली आहे. कारण सिद्धांत म्हणून काही कल्पना पुढे येतात, त्या कितीही सोप्या वाटल्या तरी परिपुर्ण नसतात आणि व्यवहारात गफ़लती होऊन जातात. तसे नसते तर अवकाशात कल्पना चावलाचा अपघात झाला नसता. पण त्या अपघातातून अमेरिकन शास्त्रज्ञ शिकले आणि त्या चुकांची पुनरावृत्ती त्यांनी होऊ दिली नाही. त्याहीपुर्वी तसे अनेकदा घडलेले होते. पण भारतात अनेक शहाणे बुद्धीमान लोक हे सत्य स्विकारायला अजिबात तयार नसतात.

व्यवहारी जगात कालचे सत्य आज सत्य उरत नाही. कारण कालची परिस्थिती आज नसते आणि आजची स्थिती उद्या बदलाणार असते. सहाजिकच काल वा आज ज्या गोष्टी केल्या वा चालून गेल्या, त्या उद्यापरवा चालतीलच असे नाही. त्यात ठराविक बदल करावे लागतात आणि कालच्या चुका सुधाराव्या लागत असतात.

 

nationaljanmat.com

विशेष म्हणजे काल का चुकले ते लक्षात घेतले नाही वा नाकारले, मग त्याच चुका करण्याला पर्याय उरत नाही. मग असे अतिशहाणे लोक परिणाम चुकीचे ठरवुन तेच तेच करीत रहातात आणि तरीही परिणाम वेगळे येण्याची आशाळभूत प्रतिक्षा करीत बसतात. त्यांच्या आशाळभूतपणाने परिस्थिती वा परिणाम बदलत नाहीत. प्रसिद्ध लेखिका विचारवंत आयन रॅन्ड नेमकी त्याच दुखण्यावर बोट ठेवून म्हणते, की

सत्य नाकारता येते. पण त्याच्या परिणामांपासून सुटका नसते.

काहीशा वेगळ्या शब्दात आईनस्टाईन हा वैज्ञानिक तेच सांगतो. तेच तेच करीत रहायचे आणि वेगळे परिणाम येण्याची अपेक्षा बाळगायची, हा निव्वळ मुर्खपणा आहे असे त्याला वाटते. इथे भारतात अशा रितीने त्याच त्याच चुका करणार्‍यांना बुद्धीमंत वा अभ्यासक म्हणून कौतुक केले जाते. तिथेच भारतीय सामाजिक राजकीय व अन्य क्षेत्रातील आपले मागासलेपण सामावलेले आहे.

कालपरवा एका न्यायालयाने हिंदू दहशतवादाचा आपल्या निकालपत्रातून फ़ज्जा उडवला आणि दोनच दिवसांनी सुप्रिम कोर्टाने न्या. लोया मृत्यूच्या चौकशीसाठी आलेली याचिका फ़ेटाळून देशातल्या तमाम पुरोगामी कारवायांवर जणू बॉम्बगोळात टाकला. या दोन निकालांनी देशातले पुरोगामी राजकारण पुर्ण विस्कटून गेले आहे. पण कुठे चुक झाली वा त्याच चुकीची पुनरावृत्ती कशाला होतेय, असा प्रश्न यापैकी एकालाही पडलेला नाही. मात्र त्याचे दुष्परिणाम त्या सर्वांनाच भोगावे लागणार आहेत.

यातली गंमत सविस्तर समजून घेतली पाहिजे.

वस्तुस्थिती नाकारणे म्हणजे तरी काय? समजा बाहेर पाऊस पडतो आहे, मुसळधार कोसळतो आहे आणि तुम्ही बौद्धिक युक्तीवाद करून पाऊस पडत असल्याचे साफ़ नाकारले, तर युक्तीवादात समोरच्याला गप्प करता येईल. पण म्हणून बाहेरचा पाऊस थांबत नाही की संपत नाही. त्यात गेलात तर भिजून जाणे वा गारठणे अपरिहार्य असते. तो परिणाम असतो आणि त्यापासून सुटका नसते.

समोर आगडोंब उसळला आहे, तो नाकारून त्यात कुठल्याही सुरक्षा आवरणाखेरीज उडी घेतली तर होरपळून भस्मसात होण्याला पर्याय नसतो. समोरचा तसा भस्मसात होताना दिसत असूनही पुढल्याने तशीच आगीत उडी घेतली, तर परिणाम तोच होणार ना? त्यापेक्षा बाहेर पाऊस आहे वा समोर आग आहे, हे सत्य स्विकारले आणि त्यामुळे आपल्याला अपाय होणार नाही याची काळजी घेऊन पुढले पाऊल उचलले, तर नुकसान कमी होते. परिणामातही फ़रक पडतो. लोक म्हणूनच पावसात हिंडूफ़िरू शकतात आणि आगडोंब उसळला असतानाही अग्निशमन दलाचे लोक आगीला भिडत असतात. पण आग वा पाऊस नाकारून नाही.

त्यातही अपघात होतात. तेव्हा त्यावरचे नवे वेगळे उपाय योजून पुढे वाटचाल होत असते. तसे झाले नसते तर छत्री वा रेनकोट यांचा शोध लागला नसता किंवा अग्निशमन दलाची निर्मिती झाली नसती.

जे तिथे लागू आहे तेच राजकीय सामाजिक आर्थिक अशा क्षेत्रातही लागू होते. आधीच्या चुका मान्य करून सुधारणा केल्या, तरच वेगळे परिणाम मिळवणे शक्य असते.

ज्यांना नरेंद्र मोदी वा भाजपाला पराभूत करायचे आहे, त्यांनी मोदी जिंकताना विरोधकांच्या कुठल्या चुका झाल्या, त्या शोधून दुरूस्त केल्या पाहिजेत. नवे उपाय योजले पाहिजेत. पण इथे उलटेच चालू आहे, जुन्या चुका नाकारून तेच तेच खेळ पुन्हा सुरू आहेत आणि त्याचे विपरित परिणाम त्यांनाच भोगावे लागत आहेत.

मग जे कोर्टात झाले, त्यापेक्षा निवडणूकीत काय वेगळे होऊ शकते?

सोळा वर्षापुर्वी गुजरातमध्ये गोध्रा जळितकांड झाले आणि कसलाही प्रशासकीय अनुभव नसलेल्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना तिथली परिस्थिती हाताळता आली नाही. पुर्ण गुजरातमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रीया उमटली व हिंदूमुस्लिम दंगली पेटल्या. तर त्यात मोदींनीच दंगली पेटवल्या व त्याला प्रोत्साहन दिल्याचा एक बिनबुडाचा आरोप झाला होता. पुढे त्यालाच सिद्धांत ठरवून सलग अपप्रचार होत राहिला. त्यामुळे गुजरातचे राजकारण बदलता आले नाही. उलट मोठ्या मताधिक्याने मोदीच मुख्यमंत्री झाले आणि आपली कोणती चुक झाली ते शोधायचीही बुद्धी अशा शहाण्यांना झाली नाही.

 

godhra_train_burning_inmarathi
hindustantimes.com

कायदा, न्याय अशा गोष्टी मोदींनी निर्माण केलेल्या नाहीत. पण असल्या प्रत्येक कसोटीला उतरून व त्यातली अग्निपरिक्षा देऊन मोदी सहीसलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत. सुप्रिम कोर्टापासून खालच्या न्यायालयापर्यंत अनेक न्यायनिवाडे या काळात त्यांच्या विरोधात गेलेले होते. पण त्यांनी कधीही न्यायालयावर ताशेरे झाडले नाहीत, की कायद्याला शिव्याशाप दिले नाहीत. ज्या कायद्याच्या कचाट्यात बहुतांश विरोधक पुरोगामी विचारवंत व माध्यमे मोदींना गोवण्याचा अखंड प्रयास करीत राहिले, त्यात फ़सण्यापेक्षा मोदी प्रत्येकवेळी तावून सुलाखुन सुखरूप बाहेर पडले. अधिक शक्तीमान होऊन बाहेर आले. पण तशी एक झळ लागली तर त्यांच्या विरोधकांना सहन करता आलेली नाही.

डझनावारी निकाल विरोधात जाऊनही मोदी न्यायालयाचा सन्मान राखत आले आहेत. त्यांना गोत्यात घालण्याच्या कारवाया करणारे प्रत्येकवेळी कायद्यातून मोदी सुटणार नसल्याची हमी देत होते. पण मोदी फ़सले नाहीत, मग याच विरोधकांनी कायदा व न्यायावर अविश्वास व्यक्त केला आहे. कारण मोदी कधीच बरोबर नव्हते तर विरोधक चुकत राहिलेले आहेत आणि त्याच्याच परिणामी लोकंसमोर मोदी निर्दोष वा प्रामाणिक ठरत आले आहेत.

आता गंमत अशी, की मोदींनी आपण किती प्रामाणिक वा योग्य आहोत त्याच्या डंका पिटण्याचा फ़ारसा प्रयत्न केला नाही. पण प्रत्येक विरोधी डावपेचातून त्यांच्या शत्रूनीच तशी संधी मोदींना उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्या परिणामी मोदींची प्रतिमा उजळ होत गेली. मग त्याचे श्रेय विरोधकांना आहे की मोदींना आहे?

यातून एक धडा शिकला पाहिजे. खोटेनाटे वा बिनबुडाचे आरोप करून तात्पुरती प्रसिद्धी जरूर मिळेल. पण कसोटीची वेळ आली, मग त्यातले काही टिकत नाही. सहाजिकच ज्याच्यावर आरोप केलेले असतात, तो आरोपकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे मोठा होत जातो. त्याला तशी संधी नाकारणे हाच त्याला रोखण्यासाठीचा उपाय असतो. या बाबतीत मोदी नेहमीच सुदैवी राहिलेले आहेत. त्यांना पदोपदी विरोधकांनी आपली प्रतिमा उजळ करण्याची व विजयाची संधी आयती आणून दिलेली आहे.

२०१३ च्या सुमारास शाहीद सिद्दीकी नावाचा एक ज्येष्ठ उर्दू हिंदी पत्रकार टाहो फ़ोडून अशा विरोधकांना एक गोष्ट सांगत होता, की असला अपप्रचार थांबवा. त्यातून तुम्हीच खोटे पडता आणि परिणामी मोदींची प्रतिमा अधिक उजळ करून देता. जितके असे करत जाल तितके मोदी मोठे होत जातील. पण त्याचे कोणी ऐकले नाही आणि अखेरीस मोदी आरामात देशाचे पंतप्रधान झाले. त्यांना दिर्घकाळानंतर एकपक्षीय बहूमत मिळवण्याचा विक्रम साजरा करता आला. त्याला आता चार वर्षे होत आली. पण ती चुक मान्य करून वा टाळून विरोधक काही करू शकले आहेत काय? आजही त्याच त्याच चुका करून मोदींना पराभूत होताना बघण्याचा आशाळभूतपणा कायम चालू आहे. त्या चुका काय आहेत? त्याची पुनरावृत्ती कशाला होत आहे? राजकीय लढाई राजकीय पातळीवरूनच होत असते. तिथे बुजगावणी वा बाहुल्या कठपुतळीप्रमाणे नाचवून युद्ध जिंकता येत नसते.

 

Congress-BJP-inmarathi
s3.india.com

मोदी विरोधकांना आजही ते लक्षात येत नाही आणि आले असेल तर करायची इच्छा नाही.

भाजपा वा मोदी हिंदूत्ववादी असतील तर त्यांना विरोध करताना मुस्लिम धर्मांधतेचे लांगुलचालन हा उपाय नसतो. हिंदू हा बहुसंख्य समाज आहे आणि त्याच्या मनात पुरोगामी पक्ष धर्माचे पक्षपाती नसल्याचे रुजले पाहिजे. त्याच्या ऐवजी मुस्लिमांच्या लांगुलचालनाने हिंदू साशंक होतो आणि अधिकच मोदी वा भाजपाकडे सरकतो. मग जिथे बहूसंख्य समाज घटक ओढला जाईल तोच निवडणुका जिंकणार, हे सांगायला कोणी गणितज्ञ वा जाणकार असायची गरज नाही.

दुसरी गोष्ट राजकीय लढाई ही राजकीय डावपेच व राजकीय संघटनेच्या माध्यमातून लढवली जात असते. त्यात युक्तिवाद, आरोप, प्रसिद्धी वा न्यायालयीन संघर्षाचीही मदत होत असते. पण अशा दुय्यम साधनांनी राजकीय युद्ध जिंकता येत नसते. ती लढाई राजकीय कार्यकर्ते व संख्याबळानेच जिंकावी लागते. पटावर बुद्धीने जिंकण्यासाठी तो बुद्धीबळाचा खेळ नाही. विरोधकांनी तिथेच चुका केलेल्या आहेत. जनतेपर्यंत जाऊन, आपल्याविषयी विश्वास निर्माण करून वा जनतेशी स्वत:ला जुळवून ही लढाई करायचे सोडून दिलेले आहे. त्यापेक्षा न्यायालये, माध्यमे व अपप्रचाराच्या माध्यमातून त्यांना जिंकाय़चे आहे. वाहिन्यांवरील चर्चा वा बातम्या यातून बाजी मारण्यात विरोधकांची शक्ती खर्ची पडते आहे. हे आजचे नाही. २००२ पासून मोदी विरोधातली मोहिम अखंड चालली आहे.

मोदी वा गुजरात दंगली विषयीच्या गोष्टी यापुर्वी अनेकदा कोर्टात खोट्या पडल्या आहेत. पण म्हणून तसा अपप्रचार थांबला आहे काय? तो सोडून खर्‍याखुर्‍या चुका शोधायच्या आणि मोदी सरकारची कोंडी करायची, हा उत्तम प्रभावी उपाय आहे. जनतेमध्ये जाऊन संघटन उभे करायचे आणि जनमानसात मोदी विरोधीभावना निर्माण करायची हा योग्य मार्ग आहे.

पण तो कष्टाचा आहे आणि बदनामीच्या मोहिमा चालवणे सोपेसरळ आहे ना? तिथेच सगळी गल्लत होऊन बसली आहे.

गावस्करपासून सचिन व आता विराटपर्यंत अनेक टिकांचा भडीमार झाला आहे. ज्यांनी कधी हातात बॅट सुद्धा पकडलेली नसते, असे लोक त्या विक्रमवीरांना सल्ले देत राहिले वा त्यांच्यावर शंका घेत राहिले आहेत. म्हणून त्यांचे विक्रम कमी झाले नाहीत की टिकाकार कधी खरे ठरले नाहीत. कॉमेन्ट्री बोक्समध्ये बसून वा बडबडून कोणी मैदानातल्या खेळाडूला पराभूत करू शकत नाही वा चाललेला सामना जिंकू शकत नाही. नेमकी तीच मोदी विरोधकांची चुक कायम चालू आहे.

राजकारणाचा आखाडा सोडून अन्य मार्गाने मोदींना पराभूत करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. म्हणून ते मैदानात उतरत नाहीत, तोपर्यंत मोदी निश्चींत आहेत. त्यामुळे न्यायालयात खटले भरून वा माध्यमात चिखलफ़ेक करून मोदी हरले नाहीत वा त्यांना हरवणे शक्य झालेले नाही. पण त्यांचे विरोधकही कसले चेंगट आहेत. ते आपला हट्ट सोडून द्यायला अजिबात तयार नाहीत. कारण स्वत:ला बुद्धीमान म्हणून घोषित केलेले हे तमाम विरोधक, व्यवहारात कुठल्याही प्राण्याच्या कळपासारखे निव्वळ निर्बुद्ध आहेत. ते स्वतंत्रपणे विचार करू शकत नाहीत.

कळपातला एक पक्षी उडाला की बाकीचे भराभरा झेप घेऊन जमिन सोडतात. कळपातला एक पशू दौडू लागला की त्याच दिशेने बाकीचा कळप धावत सुटतो. त्यापेक्षा ह्या शहाण्याची कथा किंचीतही वेगळी नाही. झुंडीतल्या प्राण्याप्रमाणे ते कुठल्या तरी इशार्‍याची प्रतिक्षा करत असतात आणि तो मिळताच विवेकबुद्धी विसरून कळपात आपल्याला हरवून बसतात. परिणामांची त्यांना चिंता नसते.

डिस्कव्हरी वा नॅट जिओ वाहिनीवरच्या कळप मानसिक्तेचे दर्शन आजकाल सातत्याने भारतीय राजकारणात वा प्रामुख्याने पुरोगामी कलपांमध्ये घडू लगलेले आहे. त्याला सत्य स्विकारण्यास नकार इतकेच कारण आहे आणि त्याचे ठरलेले परिणाम बघण्यापासून आपलीही सुटका नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Bhau Torsekar

लेखक वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.

bhau-torsekar has 26 posts and counting.See all posts by bhau-torsekar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?