' ‘‘कुणी बनवले हे दोन वेगळे देश?”: असाही पाकिस्तानी मित्र! : द्वारकानाथ संझगिरी – InMarathi

‘‘कुणी बनवले हे दोन वेगळे देश?”: असाही पाकिस्तानी मित्र! : द्वारकानाथ संझगिरी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – द्वारकानाथ संझगिरी

===

तुम्हाला पाकिस्तानबद्दल काय वाटतं ? ते आपले शत्रुराष्ट्र आहे असंच मलासुद्धा वाटतं! अतिरेक्यांचा शिखंडी करून लढलेल्या युद्धात आपले तरुण जवान धारातीर्थी पडतायत.

त्यांची मुलंबाळं रस्त्यावर येतायत.

त्यांच्या बायका विधवा होतायत. हे सर्व तळपायाची आग डोक्यात नेतं. पण म्हणून प्रत्येक पाकिस्तानी माणूस आपला शत्रू नसतो.

बऱयाचदा त्यांना कल्पनाही नसते की, त्यांचं सरकार (जे मिलिट्री चालवतं) ते हिंदुस्थानवर काय अत्याचार करते ते.

माझे काही पाकिस्तानी मित्र आहेत. त्यातलं एक वेगळं व्यक्तिमत्त्व मला भेटलं ते म्हणजे मतलूब हुसेन! तो पेशावरचा पठाण आहे.

देखणा, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खानला हृदयात घेऊन फिरणारा. ऐश्वर्या रायला एकदा तरी पाहण्याची इच्छा बाळगणारा.

 

shahrukh amitabh inmarathi
India today

 

मी पेशावरला २००४ साली मॅच कव्हर करायला गेलो तेव्हा भेटला. आम्ही काही हिंदुस्थानी पत्रकार राहत होतो त्या हॉटेलवर आला. त्याला कुणीतरी सांगितलं की मुंबईहून आलेले पत्रकार इथे राहतात.

तो आमच्या खोलीत आला.माझ्याबरोबर विजय साळवी होता. तो बोलका होता. बोलता बोलता तो माझा मित्र झाला.

रात्री दहा वाजता तो आम्हाला शाहरुख खानचे आईवडील ज्या घरात राहायचे तिथे घेऊन गेला. अजून त्यांची ती माडीवरची मोठी खोली माझ्या डोळय़ांसमोर आहे.

त्यांनी गाद्या घातल्या होत्या. ते झोपायच्या तयारीत होते. आम्ही पूर्ण अनोळखी, पण त्यांनी गाद्या गुंडाळल्या. गप्पांची मैफल जमली. खाणं मागवलं गेलं.

ज्याच्याशी गप्पा मारत होतो तो शाहरुख खानचा चुलतभाऊ होता. शाहरुखचा त्यांच्याशी फारसा जवळचा संबंध राहिला नव्हता.

 

shahrukh peshawar inmarathi
YouTube

 

शाहरुखने हिंदू मुलीशी केलेलं लग्न त्याला फारसं पसंत नव्हतं. त्याचं एक वाक्य माझ्या कानात अजून घुमत असतं. मी त्याला विचारलं की,

‘‘शाहरुखचे आईवडील स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानात का गेले?’’

तो म्हणाला, ‘‘त्यांचं अखंड हिंदुस्थानवर प्रेम होतं.’’ अनेक मुस्लिम कलावंत पाकिस्तानातून हिंदुस्थानात आले. उदा. दिलीप कुमार, साहिर लुधियानवी वगैरे!

कारण इथल्या फिल्म इंडस्ट्रीचं त्यांना आकर्षण होतं, पण सामान्य मुस्लिम पाकिस्तानहून हिंदुस्थानात अगदी मोजके आले असतील. त्यातले एक शाहरुखचे आईवडील.

त्या रात्री बारा-एकच्या सुमारास मतलूब आम्हाला पूर्वी दिलीप कुमार राहायचा (म्हणजे त्याच्या लहानपणी) तिथे घेऊन गेला. तिथून मैलभर अंतरावर कपूर कुटुंबीयांचा मोठा वाडा होता.

राज कपूर तिथे वाढला. शाळेपासून दिलीप कुमार – राज कपूर मित्र होते.

 

dilip-kumar-peshawar-inmarathi
india.com

पाच तासांपूर्वी पूर्णपणे अनोळखी असलेला मतलूब हुसेन मला भूतकाळात त्या अशा गल्ल्यांत घेऊन गेला जो माझा भावविश्वाचा भाग होता.

लहानगे दिलीप – राज शाळेच्या मैदानावर मला खेळताना दिसले इतका मी त्यात मनाने गुंतलो.

त्यानंतर दुसऱया दिवशी असेल. मतलूब हुसेन मला चरसी चिकन खायला घेऊन गेला. तंदूरमध्ये भाजल्या जाणाऱया चिकनवर एक माणूस चरसचा धूर सोडतो ती चरसी चिकन!

त्या दिवशी त्या सडपातळ शाहरुखसारखी हेअरस्टाइल ठेवलेल्या मतलूबचं खाणं पाहून मी थक्क झालो.

ही मंडळी चिकन-मटन द्राक्ष संपवावीत तशी संपवतात. आम्ही खात असताना एक उष्टय़ावर जगणारी मांजर खाली फिरत होती. चरसी चिकन खाऊन ती वाघाचा बछडा वाटत होती.

मी एक मोठा पीस कसाबसा संपवला. मतलूबला वाटलं, ‘‘मै तकल्लूफ कर रहा हूं’.’ (पाकिस्तानच्या वास्तव्यात माझं हिंदी सुधारतं पण हिंदुस्थानात परतलो की, पालथ्या घडय़ावर पाणी).

मी त्यानंतर रावळपिंडीला कसोटी सामना कव्हर करायला जाणार होतो. मतलूबने तिथे येऊन पुन्हा भेटायचं ठरवलं. त्यावेळी माझी बायको होती.

आमच्या मैत्रीत किती विश्वास निर्माण झाला होता ते पहा!

मी मॅच पाहायला गेलो त्या दिवशी माझ्या बायकोला अख्खी रावळपिंडी त्याने फिरवली. तिच्यासाठी काही भेटवस्तू त्याला विकत घ्यायच्या होत्या.

माझ्या बायकोने नको म्हटल्यावर पुन्हा त्याचा तो डायलॉग आला. ‘‘क्यों तकल्लूफ कर रहे हो भाभी.’’

 

dawn.com

त्याला नुकतंच मूल झालं होतं. मूल झाल्यानंतर तिसऱया दिवशी तो आम्हाला भेटायला रावळपिंडीत आला होता. माझ्यासाठी त्याने पठाणी बूट आणले. एक जोडा सचिन तेंडुलकरसाठी आणला होता.

मला म्हणाला, ‘‘किसी भी हालत में सचिन से मिलना और देना.’’ दुसरा दिवस पुन्हा मॅचचा होता. मला दिवस संपल्यावर लेख लिहून तो ‘सामना’ला पाठवून मग टीम उतरलेल्या हॉटेलमध्ये जायचं होतं.

मी बायकोला म्हटलं,

‘‘त्याला तू हॉटेलवर घेऊन जा. सचिन बसमधून उतरला की, त्याला थांबवून त्याची ओळख करून दे. त्याला फोटो काढून दे. तोपर्यंत मी तिथे पोहोचेन.’’ मी पोहोचेपर्यंत त्यांचं फोटोसेशन झालं होतं.

तरीही मतलूबचा चेहरा ‘टुटे हुए ख्वाबों ने’ म्हणणाऱया ‘मधुमती’ तल्या दिलीप कुमारसारखा होता.

मी त्याला म्हटलं ‘‘काय झालं?’’ तो म्हणाला, ‘‘क्या भैया, मैं एकदम ठंडा हो गया। वो भाभी से बात करते करते फोटो खिचा गया. लोगों को क्या लगेगा?’’

मी त्याला म्हटलं, ‘‘तू फोटोत घुसलायस असं वाटेल.’’ तोपर्यंत फोटोशॉपची कला बाजारात नव्हती.

थिजलेल्या त्याच अवस्थेत तो सचिनला आणलेला खास पठाणी बूटही देऊ शकला नाही. मी सचिनला खालून रूममधे फोन केला त्याला मी मतलूबची व्यथा सांगितली.

सचिन म्हणाला, “मी हॉटेलच्या बाहेर जाण्यासाठी खाली उतरतोय तेव्हा फोटो काढू’’ मी त्याला हे सांगितल्यावर तो आम्हा सर्वांना विसरला.

त्याचे डोळे फक्त हॉटेलच्या लिफ्टकडे रोखले गेले होते. सचिन आला. मतलूबच्या मनासारखं फोटोसेशन झालं. त्याने पठाणी जोडय़ाचा नजराणा दिला.

सचिनने तो स्वीकारला. मतलूब धन्य झाला. थोडय़ा वेळाने द्रविड आला.

त्याच्याबरोबर त्याचं फोटोसेशन झालं. मतलूबची तबियत खूश झाली.

 

 

नंतर पाकिस्तानचे इंझमाम, शोएब अख्तर वगैरे आले. मी म्हटलं, ‘‘फोटो काढायचे आहेत?’’ ‘‘या फिक्सर्सबरोबर कोण फोटो काढेल?’’ मतलूब ताडकन म्हणाला. नाही काढले त्याने फोटो.

रावळपिंडी सोडताना मी त्याला म्हटलं, ‘‘देवाची इच्छा असेल तर पुन्हा आपण भेटू.’’ तो उद्वेगाने म्हणाला, ‘‘कुणी बनवले हे दोन वेगळे देश? दोन दोस्त सहजासहजी भेटू शकत नाहीत?’’

मी त्याला समजावले की ‘‘हिंदुस्थानात पाकिस्तानचा संघ येईल तेव्हा ये. तुला व्हिसा मिळेल.’’ तो आला. मला तो बंगळुरूला भेटला. ‘‘मला डान्स बार पाहायचाय’’ त्याने फर्माईश माझ्यापुढे ठेवली.

मी त्याला ब्रिगेड रोडवर घेऊन गेलो.

हिंदुस्थानातलं मोकळेपण, मुलामुलींमधले मोकळं वातावरण पाहून तो थक्क झाला.

‘‘आमच्यात पडदा नसतो’’ त्याला म्हटले. तो डोळे मिचकावत म्हणाला, कि पण पडद्याचा पण फायदा ‘‘असतोच ना! पडद्यामधून कोण चाललय कोणाला कळतं?

आम्हीसुध्दा माणसंच आहोत ना? उलट जेवढी बंधनं तेवढी ती तोडण्याचा प्रयत्न मोठा.’’

मुंबईला तो चक्क आमच्या दोन खोल्यांत राहिला. मी बंगळुरूहून एक दिवस उशिरा निघालो. मतलूब त्या आधी माझ्या घरी स्थिरस्थावर झाला होता.

माझ्या मुलाने त्याला अमिताभ, शाहरुखची घरं दाखवून आणली होती.

मी त्याला मरीन ड्राइव्ह, मलबार हिल, गेटवे ऑफ इंडिया वगैरे फिरवलं. त्या क्षणी त्याला अल्ला प्रसन्न झाला असता तर त्याने अल्लाला ‘‘मला मुंबईत सेटल कर’’ सांगितलं असतं.

पुन्हा निरोप घेताना डोळय़ांत पाणी आणून म्हणाला, ‘‘हे दोन देश कुणी केले?’’

नंतर आमची दुबईत भेट झाली. अजूनही आम्ही फेसबुकवर आहोत. क्वचित फोन होतो. पेशावरमध्ये शाळेत बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्याच्या मित्राची मुलं गेली.

पुन्हा एकदा त्याने चिडून विचारलं, ‘‘हे सर्व कधी थांबेल?’’ मी त्याला म्हटलं, ‘‘तुझ्यासारखी माणसं तुमच्या राजकारणात बहुसंख्य झाल्यावर.’’

===

मूळ लेखाची लिंक : हे दोन देश कुणी केले?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?