' ॐ = mc² - अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख !

ॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काही दिवसांपूर्वी माजी आयएएस ऑफिसर आणि चाणक्य मंडल परिवार चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी त्यांच्या व्याख्यानमालेत विज्ञान आणि अध्यात्म हे परस्परपूरक विषय असल्याचे सांगत ‘ॐ = mc²’ हे विशेषण मांडले होते. त्यानंतर अनेक माध्यमांतून त्यांच्यावर टीका करण्यात आली.

 

youtube.com

‘विज्ञान आणि अध्यात्म हे दोन पूर्णतः वेगळे विषय असून त्या दोघांचा बादरायण संबंध नाही, तो लावणे म्हणजे अज्ञानाचे लक्षण आहे.’ असा एकंदर विरोधाचा सूर होता. आता या टिकेनंतर त्याच विधानाचे पुन्हा समर्थन करणारा वादग्रस्त लेख अविनाश धर्माधिकारी यांनी लिहिला आहे.

===

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका – कवि कुलगुरु कुसुमाग्रज

कोणत्यातरी (महत्त्वाच्या : अशी आपण स्वत:चीच समजूत काढायला काय हरकत आहे!) घडामोडीवर चर्चेत सहभागी होण्यासाठी वृत्तवाहिनीच्या स्टुडिओत पोचलो, तर प्रसन्न जोशी प्रसन्नपणे पुढे आला. उत्साहात म्हणाला : सध्या सोशल मीडियात तुमच्या विरुद्ध खूप टीका चालू आहे… मी म्हणालो : टीका ही काही मला नवी गोष्ट नाही, तू कोणत्या मुद्द्याच्या संदर्भात म्हणतोयस… प्रसन्न म्हणाला : तेच, ॐ = mc² वरून. ते सांकेतिक, प्रतीकात्मक आहे हे कळतं मला, पण तुम्ही खुलासा करायला हवा. मी प्रसन्नाला सांगितलं-तुझी स्वत:ची म्हणून एक वैचारिक बैठक आहे, तरी तुला न सांगता, खुलासा वगैरे न करता एवढं तर लक्षात आलं की ॐ = mc² हे एक रूपक आहे.

विज्ञान आणि अध्यात्म आपापल्या परिभाषेत, मुळातल्या एकच असलेल्या सत्याचं दर्शन घडवतात, याचं ते सांकेतिक किंवा प्रतीकात्मक दर्शन आहे. खुलासा काय करणार? जिथे संवाद होऊ शकतो तिथे खुलासा करण्यात अर्थ आहे. जिथे हे समजण्याची प्रगल्भता आहे की विचारही वेगवेगळे असू शकतात, त्यानं लगेच माणसातलं नातं दुराव्याचं, शत्रुत्वाचं ठरत नाही. एकाच सत्याचं वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळं दर्शन घडू शकतं. तसेच ते मतभेद नसतात, आणि ‘दुसरा’ – the other – ढोंगी अप्रामाणिक इ. असत नाही, उलट एकाच सत्याचं वेगवेगळं दर्शन हे फक्त वेगवेगळं ‘पर्स्पेक्टिव्ह’ असतात. हे जिथे समजतं, जिथे खुलं मन आहे, वेगळ्या मताचा आदर करण्याची समज आहे तिथे संवाद किंवा खुलासा करण्यात अर्थ आहे.

 पण जिथे घट्ट आणि मठ्ठ मतं आधीपासूनच ठरलीत, त्यातून तयार झालेले कट्टर पूर्वग्रहांची कावीळ झालेली आहे तिथे कसले खुलासे करणार. शिवाय सध्या समाजात आपापले स्वार्थ साधण्यासाठी खूप तर्हांच्या द्वेषांची पद्धतशीर जोपासना केली जातेय. त्या स्थितीत कितीही खुलासे केले तरी ‘गाढवापुढे वाचली गीता।कालचा गोंधळ बरा होता!’

जिथे संबंधित विषयाचा अभ्यास सुद्धा नाही, तो करायची तयारी नाही उलट अर्ध्या हळकुंडानं पिवळी पडलेली बौद्धिक शिस्त. त्यातून ते सायबर स्पेस हो! ती काय कुणाच्या बापाची मालमत्ता नाही. ती एक खुली, सार्वजनिक भिंत! कुणीही यावं आणि तंगडी वर करावी. कितीही ‘मतभेद’ असले तरी आपलं म्हणणं मांडण्याची काही एक किमान शालीन पद्धत तर हवी ना. पण ती कोण कोणाला कशी शिकवणार. घरी, दारी, कळत नकळत झालेल्या संस्कारातून जो तो वागणार.

कवि कुलगुरु कुसुमाग्रजांनी ‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ या फटक्यात आपल्यासाठी आवाहन केलंय –

‘अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका’

ज्यांनी आपल्या अज्ञानाच्या गळ्यात दुरभिमान, अहंकार, उर्मटपणा अशा माळा परिधान केलेल्या नसतील त्यांना ॐ = mc² मधला सांकेतिक, प्रतीकात्मक, रूपकात्मक अर्थ जाणवेल. त्यात एक वैज्ञानिक गंमत आहे. मला तर वाटलं आईन्स्टाईन सुद्धा त्याच्या सूक्ष्म, तरल विनोद बुद्धि सहित हसला असता. धर्माशिवाय विज्ञान आंधळं आहे आणि विज्ञानाशिवाय धर्म लंगडा आहे असं म्हणणाऱ्या आईनस्टाईनला, धर्म आणि विज्ञान यांच्यातलं परस्पर पूरकत्वच काय, अंतिम एकत्वच जाणवलेलं होतं. ते वैज्ञानिक परिभाषेत शोधण्याचा, सिद्ध करण्याचा आईन्स्टाईनचा प्रयत्न म्हणजे त्याची युनिफाईड फील्ड थिअरी.

Science and Non Duality (SAND) असा एक वैश्विक समुदाय आहे. या नावानं शोध इंटरनेटवर घेतल्यास सर्वांनाच सर्व तपशील मिळेल. त्यामागची मूळ संकल्पना स्वयंस्पष्ट आहे – विज्ञान आणि अध्यात्म – त्यातला अद्वैताचा विचार – हे एकाच सत्याचं दोन परिभाषांमध्ये घडणारं दर्शन आहे.

किंबहुना त्यांच्या परिभाषासुद्धा आता एकसारख्या होऊ लागल्या आहेत. या समुदायाची वर्षातून एकदा परिषद भरते. त्यातल्या 2012मधे कॅलिफोर्नियात भरलेल्या परिषदेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती. 32 देशांमधले 700हून जास्त प्रतिनिधी आले होते. त्यात शास्त्रज्ञांसोबतच लेखक, कवी, कार्यकर्ते होते- (मी आपला, उगाचच!) सर्वांचाच समान मुद्दा होता- विज्ञान आणि अध्यात्माचं अद्वैत. आणि त्या परिषदेची मुख्य मथळ्याखालची बायलाईन होती – ॐ = mc²

हा तर माझ्या सततच चालू असलेल्या अभ्यासाचा, साधनेचा आणि प्रत्यक्ष अनुभवातून, नीट विवेकनिष्ठ विचाराअंती तयार श्रद्धेचा विषय आहे. ‘अभ्यासे प्रकटावे’ची एका किमान पातळीची खात्री झाल्यावर आता गेली 3 वर्षे मी हा विषय समाजासमोर मांडतो आहे. त्या सर्व व्हिडिओ चाणक्य मंडलच्या यूट्यूब चॅनलवर आहेत. हा विषय असलेल्या व्याख्यानमालेचं पहिली 2 वर्षं नाव होतं जय भारत जय जगत. आणि विषयांचा समारोप करताना यावर्षी घेतलेल्या व्याख्यानमालेचं नाव ठेवलं –‘21वे शतक भारताचे’- त्यातलं शेवटचं व्याख्यान ‘विज्ञान आणि अध्यात्माचं अद्वैत’. या व्याख्यानमालेचं कार्यकर्त्यांनी जे कलात्मक कोलाज तयार केलं त्यात ॐ = mc² हे प्रतीक त्यांनी मांडलं.

e = mc² म्हणताना आईन्स्टाईनने वस्तुमान (matter) आणि ऊर्जा (energy)च्या समतुल्याचा सिद्धांत मांडला. वस्तुमान आणि उर्जा एकमेकात रूपांतरित होतात, ते फक्त दोन वेगळे अविष्कार आहेत, मुळात ते ‘एक’च आहेत. आत्तातर विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय की सर्व विश्वाच्या मुळाशी एकच एक चैतन्य आहे. सर्व विश्व त्याच्या सर्व वैविध्यासहित मूळ एकाच ऊर्जेचा आविष्कार आहे.

सर्व भारतीय विचारात- वैदिक, बौद्ध, जैन, शिख- विश्वाच्या मुळाशी असलेल्या त्या चैतन्याचं प्रतीक ॐ हे मानण्यात आलं आहे- तस्य वाचक: प्रणव:

आता जगभर ओंकारावर शास्त्रशुद्ध संशोधन सुरू आहे. ओंकाराच्या उच्चारातून निर्माण होणार्या ध्वनिलहरींचा शरीर, मन, बुद्धीवर होणारा विधायक परिणाम हा त्या संशोधनाचा विषय आणि निष्कर्ष आहे. याचा मेळ घालून तयार झालं प्रतीक ॐ = mc². ज्यांना समजेल त्यांना शुभेच्छा. ज्यांना समजणार नाही, समजून घेण्याची गरजच वाटत नाही, त्यांनाही त्यांच्या ‘अज्ञानाच्या गळ्यातल्या अभिमानाच्या माळां सहित’ शुभेच्छा. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा.

-अविनाश धर्माधिकारी

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “ॐ = mc² – अविनाश धर्माधिकारींचं, वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारा लेख !

 • September 11, 2018 at 11:55 pm
  Permalink

  खुपच छान लेख आहे.
  मी धर्माधीकीरी यांच ते व्याख्यान खुपदा एकलं आहे,
  कधी थोडासा विसर पडला कि, मी ते पुन्हा पुन्हा ऐकतो, खुप छान वाटतं.
  खुप काही शिकायला मिळतं, आणि महत्वाचं म्हणजे छाती अभिनाने भरुन येते, मी भारतीय असल्याचा मला अभिमान वाटतो.

  आणि समाजसेवक, क्रांतीकारी, संतांच्या भुमीत माझा जन्म झाला, आणि हे वैश्विक अद्वैत माझ्या वाट्याला आलं हे मी माझं भाग्य समजतो.

  Reply
 • September 11, 2018 at 11:57 pm
  Permalink

  खुपच छान लेख आहे.
  मी धर्माधीकीरी यांच ते व्याख्यान खुपदा एकलं आहे,
  कधी थोडासा विसर पडला कि, मी ते पुन्हा पुन्हा ऐकतो, खुप छान वाटतं.
  खुप काही शिकायला मिळतं, आणि महत्वाचं म्हणजे छाती अभिनाने भरुन येते, मी भारतीय असल्याचा मला अभिमान वाटतो.

  आणि समाजसेवक, क्रांतीकारी, संतांच्या भुमीत माझा जन्म झाला, आणि हे वैश्विक अद्वैत माझ्या वाट्याला आलं हे मी माझं भाग्य समजतो.

  Reply
 • March 13, 2019 at 7:32 pm
  Permalink

  Jay Bharat Jay jagat

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?