‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!’ चार्ली चाप्लीन जीवन प्रवास – भाग ४

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जोन बेरीला काढल्यावर आता परत नव्या नायिकेचा शोध सुरु झाला आणि समोर आली १८ वर्षांची उना ओ नील ही अमेरीकेचा प्रसिद्ध नाटककार युजीन ओ नील ची मुलगी. पण तिचे वडिलांशी फारसे पटत नव्हते. असो तर उनाला पाहून पुन्हा एकदा चार्ली प्रेमात पडला. तिलाही चार्ली आवडला लवकरच दोघांनी लग्नही केले तेव्हा ती १८ वर्षांची होती तर चार्ली होता ५४ वर्षांचा.ज्या चित्रपटासाठी जोन बेरीला काढले आणि उना ला घेतले तो चित्रपट शेवटी त्याने बनवलाच नाही. त्यांच्या ह्या लग्नाला उनाच्या वडलांनी अजिबात संमती दिली नव्हती आणि त्याने नंतर मुलीशी उरले सुरले संबंध ही तोडले. इतके की तो चार्लीला आणि उनालाच काय त्यांच्या नातवंडानाही कधीही भेटला नाही. नातवंड काही १-२ नव्हती तर चांगली ८ होती.

पण हे सगळे चालू असताना, जोन बेरी स्वस्थ बसलेली नव्हती. तिने चार्लीवर फसवून, चित्रपटात काम देतो असे सांगून,आमिष दाखवून तिचा उपभोग घेतल्याचा व आता तिच्या पोटात असलेले मूल त्याचेच असल्याचा दावा दाखल केला.

हा काळ दुसऱ्या महायुद्धानंतरच्या – शीत युद्धाचे ढग क्षितिजावर जमू लागले होते आणि अमेरिकन FBI  त्याना संशय येईल अशा कुणाच्याही मागे हात धुऊन लागत असे. ह्यातून ओपेनहायमर सारखे विख्यात अणु शास्त्रज्ञ सुटले नाहीत तसेच चार्ली चाप्लीन ही नाही. दुसर्या महायुद्ध्च्या काळात त्याने रशियासाम्बंधी काढलेले गौरवोद्गार FBI ला त्याच्या बद्दल संशय यायला पुरेसे होते. खरेतर वैद्यकीय चाचणीत ते मूल चार्लीचे नाही हे सिद्ध झाले होते आणि ज्युरीने त्याला निर्दोष सोडलेही होते पण मग त्याच्यावर जोन बेरीला बेकायदेशीर रीत्या अमेरिकन सीमेबाहेर घेऊन गेल्याचा, त्याकरता रशियन हेरांची मदत घेतल्याचा, स्वत: चार्लीही रशियनांसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप केला गेला.

जजने परत केस चालवायची परवानगी दिली आणि पुरावे चार्लीच्या बाजूने असताना ही त्याला जोन बेरीच्या मुलीला ती सज्ञान होईपर्यंत आर्थिक मदत देण्याचा आदेश दिला. ह्या सगळ्यामुळे चार्ली अंतर्बाह्य बदलला. ह्यानंतर त्याने परत कधीही ट्रम्पला पडद्यावर आणले नाही. ट्रम्पचा एका प्रकारे ह्या केस ने बळी घेतला म्हणाना.

त्याचा हा सगळा कडवटपणा त्याच्या पुढच्या चित्रपटात Monsieur Verdoux (१९४७) मध्ये आला. ही कथा कुप्रसिद्ध फ्रेंच गुन्हेगार लान्द्रू ह्याच्या जीवनावर बेतलेली होती जो श्रीमंत स्त्रियाना फसवून त्याच्या पैशाकरता त्यांच्याशी लग्न करतो आणि त्यांचा खून करतो. (आपल्याकडील गाजलेल्या आचार्य अत्र्यांच्या तो मी नव्हेच सारखा) चार्लीने हे असले पात्र लोकांना करणे लोकाना झेपणे शक्यच नव्हते, चित्रपट साफ कोसळला.

 

Monsieur-Verdoux-inmarathi
chaplin.bfi.org.uk

१९५२ साली आलेला The Limelight हा त्याचा हॉलीवूड मध्ये बनलेला शेवटचा चित्रपट. एक काळ गाजवलेला  पण आता म्हातारपणामुळे, एकटेपणामुळे आणि फारसे काम नसल्याने दारुडा झालेल्या ह्या निराश विदुषकाच्या आयुष्यात एक तरुण मुलगी येते. ही एक काम शोधायला आलेली नृत्यांगना असते आणि काम न मिळाल्याने निराश होऊन आत्महत्या करायचा प्रयत्न करते जेव्हा हा म्हातारा विदुषक तिला वाचवतो. तिला हळू हळू नैराश्यातून बाहेर आणताना ती तरुण पोरगी ह्या म्हातार्याच्या प्रेमात पडते. तिला स्टेज वर काम मिळवून देण्यात त्याला आता आयुष्याचे ध्येय सापडते  त्याला त्याचा जुने साथीदार भेटतात, तो ही पुन्हा उभारी धरून, व्यसनातून बाहेर येऊन काम करायचे ठरवतो पण ऐन कार्यक्रम चालू असताना त्या हृदय विकाराचा झटका येऊन तो स्टेजवरच प्राण सोडतो पण जाताना आपण एका गुणी कलाकाराला त्याचा आत्मविश्वास परत मिळवून दिला ह्याचे त्याला सामाधान असते अशी काहीशी कथा ह्या चित्रपटाची आहे.

आता शीत युद्ध अमेरिकेत अगदी भरात होते आणि अमेरिकाविरोधी, भांडवलशाही विरोधी विशेषत: साम्यवाद, समाजवाद ह्याबद्दल जराही सहानुभूती बाळगणार्या माणसाच्या मागे FBI आणि त्याचा सर्वेसर्वा अध्यक्ष जे एडगर हूवर अगदी हात धुवून लागत असे. त्यांचा हर तर्हेने मानसिक छळ करून भंडावून सोडले जात असे. खोटे नाटे आरोप करून तांचे चारित्र्य हनन केले जात असे.

चार्लीसारखा माणूस आता त्यांच्या रडारवर आला. सप्टे.१९५२ मध्ये चार्ली इंग्लंड मध्ये The Limelight च्या प्रीमियर साठी गेला असताना FBI ने अमेरिकेच्या अटर्नी जनरलकडे चार्लीची बर्याच वर्षापसून तयार केलेली फाईल सोपवली.

सगळे काही ठरल्याप्रमाणे दोनच दिवसात चार्लीवर अमेरिकेत परत यायला बंदी घातली गेली. बरोबरच होते, चार्लीची जगभरातली लोकप्रियता पाहता आणि कोणतेही सबळ पुरावे नसताना ते चार्लीचे फार काही नुकसान करूच शकत नव्हते म्हणून ही पळवाट. ना केस न खटला अन आरोपपत्र ना सवाल जवाब. अमेरिकन व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रचंड विजय ! ह्यानंतर पुढची २० वर्षे तो अमेरिकेत परतला नाही. आणि आला तेव्हाच जेव्हा चार्लीला त्यांनी आपण होऊन बोलावले आणि पायघड्या घालून त्याचे स्वागत केले.

१९५२ साली The Limelight अमेरिका सोडून जगभरात प्रदर्शित झाला आणि तुफान चालला. अमेरिकेत परत यायला बंदी घातल्यावर चार्लीने स्वित्झर्लंड मध्ये लेक जिनिव्हा इथे ३७ एकराची इस्टेट विकत घेतली व आपल्या सर्व कुटुंबासमवेत तो तिथेच राहिला. तिथे त्याला आणि उनाला अजून ४ मुले झाली, १९६२ साली शेवटचा ख्रिस्तोफर जन्माला आला  तेव्हा चारली ७२ वर्षांचा होता.

अमेरिकेतून अपमानास्पदरीत्या हाकलला गेल्यावर आलेला त्याचा चित्रपट A King in New York (साल १९५७) हा पूर्णपणे इंग्लंड मध्ये चित्रित झाला होता. हा त्याचा नायक किंवा प्रमुख भूमिका असलेला शेवटचा चित्रपट.

नुकत्याच झालेल्या अपमानाचे दाट सावट ह्या चित्रपटावर होती, चित्रपटाचे युरोपात चांगले स्वागत झाले. पण अर्थातच तो १९५७ मध्ये अमेरिकेत प्रदर्शित नाही होऊ शकला.उना आणि चार्लीला चौथ्या लग्नानंतर झालेला पहिला मुलगा मायकेल हा ह्या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत होता. या आधी त्याला त्याच्या इतर दोन भावंडांबरोबर The Limelight मध्ये अगदी छोटेशी भूमिका होती. हा चित्रपट देशात बंडाळी मजल्यामुळे परागंदा होऊन अमेरिकेत आलेल्या एका राजाची कथा आहे.

 

limelight-inmarathi
mythicalmonkey.blogspot.in

१९६४ साली त्याने स्वत:चे आत्मचरित्र लिहिले. माझे आत्मचरित्र ह्याच नावाने (My Autobiography). त्याच्या इतर चित्रपटाप्रमाणे हेही तुफान गाजले. जगभरातून लोकांच्या त्याच्यावर उड्या पडल्या. एका महिन्यात तिसरी आवृत्ती छापण्याचा विक्रम ह्या पुस्तकाने केला. त्याची अनेक भाषांत भाषांतरेही झाली. पण आयुष्याच्या संधाकाळी, एक भव्य कारकीर्द घडवून झाल्यावर सुद्धा एक प्रच्छन्नपणा, प्रामाणिकपणा किंवा मोकळेपणा ह्या आत्मचरित्रात दिसत नाही. चार्ली ह्या आत्मचरित्रात त्याची कला, त्याचे चित्रपट बनवण्याचे तंत्र त्याला दिसणाऱ्या जाणवणाऱ्या गोष्टी, त्यांचा त्याच्या चित्रपट निर्मितीवर पडलेला प्रभाव  ह्याबद्दल कमीच लिहितो, तर त्याच्या आयुष्यात आलेले मोठ मोठे लोक, त्याची दोस्ती किंवा ओळख , त्यांच्या विचारांचा, व्यक्तिमत्वाचा  त्याच्यावर पडलेला प्रभाव, मान सन्मान  ह्याबद्दल अगदी भरभरून लिहितो.

पण त्याचा सावत्र भाऊ व्हीलर ड्रायदन, अनेक वर्ष त्याचा कॅमेरामन म्हणून काम केलेला रोली टाथ्रो,त्याचा सहायक दिग्दर्शक रॉबर्ट फ्लोरे आणि दुसरी बायको लीटा ग्रे ह्यांचा तर आत्मचरित्रात उल्लेखही नाही.

१९६५ साली त्याचा जन्मापासूनचा सुखदु:खातला साथीदार असलेला भाऊ सिडने वारला.तर १९६८ साली त्याचा थोरला मुलगा चार्ल्स ज्युनियर अतिरिक्त मद्यपानाने आजारी पडून मेला. चार्ली आता एकटा पडत चालला होता.नशीब इतकी लफडी करूनही त्याची शेवटची बायको उना त्याच्या बरोबर शेवटपर्यंत होती. तिच्या रूपाने त्याला आयुष्यात खरे प्रेम, शांती आणि स्थैर्य  मिळाले असे आपण म्हणू शकतो. तो खरेच त्या गोष्टीच्या शोधात होता कि नाही ह्या बाबत मात्र खात्रीने काही सांगता येणे मुश्कील आहे.

१९६६ साली म्हणजे वयाच्या ७७ व्या वर्षी त्याने त्याच्या ८२ व्या आणि शेवटच्या चित्रपटाचे काम सुरु केले. चित्रपट होता A Countess from Hong Kong. हा चित्रपट त्याने दिग्दर्शीतही केला आणि त्यात भूमिकाही केली.

ह्यात मार्लन ब्रान्डो- GodFather वाला, आपल्या पैकी बऱ्याच जणाना त्याचा  हाच चित्रपट माहिती असतो पण त्याचे Young Lions,  A Street Car name desire, On the Water Front  (आपल्याकडचा आमीर खान- राणी मुखर्जीचा गुलाम ह्यावरून घेतलेला होता.), असे अनेक उत्तम आणि गाजलेले चित्रपट आहेत. सोफिया लोरेन ( Two Women  ह्या जगभरात अत्यंत नावाजलेल्या चित्रपटाची नायिका आणि जिला अगदी  मादक सौन्दर्यचा atom bomb म्हणता येईल अशी इटालियन सुंदर अभिनेत्री) असे बडे बडे स्टार्स त्यात होते.

 

hongcong-inmarathi
randomramblingsthoughtsandfiction.blogspot.in

हा त्याचा पहिला वाहिला ७० मिमि रंगीत बोलपट होता. हा चित्रपट जपान होन्ग्कोंग, कॅनडा इथे तुफान चालला मात्र युरोपात चालला नाही. अमेरिकेत तर त्याचे The Lime Light  पासूनचे चित्रपट प्रदर्शितच झालेच नव्हते. पण अमेरिकन जनता त्याला विसरली नव्हती की तिचे प्रेम कमी झाले नव्हते. चित्रपट नाही दाखवले तरी त्याचे आत्मचरित्र मात्र धडाक्यात खपत होते, अमेरिकन सरकारही आता जरा मवाळ झाले होते, बराच काळ लोटला असेल म्हणून असेल पण १९७१ साली चार्लीने अमेरिकन व्यावसायिक मोझेस रोथमन बरोबर करार करून त्याचे चित्रपट अमेरिकेत पुन:प्रदर्शित करायचे ठरवले.

त्याला १९७२ साली अमेरिकेतून ऑस्कर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मानाचे बोलावणे आले आणि तोही मागचे शल्य, अपमान विसरून गेला. १९५२ साली अमेरिकेतून अपमानास्पदरीत्या बाहेर काढला गेलेला चार्ली २० वर्षानी पुन्हा परतला लोकानी पुन्हा त्याचे प्रेमानेच स्वागत केले.

४४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात त्याला जीवनगौरव पुरस्कार दिला गेला.

त्यावेळी चाहत्यांनी त्याला ऑस्करच्या इतिहासातले सगळ्यात मोठे Standing ovation दिले. सतत २० मिनिट लोक उभे राहून, टाळ्या वाजवून त्याचा गौरव करीत होते.त्याला पुरस्कार दिला जात असताना, त्याने पुरस्कार स्वीकारल्यावर आभार व्यक्त करतानाही ते सतत उभेच होते. गैरसमजाचे, कटुतेचे, द्वेषाचे, सगळे बांध फुटले, सगळी अंतरे खलास झाली, सगळे किंतु, किल्मिष चाहत्यांच्या प्रेमात वाहून गेली.

चार्लीला नाताळ कधीच आवडला नाही. नाताळ त्याला त्याच्या लहानपणीच्या गरीबीची आणि हलाखीच्या दिवसांची आठवण करून देतो असे चार्ली नेहमी म्हणत असे. तोच चारली वयाच्या ८८व्या वर्षी म्हणजे १९७७ साली नाताळच्याच दिवशी सकाळी झोपेत असताना वारला. त्याच्या रूपाने वर्तमानात तग धरून असलेला मूकपटयुगाचा अखेरचा दुवा खऱ्या अर्थाने इतिहासजमा झाला.

तर आता लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेली चार्लीच्या मृतदेहाच्या चोरीची हकीकत …

तर झाले असे कि २५ डिसेंबर १९७७ रोजी चार्ली वारला. त्याला तो राहत असलेल्या स्वित्झर्लंड मधील घराजवळच्या एका दफनभूमीत पुरले गेले. त्यानंतर जवळपास २ महिन्यांनी म्हणजे २ मार्च १९७८ ला त्याचे थडगे उकरून त्याचा मृतदेह असलेली शवपेटीच चोरून नेल्याचे आढळून आले. आधी ही कोणातरी चार्लीच्या चाहत्याने त्याचे अवशेष आपल्या संग्रही असावेत म्हणून केलेली कृती असावे असेच वाटले पण उनाला जेव्हा ६ लाख डॉलर ची मागणी करणारा फोन आला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. उनाने अर्थातच ही मागणी फेटाळली. तेव्हा चोरांनी त्याची आधीची पत्नी पॉलेट गोडार्ड हिला फोन करून आपल्याकडे चार्लीचा मृतदेह असल्याचे सांगितले त्यावर तिने त्यांना “बर मग?” असा प्रश्न विचारला आणि फोन ठेवून दिला असे सांगतात. असो.

तर ११ आठवड्यांनी चोरही सापडले आणि त्यांनी आता कुणीच पैसे देत नाही हे पाहून जवळ च्याच एक मक्याच्या शेतात पुरलेली चार्लीची शवपेटी आणित्यातले त्याचे शव, असे सर्वकाही सहीसलामत (?) अवस्थेत सापडले.

ते दोन चोर होते. एक पोलंडचा रोमन वार्डास आणि दुसरा बल्गेरियाचा की गास्तो गानेव. दोघेही मेकॅनिक होते आणि थोडेफार पैसे कमावण्याच्या लालसेने त्यांनी हे कृत्य केले होते. चार्ली सारख्या इतक्या प्रसिद्ध माणसाच्या शवा करता ६ लाखाची क्षुल्लक रक्कम कुणीही देईल असा त्यांचा कयास असावा. त्यांनी चार्लीच्या घरच्या कुणाऐवजी जर त्याच्या धनिक चाहत्याला संपर्क केला असता तर कदाचित त्यांचा विचार खरा ठरलाही असता… असो.

तर चोरांना ४ वर्षे आणि १८ महिन्याची शिक्षा झाली. २०१४ मध्ये ह्या घटनेवर आधारलेला एक विनोदी चित्रपट आला त्याचे नाव होते “द प्राईस ऑफ फेम ” दिग्दर्शक होता झेवियर बोवी. आश्चर्य म्हणजे ह्या चित्रपटामुळे चॅप्लिन कुटुंबीय किंवा चोरांचे कुटुंबीय देखील अशा कुणाच्याही भावनावगैरे दुखावल्या गेल्या नाहीत. उलट चॅप्लिन कुटुंबीयांनी दिग्दर्शकाला बारीक सारीक तपशील पुरवून मदतच केली.

 

charlie-inmarathi
www.scoopwhoop.com

कोणता चार्ली खरा? पडद्यावरचा? की पडद्यामागचा?

असल्या प्रश्नांची उत्तरं शोधायचीच नसतात.

हे वर्षं चार्लीचं १२८व जयंती वर्ष…त्या निमित्तानं त्याची आठवण झाली..इतकंच.

===

संदर्भ-

१.My Autobiography- By Charles Chaplin

२. हसरे दुःख चार्ली चॅप्लिन – चरित्र लेखक- भा द खेर

३. Charlie Chaplin – Full Length Biography (Documentary) यु ट्यूब डॉक्यूमेंटरी

४. Paul Merton’s Silent Clowns – Episode 2 – Charlie Chaplin

===

समाप्त

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?