नास्तिक परिषदेतील भाषण : धर्मवाद्यांना ओव्हरटेक: थिअरीत की थेरपीत? : राजीव साने

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

दिनांक ७ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या नास्तिक परिषदेत श्री राजीव साने ह्यांनी केलेलं भाषण

===

 

atheist conference inmarathi

 

धर्मवाद्यांच्या ज्या थिअरीज असतात ना? त्या थिअरी म्हणून नेस्तनाबूत करणे हे सोपे काम आहे. इतक्या त्या टुकार आहेत. त्यांच्यात तपासणीयता तर नसतेच पण अंतर्गत सुसंगतीसुध्दा नसते. कोणाला थिअरी पटते म्हणून तो भाविक बनतो असे नसतेच. भाविक हे ‘भाविक’ बनतात तर त्यांना ‘थेरपी’ मिळते म्हणून! भाविक होतात. पर्यायी थेरपी उभी केल्याशिवाय त्या थेरपीज हटणार नाहीयेत.

पण धार्मिक थेरपीजना दोन प्रकारचे भयानक साईड-इफेक्ट आहेत. खास भारतीय किंवा पौर्वात्य धर्मांत कर्तेपण नाकारून मोक्षात विलीन व्हायचे असल्याने पलायनवाद, वैराग्यवाद, तपश्चर्यावाद आणि मुख्य म्हणजे न्यायबुद्धीचा नाश हे साईड इफेक्ट आहेत. कर्मविपाक मानला की मानवकृत न्यायाचा प्रश्नच एलीमिनेट होतो.

दुसऱ्या प्रकारचा भयंकर साईड-इफेक्ट म्हणजे वैरवाद. जे एकच एक ईश्वर आणि सैतान मानतात आणि अमुक नावाच्याच ईश्वराशी निष्ठा राखण्याचा आग्रह धरतात, त्यांना बिगर-निष्ठावानाना वठणीवर तरी आणा नाहीतर नष्ट तरी करा हे कर्तव्य बनून बसते. पुन्हा एकाच जन्मात स्वर्ग की नरक हे ठरणार असल्याने घाई फार असते. (भरपूर जन्मवाले एटीकेटी असल्यानेच अटीतटीवर येत नाहीत.) हा साईड-इफेक्ट हिंस्र असल्याने ते सभ्यतेला मोठेच आव्हान आहे.

काय टाईपच्या मानसिक गरजा आपल्याला नको तिकडे नेतात? तसल्या गरजा उरूच नयेत ही आदर्श दिशा झाली पण मानसिक गरजांमध्ये परिवर्तन करत नेत असताना त्या भागवाव्याही लागतात. काहीतरी नवा पर्याय दिल्याशिवाय नुसतेच जुने जाउद्या मरणालागुनी असे म्हणून भागत नाही म्हणजे त्या भागवायच्यासुध्दा आणि बदलायच्यासुध्दा ही तारेवरची कसरत असणार आहे.

 

rajeev sane atheist conference 2018 inmarathi

 

जेव्हा प्रगतीच नव्हती तेव्हा दुःख भीती अनिश्चितता या गोष्टी फारच तीव्र होत्या त्या झेलणे अवघडच होते. पण म्हणून माणसाने जे उपाय शोधले त्यांचे भयानक साईडइफेक्ट्स झाले. आता ते आपण निस्तरतोय. दुःख भीती अनिश्चितता या गोष्टी प्रगती बरोबर कमी होतीलही पण माणसाला असेही काही पेच असतात की जे प्रगती होण्याने सुटणारे नसतात.

पण रँडमनेस-भाग्य, विसंगती, दुविधांमुळे अंग्विश, अनॉमी म्हणजे नियमरहितता, एलियनेशन आत्मवियोग, अब्सर्डिटी असंबद्धता, पर्पजलेसनेस प्रयोजनशून्यता, बोअरडम कंटाळा, हे जाणीवेतल्या अस्तित्वाला भेडसावणारे प्रश्न आहेत. झेपवणे फार अवघड.

शंकराचार्य म्हणतात मोक्ष मिळाला की सगळेच प्रश्न सुटतील. अहो पण तो नसताना त्यातल्या त्यात हेल्दी कसं जगायचं हे बिगर मोक्षातच जमावे लागेल ना? जडवाद काय ऑफर करतो? पूर्ण विज्ञानाने जर ‘जडवादी क्रांती’ झालीच तरी त्यातून सर्वांना मोक्षच मिळेल कारण ‘आपले’ जाणीवेतले ‘निवडकर्ते अस्तित्व’ जाणवणारच नाही. आपण कारणवशात वागत असू पण योग्य/अयोग्य हा प्रश्नच राहणार नाही. चिद्वाद्यांचा मोक्षसुध्दा ‘कर्ता मी’ विलीन करण्याचाच असतो. समजा मोक्षात सगळाच आनंद असेलही. पण खरा प्रश्न मोक्ष नसताना कशासाठी व कसे जगायचे हा आहे!

काय केले पाहिजे? हा प्रश्न वेगळा आणि आहे ते कमीत कमी मानसिकऱ्हासानिशी कसे स्वीकारायचे? हा अगदी वेगळा प्रश्न आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या विचारक्रिया लागतात. नॉनझेप मोडमध्ये न जाता झेप-मोडमध्ये रहाणे हे कोणालाही अत्यंत आवश्यक असते.

सायकोलॉजीकल सर्व्हायव्हलचा प्रश्न फिजिकल सर्व्हायव्हल इतकाच गंभीर प्रश्न असतो. मानसिक उर्जेचे अर्थशास्त्र सांभाळावेच लागते. केवळ काही त्रास असताना तो बरा व्हावा म्हणूनच मानसोपचार लागतो अशी सध्याची धारणा आहे. तोही घेण्याला कलंक मानणे हा गाढवपणा चालू आहे तो वेगळाच. मी एक सकारात्मक पाउल म्हणूनही मानसोपचाराकडे बघतो. मानसिक गोची होऊन बसण्याअगोदर ती होऊच नये म्हणून काळजी घेणे ज्याला प्रिव्हेंटिव्ह थेरपी म्हणता येईल, ती सुध्दा का नसावी? इतकेच नव्हे तर आत्मघातकी दुर्गुण दूर करण्यासाठी, निदान कमी राखण्यासाठीसुध्दा थेरपीजचा उपयोग केला जावा. माणूस बदलला पाहिजे असे आपण नेहमी म्हणतो. पण तो नुसत्या बौद्धिक आकलनाने बदलत नसतो. कळते पण वळत नाही. मग वळायला मदत करणे का नसावे? गंमत अशी की भारतीय परंपरेत कळण्याला ज्ञान आणि वळण्याला ‘विज्ञान’ असा शब्द आहे. इथे मॉडर्न-सायन्स हा अर्थ नाही. असो.

मानसोपचार शब्द आधुनिक, मानसोपचार-व्यवहार मात्र आदिमकाळापासून

आधुनिक स-औषध सायक्याट्रीतसुध्दा, जाणिवेत काय धोरण घ्यायचे हे शिकवावे व शिकून घ्यावे लागते. कौन्सेलिंग = संवाद-थेरपी. जाणिवेतले आपण आपल्याशीच जाणीवेत संवाद करत असतो हा आत्मसंवाद मानसोपचारासाठी कसा करावा हे शिकून घ्यावे लागते. अर्थात हार्मोन्स व न्युरोट्रान्समीटर्स मध्ये होणाऱ्या जीवनात किंवा जाणीवेत नसलेल्या कारणांनीदेखील विकारग्रस्तता येत असल्याने औषधे महत्त्वाचीच. ती पुरेशी नसतात. कारण जशी योग्य केमिकल्स मिळाल्याने आपल्याला योग्य दिशेने विचार करणे सोपे जाते. तसेच योग्य दिशेने विचार करण्याने आणि तसे आचरण करण्याने आपण स्वतः केमिकल्स चे उत्पादन करू सुध्दा शकतो. म्हणजेच दोन्ही दिशांनी काम व्हायला हवे.

आधुनिक स-औषध सायक्याट्रीत वापरल्या जाणाऱ्या आधुनिक थेऱ्यासुध्दा नको इतक्या सुटसुटीत आहेत. इड-इगो-सुपरइगो-सबकॉन्शस. पेरंट-अडल्ट-चाईल्ड, कहानेमान:सिस्टीम वन सिस्टीम टू यांचा सुटसुटीतपणा अगदी कफ-वात-पित्त किंवा सत्व-रज-तम इतका वाईट असतो. थेरपीला लागणारी थेरी ना वास्तवात ग्राउंडेड असते. ना वास्तवावर होल्ड आणणारी समहाऊ झेप-मोडमध्ये कसे टिकायचे हा असतो.

स्वीकार: प्रसन्नता की विषाद?

आर ई बी टी, कॉग्निटीव थेरपी, असर्टिव्हनेस ट्रेनिंग आधुनिक थेरपीज स्वीकारवादीच

स्वीकार आला की परिवर्तनवाद गेलाच असे नाही. सर्वच मानसोपचारतज्ज्ञ हे नेसेसरीली प्रस्थापितवादीच वाटू लागतात. पण तसे नसते आनंद नाडकर्णी, उल्हास लुकतुके, प्रदीप पाटकर, हमीद दाभोलकर हे परिवर्तनवादीच आहेत. पण म्हणून त्यांनी थेरपी रोको असे केलेले नाही. ते थेरपिस्ट असताना काय करायचे आणि एरवी नागरिक म्हणून काय करायचे यात फरक करू शकतात म्हणूनच ते थेरपिस्टच्या रोलमध्ये यशस्वी आहेत.

मूल्यचिकित्सक मानसोपचारात त्या निमित्ताने मूल्यचिकित्सा सुरू तर होते. नंतर राजकीय अंगानी मूल्यचिकित्सा पुढे नेता येते. नुसती वास्तवाची कारणमीमांसा करत राहिले तर मूल्यचिकित्सा होत नाही. प्रयोजनमीमांसा हा स्वतंत्र प्रांत आहे.

रँडमनेस-भाग्य. विसंगती, पेचांमुळे अंग्विश, अनॉमी म्हणजे नियमरहितता, एलियनेशन आत्मवियोग, अब्सर्डिटी असंबद्धता, पर्पजलेसनेस प्रयोजनशून्यता, बोअरडम कंटाळा, वगैरे आव्हाने ही मी संरक्षणात्मक अंगाने सांगितली. पण काही सकारात्मक गोष्टीही आपण विसरता कामा नयेत.

निरपेक्ष आनंद, वासनारहित सौदर्य, सुकून(ब्लिस), धन्यवाद द्यावेसे वाटणे, सन्मार्गच घेतला याचा धन्यभाव, आश्चर्य-कौतुक, शुचिता-पावित्र्य, आदर-जोडलेपणा, साक्षीभाव मोकळेपणा, रितेपण नव्हे तर भरलेपण म्यूच्युअलटीतून येणारी इंटिमसी, आत्ताच्या वास्तवाचा काच सोडून येणारी क्रियेटिव्हिटी याही गोष्टी हव्या आहेत की नाहीत.

तसेच नैतिकता ही फक्त कर्तव्यांपर्यंत पोहोचते. पण कर्तव्यातीत सद्गुण म्हणजेच औदार्य, करुणा, मुदिता, क्षमा, अनसूया हे जोपासायला मनोवस्था आत्मीयतेची लागते. ती ठरवून आणता येत नसली तरी तिला येऊ देणे ‘लेट’ याकरता स्वागतशील असावे लागते. म्हणजे मानसोपचार हा फक्त विकारग्रस्तता घालवण्यापुरता पुरेसा नसून आंतरिक उन्नतीसाठी पुढे नेला पाहिजे.

मनुष्य नेहमीच आदीमकाळापासून ते आज सुध्दा स्वतःला मानसोपचार देत/घेत आला आहे. या मानसोपचारात घोटाळे बरेच झाले. घोटाळे टाळले पाहिजेत. पण मानसोपचारच टाळला पाहिजे असे परवडणारे नाही. कल्पनाशक्ती आणि कथारचनाशक्ती जबरदस्त असल्याने मनुष्याने मानसोपचाराकरिता नेहमीच मिथके वापरलेली आहेत.

विकास किंवा प्रगती हे सुध्दा एक मिथकच आहे असे आजही कित्येकांचे गंभीर मत आहे. मिथके तारकही ठरली आहेत आणि मारकही ठरलेली आहेत. तारक ठरणार की मारक ठरणार हे त्या मिथकांत कोणता मूल्यविचार आहे यानुसार बदलते. मूल्यविचार तारक मारक असतो पण मिथक हे वास्तव नसते ही गोष्ट तारक किंवा मारक नसते. अर्थात मिथकाला वास्तव मानणे हे मारक ठरू शकते.

पण मिथकाचे भान कथा म्हणून ठेवले तर तारक/मारकता त्या कथेतून कोणता मूल्यविचार पुरस्कृत केला जातो हा कळीचा मुद्दा बनतो. मूल्यविचारात वादविवाद झालेच पाहिजेत. पण मूल्य-वाहक कथा ही वास्तव नाही हा वाद मूल्यात्मक वाद नसतो. तथ्यातथ्य विवेक आणि सुमूल्य-कुमूल्य विवेक हे वेगळे विवेक असतात. कथेची मूल्यात्मक चिकित्सा करता येते आणि ही चिकित्सा वास्तव असणे/नसणे हा निकष न आणतादेखील करता येते.

युधिष्ठिराचा रथ जमिनीपासून दोन इंच वर तरंगत असे हे वास्तवात असणे शक्य नाही. ते काय हॉवरक्राफ्ट किंवा ड्रोन नव्हते. मुद्दा असा आहे की ‘नरोवा कुंजरोवा’ म्हणण्यात जो चालूपणा त्याने केला तो करण्याच्या अगोदरचे त्याचे आचरण असे काय लायकीचे होते की त्याचाच रथ दिव्यशक्तीने का होईना पण तरंगावा? मला एखाद्या संस्कृती-अभिमान्याच्या ध्यानात आणून द्यायचे आहेत त्याचे अगोदरचे संधीसाधूपणे. हे करणे माझ्या मूल्यप्रणालीत्मक लढयासाठी मला आवश्यक आहे. आता मला द्रौपदीचा पाचही पांडवांशी विवाह लावण्याच्या बाजूने त्यांनी जी भुक्कड समर्थने दिली ती खोडून काढायची आहेत. अशा वादात मी मध्येच “पण रथ मुदलात तरंगेलच कसा?” हा प्रश्न आणला तर माझा मुख्यवाद बाजूला पडणार आहे. तरंगला तर तरंगला पण युधिष्ठिराला हिरो मानू नका हेच मी म्हटले पाहिजे.

किंवा परशुरामाने वडलांच्या आज्ञेनुसार आईचे मुडके उडवणे हे निषेधार्ह आहे असे मला म्हणायचे आहे. आता रेणुकेच्या मनात खरोखरच चित्ररथ गन्धर्वाविषयी आकर्षण वाटले होते का? मी म्हणीन वाटले तर वाटले त्यात काय चूक आहे. जमदग्नीना अंतर्ज्ञान होते की नव्हते. मी म्हणीन अंतर्ज्ञान झूठ आहे. पण जर मला असे म्हणायचे असेल की जरी आकर्षण वाटले असले आणि जरी अंतर्ज्ञान असले तरीही मुंडके उडवणे चूकच होते. मला आत्ता पितृआज्ञा शिरसावंद्य आणि हत्या या दोन गोष्टींचा निषेध करायचा आहे. मग मी अंतर्ज्ञान आणि आकर्षण यांच्या वास्तव-अवास्तवतेची चर्चा बाजूला ठेवली पाहिजे. कारण माझा फोकस विसकटेल.

म्हणूनच मुद्दा जेव्हा सुमूल्य की कुमूल्य हा असतो, तेव्हा तथ्यातथ्यतेत अडकायचे नसते. भैरप्पा यांचे महाभारत जरूर वाचा. त्यात चमत्कार काढून टाकलेले आहेत. पण तीच मूल्यचिकित्सा चमत्कार ठेवूनही करता येते हे मी सिद्ध करू शकतो. अर्थात चमत्कार मानावेत असे मी म्हणत नाहीये.

याहून सखोल मुद्दा असा आहे की फक्त वास्तवात असणे म्हणजेच अस्तित्वात असणे हे खरे आहे काय? ध्येये-आदर्श कुठे वास्तवात असतात? पण ती महत्त्वाची नसतात काय? व्हेन अँन आयडीया कॅचेस इमॅजिनेशन ऑफ मासेस इट बिकम्स अ मटेरिअलफोर्स मार्क्स

कित्येक गोष्टी या मटेरिअल ऑब्जेक्ट्स नसतात. ती फॉर्मल/लॉजिकल ऑब्जेक्ट्स संख्या इम्प्लाईज, इक्वल टू, देअरफोर अशी चिन्हे ज्याचे प्रतिनिधित्व करतात तीही मटेरिअल ऑब्जेक्ट्स नसतात. स्क्वेअर-रूट ऑफ मायनस लॉजिकल इम्पॉसिबिलिटी असूनसुध्दा स्क्वेअर-रूट ऑफ मायनस वन ही गोष्ट गणिताची उत्पादकता वाढवण्यासाठी उपयोगी पडते. कॉम्प्लेक्स नंबर्स! शुध्द बिंदू उपलब्ध नसतो पण अवकाशाला आकलनीय बनवण्यासाठी तो आवश्यक असतो. परफेक्टली ब्लॅक बॉडी, परफेक्टली इलॅस्टिक बॉडी, फ्रीक्शनलेस सरफेस अशी आदर्शीकरणे लागतात. मानवविद्यांतही आदर्श प्रकार वेबरने स्थापित केले. देअर आर मेनी पॉसिबिलिटीज. ऑल कॅन नेव्हर कम इन टू रिअलिटी. डू दे नॉट एक्झिस्ट? आपण शक्यतांचे वैभव घेऊन जगत असतो. फँटसीज मध्ये घातक असतात तशा विधायक किंवा निरुपद्रवी पण सुखदसुध्दा असतातच. म्हणजे फँटसी ही गोष्ट ‘पर से’ वर्ज्य मानता येत नाही.

स्वयंमात्र ईश्वर म्हणजे गॉड बाय हिमसेल्फ/हरसेल्फ नसेल पण लोकांच्या मनातील ईश्वर अस्तित्वात आहेच. भक्तीरसाचा आस्वाद मलासुध्दा घेता येतो! गॅब्रियल मार्सेल या अस्तित्ववादी तत्त्वज्ञाने एक छान मांडणी केली आहे. गॉड डज नॉट एक्झिस्ट इन फर्स्ट पर्सन ऑर थर्ड पर्सन. ही एक्झिस्ट्स ओन्ली इन सेकंड पर्सन. अज ए पार्टनर इन आय दाऊ डायलॉग. तू मी संवादातला तू! आपण सगळेच स्वतःशी संवाद करतोच इतरांशीही करतो. समजा एक टेनिस प्लेअर वॉल प्रॅक्टीस करत आहे. तो कल्पू शकतो की समोरून कोणीतरी त्याला प्रॅक्टीस देत आहे. म्हणजे तो त्याचेच रोल्स स्वीच करू शकतो

गॅब्रियल मार्सेलची भूमिका जास्त चांगली अशासाठी आहे की प्रत्येकाला त्याच्या अनन्यतेनुसार त्याचा गॉड डिझाईन करण्याचे, सिच्युएशननुसार मॉडिफाय करण्याचे स्वातंत्र्य येते. धर्मांच्या हुकूमशाहीला आव्हान मिळतेय.

ढोंगीपणा वाईटच. पण तथ्यात्मक आणि मूल्यात्मक असे दोन्ही असतात. व्यायाम करायचा नाही पण मारुतीला नमस्कार करायचा हे अप्रामाणिक आहे – असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा भाविक चपापतो पण अंतर्मुख होतो. हा काय शेंदूर फासलेला दगड आहे हे मलाच काय, खरेतर त्याला सुध्दा कळत असते. पण त्याने प्रतीकमूल्य चिकटवलेले असते. त्यामुळे शेंदूर फासलेला दगड म्हटल्याने तो माझ्या अंगावर येईल आणि आत्मपरीक्षण करणारच नाही. राम आणि वचन पाळणे अशा जोड्या सापडतात.

बिलीफ खरा की खोटा यापेक्षा विल टू बिलीव्ह किती स्ट्रॉग आहे हा प्रश्न जास्त महत्त्वाचा असतो. बिलीफ मधली हवा काढून घेण्याचे ‘खरे की खोटे?’ याहून वेगळे मार्ग असतात. पुनर्जन्म आणि कर्मविपाक या संकल्पनांमुळे किती नुकसान झाले आहे हे आपल्याला कळते. ज्यांना कळत नाही

त्यांच्याशी बोलताना जरी कर्मविपाक खरा असता तरी तो न्याय नसताच हे आर्ग्युमेंट मी करतो. स्मृती पुसलेला पुनर्जन्म असला तर न्याय मिळाल्याचे समाधान कसे मिळणार? मी काय चुकीचे वागलो होतो हे मला माहीतच नसेल तर मी शिक्षेमुळे सुधारणार कसा? मी ज्या कोणावर अन्याय केलेला असेल त्याला हे कसे कळणार की ‘तो’ सध्याच्या जन्मात मी आहे आणि मला अद्दल घडलेली आहे. किंवा पुण्यकृत्य कळले नाही तर अर्ह्तेचे समाधान कसे मिळणार आणि माझ्या सुभाग्याबाबत इतरांची असूया कशी कमी होणार? न्यायाचा कोणताच पर्पज सर्व्ह होत नाहीये जरी कर्मविपाक खरा असला तरी.

तपश्चर्यावादामुळे सोसणे या गोष्टीचे उदात्तीकरण केले जाते. दुःख भोगले की पापक्षय होतो आणि सुख भोगले की पुण्यक्षय होतो. पण श्रेय हे भोगानुसार हवे की कृत्यानुसार? सत्कर्मानेच पुण्यवृद्धी झाली पाहिजे आणि कुकर्माने पापवृद्धी. हे नैतिक आर्ग्युमेंट पाप/पुण्य काही नसतेच असे म्हटले तर करताच येत नाही. तपश्चर्यावाद वैराग्यवाद यांचा पराभव नैतिक पातळीवर झाला पाहिजे पाप/पुण्य ‘भौतिक नसते’ याने तो पराभव होत नसतो.

काय म्हणजे चांगले? हे सांगायला खूपजण आहेत. वाईटातून कमी वाईट कमी वाईटातून आणखी कमी वाईट असे ओढत आणावे लागते. सुरुवात शिकणाऱ्याच्या धारणांपासून करावी लागते शिकवणाऱ्याच्या नव्हे. मी अवघड लिहितो म्हणून ते खूप जणांपर्यंत पोहोचत नाही ही माझ्यावर टीका होते. ती खरीही आहे. माझ्या मर्यादा आहेत. जास्त जणांपर्यंत पोहोचावे म्हणून डायल्यूट करायचे व डिस्टॉर्ट व्हायला स्कोपही ठेवायचा की कमी जणांपर्यंत पोहोचले तरी चालेल पण म्हणणे विशुध्द राहिले पाहिजे? हा धोरणात्मक प्रश्न आहे. तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो.

तुमची चळवळ जे आलरेडी नास्तिक आहेत त्यांच्यातच राहू द्यायचीय की आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहनही करायचेय? आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहन, जडवादाच्या मर्यादेत उभे राहू शकत नाही. भावविश्वात शिरून भावविश्वात जिंकायचे आहे. मन जिंकी तो वैऱ्यासही जिंकी.

तुम्ही जिंकावे म्हणून हे बोललो. विरोध करायचा म्हणून नाही.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?