वजन कमी करताना ही चरबी जाते तरी कुठे? – वाचा तर्कशुद्ध उत्तर!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
वजनवाढ हा सध्याच्या पिढीला लागलेला एक शापच आहे, ह्या शापातून सगळेच सध्या जात आहेत, आणि खासकरून सध्याची तरुणाई!
विस्कळीत जीवनशैली, अपुरी झोप, वेळी अवेळी खाणं, फास्ट फूडचा मारा, दारूचे सेवन अशा कित्येक वाईट सवयींमुळे सध्याची तरुणाई फक्त वजनवाढच नाही तर शरीराच्या कित्येक व्याधींशी लढत आहे!
आज जगात बहुधा सर्वात मोठी समस्या म्हणजे लोकांचं वाढलेलं वजन आहे.

त्यामुळे सर्वच लोक जरा जास्तच हेल्थ कॉन्शिअस झाले आहेत. त्यातूनच मग वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. कोणी जिम करणार, कोणी जॉगिंग, कोणी योग तर कोणी डायटिंग.
वजन वाढणे म्हणजे नेमकं काय? तर शरीरात फॅट्स अतिप्रमाणात वाढले तर आपण लठ्ठ होतो म्हणजेच आपलं वजन वाढतं.
हे वाढलेलं वजन व्यायाम केल्याने कमी होतं. पण जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा फॅट्स म्हणजेच चरबीचे प्रमाण कमी होते.
पण कधी विचार केला आहे का की, ही कमी झालेली किंवा होणारी चरबी जाते कुठे?

अनेक विशेषज्ञ देखील ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देऊ शकलेले नाहीत.
पण ऑस्ट्रेलिया येथील न्यू साउथ वेल्स यूनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ बायोमोलिक्यूलर सायन्स येथील वैज्ञानिक रुबेन मिरमैन ह्यांनी केलेल्या एका सर्वेत असे दिसून आले की, १४७ विशेषज्ञ ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यास असमर्थ ठरले.
त्यांच्या मते शरीरातील चरबीचे उर्जा आणि उष्मा ह्यात परिवर्तन होते.
कारण हेच सर्वांना माहित आहे किंवा वाटतं की चरबीचे रुपांतर हे उर्जेतच होत असेल.

पण हे चुकीचे आहे. शरीरातील चरबीचे उर्जेत किंवा उष्मा ह्यात परिवर्तन होणे हे भौतिकशास्त्रीय उर्जा अक्षय्यतेच्या नियमांमध्ये बसत नाही.
ह्याचे बरोबर उत्तर म्हणजे चरबीचे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात रुपांतर होते.
२०१४ साली ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये छापून आलेल्या मिरमैन ह्यांच्या शोधानुसार वजन कमी करताना किंवा व्यायाम करत असताना शरीरातून कमी होणाऱ्या चरबीचे रुपांतर हे कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात होते.
ह्यात फुफ्फुसं सर्वात मोलाची कामगिरी बजावतात.

ह्या रिसर्चनुसार शरीरातून पाणी, घाम, मुत्र, श्वास तसेच तर द्रवपदार्थ ह्यांच्या रूपाने चरबी बाहेर निघते. मिरमैन ह्यांनी theconversation.com वर लिहिले होते की, जेव्हा तुम्ही १० किलो वजन कमी करता.
ह्याचा अर्थ ८.४ किलो कार्बन डायऑक्साईड च्या माध्यमातून तर उर्वरित १.६ किलो ही पाण्याच्या रुपात बाहेर निघते.
म्हणजेच आपण जे वजन कमी करतो त्याला आपण श्वासाद्वारे बाहेर सोडतो.

ज्या १५० विशेषज्ञांमध्ये हा सर्वे करण्यात आला त्यापैकी केवळ तिघांनीच ह्याचं बरोबर उत्तर दिलं. हा सर्वे ऑस्ट्रेलियाच्या विशेषज्ञांमध्ये करण्यात आला. मिरमैन ह्यांचा हा निष्कर्ष ह्या वस्तूस्थितीवर आधारित आहे की –
आपण जे काही खातो त्यातून जेवढा ऑक्सिजन घेतो त्याला देखील ह्यात समाविष्ट केले जावे.

म्हणजे जर आपल्या शरीरात ३.५ किलो जेवण आणि पाणी येत असेल तर त्यादरम्यान ५०० ग्राम ऑक्सिजन देखील येतो.
तेव्हा आपल्या शरीरातून काही एकक कार्बन डाय ओक्साईड बाहेर निघणे देखील गरजेचे असते. नाहीतर आपलं वजन वाढतं.
मग वजन न वाढू देण्याचा केवळ एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या शरीरातील स्नायूंच्या हालचाली वाढवायला हव्या.
ह्याशिवाय मिरमैन काही इतरही उपाय सांगतात ज्याद्वारे आपण आपलं वजन नियंत्रित ठेवू शकतो. आणि जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईडची निर्मिती करू शकतो.
झोपेत असताना एक व्यक्ती जवळपास २०० ग्राम कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो.
ह्याशिवाय फक्त उभं राहिल्याने, देखील आपलं मेटाबॉलिक स्तर वाढतो. फेरफटका मारायला जाणे, जेवण बनवणे आणि घरची साफसफाई करणे ह्याने देखील मेटाबॉलिक स्तर वाढतो.
म्हणजेच शक्य तेव्हढी हालचाल करा आणि नियंत्रणात खा, जो आहार तुमचं वजन कमी करण्यासाठी चांगला असेल त्याचे सेवन करा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.