'"प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट" - चार्ली चॅॅप्लीन जीवन प्रवास : भाग ३

“प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट” – चार्ली चॅॅप्लीन जीवन प्रवास : भाग ३

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – आदित्य कोरडे

===

THE KID  चे चित्रीकरण चालू असताना मिल्ग्रेड हरीसने चार्लीवर घटस्फोटाची केस दाखल केली. तिने चार्लीवर क्रूरपणे वागल्याचा, टाकून दिल्याचा आरोप केला होता.

तिच्या वकिलांनी चार्लीच्या सर्व संपत्ती मध्ये हक्क मागितला THE KID  चे वितरण व फायद्याचे हाक्क ह्यात सुद्धा हिस्सा मागण्यात आला. अर्थातच घटस्फोट मंजूर झाला. तिला संपत्तीत वाटा मिळालाच शिवाय १ लाख अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई / पोटगी ही द्यावी लागली.

THE KID १९२१ साली प्रदर्शित झाला आणि जगभरात त्याने धुमाकूळ घातला. हा चित्रपट त्याच्या महत्वाच्या चित्रपटात गणला जातो.

आजही तो अधून मधून  एखाद्या वाहिनीवर दाखवला जातो. बघितला जातो. ह्या चित्रपटात एक स्वप्न दृश्य आहे. ज्यात पंख लावलेले ANGELS  येऊन चार्ली आणि लहान मुलाशी खेळतात. त्यात बाल कलाकार असलेली लीटा ग्रे मुळे पुढे चार्लीच्या आयुष्यात मोठे वादळ येणार होते.

एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हा चित्रपट त्याने इतर सहकलाकारांबरोबर नुकत्याच स्थापन केलेल्या UNITED ARTISTS करता तयार केलेला नव्हता तर आधी ज्या कंपनीशी करार केला होता त्या NATIONAL FILMS  कंपनीसाठी केलेला होता.

अखेर NATIONAL FILMS बरोबरचा करार संपल्यावर १९२३ साली म्हणजे UNITED ARTISTS स्थापना होऊन ५ वर्षे झाल्यावर त्याने UNITED ARTISTSसाठी पहिला चित्रपट तयार केला. A Woman In Paris  नावाचा.

खरेतर हा एक उत्तम चित्रपटहोता पण हा त्याचा असा बहुधा पहिला चित्रपट होता कि जो त्याने लिहिला, बनवला आणि दिग्दर्शित केला होता पण त्यात काम केले नव्हते. आतापर्यंत चार्ली हा इतका प्रसिद्ध झालेला होता कि लोक फक्त त्याला पहायला चित्रपट गृहात जात. त्यामुळे लोकांचा बहुधा अपेक्षाभंग झाला असावा आणि हा चित्रपट साफ पडला.

१९२४ मध्ये त्याने त्याचा आजवरच्या सर्वश्रेष्ठ कलाकृतीपैकी एक असलेल्या चित्रपटावर काम सुरु केले. मागच्या चित्रपटाच्या अपयशातून धडा घेऊन आता त्याने परत ट्रम्पला पडद्यावर आणायचे ठरवले. चित्रपट होता THE GOLD RUSH. चार्लीने स्वत: अनेक वेळा अशी इच्छ व्यक्त केली आहे कि त्याची आठवण म्हणून जर फक्त एकाच चित्रपटाचे नाव घ्यायचे असे ठरले तर तो हा चित्रपट असायाला हवा.

सियेरा नेवाडा मध्ये बर्फाच्या वादळात अडकलेल्या लोकांच्या अनुभवावर लिहिलेले एक पुस्तक कि लेख वाचून त्याला ह्या चित्रपटाची कल्पना सुचली. ह्या चित्रपटात त्याला त्याच्या लाडक्या ट्रम्पचे सूत्र सापडले.

विनोद आणि दु:ख हे एकमेकापासून फार लांब असत नाहीत तर आयुष्य हे त्या दोघांनी हातात हात गुंफून केलेलं नृत्य आहे. हा लेख चार्लीवर असल्याने ह्या किंवा त्याच्या इतर चित्रपटावर जास्त लिहित नाही पण एक दोन गोष्टी मात्र संगीतल्याच पाहिजेत.

ह्याची नायिका आधी ठरली होती लीटा ग्रे , मगाशी वर उल्लेख केलेली THE KID मधली ANGEL  झालेली बाल कलाकार.

 

 

पण नेहमी प्रमाणे चार्ली ह्या १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडला , तिला दिवस गेले, त्याना मेक्सिकोत जाऊन गुपचूप लग्न करावे लागले. तिच्या गर्भारपणामुळे तिला अर्थात चित्रपट सोडावा लागला. तिच्या ऐवजी ते काम मग केले १८ वर्षीय जॉर्जिया हेल हिने.

ह्या चित्रपटात बर्फाच्या वादळात अडकलेल्या व भुकेमुळे हैराण झालेल्या ट्रम्पने बूट उकळून खाणे, किंवा तो आणि त्याचा पार्टनर ह्यांची कड्याच्या टोकावर अडकलेल्या लाकडाच्या खोपटातली धडपड.( हा प्रसंग सुद्धा अनेक ठिकाणी कॉपी झालाय) पण सगळ्यात गाजलेला म्हणजे त्याने पावाचे की बटाट्याचे तुकडे काट्याला खोचून केलेला ओशियाना रोल डान्स. खाली लिंक दिलेली आहे जरूर बघा..

 

 

ह्यानंतर त्याचा चित्रपट आला  THE CIRCUS  हा देखील प्रचंड गाजला. ह्या चित्रपटात  ट्रम्पच्या हातून विनोद होतो पण खरेतर त्याचा काही विनोद/थट्टा करायचा हेतू नसतो, पण घटनांवर त्याचा ताबा नसतो. अशी काहीशी ह्याची कथा होती.

ह्या काळात चार्लीच्या आयुष्यातही अशा घटना घडत होत्या ज्यावर त्याचा काहीच ताबा राहिला नव्हता. लीटा ग्रे बरोबर त्याचे संबंध नावापुरते राहिले होते. खरेतर तिला वयाच्या २० वर्ष पूर्ण व्हायच्या आत चार्लीच्या २ मुलांची आई व्हावे लागले होते आणि ह्या काळात कुठल्याही पत्नीला हवे असलेले नवऱ्याचे प्रेम, आधार सोबत तिला मिळत नव्हती.

त्याचे नेहमीच्या सवयी प्रमाणे जॉर्जिया हेल ह्या त्याच्या सध्याच्या नायिके बरोबर प्रेमप्रकरण चालू होते.

शिवाय मेरना केनेडी, (CIRCUSची नायिका), मेरियान डेविस (हॉलीवूडची तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्री) अशी  इतर अनेक प्रकरण होतीच. तो ह्या न त्या कारणाने लीटा ग्रे राहत असलेल्या घरापासून लांब राहत होता. मुलांपासूनही लांब राहत होता आणि तशीही त्याला रहायला अनेक घर आणि उंबरे उपलब्धही होते.

सप्टेंबर १९२६ मध्ये चार्लीच्या स्टुडियोला भयंकर आग लागली आणि तो पार जाळून खाक झाला, एवढ्यात अमेरिकन आयकर विभाग त्याच्या मागे हात धुवून लागला. त्याने १३.५ लाखाचा कर चुकवल्याचे त्यांच्या लक्षात आले होते आणि अशात लीटाने त्याच्यावर घटस्फोटाचा दावा दाखल केला.

त्यात त्याच्यावर, त्याच्या चारित्र्यावर गंभीर आरोप तर होतेच पण त्यात तथ्यही होते. शिवाय बायकोला आणि दोन लहान मुलाना टाकून दिल्याप्रमाणे वागणे, लक्ष न देणे , मानसिक छळ आणि पाणऊतारे करणे असेही आरोप होते.

लीटाने ३ लाख़ डॉलरची नुकसान भरपाई मागितली होती. ह्या सगळ्या खमंग प्रकरणाला हॉलीवूड आणि अमेरिकेत प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पडद्यावर साधाभोळा गरीब दिसणारा ट्रंप प्रत्यक्षात फार वेगळा होता तर. हे प्रतिमाभंजन त्याच्या फार जिव्हारी लागले आणि त्याला नैराश्याचा मोठा झटका आला.

अखेर त्याने ह्या सगळ्याच कटकटीना कंटाळून, आयकर विभागाला १० लाख डॉलर एकरकमी भरून ते प्रकरण मिटवले तसेच लीटाला सव्वासहा लाख अमेरिकन डॉलरची एकरकमी पोटगी दिली शिवाय मुलाना प्रत्येकी  एक एक लाख डॉलर दिले आणि कोर्ट कचेरीतून स्वत:ची सुटका करून घेतली.

तेव्हाच्या अमेरिकन वर्तमान पत्रात ह्या बातमीचे शीर्षक मोठे मार्मिक होते “तो कदाचित चांगला नवरा नसेलही पण तो एक लग्न करायच्या लायकीचा पुरुष नक्कीच आहे. ”

 

 

(He may not proved tobe a great husband, but he certainly is man worth marrying! -The Washington Post)

ह्यानंतर चार्लीने सिटी लाईट्स ह्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले. एका फुल विकणाऱ्या अंध मुलीला गरीब ट्रम्प तिची दृष्टी परत मिळवून देतो अशी कथा होती. १९३१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि  नेहमी प्रमाणे गाजला. चार्ली कसाही असो लोकांचे ट्रम्पवरचे प्रेम अजिबात कमी झाले नव्हते.

१९३२ साली तो २१ वर्षीय पॉलेट गोडार्ड ह्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. चार्ली प्रमाणेच ती एक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनच वर आलेली अभिनेत्री होती. स्वतंत्र, हुशार, सुंदर आणि कर्तबगार. तिचे आणि चार्लीचे कसे जुळले कुणास ठावूक पण ते टिकणार तर नव्हतेच. ती दोघे ८ वर्षे एकत्र होती शेवटची ४ वर्षे ती त्याची पत्नी होती पण पुढे अर्थातच त्यांचे फाटले. असो…

तिने आग्रह केल्यावरून त्याने आपल्या लीटा ग्रे पासून झालेल्या दोन मुलाना, चार्लस स्पेन्सर ज्युनिअर आणि सिडने चाप्लीन ह्याना आपल्याकडे रहायला बोलावले. सिडनेनेच नंतर सांगितल्या प्रमाणे चारली एक कडक, तुसडा, रागीट, अती शिस्तप्रिय, कमालीचा संतापी, मारकुटा असा बाप होता. त्याच्या असल्या वागण्याने मोठा मुलगा चार्लस स्पेन्सर हा कुमार वयातच व्यसनांच्या आहारी गेला, आणि चार्लीच्या मनातून उतरला.

१९३६ साली अमेरिका आर्थिक महामन्दीच्या विळख्यातून बाहेर पडत असताना चार्लीचा The Modern Times  हा चित्रपट आला. हा चित्रपट भांडवल शाही, प्रचंड आणि बिनडोक उत्पादन,गळेकापू स्पर्धा, माणसाच्या व्यक्तिगत गुणांचा होणारा ऱ्हास,बेकारी, बकाली, गुन्हेगारी  अशा अनेक पैलूंवर मोलाचे भाष्य करतो अर्थात मूकपट बनूनच.

हा वेळेपर्यंत बोलपट आलेले होते आणि चांगलेच रुलालेही होते पण चार्लीला चित्रपटातले संवाद आवडले नाहीत. त्याने चित्रपटात संवाद घ्यायचे नाकारले . मात्र त्याने पार्श्व संगीत मात्र ह्या चित्रपटात भरपूर वापरले. अर्थात बदलत्या काळासोबत त्याला जुळवून घ्यावे लागणार होते.

बोलपट आल्यावर मूकपट झपाट्याने मागे पडत चालले होते आणि त्याबरोबरच  स्वत:ला न बदलू शकणारे डग्लस फेअर बँक्स सारखे एके काळाचे मूकपटांचे शहेनशहाही …

ऑक्टो १९४० साली त्याचा पहिला बोलपट “The Great Dictator” आला. हा अर्थातच एक विडंबनपट होता-जर्मनीच्या हुकुमशहा हिटलरवर बेतलेला.

(हा चित्रपट तेव्हा जर्मनीत प्रदर्शित होउ शकला नाही… साहजिक आहे , हुकुमशहाना व्यंगात्मक टीका कशी सहन होणार – त्याना कसलीच टीका सहन होत नाही) ते १९४० साल होते.

हिटलरच्या क्रौर्याची खरी कहाणी जगाला कळायला अजून ५-६ वर्षे वेळ होता अन्यथा चार्लीतारी असा विनोदी चित्रपट त्याच्यावर बनवू शकला असता कि नाही कुणास ठावूक! पण आज ६७ वर्षानी देखील हा चित्रपट काल बाह्य वाटत नाही हे विशेष.

 

great-dectator-inmarathi
vulture.com

 

हिटलर आणि चार्लीच्या व्यक्तिमत्वात काही समानता नि विरोधाभास दोन्ही होते. हिटलर आणि चार्ली दोघे एप्रिल १८८९ साली जन्मले चार्ली १६ तारखेला तर हिटलर २० तारखेला. दोघेही व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत संशयी हेकेखोर आणि हुकुमशाही वृत्तीचे होते, दोघेही प्रतिकूल परिस्थितून स्वत:च्या कर्तृत्वावर मोठे झालेले.

चार्लीचा ट्रम्प आणि हिटलर दोघांच्या छोट्या आखूड मिशा जगात प्रसिद्ध. तशा मिशा म्हटल्या कि फक्त हे दोघेच समोर उभे राहतात पण एक आबालवृद्धांचा अत्यंत आवडता तर दुसरा कमालीचा तिरस्कृत. पण दारू आणि स्त्रिया ह्या बाबत मात्र दोघांचेही स्वभाव पूर्णपणे भिन्न… असो.

पूर्वीपासूनच चार्ली काहीसा कम्युनिस्ट विचारधारेकडे आकर्षित झालेला होता आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रशिया दोस्तांच्या बाजूने (नाईलाजाने का होईना) युद्धात उतरला होता. त्यामुळे ह्या चित्रपटाच्या निमित्ताने  अनेक ठिकाणी चार्ली गेला असताना त्याने रशियन क्रांतीचे, समाजवादी विचारधारेचे खूप कौतुकही केले होते.

हे सगळे त्याच्या नंतर अंगलट येणार होते आणि कारण ठरणार होती जोन बेरी नावाची एक दुय्यम दर्जाची अभिनेत्री.

ही बाई सुंदर होती आणि एका अशाच टाईमपास म्हणून खेळल्या गेलेल्या टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने ती चार्लीला भेटली. तिने लवकरच आपल्या सौंदर्यपाशात चार्लीला ओढले. त्याने तिला पुढील चित्रपटासाठी करारबद्ध ही केले. पण झाले काय! कि बेरी बाई जरा जास्तच उतावीळ होत्या तर चार्ली आधीच्या दोन अनुभवांनी सावध त्यामुळे तो आपण कुठे अडकणार नाही ह्याचे काळजी घेत होता.

बेरी बाईंचा संयम संपत चालला, तिने नैराश्यातून किंवा अधीर होऊन रात्री बेरात्री चार्लीच्या घरात घुसायचा प्रयत्न केला आणि चौकीदारानी अटकाव करताच रस्त्यावर गोंधळ घातला. झाल्या प्रकाराने चार्ली लगेच सावध झाला आणि त्याने तिला करारातून मोकळे करून तिची सगळी रक्कम देऊन टाकली आणि बाय बाय केले.

===

क्रमशः 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?