' प्रेमाची परिभाषा नव्याने शिकवणारा ‘सिड’ : अक्षय खन्ना – InMarathi

प्रेमाची परिभाषा नव्याने शिकवणारा ‘सिड’ : अक्षय खन्ना

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

====

दिल चाहता हैं, हा आता एक कल्ट क्लासिक झाला आहे, केवळ तरुणांचाच नव्हे तर एकंदर सर्व प्रेक्षकवर्गाचा. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच फरहान अख्तरने तीन मित्रांच्या भोवती फिरणारी एक कथा गुंफली आणि एका ट्रेंडसेंटर सिनेमाची नांदी झाली. नेहमीच्या पठडीतल्या, टाईपकास्ट झालेल्या त्याच त्या पद्धतींच्या सिनेमांना छेद देत फरहानने पडद्यावर साकारलेली कथा पाहताना, तो लंबी रेसचा घोडा असल्याचं पहिल्याच चित्रपटात पटवून दिलं.

तीन मित्रांची केमिस्ट्री, स्वभाव आणि आवडीनिवडी वेगळ्या असूनही एकमेकांसोबतची बॉंडिंग, एकत्र केलेली आऊटिंग, धमाल, वैयक्तिक मतभेद, इमोशनल अटॅचमेंट, ड्रामा आणि सरतेशेवटी प्रत्येकाला आपापल्या परीने झालेली खऱ्या प्रेमाची आणि मैत्रीची ओळख.

या सर्व प्रवासात आपण त्यांच्या सोबत हसतो, रडतो, इमोशनली एटॅच होतो आणि त्यांच्यातलेच एक होऊन जातो.

 

dil-chahata-hai-inmarathi
data1.ibtimes.co.in

परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालंच तर आमिरने साकारलेला ‘आकाश’ हा आऊटस्टँडिंग होता यात शंकाच नाही; तितकाच सैफचा इंडस्ट्रीत रिकार्नेशन ठरावा असा समीरही हलकाफूलका आणि नर्मविनोदी होता. पण खऱ्या अर्थाने अलगदपणे मनात घर करून गेला तो अक्षय खन्नाचा ‘सिड’ अर्थात ‘सिद्धार्थ सिन्हा’.

मधला एक पॅच सोडला तर दोन्ही बाजूने आत गेलेलं कपाळ, डोक्यावर बारीकसे केस, मान तिरकी करत आणि भुवयांशी खेळ करणारे बोलके डोळे मिश्किलपणे छोटे करत, ओठांच्या टिपिकल तरीही जस्टीफाय व्हाव्यात अश्या प्रसंगानुरूप हालचाली करत फक्त ऐकू यावं एवढयाश्या हळुवार आवाजात गालातल्या गालात किंचितसं हसत संवादफेक करण्याची त्याची शैली, त्याच्या शांत आणि संयत कॅरॅक्टरला परफेक्ट सूट झाली.

चित्रपटाची सुरुवातच होते ती सिड ताराला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो इथून. ऍडमिट केलेल्या ताराला काचेच्या विंडोमधून पाहणारा, डॉक्टरशी बोलताना रडवेला झालेला सिड पहिल्या काही मिनिटातच आपली छाप पाडायला सुरुवात करतो आणि हळू हळू अख्खा चित्रपट टप्प्याटप्याने फ्लॅशबॅकमध्ये आपल्यासमोर येतो.

सिड आणि तारा जैस्वाल यांची योगायोगाने झालेली पहिली भेट, त्यांच्यातला ‘पेंटिंग’ हा समान दुवा, वरचेवर एकमेकांना भेटत राहणं आणि दोघांत अलवारपणे तयार झालेले ऋणानुबंध, हे फार हळुवारपणे येतं चित्रपटात.

 

dil-chahta-hai-story-inmarathi
www.indiatoday.in

तिच्यावर एकतर्फी जडत गेलेलं प्रेम, ‘आय थिंक आय एम इन लव’ असं म्हणत, मित्र समजून घेतील म्हणून त्यांच्यासमोर दिलेली प्रेमाची कबुली, त्याचं निखळ प्रेम चेष्टेचा विषय झाल्यावर प्रत्युत्तरादाखल आकाशला दिलेली उत्स्फूर्त रिऍक्शन, ‘प्यार सोच समझकर नही किया जाता, बस हो जाता हैं’ हे समजावताना त्याच्या नजरेत दिसणारी अस्वस्थता, आईला पोटतिडिकीने ‘तिला यातलं काहीही माहीत नाहीये’ हे सांगतानाची त्याची झालेली घालमेल, ह्या सर्व घटना पूर्ण सिनेमाचे त्याच्या निस्वार्थ प्रेमालाच अधोरेखीत करत राहतात.

समोरची व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नसताना आपण तिच्यावर विनाशर्त, निस्वार्थ प्रेम करत राहणं, तिला हवं तेव्हा खंबीरपणे तिच्यासोबत उभं राहणं, कसलीही अपेक्षा न करता, यातच खऱ्या प्रेमाचं सार आहे.

ताराची ओळख होण्याआधी एक सिन आहे. आकाशवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या दिपाला समजावताना सिड म्हणतो, ‘रेत को जितना पकडनेकीं कोशिश करोगी, उतना वो फिसलती जायेगी’. शोकांतिका ही की अश्याच एकतर्फी प्रेमात स्वतः लाही जळावं लागणार आहे, याची त्याला त्यावेळी यत्किंचितही कल्पना नसते.

कट टू, तारा त्याच्याशी बोलण्यात गुंग असताना, तो अचानक अनपेक्षितपणे ‘मैं आपकी तसवीर बनाना चाहता हू’ म्हणतो, तो सिन आठवा. तिने होकार दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अभूतपूर्व आहे.

ज्या आवेशाने तो धावत पळत घरी जाऊन सर्व पेंटिंगचे सामान घेऊन तिच्या दारात उभा राहतो, त्यात त्याच्या प्रेमाची निरागसता आणि अगतिकता दिसून येते. अर्थात, खरी पेंटिंग घडायला वेगळा दिवस उजडावा लागतो. त्यातही बॅगराऊंडला वाजत राहणारं ‘कैसी हैं ये रुत’ चित्राइतकंच इंद्रधनुषी वाटत राहतं.

 

Horizontal-Poster-inmarathi
readersride.com

जेवढ्या वेळेस हा चित्रपट परत पाहिला जातो, सिड अधिकाधिक गडद होत जातो. दर वेळी नव्याने उमजत जातो, आधीपेक्षा जास्त प्रगल्भ वाटत राहतो आणि आपण नकळत त्याला स्वतःशी रिलेट करू लागतो.

एकाकी, अलिप्त राहणारा, कमी-हवं तेवढं, गरज नसेल तर न बोलणारा सिड खूपच जवळचा वाटतो. ताराही जेव्हा त्याच्या पेंटिंग्स पाहते, तिच्या नजरेतूनही ते सुटत नाही. ‘तुम्हारे ख्वाब, तुम्हारे सपने, तुम किसींसे बाटते नही, जो लोग तुम्हे जानते हैं वो भी तुम्हे जानते नही’, हे ती त्याला आवर्जून सांगते आणि त्याच्या नजरेतूनही तिच्या निरीक्षणाला होकार मिळतो.

अजून एक सीन, जिथे आईने फॅमिली फंक्शनला सोबत चल म्हटल्यावर, टिपिकल ‘माँ मैं वहा बहोत बोर होता हू’ ऐकलं की आपण आपलीच प्रतिकृती पाहत असल्याचा भास होतो मला.

तो मोजकेच बोललाय पूर्ण सिनेमात, कुठेही ओढून ताणून विनोद नाही, जिथे गरज नाही तिथे डायलॉग नाही, बऱ्याच ठिकाणी स्माईल, एक्सप्रेशन्स किंवा फक्त हावभाव, बस. वाढीव काहीच नाही. सो डिसेंटली वेल क्राफ्टेड कॅरॅक्टर!

अखेरीस कोणत्याही परतफेडीच्या अपेक्षेशिवाय आयुष्याशी झगडत असणाऱ्या ताराच्या अखेरच्या श्वासात तिच्याजवळ खंबीरपणे उभा राहणारा, डॉक्टरने ती आता वाचणार नाहीये असं सांगितल्यावर हरलेला, रडवेला, अस्वस्थ झालेला सिड प्रेमाची परिभाषा नव्याने शिकवतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?