' अहिल्याची “शिळा” : रूपकांचा योग्य अर्थ विषद करणारी अहिल्या-रामाची आगळीवेगळी कथा! – InMarathi

अहिल्याची “शिळा” : रूपकांचा योग्य अर्थ विषद करणारी अहिल्या-रामाची आगळीवेगळी कथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – तुषार दामगुडे 

===

“टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. तुझ्या मनात देखिल वासनेचं, विकारांच वादळ थैमान घालत असेल ज्याची परिणीती शेवटी तुला अपेक्षित अशीच झाली. तुझा हा अपराध अक्षम्य आहे. एका व्यभीचारी, अनाचारी, स्त्रीचा भ्रतार म्हणून सगळं जग माझ्यावर हसतंय.

माझ्या गरीब परिस्थितीचा तुला एवढाच कंटाळा आला होता तर विभक्त होण्याचा मार्ग तुझ्यासमोर खुला होता. परंतु तसे न करता श्रीमंतीची भूल पडून एखाद्या ढालगज स्त्री प्रमाणे त्या इंद्राची शय्या सजवताना तुला लज्जा कशी वाटली नाही?

अहल्ये तुझ्या चेहऱ्यावर या गौतमाने तीरस्काराने थुंकावे इतकीही तुझी पात्रता नाही. अग्नीच्या साक्षीने सात जन्म साथसंगत करण्याची पवित्र शपथ आत्ता या क्षणी मी मोडत आहे. अहल्ये मी तुझा त्याग करतोय …”

एखाद्या तप्त शिसाप्रमाणे ते शब्द माझ्या कानात शिरले. ते शब्द ऐकून माझं काळीज दुःख, भिती, अश्रू आणि तीव्र संताप या सगळ्या भावनांनी भरून आले. ज्याच्या खांद्यावर मान टाकून आणि हातात हात देऊन मी आजपर्यंत निर्धास्तपणे निद्रा घेतली, माझं सगळं प्रेम अर्पण केलं, माझा सगळा विश्वास ज्याच्या चरणांवर वाहून टाकला तो गौतम…

माझा गौतम समाजाने उठवलेल्या वावड्या, निर्लज्जपणे रंगवलेल्या खोट्या गावगप्पा यांना बळी पडून माझी निर्भत्सना करत होता.

एखाद्या कसायाने निष्पाप कोकराच्या गळ्यावर निर्ममपणे सुरी चालवावी तसे गौतमचे शब्द माझ्या काळजावर आघात करुन गेले.

 

Ahilya-inmarathi

 

“तो” क्षण निर्णायक होता. आजपर्यंत हसणाऱ्या खेळणाऱ्या मनमिळाऊपणे सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या, गायन आणि नृत्याची मनस्वी आवड असणाऱ्या व…अत्यंत हळव्या मनाच्या अहल्येच्या सर्व भावना मृत झाल्या.

मला कसलाही शोक करावा वाटत नव्हता. मला गौतमाला कसलाही खुलासा द्यावा वाटत नव्हता. माझे अश्रू त्या क्षणी गोठून गेले होते. माझं हास्य त्याच क्षणी मावळून गेलं होतं. आता मला कुठलीच भावना स्पर्श करत नव्हती! मी अत्यंत निर्विकार झाले होते.

गौतमाच्या त्या शब्दांनी, त्या मानखंडनेने, त्या अविश्वासाने माझ्या रसरसत्या मनाचा आणि खुद्द माझाच “दगड ” झाला.

माझा काय अपराध होता? मी सुंदर होते हा, की मी मनमोकळ्या स्वभावाची होते हा?

मला नटायला, गायला, नृत्य करायला आवडत होतं. मला जीवन आनंदाने व्यतीत करायला आवडत होतं. माझं गौतमवर निरतीशय , निर्व्याज प्रेम होतं. तो आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेल पण तो सदाचरणी व पापभिरु होता. अगदीच चंगळ नसेल पण त्याने मला कधी काही कमी देखिल पडू दिलं नव्हतं. आमचं सगळं सुरळीत चाललं होतं.

पण आयुष्याचा प्रवास आपल्या अपेक्षांनुसार सरळसोटपणे फक्त हमरस्त्यांनीच होत नाही. त्या मध्ये अनपेक्षित वळणं आणि खाचखळगे, काटेकूटे दबा धरून बसलेली असतात. आपली पाऊले आणि हृदय रक्तबंबाळ करण्यासाठी.

तो नीच असाच एक दुर्दैवी वावटळ बनून माझ्या आयुष्यात आला. तोच, आमचा नगराधिपती, आमचा राजा ” देवराज ” !

हे घराणे स्वतःला “इंद्र” म्हणजेच स्वर्गाचा राजा ही पदवी लावून घेतं. त्यामुळे त्यांना इंद्रच म्हणत. मला वाटतं कुठल्यातरी नगरोत्सवात मी त्याच्या नजरेस पहिल्यांदा पडले. त्याच्या नजरेला नजर भिडताच त्या नजरेतून ओसंडून वाहणारा वासनेचा विखार माझ्या शरीराला स्पर्श करुन गेला. घृणेने मी माझी नजर फिरवली व तिथून काढता पाय घेतला.

त्यानंतर त्या निचाने पाताळयंत्रीपणे मला वश करण्यासाठी हरतर्हेने प्रयत्न केला. आपले हस्तक वापरून वस्त्र अलंकार रत्नं यांची प्रलोभनं दाखवली. परंतु त्या नीचाला कधी प्रेमाचा स्पर्श झालाच नसावा अन्यथा या भौतिक गोष्टींनी एका स्त्री चे मन जिंकण्याचा निर्ल्लज प्रयत्न त्याने केलाच नसता. मी त्याचा प्रत्येक प्रयत्न कठोर शब्दांत धुडकावून लावला.

आणि एक दिवस..गौतम कामा निमित्त काही बाहेर गावी गेले होते. दैनंदिन कामं उरकुन रात्र समयी मी नुकतीच पडली असेल नसेल तोच दरवाजावर थाप पडली. मी थोडी सावध झाले, इतक्या रात्री कोण आले असावे बरे? भितीने माझी छाती भरून आली. कारण आमचे घर तसे थोडे आडबाजूलाच होते.

” कोण ?” मी विचारले

एक नाही की दोन नाही… पुन्हा दरवाजावर थाप पडली…

“कोण आहे? बोलत का नाही?” मी पुन्हा विचारले…

“अग अहल्ये मी… मी गौतम. आता दरवाजा उघडशील की मला बाहेरच तिष्ठत ठेवशील ?” बाहेरुन आवाज आला.

मी आनंदाने हरखले. भिती कुठल्या कुठे पळाली. कारण हा आवाज माझ्या गौतमचाच होता. तो आवाज ओळखण्यात माझी चुक होणारच नव्हती. मी दरवाजा उघडला. आणि…!

चेहऱ्यावर अत्यंत निर्लज्ज व किळसवाणे हास्य असलेला देवराज “इंद्र” घरात प्रवेश करता झाला. सगळं काही समजायला काही क्षण जावे लागले. परंतु ते लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. त्याच्या शारीरीक ताकदीपुढे माझ्या शरीराचा व भावनांचा अगदी चोळामोळा झाला.

ती संपूर्ण रात्र त्याने माझ्या शरीराचा एखाद्या पशु प्रमाणे उपभोग घेतला. माझे संपूर्ण शरीर त्याच्या चाव्यांनी आणि ओरखड्यांनी रक्तबंबाळ झाले. परंतु माझे मन त्यापेक्षा जास्त रक्तबंबाळ झाले होते.

स्वतःचा कार्यभाग साधल्यावर तो राक्षस मुद्दाम सकाळी सकाळी दिवसाढवळ्या माझ्या घरातून बाहेर पडला. ज्यांनी ज्यांनी त्याला माझ्या घरातून सुहास्य वदनाने व अस्ताव्यस्त कपड्यात बाहेर पडलेले पाहिले त्यांना चर्चा करण्यासाठी एक विषय मिळाला. ही घटना कुजबुजीच्या स्वरूपात संपूर्ण नगरात पसरली व ……. !

कितीतरी वर्ष उलटून गेली असावीत. माझ्या आयुष्यात सोबती म्हणून आता फक्त ” एकांत व अंधार ” उरला होता. मी संपूर्ण जगाशी संपर्क तोडून टाकला होता. माझ्या केसांत चंदेरी झाक दिसायला लागली होती. बाह्य जग मला विसरून गेले होते आणि… गौतम देखील मला विसरून गेला होता.

मी माझ्याच परिघात एका शिळे प्रमाणे पडून होते.

============

अयोध्या कित्येक योजनं मागे टाकून मी लक्ष्मणा बरोबर या नगरीत प्रवेश केला होता. मार्गदर्शन करण्यासाठी आचार्य आमच्या बरोबर होतेच. या संपूर्ण प्रवासाचा हेतूच आम्ही आजवर गुरूकूलात शिकलेल्या पुस्तकी ज्ञानाखेरीज प्रत्यक्ष जिवनातील ज्ञानाचे अर्जन करणे हा होता. या प्रवासात नजरेस दिसणाऱ्या घटना, स्थळं, निसर्ग, प्राणी, माणसं यांचा अभ्यास करुन त्यामधुन धडे घेणे, आत्मचिंतन करणे !

“निसर्ग मुक्त हस्ताने आपली संपत्ती उधळत होता. संकटात असणारी एकेक स्थळं आम्ही दोघं बंधु पराक्रमाच्या बळावर सुरक्षित करत चाललो होतो, प्राणी त्यांच्या स्वभावाला अनुसरून वागत होते.

माणसं… काही माणसं मात्र शापग्रस्त झाल्या प्रमाणे वर्तन करत होती. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना देखिल दुषित करत होती. हि साखळी हळुहळु वाढत गेली तर समाजाच्या एकूण स्वास्थालाच धोका होता. अयोध्ये सारख्या मोठ्या साम्राज्याचा ज्येष्ठ राजकुमार आणि पिताश्रींची आज्ञा झाली तर कदाचीत उद्याचा ” राजा ” मी श्रीराम !

मी कसल्या लोकांचे एक राजा म्हणून प्रतिनीधित्व करणार होतो? वासना, अहंकार, कपट, लोभ, मत्सर अशा कित्येक विकारांनी ग्रस्त तामसी वाममार्गी लोकसमुहाचा कि प्रेम, सदाचार, आत्मीयता , कर्तव्यतत्पर, सज्जन अशा सदगुणांनी युक्त लोकसमुहाचा?

तो आदर्श लोकसमुह निर्माण करण्यासाठी एका राजाला काय करावे लागेल ?

अर्थात एका आदर्श लोकसमुहाची निर्मिती करण्यासाठी त्या समुहाचे नेतृत्व करणाऱ्या राजाला आदर्श जीवन जगून लोकांपुढे उदाहरण ठेवावे लागेल. श्रीरामा…मार्ग कठीण आहे…!

कित्येक ठिकाणी मोह, लोभ, विकार तुला पथभ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतील. कित्येक ठिकाणी तुला, तुझ्या आप्तांना अग्नीपरीक्षा द्यावी लागेल…पुन्हा विचार कर !

हरकत नाही…! मी असं जीवन जगेन की हजारो वर्षे उलटून गेली तरी लोक माझे नाव, माझा जीवनपट लक्षात ठेवतील.

जेव्हा जेव्हा ते विकारांना बळी पडून असुर होऊ पाहतील तेव्हा तेव्हा ते ” श्रीराम ” म्हणून त्या असुर शक्तींवर त्याग, बंधुभाव, प्रेम , सत्य या शस्त्रांनी विजय मिळवतील…

माझे स्वतःशीच कितीतरी वेळ चाललेले आत्मचिंतन संपले.

 

shri ram inmarathi

 

आज नेहमीप्रमाणे नगरी मध्ये भिक्षा मागण्यासाठी खांद्याला झोळी अडकवून मी बाहेर पडलो. मी एका मोठ्या साम्राज्याचा राजकुमार असलो, या नगरीत नागरिकांकडून आमचे जंगी स्वागत झाले असले तरी आम्ही नियमांनी बद्ध होतो. अद्याप आम्ही आचार्यांचे अनुग्रहीत शिष्य होतो. शिष्याने आपले कर्तव्य विनातक्रार पार पाडलेच पाहिजे.

चार घरांमध्ये भिक्षा मागून झाल्यावर मी आडवळणावर असलेल्या त्या कुटीवजा घरावर थाप मारली. दार उघडायला अंमळ उशीरच झाला…चंदेरी केसांची महिरप डोक्यावर असलेल्या एका सुंदर सात्विक चेहऱ्याने दार उघडले.

“माई, भिक्षांदेहि!” मी साद घातली

“उम्म्म”

“माई, भिक्षांदेहि!” मी पुन्हा साद घातली

“रस्त्यावर फिरणाऱ्या फुकटखाऊ गोसवड्याला या घरातून फुटका दाणाही मिळणार नाही, चल चालता हो!”

त्या क्षणापुर्वी सात्विक दिसणाऱ्या डोळ्यांतून अग्नीचा वर्षाव माझ्यावर झाला. आणि दार धाडकन लोटले गेले. मी स्तिमीत होऊन जागेवरच उभा राहिलो. आमच्या निवासस्थानी परतून जेवायला बसलो तरी ते सात्विक डोळे माझ्या नजरेपुढून हलले नाहीत. तो दिवस एक कडवट चव मनात ठेऊन निघून गेला.

पुन्हा दुसऱ्या दिवशी मी “ते” दार वाजवले. दार उघडले गेले नाही. त्या बंद दारा बाहेरुनच मी

“माई , भिक्षांदेहि!” अशी साद घातली

दार उघडले गेले नाही.

“माई, भिक्षांदेहि!”

तोच शुन्य प्रतिसाद. निराश मनाने मी तिथून परतलो. जेवण उरकल्यावर मी लक्ष्मणाला जवळ बोलवले व घडला प्रकार सांगितला. दारी आलेल्या याचकाला विन्मुख पाठवण्या इतपत विपरीत काळ अद्याप या भुमीत आला नव्हता.

“त्या” स्त्री विषयी नगरातून माहिती काढण्याची आज्ञा मी लक्ष्मणाला केली. लक्ष्मण आपले काम चोख बजावेल याची मला खात्री होती – कारण माझ्या त्या विश्वासाचेच दुसरे नाव “लक्ष्मण” होते.

दोन दिवस उलटून गेल्यावर लक्ष्मण मला एकांतात भेटला. त्या स्त्री चे नाव अहल्या आहे हे तेव्हा मला कळले. पुढे तीच्या जीवनात घडलेल्या घटनांचा क्रम ऐकल्यावर मनात एकच कल्लोळ माजला.

एका धर्मच्युत व अनाचारी पुरुषाच्या वासनेचा बळी ठरलेल्या त्या निष्पाप स्त्रीचे संपूर्ण जीवन म्हणजे एक दुःखद जीवनपट होता. हा माझा समाज कुणाच्या पापाची फळं कुणाला भोगायला लावत होता?

जे घडलं त्यात तीची काहीही चुक नसताना तीला कुत्सीत टोमणे मारणाऱ्यांची जीव्हा कुणाला हासडावीशी वाटली नाही का? तीच्या चारित्र्यावर बोट उचलणाऱ्यांची ती बोटं कुणाला कलम करावीशी वाटली नाही का?

कुणालाही उत्तरदायी नसणाऱ्या गौतमाने गावगप्पांना बळी पडून अहल्येचा त्याग केला तेव्हा त्याची पाऊले कुणाला छाटावी वाटली नाही का? आणि पुत्रवत असलेल्या प्रजेवर विकृत अत्याचार करणाऱ्या “देवराज” इंद्राची गर्दन कुणाला धडावेगळी करावी वाटली नाही का?

संताप, दुःख, सहानुभूतीने माझे मन व्याकुळ झाले. काहीतरी करण्याची गरज होती…ते नेमकं काय…

मी लक्ष्मणाला आवश्यक त्या सुचना दिल्या. त्यानुसार त्या नगरातील प्रतिष्ठीत नागरिकांची बैठक घेतली. त्यांच्या बरोबर कित्येक तास चर्चा केली. व त्यांचे समाधान झाल्यावर मी त्यांना निरोप दिला.

ठरलेल्या दिवशी माझ्या आवाहनानुसार जमलेल्या नागरीकांचा लवाजमा घेऊन मी “त्या” दरवाजा वर थाप मारली.

“कोण?” आतून आवाज आला

“मी अयोध्यापती राजा दशरथ, प्रातःस्मरणीय राजमाता कौसल्या, कैकयी, सुमित्रा यांचा ज्येष्ठ पुत्र, भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांचा ज्येष्ठ बंधु व महर्षि वसिष्ठ यांचा शिष्य श्रीराम! माते दार उघडा.”

“माते…? मी कुणाची माता नाही… तुम्ही निघून जा…”

“माते…माता अहल्या… हा तुझा पुत्र श्रीराम तुझ्या दाराशी आला आहे. तु दार उघडे पर्यंत आता तो येथून जाणार नाही माते. आणि दिलेला शब्द मोडण्याची रघुच्या कुळाची परंपरा नाही.”

दार हळूच किलकीले झाले. त्या दारातून ती सोनेरी केसांची महिरप बाहेर आली.

“मला सहानुभूती दाखवायला आला आहेस? मला नकोय तुझी आणि तुमच्या सगळ्यांची सहानुभूती, कुणाच्या सहानुभूती वर जगण्यापेक्षा ही अहल्या शिळा बनुन युगानुयुगं इथे पडुन राहिन. स्वतःचा आत्मघात करेन.”

“माते… तु माझी… या श्रीरामाची माता आहेस. आणि तुझ्या पुत्राच्या हातात “वैष्णवत” तळपत आहे तोवर तुझ्यावर सहानुभूती दाखवण्याची वेळ किंवा तुझा अपमान करण्याची हिंमत या त्रिखंडात कुणाची नाही. आजवर तुझी झाली तेवढी वंचना पुरे…”

“बस… पुरे झाला तुझा शब्दच्छल. तुला कल्पना नसेल पण हे तेच लोक आहेत ज्यांनी काहीही चुक नसताना एका स्त्री ला अपमानास्पद वागवलं, हा तोच समाज आहे ज्यांनी निर्लज्जपणे एखादे हाडूक चघळावे तसे माझे चारित्र्यहनन चघळले.

हे तेच नागरिक आहेत ज्यांनी स्वतःच्या मनोरंजनासाठी माझी पदोपदी निर्भत्सना केली, माझे तारुण्य भस्मसात केले. माझ्या कोमल भावना निष्पर्ण केल्या…आता आणखी काय हवे आहे तुम्हाला?” अत्यंत निर्विकारपणे एखादा दगड तडतडावा तसे शब्द बाहेर पडले.

मी पाऊल पुढे टाकले….आणखी पुढे…अगदी तिच्या जवळ…मी तीचे हात हातात घेतले…थेट तीच्या डोळ्यात डोळे घातले आणि…

“माते… इकडे माझ्या डोळ्यात बघ, माझ्या हातांचा स्पर्श अनुभव आणि मला सांग या डोळ्यांत आणि या स्पर्शात तुला किंचीत देखिल किल्मिष जाणवते आहे काय? मी तुला माते अशी हाक मारतो तेव्हा तुला त्यातील स्नीग्धता जाणवत नाही काय?

माते… मानवाच्या उत्पत्ती पासुनच तो निरनिराळ्या विकारांनी ग्रस्त आहे. कमी अधिक प्रमाणात ते विकार प्रत्येक व्यक्ती मध्ये वास करतात. त्या विकारांना बळी पडून माणसं कित्येकदा पथभ्रष्ट होतात. चुकतात…साफ चुकतात!

हा संपूर्ण समाज अशा कमी अधिक प्रमाणात विकारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींचाच समुह आहे आणि असेल. पण ते थोडेथोडके लोक म्हणजे संपूर्ण समाज असं म्हणणे चुक ठरणार नाही काय? आयुष्यात कधीतरी विकारग्रस्त होऊन पथभ्रष्ट झालेल्या परंतु पश्चातापाच्या अग्नीत आपल्या चुका दग्ध करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना माफ करणे आपले कर्तव्य नाही काय?

आजवर तुझ्यावर अन्याय झाला, तुझी अवहेलना झाली, इतकेच काय तुला एखाद्या दगडा प्रमाणे निष्प्राण समजून विस्मृतीत टाकून देण्याची अक्षम्य चुक देखिल घडली. परंतु आता हा सगळा जनसमुह आपल्या पापाचे क्षालन करू इच्छितो.

मी श्रीराम या जनसमुहाचा प्रतिनीधी म्हणून त्या पापाची कबूली देतो… त्या पापाबद्दल आम्ही सगळे करू तेवढा पश्चाताप कमीच असेल… पण माते… हा श्रीराम… तुझा पुत्र श्रीराम… तुझ्या दयेची याचना करत आहे. मला, आम्हाला माफ करून तु आता हे मौनव्रत व एकांत सोडावा अशी विनंती करत आहे.

तुझ्या लेकराला माफ करशील का माते ? करशील ना माफ माते …?”

कितीतरी वेळ ते शब्द हवेत कंपन निर्माण करत होते. एका पवित्र हृदयातून निघालेले ते पवित्र शब्द आसमंतात आपला ठसा उमटवत होते. त्या धनुष्याकृती नजरेतील पश्चाताप व व्याकुळता त्या संवेदनशील सात्विक डोळ्यांनी बरोबर टिपली होती. एका हृदयातून निघालेले ते स्नीग्ध शब्द दुसऱ्या हृदयापर्यंत पोहचले होते.

बंद करून टाकलेले मनाचे कवाड त्या प्रामाणिकपणे उच्चारलेल्या शब्दांनी सताड उघडले होते. दुर कुठेतरी हलका पाऊस पडला असावा कारण वाहत येणारा वारा मातीचा मृदगंध त्या आसमंतात पसरवत होता. त्या जलवर्षावाने निष्पर्ण झाडांना पालवी नव्याने फुटणार होती.

त्या सात्विक डोळ्यांना लागलेली अश्रुची धार मिठीत घेतलेल्या श्रीरामाची पाठ ओली करत होती. पण कोणी तीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही कारण कित्येक वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर…

शिळा जिवंत झाली होती ! अहल्या जिवंत झाली होती !

“श्रीरामार्पणमस्तु”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?