'तुमचं सरकार "खऱ्या" मुद्द्यांवर काम करत आहे का हो?

तुमचं सरकार “खऱ्या” मुद्द्यांवर काम करत आहे का हो?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

एकीकडे मोदी समर्थकांचे मुद्दे आहेत. दुसरीकडे मोदी विरोधकांचे मुद्दे आहेत. आणि तिसरीकडे – खरे महत्वाचे मुद्दे आहेत.

कोणते मुद्दे?

फेसबुकवर कोणत्याही राजकीय अभिनिवेशापासून मुक्त, फक्त महत्वाच्या – आणि ते ही स्वतःच्या व्यावसायिक अनुभवातून जाणवलेल्या – मुद्द्यांवर अतिशय सुंदर लिखाण करणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे राजेश मंडलिक सर.

राजेश सरांची ही पोस्ट लक्षपूर्वक वाचा :

===

एक इनोव्हेशन इंडेक्स म्हणून प्रकार असतो. ब्लूमबर्ग नावाची संस्था आहे, ज्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला हा रिपोर्ट सबमिट केला आहे. त्या इंडेक्स मध्ये खालील देशाचा समावेश आहे. आणि तो का, याचं कारण पण दिलं आहे.

१. साऊथ कोरिया: साऊथ कोरियाच्या पर कॅपिटा उत्पादन क्षमतेसाठी त्यांना पहिला क्रमांक मिळाला आहे.

२. स्वीडन: स्वीडन मध्ये ग्रॅज्युएट होणाऱ्या लोकांची संख्या जगात सर्वाधिक आहे. (पर कॅपिटा)

३. सिंगापुर: त्यांची शिक्षण पद्धती ही जगात वाखाणली जात आहे.

४. जर्मनी: हाय टेक स्टार्ट अप चं सध्या जर्मनी मध्ये उधाण आलं आहे.

५. स्वित्झर्लंड: मूलभूत संशोधनाच्या जगातल्या सर्वोत्तम प्रयोगशाळा या देशात आहेत.

 

lab-inmarathi
s-ge.com

६. जपान: मिड साईझ कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर इनोव्हेशन, पर्यायाने पेटंट्स मिळवत आहेत.

७. फिनलँड: या देशाच्या सरकारने ज्ञानाधिष्ठित उपक्रमांची विधेयकं पास केली आहेत.

८. डेन्मार्क: रिनेव्हेबल एनर्जी (सोलार, विंड, टायडल एनर्जी वगैरे) या क्षेत्रात जगातील सर्वोत्तम टेक्नॉलॉजी डेन्मार्क कडे उपलब्ध आहे.

९. फ्रान्स: या देशाच्या सरकारने डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी इनोव्हेशनला मदत करण्यासाठी १३ बिलियन डॉलर्स चा इन्व्हेस्टमेंट फंड उभा केला आहे.

१०. इझ्राएल: मूलभूत संशोधनासाठी (आर अँड डी) जगात सगळ्यात जास्त गुंतवणूक या देशाने केली आहे.

या लिस्ट मध्ये येण्यासाठी तुमच्या देशात काय पाऊलं उचलली जात आहेत?

देश विकसित या गोष्टींमुळे बनतो राजा!

===

राजेश सरांच्या पोस्टमधून खरंच धडा शिकायला हवा. रोज उठून एकमेकांना टपल्या मारतांना, काही महत्वाच्या प्रश्नांना भिडायला हवं.

आपलं व्हिजन काय आहे? आपली दिशा काय असावी? आपलं उद्दिष्ट कोणतं असावं? हा विचार गांभीऱ्याने करायला हवा.

सरकारच्या स्टार्ट अप इंडिया योजनेचा धुव्वा उडालाय. ५% तरुणांना मदत मिळाली आहे फक्त.

मुद्रा योजना सर्वपक्षीय कार्यकर्ते, बँक अधिकाऱ्यांचे आप्तेष्ट आणि एकूणच “ओळख असणाऱ्या लोकांसाठी” असलेली स्वस्त कर्ज योजना होऊन बसली आहे.

इंडस्ट्री इनोव्हेशन ज्या लघु-मध्यम उद्योगांवर अवलंबून असते, ते उद्योग एकतर फक्त सर्व्हिस देण्यात गुंतलेत किंवा टाळे ठोकून बसलेत. इतर टेक इनोव्हेशन करण्यासाठी आवश्यक वातावरण नाही. प्रोत्साहन नाही. ट्रेनिंगची सोय नाही.

स्किल इंडिया योजनेतून फक्त दुकानं थाटून सरकारी अनुदान उडवलं गेलंय.

शिक्षण-आरोग्य क्षेत्रांत सरकारने लक्षणीय बदल करणं तर सर्वात पहिली टास्क असायला हवी होती.

 

www.quora.com

नव्या आयआयटी नंतर उभारा – आहेत त्या सरकारी शाळा कॉलेजेसमध्ये सुधारणा घडवून आणा, त्यांच्याकडून देशात टेक रिव्हॉल्युशन घडवून आणा….सरकारी इस्पितळात मिळणारी निकृष्ट सेवा सुधारा…त्यासाठी हेल्थकेअर मध्ये गुंतवणूक करा…हे वेगळं सांगायची गरज का भासावी?

आजचा विकासाचा बॅकलॉग आणि समस्यांचा डोंगर गेल्या ६०-७० वर्षांत हळूहळू उभा राहिला आहे हे सत्यच आहे. पण ते म्हटल्याने आजच्या सत्ताधाऱ्यांची जबाबदारी कमी होत नाही. मापात पाप नको. आम्ही पूर्वी जगद्गुरू होतो पण बाहेरच्यांनी आमची ग्रंथ संपदा जाळली – असं म्हटल्याने गोड वाटतं पण आजच्या शिक्षण व्यवस्थेची अगदी प्राथमिक-माध्यमिक स्तरापासूनची निकृष्ट अवस्था सुधारत नाही.

आमच्याकडे पूर्वी विमानं होती – असं म्हटल्याने आज, आत्ता असणारी विज्ञान-तंत्रज्ञानातील पीछेहाट भरून निघत नाही.

आणि — माईंड यू — अशी विधानं करणाऱ्यांचा #फक्त विरोध करूनसुद्धा बदल घडत नाही. तेवढं पुरेसं नाही. काय नकोय हे सांगून झालं की लगेच “काय हवंय” हे सांगता आलं पाहिजे. ह्या सरकारच्या आधी सत्तेत असणारी लोकं असं फालतू काहीबाही बोलत नव्हती, पण म्हणून भारत विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात भराऱ्या मारत होता असं काही नाही. सबब, टीका करून पुढे जाता आलं पाहिजे. एक सकारात्मक, भविष्यकेंद्री कॉमन मिनिमम प्रोग्रॅमसुद्धा देता आला पाहिजे.

खांद्यावरील बॅकलॉगचं ओझं कुणी का लादलेलं असेना, ते आपल्या सर्वांच्याच खांद्यावर आहे. आणि ते ओझं पेलण्याची जबाबदरी सरकारची असली, तरी त्याचा ध्यास-आग्रह धरण्याची जबाबदारी आपलीच आहे.

सरकार बदलत राहील. पुढच्या सत्तर वर्षांनंतर येणाऱ्या पिढीला हेच ओझं मिळणार की कृत्रिम अडचणींपासून मुक्त, संधींनी परिपूर्ण वातावरण मिळणार – हे “आजच्या” जनतेच्या हातात आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 175 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?