'विधिमंडळातील गमतीजमती : जोशींची तासिका यंदा थेट विधिमंडळातून

विधिमंडळातील गमतीजमती : जोशींची तासिका यंदा थेट विधिमंडळातून

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेचं भाग्य कोणाच्या लेखी घडवलं किंवा (बि)घडवलं जातं त्या विधीमंडळात अनेकदा वाऱ्या होत असतात. मात्र, १४ मार्च रोजी जरा वेगळी घटना घडली. विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयामार्फत सभेची प्रवेशिका मिळाली. सोबत परळी वैजनाथ पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धनंजय आरबुने, शहराध्यक्ष दत्तात्रय काळे होते.

वातानुकूलित हिरवा गालीच्या अंथरलेल्या सभागृहाच्या अतिथी कक्षात मंद दिव्यांचा प्रकाश होता. आम्ही जिथे बसलो होतो तिथून बरोबर समोर विरोधी बाक होते. थोडक्यात शब्दशः सत्ताधारी मंडळींच्या डोक्यावर असलेल्या गॅलरीत आम्ही तिघे बसलो. सभागृहात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. विधानसभेत सत्ताधारी सदस्यांची संख्या जास्त असली तरी त्या दिवशी दुपारी विरोधकच अधिक संख्यने उपस्थित होते.

विरोधी बाकांवर बसलेले अजित पवार लक्ष वेधून घेत होते. कारण धाकल्या पवारांना दादा का म्हणत असतील ते तिथे अनुभवायला मिळाले. ज्या रुबाबदार पद्धतीने अजित पवारांचा वावर होता तो कोणालाही भूरळ पाडणारा होता.

सभागृहाचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे मुख्याध्यापकांसारखे सभागृहाची तासिका शांतपणे हाताळत होते. विरोधक आक्रमक होत होते तर सत्ताधारी त्याला उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. आम्ही प्रेक्षा कक्षात असताना आमदार वारीस पठाण हिंदी-मराठीतून सत्ताधारी मंडळींवर तुटून पडत होते.

नंतर कोण बोलणार यावर थोडी ओढाताण झाली. तेव्हा शिवसेनेचे एक आमदार बोलण्यास ऊभे राहिले. त्यावर अध्यक्ष महोदयांनी “आज तुमचे नाव पटलावर नाही” असे सांगितले. त्यानंतर सत्ताधारी भाजपातले काही आमदार आरडाओरडा करू लागले तेव्हा पुन्हा दादांनी “सेना आमदाराला बोलू द्या, सर्वांना बोलू द्या, सर्वांचं ऐका नंतर आळीपाळीने सर्वजण बोलू” असे म्हंटले. दरम्यान या गदारोळात एक कॅबिनेट मंत्री तिथून निसटण्याच्या तयारीत असताना चाणाक्ष दादांनी आक्रमक होत मंत्री महोदयांना रोखून धरले.

दोघांत थोडी शाब्दिक चकमक झाली पण मंत्र्यांना माघार घेत थोडावेळ बसावे लागले. अखेर पाच मिनिटांनी दादांनी इशारा केल्यावरचं मंत्री महोदय सभागृहातून बाहेर पडले.

 

vidhansabha-inmarathi
majhapaper.com

*खटकलेली गोष्ट*

सभागृहात सहा भव्य तैलचित्र लक्ष वेधून घेतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. या सर्व महापुरुषांविषयी मला आदरच आहे. नेहरुंच्या राष्ट्रनिर्मिती कार्याबाबत मत मतांतरे असू शकतात. त्यांचा भारताच्या जडणघडणीत निश्चितच वाटा आहे असे मला वाटते. पण, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला कडाडून विरोध करणाऱ्या नेहरूंचे तैलचित्र राज्याच्या विधिमंडळात असण्याचे प्रयोजन माझ्या आकलनशक्ती पलीकडचे आहे. मला कोणत्या नव्या वादाला तोंड फोडण्याची अजिबात ईच्छा नाही.

पण, काही गोष्टी विसरता येत नाहीत. कारण आपला म्हणजे महाराष्ट्राचा जन्म कसा झाला हे प्रत्येकाला सदैव लक्षात असेल तरच सुवर्ण भविष्य घडवता येईल. इ.स.१९५६ च्या नोव्हेंबरातील २१ तारखेच्या संध्याकाळी महाराष्ट्र निर्मितीसाठी ठाण मांडून बसलेल्या सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते.

फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारखेच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती.

या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. थोडक्यात महाराष्ट्र विरोधी नेहरूंचे तैलचित्र राज्याच्या विधानसभेत का? असे खटकले पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. राज्यकर्ते आपल्याला नाचवत असतात आणि आपण नाचतो असे त्यावेळी वाटले. वेन्सडे चित्रपटातील नसरुद्दीन शहाचा एक संवाद आठवला

“we are resilient by force not by choice”.

 

Samyukta-Maharashtra-Chalwal-inmarathi
s3.india.com

*महिला सबलीकरणाचे वास्तव*

कक्ष क्रमांक १११ अध्यक्षांची गॅलरी असा फलक असलेल्या त्या खोलीत १ ते २० अशी आसनव्यवस्था आहे. एका रांगेत ५ खुर्च्या अशा ४ रांगा आहेत. गॅलरीच्या कठड्यावर एक हस्तलिखित फलक आहे. ज्यावर” पहिली रांग महिलांसाठी राखीव अशा आशयाचा मजकूर आहे. मात्र, आम्ही जेव्हा कक्षात होतो एकूण ९ जण तिथे उपस्थित होते. त्यात एक महिला तर आठ पुरुष होते. तेव्हा पहिल्या रांगेत “चार कठळे” ठाण मांडून बसले होते तर बिचारी एकमेव भगिनी शेवटच्या रांगेत बसून टिपणे काढत होती.

अखेर वैतागून ती भगिनी दुसऱ्या रांगेत जाऊन आपले काम निमूटपणे करू लागली. यात मी दोष कोण्या मंत्री, आमदारास किंवा यंत्रणेला देत नाही. दोष सर्वस्वी आपल्या मानसिकतेचा आहे की ज्या कायदेमंडळात सर्वसामान्यांसाठी कायदे बनवले जातात तिथे सामान्य नागरिकच जाणते-अजाणतेपणी कायदा झुगारतो. मात्र आपण “एकविसाव्या शतकातील सक्षम महिला”, “स्त्री शक्तीचा गौरव” वगैरे गप्पा मारत असतो.

*जाता जाता:-*

काही आमदार मंडळी प्रथे आणि परंपरेप्रमाणे डुलक्या घेत होती. कोणी मोबाईलमध्ये व्यस्त होते. (तिथे नेटवर्क जॅमर आहेत असे म्हणतात.) कदाचित महत्त्वाचे टिपण वाचत असतील. आणि हो “बरबाद ए गुलिस्ताचे” (एकमत) युवराज अमित देशमुख आपली काळीभोर दाढी कुरवाळत होते. हात उंचावत बोलू द्या असा इशारा अध्यक्षांना करत होते. अध्यक्ष मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होते. तेव्हा मनात विचार आला की अमितजी सभागृहातून बाहेर पडण्याची वाट पाहू आणि विचारू की “शंभर-सव्वाशे लोकांनी असा काय गुन्हा केला होता की रातोरात एकमतची औरंगाबाद आवृत्ती त्यांनी नेमलेल्या प्रशासकीय आणि संपादकीय मंडळांनी बंद केली.

एका रात्रीत शेकडो चुलींवर पाणी टाकणाऱ्या निर्णयाने काय साध्य झाले.” अजून एक गोष्ट त्यांना सांगावीशी वाटत होती की “२८ ऑक्टोबर २०१७ पासून १४ मार्च २०१८ रोजी पर्यंत आमचे काही सहकारी खचले, काही पिचले, काही लढले, तर काही नडले.” असो, मूळ विषयावर येऊ.

एव्हाना विधिमंडळातील डिजीटल घड्याळात चार वाजले होते. मित्रांची गाडी सहा वाजता होती म्हणून उठायला लागलो तितक्यात तिथे असलेल्या दोन वेगवेगळ्या घड्याळांवर लक्ष गेले. अजूनही पारंपरिक राजकारण करणाऱ्या विरोधकांच्या मागे काट्याचे घड्याळ होते ज्यात चार वाजून एक मिनीट झाली होती. तर आधुनिकतेचा बाज असलेले राजकारण करणारे आणि डिजीटल इंडियाचा पुरस्कार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या मागे असलेल्या डिजीटल घड्याळात चार वाजले होते.

सध्याचे विरोधक प्रशासनाच्या ज्ञानाबाबत सत्ताधारी मंडळींपेक्षा पुढेच आहेत असे मंत्रालय वर्तुळात बोलले जाते त्यामागचे गुपित हे एक मिनीट पुढे असलेले घड्याळ तर नसावे? गंमतीचा भाग सोडता मनात विचार आला इथे असलेल्या दोन घड्याळात साम्य नाही तर लोकांच्या विचारात कसे साम्य असेल?

(टीप : विधिमंडळातील कोणत्याच गोष्टीचा उपमर्द हा या लेखाचा उद्देश नाही तर केवळ माझ्या अल्पमतीनुसार मांडलेली निरीक्षणे आहेत. तरीही कोणास काही खटकले असेल तर आधीच दिलगिरी व्यक्त करतो. कारण हे लोकशाहीचे मंदिर आहे; याची पूर्ण जाणीव या पामरास आहे.)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?