फ्रिक्वेंटली विहंगम : विमानातून फोटोग्राफी करण्याचा रोचक अनुभव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

दूर देशी हजारो किलोमीटर प्रवास करणाऱ्या प्रवासी पक्ष्यांना आपलं जग कसं दिसत असेल हा प्रश्न मला लहानपणापासून पडत असे.

हिरवीगार शेतं, अथांग समुद्र, मानवी जगाला चेतना देत वाहणाऱ्या नद्या… आकाशात अंथरलेली ढगांची दुलई… हे सगळं उंचावरून उडताना कित्ती वेगळं दिसत असेल असं मला वाटायचं. वय वाढलं तरी हे कुतूहल काही कमी झालं नाही.

पहिल्या वेळेला स्वतःच्या पैशांनी तिकीट काढून विमानात बसलो तेव्हा खूप लवकर विमानतळावर जाऊन खिडकी आरक्षित केली होती.

आणि विविध आकारांच्या ढगांना कापसासारखं पिंजलेलं पाहून मुग्ध होऊन गेलो होतो. तेव्हापासून विमानात बसायची संधी मिळाली आहे आणि खिडकी पकडली नाही असं खूप क्वचितच झालं.

पुढे चांगला डिजिटल कॅमेरा घेतल्यावर खिडकीबाहेरची दृश्ये टिपून ठेवायलाही सुरुवात केली.

 

 

मुंबईहून लखनौ ला जात असताना कानपुर शहराच्या आसपास उडत असलेल्या आमच्या विमानातून गंगा नदीच्या एका वळणाचे दृश्य दिसले आणि प्रत्येक फ्लाईटमधून भारताची विविध रूपं कॅमेरात कैद करण्याचा सिलसिला सुरु झाला.

 

 

मुंबईकर असल्यामुळे सगळ्यात जास्ती फ्लाईट मुंबईतूनच पकडल्या जातात आणि परतीचे ठिकाणही छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळच असतं. पश्चिमेला समुद्र आणि पूर्वेला सह्याद्री असल्याने नेहमीच काही ना काही छान फ्रेम मिळते. कधी जुहूचा समुद्र किनारा तर कधी पवई-विहार तलावांच्या सान्निध्यातील नॅशनल पार्क.

तीच नेहमीची ओळखीची ठिकाणे … पण वेगळ्या दृष्टीने आणि वेगळ्या संदर्भबिंदूने पाहिलेली. आपल्याच शहराकडे पाहण्याची नजरच जणू बदलून जावी असं काहीसं होतं.

पण कधीकधी नव्या रूटवर प्रवास करत असताना आकाशातून इतकं अद्भुत काही दिसतं की आपण काय पाहिलं त्याचा शोध घ्यावासा वाटतोच. मुंबईहून कुवेत मार्गे फ्रँकफर्ट ला जात असताना आखातातील अल-खीरान रिसॉर्टच्या दृश्याने अशीच मोहिनी घातली होती.

 

 

पण हा शोध घ्यायचा कसा? हा प्रश्न सोडवला आहे गुगल मॅप्स आणि जीपीएसच्या तंत्रज्ञानाने. अशी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत ज्यावर आपण आपल्या फ्लाईटने कोणत्या मार्गाने प्रवास केला याची माहिती नकाशावर चित्ररूपात मिळते आणि या फ्लाईट पाथच्या मदतीने आपण नक्की काय पाहिलं ते शोधू शकतो. आंतरराष्ट्रीय फ्लाईट्समध्ये हा मार्ग आपल्याला विमानातील मॉनिटरवरच दिसतो. त्याचा उपयोग असा होतो की एखादे छान दृश्य नजरेसमोर येण्याआधीच आपण कॅमेरा सरसावून तयार राहू शकतो.

 

 

कोणत्याही शहरात विमान उतरत असताना किंवा उड्डाण झाल्यावर त्या शहराचे हवाई दृश्य आपल्याला दिसते. नव्या शहराशी ओळख करून घेण्याचा हा एक आगळावेगळा मार्ग म्हणता येईल. फ्रँकफर्ट विमानतळावर उतरण्यापूर्वी जर्मनीतल्या ऑटो बान महामार्गांचे जाळे दीड-दोन हजार फूट उंचीवरून पाहताना मजा आली होती.

 

 

आपल्या रस्त्यांवर जसे ट्रॅफिक जॅम होतात आणि आपण अडकून पडतो तसेच ट्रॅफिक जॅम जगभरच्या गजबजलेल्या विमानतळांवर होत असतात. आणि विमाने या शहरांजवळ घिरट्या मारत उडत राहतात. अशा वेळेला जर उजेड भरपूर असेल आणि आकाश निरभ्र असेल तर काही चांगले फोटो मिळण्याची शक्यता असते. थोडी नशिबाचीही साथ हवी कारण आपण विमानाच्या जा बाजूला बसलो आहोत त्या दिशेने विमानाने वळण घेतले तर आपण जमिनीवरील दृश्य छान टिपू शकतो.

 

 

हल्ली एकदा मुंबईत येत असताना संध्याकाळच्या वेळेला एअर ट्रॅफिक जॅम झाल्याने आमचे विमान जवळजवळ वीस मिनिटे पिंपळगाव जोगा धरणाच्या आसपास उडत राहिले आणि मला काही फोटो घेण्याची संधी मिळाली. फ्लाईट पाथ पहिला तर लक्षात येईल की उजवीकडे बसलेल्या प्रवाश्यांना धरणाचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले.

 

 

हल्ली जोधपूर मुंबई प्रवासात तापी आणि नर्मदा नदीवर बांधलेली धरणे आणि त्यावर बांधलेले विस्तृत जलाशय पाहायला मिळाले. कामासाठी भारतात विविध ठिकाणी नेहमीच हिंडावं लागतं आणि शालेय अभ्याक्रमात भूगोलात ऐकलेली विविध नावे प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळते.

 

 

अरवली किंवा विंध्य पर्वत .. महानदी, हुगळी, यमुना, गोदावरी अशा प्रसिद्ध नद्या आणि बरंच काही. हे फोटो वापरून भूगोलाचा तास अधिक रंजक करता येईल का असं मला कधीकधी वाटतं.

 

 

जेव्हा जेव्हा विमान प्रवास कराल असे फोटो तुम्हीही टिपू शकता … त्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या –

१. फ्लाईट रडार सारख्या साईटवर फ्लाईटचा पाथ किंवा मार्ग पाहून घ्या.
२. कोणत्या बाजूला नाविन्यपूर्ण काही दिसेल याचा गुगल मॅप्स वापरून अंदाज घ्या व त्या बाजूची खिडकी निवडा.
३. वेब चेकिन केल्यास हवी ती खिडकी मिळण्याची शक्यता वाढते.
४. सीटची निवड करत असताना विमानाचे पंख टाळून सीट निवडा जेणेकरून स्पष्ट दिसेल.
५. उन्हाच्या विरुद्ध दिशेची बाजू निवडा. म्हणजे समजा विमान उत्तरेकडे प्रवास करणार असेल तर सकाळी डाव्या खिडकीत बसणे चांगले, तर संध्याकाळी उजवीकडे.

तेव्हा करा एरियल फोटोग्राफीची सुरुवात

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?