' शिवरायांसह स्वराज्याला दिशा दाखवणाऱ्या, गुरु दादोजी कोंडदेवांच्या भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती – InMarathi

शिवरायांसह स्वराज्याला दिशा दाखवणाऱ्या, गुरु दादोजी कोंडदेवांच्या भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : बापू शिंदे 

शहाजीराजे आदिलशाही चाकरीत दाखल होते वेळी त्यांना भीमा व नीरा या दुआबातील काही प्रदेश जहागिरी दाखल देण्यात आला. शके १५५८ फाल्गुन शुद्ध ११ म्हणजे शनिवार दि. २५ फेब्रु १६३७ चे शहाजीराजांचे एक खुर्दखत गणेशभट बिन मलारीभट भगत मोरया याला दिलेले उपलब्ध आहे.

त्यावरून पुणे परगणा शहाजीराजांना नुकताच ‘मुकासा अर्जाने झाल्याचे स्पष्ट होते.

म्हणजे पुणे परगण्याची जहागिरी व मोकासदारी शहाजीराजांना इ.स.१६३६ अखेर प्राप्त झाली होते हे स्पष्ट होते. पुणे परगण्यात एकूण २९० गावे असून हा परगणा ७ तरफांत विभागला गेला होता.

या ७ तरफांमध्ये १) हवेली (८२ गावे) २) कडेपठार (४३ गावे) ३) सांडसखुर्द (२० गावे) ४) कर्यात मावळ (३६ गावे) ५) पाटस (४३ गावे) ६) सांडसबुद्रुक (२९ गावे) ७) निरथडी ( ३७ गावे) अशी विभागणी केलेली होती.

यापैकी कर्यात मावळच्या ३६ गावांचा मोकासा शिवबाजीराजांच्या नावे सातव्या वर्षीच शहाजीराजांनी करून दिला. पुणे जहागीरीची व्यवस्था पाहण्यासाठी शहाजीराजांनी दादोजी कोंडदेव या वृद्ध, अनुभवी, कर्तबगार, विश्वासू व चारित्र्यवान माणसाची नेमणूक केली.

(संदर्भ : मराठ्यांचा इतिहास खंड पहिला, लेखक – ग. ह. खरे; शककर्ते शिवराय खंड १, लेखक – विजय देशमुख)

 

dadoji-konddev-inmarathi
dnaindia.com

शहाजी राजांच्या पुण्याच्या परिसरातील मुकाशांचा कारभार त्यांच्यावतीने दादाजी कोंडदेव हा पाहत असे. शिवाय हा पुणे परगण्याच्या पाटस तर्फेतील मलठण या गावचा कुलकर्णी होता. /

(संदर्भ : श्री राजा शिवछत्रपती खंड १ भाग १ – लेखक: गजानन भास्कर मेहंदळे)

दादाजी कोंडदेव एक लहानसा कारकून होता हि समज चुकीची आहे. तो राजकारण जाणणारा चतुर मुत्सदी व करडा प्रधान होता. शहाजींची नोकरी इमानाने बजावीत असता शिवाजीला त्याने योग्य वळण लावून पुढील उद्योगास समर्थ केले. शहाजींच्या जागिरीची व्यवस्था म्हणजेच भावी राज्याचा पाया त्याने घालून दिला.

(संदर्भ : मराठी रियासत खंड १, लेखक – गोविंद सखाराम सरदेसाई )

 

dadoji-InMarathi

 

वरील सर्व इतिहासकरांचे मत लक्षात घेतले असता दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘गुरु’ होते असा उल्लेख कुठेही सापडत नाही.

मात्र ते एक कुशल राजकारणी, चारित्र्यवान असे स्वराज्याचे सच्चे सेवक होते व शिवरायांचे वडील शहाजीराजांचे विश्वासू होते हे स्पष्ट दिसून येते. पुणे जहागीरीची व्यवस्था लावण्यासाठी त्यानी कष्ट घेतले हेही दिसून येते.

जहागीरीची व्यवस्था लावताना दादाजीने केलेल्या खालील गोष्टी विशेष नमूद करण्यासारख्या आहेत.

शहाजीराजे कर्नाटकात निघाले त्यावेळी कुटुंबाचा प्रश्न स्वाभाविकच त्यांच्यासमोर आला. राजकीय स्थित्यंतरामुळे काहीशी अस्थिरताच होती. यावेळी शहाजीराजांना जिजाबाई व तुकाबाई अशा दोन राण्या व शंभूराजे व शिवबा अशी दोन मुले होती.

थोरले पुत्र शंभूराजे सुमारे १३-१४ वर्षांचे तर धाकटे शिवबा राजे ७ वर्षांचे होते. संभाजीराजांची कर्तबगारी हळूहळू दिसू लागली होती त्यामुळे त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शहाजीराजांना त्यांना आपल्या जवळ ठेवणे इष्ट वाटले असावे.

 

nangarani-inmarathi
maayboli.com

सर्व कुटुंब कर्नाटकासारख्या परमुलखात नेल्यास पुणे जहागीरीची व्यवस्था नीट होणे शक्य नव्हते. हा सर्व विचार करूनच राजांनी दादोजी कोंडदेवांना पुणे परगण्याचा आपला मुतालिक नियुक्त करून त्यांचावर त्या परगण्याच्या व्यवस्थेचा भार सोपवला व खाशांपैकी जिजाबाई व बाल शिवबाराजांनाही पुणे प्रांताच ठेवण्याचे त्यांनी ठरवले.

इ.स. १६३७ साली शहाजीराजांच्या पुणे जहागीरीची अवस्था अतिशय खराब होती. आधी हा भाग निजामाकडे व त्यानंतर आदिलशहाकडे आला. त्यांच्याकडून तो पुन्हा शहाजीराजांकडे विजापूरकरांच्या वतीने आला.

 

relation between karnataka shahaji raje InMarathi

 

त्यापूर्वी विजापूरकरांच्या वतीने मुरारपंतांनी तेथील लोखंडी पहार ठोकून गाढवाचा नांगर फिरवला होता. पुण्याची वस्ती उठून गेली होती. तो पूर्ण भाग उद्ध्वस्त, ओसाड पडलेला होता. आधी सैनिकांनी केलेली लुट व त्यानंतर पुंड- पाळेगार लुटारुंच्या कोसळलेल्या धाडीवर धाडी त्यामुळे पुण्याचे होते नव्हते ते रूपही पार नष्ट झाले.

आणि अशा अवस्थेत आता हा भाग विजापूरकरांकडून शहाजीराजांना मिळाला. या भागात जंगली जनावरे लांडगे वगैरेंचा सुकाळ झाला. त्यामुळे कशीबशी उरलेली प्रजा व पाळीव जनावरेही नष्ट होऊ लागली होती. शेती करणेही मुश्कील झाले होते.

दादोजींचे काम व मावळप्रांतात नवचैतन्य :

इ.स.१६३७ साली दादाजी, जिजाऊसाहेब व शिवाजीराजांना घेऊन पुणे जहागिरीत आले. पहिलाच प्रश्न उदभवला तो निवासाचा. कारण शहाजीराजांचे पुण्यातील राहते वाडे मागेच भुईसपाट झाले होते.

त्यामुळे वाडे बांधून होईपर्यंत पुण्याच्या दक्षिणेस सात कोसांवर असलेल्या खेडेवारे येथील बापुजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे यांच्या वाड्यात राहण्याचे ठरले. जिजाबाई आणि शिवाजी यांच्याकरिता दादाजी कोंडदेवाने पुण्यात लालमहाल नावाचा वाडा बांधला पण तो कधी बांधला हे निश्चित सांगता येत नाही.

 

lal-mahal-pune InMarathi

 

शिवगंगेच्या काठी नामवंत आंब्याची बाग लावून त्यांनी त्या बागेला शहाबाग असे नाव दिले. संभाजीराजे व शिवाबराजे यांच्या नावे संभापूर व शिवापूर अशी दोन गावेही त्यांनी वसवली.

पुण्यापासून चार पाषाण म्हणून गाव आहे. तेथे दादोजीनी पेठ वसवून त्या गावचे नवे नाव ठेवले पेठ जिजापूर. जिजाऊसाहेबांच्या खाजगी खर्चासाठी केळवडे व रांझे ही दोन गावे लावून दिली. त्यासाठी नारो त्रिंबक पिंगळे हा स्वतंत्र कारकून नियुक्त केला होता.

दादोजीनी ओसाड गावच्या पाटील, देशकुळकर्णी, चौधरी, चौगुले यांना पुण्यात बोलावून त्यांची तक्रार ऐकून घेतली. त्यांना कौल देऊन वसाहत फिरून उभी करण्यासाठी आव्हान केले. नानातऱ्हेने त्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले. दादोजींच्या दिलाशाहाच्या शब्दांनी हळूहळू गावे उभी राहू लागली.

 

dadoji-1 InMarathi

 

दादोजीनी पुण्यावरून सोन्याचा नांगर फिरवून विलक्षण क्रांती केली. जंगली जनावरांचा नाश करण्यासाठी बक्षिसे लावली. गस्ती तुकडया नियुक्त केल्या. संरक्षणव्यवस्था मजबूत केली. चोराचिलटांचे भय नाहीशे केले. शेतीस उत्तेजन दिले. जमिनीची मापणी करून प्रतवारी ठरविली. मुक्तहस्ते तगाई, कर्जे वाटली. सारा-वसुलीचे प्रमाण ठरवून दिले.

दादोजी कोंडदेवाची न्यायव्यवस्था :

सुभेदार म्हणून काम करीत असताना दादाजीला वतनासंबंधीच्या निरनिराळ्या तंट्याचे निवाडे करावे लागले. शहाजींच्या पुण्याच्या परिसरातील मुकाशांमध्ये अंमल बसविताना दादाजीने काही वतनदारांविरूद्ध स्वाऱ्या केल्याचे उल्लेख काही उत्तरकालीन कागदपत्रांमध्ये आले आहेत.

हिरडस मावळचा देशमुख कृष्णाजी बांदल हा अशाच वतनदारांपैकी होय. हिरडस मावळ रोहीडखोऱ्याच्या भोर तरफेला लागून होते. त्यांच्यातील हद्दीवरून कृष्णाजी बांदल आणि भोर तरफेचा देशमुख कान्होजी जेधे यांच्यात तंटा होता आणि झटपटीही झाल्या होत्या.

त्या परिसरात कृष्णाजी बांदलाची मोठी दहशत होती असे दिसते. त्याचा बंदोबस्त दादाजीने कसा केला याची हकीगत बांदलांच्या एका उत्तरकालीन तकरीत आली आहे.

 

krushnaji bandal InMarathi

 

यानुसार, [शहाजी] महाराजांना बारा मावळे जहागीर मिळाली म्हणून त्यांनी राजश्री दादाजी कोंडदेव सुभेदार यांना त्या मुलखावर अंमल बसविण्यास पाठविले त्यांनी सर्व महालोमहाली देशमुखांना हुकुम पाठविला कि भेटीस येणे.

कृष्णाजी नाईक बांदल भेटीस गेले नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध फौज पाठविली. युद्धे झाली तरी कृष्णाजी बांदल भेटीस गेले नाही. राजश्री दादाजी पंतांकडे जाऊ नये जेव्हा जायचे तेव्हा शहाजीमहाराजांकडे जावे असे त्यांनी ठरविले. नंतर राजश्री दादाजीपंतांनी महाराजांना विनंती पत्र पाठवून दिले कि कृष्णाजी नाईक बांदल भेटत नाही, पुढे काय करावे ?

त्यावर महाराजांचा हुकुम आला कि कृष्णाजी बांदल हातात येईल अशे करावे मग राजश्री दादाजीपंतानी शपतपूर्वक बेलभंडार पाठवून कृष्णाजी बांदलास भेटीला बोलाविले. तेव्हा कृष्णाजी नाईक यांनी मुद्दा काढला कि मी पुंडावे करीत होतो, आता पुढे काय करावे कसे राहावे?

त्यावर राजश्री दादाजीपंतानी अभय दिले कि त्यांची भेट झाल्यावर त्यांचा मुद्दा महाराजांना लिहून पाठवू. तुमचे भले करो, असे म्हणून कृष्णाजी नाईक बांदल भेटीला आल्यानंतर कोंढाणा किल्ल्यास नेऊन धरून चौरंग केले, म्हणजे त्याचे हातपाय तोडले. (संदर्भ : श्री राजा शिवछत्रपती खंड १ भाग १ – लेखक: गजानन भास्कर मेहंदळे)

 

shivaji-inmarathi
punerispeaks.com

यावरून समजू शकते कि दादोजी कोंडदेव अतिशय प्रामाणिक व कर्तबगार कारभारी होते. मिळालेल्या अधिकारांचा त्यांनी अतिशय शहाणपणाने व निष्टापुर्वक उपयोग करून शहाजीराजांची उद्ध्वस्थ ओसाड जहागीर ऊर्जितावस्थेत आणून दाखविली.

पुण्यातील कारभाराची शहाजी राजांनी ज्यावेळी कसोशीने तपासणी केली, त्यात शिवाजी राजांचे शिक्षण व जहागीरीची व्यवस्था दोनही गोष्टी दादाजीने अल्पावधीत फार चागल्या सिद्धीस नेल्या हे पाहून शहाजी राजाना मोठा संतोष वाटला व त्यांनी दादाजीस बक्षिसे व पोशाख देऊन आणि पूर्वी तनखा होता त्यावर सातशे होनाची बढती करून गौरव केला आहे.

तसेच, ‘दादोजी कोडंदेव लहानसाच ब्राह्मण झाला, परंतु त्याने जे इनसाफ केलेते अवरंगजेब पाद्शाहासही वंद्य जाहले’, असे उद्गार छत्रपती शाहूंनी एका प्रसंगी काढल्याचे एका समकालीन पत्रात नमूद केले आहेत.

वापरलेले संदर्भ ग्रंथ

o (शककर्ते शिवराय खंड १ लेखक विजय देशमुख)

o (मराठ्यांचा इतिहास खंड पहिला लेखक ग. ह. खरे)

o (श्री राजा शिवछत्रपती खंड १ भाग १ लेखक: गजानन भास्कर मेहंदळे)

o (मराठी रियासत खंड १ लेखक गोविंद सखाराम सरदेसाई)

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?