' त्याने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला आणि आदर्श घडवला..! – InMarathi

त्याने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला आणि आदर्श घडवला..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

“हम दिल दे चुके सनम, तेरे हो गये हम… तेरी कसम”… बॉलिवूडच्या सर्वात रोमँटिक चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजेच “हम दिल दे चुके सनम!”… सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगन यांच्यावर चित्रित हा चित्रपट खूप गाजला होता.

त्यातील स्टारकास्ट, डायलॉग, गाणी सर्वच काही खूप सुंदर होतं. आणि ह्या चित्रपटाला एवढं हिट करण्यामागे होती ह्या चित्रपटाची कहाणी.

ह्या चित्रपटात पण हिरो आहे, हिरोईन आहे पण स्टोरी जरा वेगळी आहे.

 

Hum-Dil-De-Chuke-Sanam-INMARATHI
bollywoodbubble.com

ह्यात सलमान खान म्हणजेच समीरचे ऐश्वर्यावर म्हणजेच नंदिनीवर प्रेम असते पण ते तिच्या वडिलांना पंडित दरबार ह्यांना मान्य नसते आणि मग ते तिचे लग्न अजय देवगन म्हणजेच वनराजशी लावून देतात.

नंतर नंदिनी वनराजला समीर बद्दल सांगते आणि मग वनराज हा नंदिनी आणि समीर ह्यांना एकत्र आणायचे प्रयत्न करतो.

तो नंदिनीला समीर पर्यंत घेऊन जातो… तसं तर आपण सर्वानीच हा चित्रपट बघितला असेल आणि ह्याची कहाणीपण आपल्याला माहितच आहे. मग आज पुन्हा ही कहाणी का सांगताय असेच प्रश्न आपल्या मनात येत असणार.

पण हे असं सर्व चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही घडतं. म्हणून ही कहाणी परत एकदा मांडली.

कारण असाच एक प्रकार खऱ्या आयुष्यातही घडला आहे. एका व्यक्ती चक्क लग्नाच्या सहाव्या दिवशीच आपल्या नवीन नवरीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिले.

विश्वास बसत नाहीये ना… पण असं झालंय. ही घटना आहे ओडिशा राज्यातील जिथे एका तरुणाने आपल्या बायकोचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. आणि तेही सर्व संमतीने अगदी वाजतगाजत.

 

Marriage-Anniversary-inmarathi
3.bp.blogspot.com

ओडीशाच्या राउलकेला येथील सुंदरगढ जिल्ह्यातील बडगाव ब्लॉकच्या पमारा येथे राहणाऱ्या २८ वर्षीय वासुदेव टप्पूचे लग्न झारसगुडा येथील देविनी गावातील २४ वर्षीय मुलीशी झाला. गेला ४ मार्चला हा विवाह सोहळा अगदी पारंपारिक पद्धतीने आनंदाने पार पडला.

लग्नाच्या काही दिवसानंतर टप्पुच्या घरी तीन तरुण आले, त्यातील एकाने सांगितले की, तो तप्पुच्या बायकोचा चुलत भाऊ आहे. त्याने असे सांगितल्यावर घरी त्याचा अगदी मानपान करण्यात आला.

त्यानंतर इतर दोन तरुण हे वासुदेव सोबत गावं बघण्याच्या बहाण्याने त्याला बाहेर घेऊन गेले. तर हा चुलत भाऊ घरीच थांबला.

काहीवेळाने गावकऱ्यांना वासुदेवची बायको आणि तो चुलत भाऊ सोबत दिसले. त्यानंतर कळाले की, तो कोणी चुलत भाऊ नसून वासुदेवच्या बायकोचा प्रियकर आहे.

 

marriage05-marathipizza
india-forums.com

ज्यानंतर गावकऱ्यांनी त्या प्रियकराला मारहाण करण्यास सुरवात केली. आपल्या प्रियकराला मारहाण होत असलेली पाहून नववधू समोर आली आणि तिने स्वतः सांगितले की, हा कोणी चुलत भाऊ नसून प्रियकर आहे.

त्यासोबतच तिने हे देखिल सांगितले की,

“आम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण माझे कुटुंबीय ह्यासाठी तयार नव्हते. म्हणून त्यांनी माझ्या मना विरोधात माझं लग्न लावून दिलं.”

नववधूच्या कुटुंबात फक्त तिचे मोठे भाऊ-बहिण होते, तिला आई-वडील नाहीत. त्यामुळे तिला तिच्या भाऊ-बहिणींचे ऐकावे लागले आणि इच्छा नसतानाही हे लग्न करावे लागले.

सर्व हकीगत समजल्यावर वासुदेवने एक असा निर्णय घेतला ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. त्याने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराशी लग्न करण्यास सांगितले.

 

Indian_Marriage_Holding_Hands-inmarathi
mymarriagewebsite.com

आणि नुसतेच सांगितले नाही तर पत्नीच्या मोठ्या भाऊ-बहिण आणि तिच्या प्रियकराच्या घरच्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांना देखील ह्या विवाहासाठी तयार केलं.

त्यानंतर हे सगळे जण पमारा गावात आले आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीत या प्रेमी युगुलाचं मोठ्या थाटात लग्न संपन्न झालं.

आपल्या लग्नानंतर अवघ्या ६ दिवसांतच ह्या तरुणाने आपल्या पत्नीचं तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिलं आणि तेही सर्वांच्या संमतीने.

ह्यावर बोलताना वासुदेव म्हणतो की,

“जर मी असं नसतं केलं, तर तीन-तीन लोकांच जीवन आज उद्ध्वस्त झालं असतं. पण आता सर्व आनंदात आहेत.”

तर ह्यावर त्याच्या पत्नीने सांगितलं की, “आम्ही वासुदेवचे उपकार कधीही विसरणार नाही.”

 

marriage-inmarathi
theindianfeed.in

पमारा गावचे सरपंच गजेंद्र बाग म्हणाले की, “जेव्हा आम्हाला वासुदेवच्या या निर्णयाबाबत समजलं, तेव्हा यापेक्षा चांगलं आणखी काहीही असूच शकत नाही, असं आम्हाला वाटलं. म्हणूनच संपूर्ण गावाने त्याच्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाला पाठिंबा दिला.”

आज जिथे आपला आणि आपल्या कुटुंबाचा समाजात मान राहावा, त्यांची मान खाली जाऊ नये म्हणून अनेक तरुण तरुणींना आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागतो. कित्येकांना त्यांच्या मनाविरोधात लग्न करावे लागते.

आणि जर चुकीने मुलीच्या प्रेमप्रकरणाबाबत माहित झाले तर तिला काहीही विचारणा न करता माहेरी धाडल्या जाते.

ह्यात वासुदेव टप्पूने उचलेलं हे पाउल खरचं खूप कौतुकास्पद आहे. कदाचित ह्यापासून प्रेरणा घेत आजची पिढी तंत्रज्ञानाने नाही तर डोक्यानेही आधुनिक होइल…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?