' स्त्रीचे विवाहबाह्य संबंध म्हणजे ‘स्त्री-स्वातंत्र्य’ की व्यभिचारी फार्स…? – InMarathi

स्त्रीचे विवाहबाह्य संबंध म्हणजे ‘स्त्री-स्वातंत्र्य’ की व्यभिचारी फार्स…?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – ऍड. अंजली झरकर

===

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रेच्या अपहरण आणि हत्येचं प्रकरण गाजलं होतं. त्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि या गुन्ह्यात त्याला साथ देणारे इतर लोक;

त्यात कुरुंदकरचा ड्रायव्हर कुंदन भंडारी, संशयित म्हणून अटक केलेला मा. खासदार एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील आणि कुरुंदकरचा बालमित्र महेश पळणीकर या तीन लोकांना अटक करून त्यांच्याकडून पोलिसांनी खुनाचे धागेदोरे शोधण्यात थोडेफार यश मिळवलं.

यात प्रथम दर्शनी राजेश पाटील याचा गुन्हा करण्यात तर कुठला सहभाग दिसत नव्हता. अश्विनीची हत्त्या केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरने राजेशला विनंती केली होती परंतु त्याने या गोष्टीला नकार दिला इथपर्यंत त्याचा संदर्भ येतो.

या केसमध्ये अजून एक गुंतागुंतीचा मुद्दा म्हणजे खुनाला कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. खून केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी ड्रायव्हर कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांनी मदत केली पण खून करताना यांच्यापैकी कुणी हजर होते किंवा नाही याबद्दल अजून कसलाच कबुली जबाब नाही.

 

ashivini-bindre-inmarathi

 

पोलिसांनी केलेल्या तपासाच्या अशाही कोर्टामध्ये अनेकदा विश्वासाहर्ते अभावी ठिकऱ्या उडवल्या जातात. त्यामुळे पोलीस काय बोलले यावर विश्वास ठेवा असं म्हणता येणार नाही, पण याबाबत खुद्द अश्विनीच्या पतीने एक स्टेटमेंट मीडियाला दिलं होतं.

आरोपी कुरुंदकर आणि अश्विनी यांच्यामध्ये असलेल्या प्रेम संबंधामुळे आमच्यात वाद होत असत या स्वरूपाचं. शिवाय हे सांगताना अश्विनीच्या पतीने आपल्या मृत पत्नीच्या बाबत कुठल्याही खालच्या पातळीची शेरेबाजी अथवा आकांडतांडव न करता ज्या संयमाने अश्विनीची dignity ठेवत सांगितलं त्यावरून तरी एकंदर घटनेची पार्श्वभूमी थोडीफार लक्षात यावी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लग्नानंतर एका वर्षात PSI झाल्यानंतर सांगलीला झालेल्या पोस्टिंगपासून कुरुंदकरशी आलेले संबंध ते पनवेलला कळंबोली येथे बदली झाल्यावर तिथे हजर न होता कुरुंदकर बरोबर भायंदरला गेल्यानंतर संपलेला आयुष्याचा प्रवास असं एकंदरीत अश्विनीच्या आयुष्याचं चित्र पोलिसांच्या हकीकतीतून समोर येतंय.

अवतीभवती घडणाऱ्या लाखो घटनांपैकी जर हेच एक प्रकरण विचारात घेतलं तर अश्विनी बिद्रेचा सुद्धा गुन्हा गंभीर आहे ज्याची जबाबदारी कुरुंदकर, वकील आणि कायदा यांच्या अगोदर तिच्या स्वत:च्या खांद्यावर येते ज्याची किंमत अर्थात तिने स्वत:चा जीव गमावून चुकवली आहे.

मला अश्विनीच्याच काय पण एकंदरीत कुठल्याच बाईच्या चुकांवर किंवा तिने केलेल्या गुन्ह्यावर पांघरूण घालायचे नाही.

एक वकील आणि कायद्याची माहितीगार म्हणून ती जबाबदारी स्वीकारणं मला क्रमप्राप्त आहे. मी कायद्याच्या क्षेत्रात काम करते. माझ्यासमोर जी कुणी व्यक्ती येईल ती बाई किंवा पुरुष असण्यापेक्षा पहिल्यांदा victim असते.

गुन्हेगाराला लिंगभाव चिटकवून त्याच्या गुन्ह्यांचं उदात्तीकरण करणं किंवा खच्चीकरण करणं या दोन्ही गोष्टी मूर्खपणाच्या आहेत. त्यामुळे स्त्री आणि पुरुष असा भेद बघण्यापेक्षा पिडीत आणि शोषणकर्ता अशा कायद्याच्या कक्षेत बसू शकणाऱ्या व्याख्येतच समोर येणाऱ्या गुन्ह्यांचं विश्लेषण केलं जावू शकतं.

 

law-inmarathi

बाईच्या बाबतीत ज्या प्रकारचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, शारीरिक आणि लैंगिक गुन्हे घडतात त्यामध्ये असं समजून चालू, की ५०% गुन्ह्यात ती victim असते. तिची इच्छा नसताना आणि तिची चूक नसताना तिच्यावर बळजबरी करून तिला लुटलं जातं.

अन्याय होतो आणि कायद्याच्या पळवाटा शोधून गुन्हेगार सुटतात. तर २०-२५% गुन्हे असे ही येतात जिथे पुरुष victim असतो.

त्याच्या स्वभावाचा , प्रेमाचा, भोळेपणाचा फायदा घेवून रीतसर त्याला बाईकडून तिच्या घरच्या व्यक्तींकडून लुबाडलं जातं. खोट्या गुन्ह्यांखाली त्याला त्याच्या कुटुंबाला अडकवलं जातं.

तिथं ही खरंच त्याच्यावर अन्याय होतो. बहुसंख्य पुरुष हे सुद्धा अन्यायाचे, अत्याचाराचे बळी असतात हे मोठं मन करून कबूल केलं गेलचं पाहिजे.

उरलेल्या बहुसंख्य केसेस अशा येतात ज्याच्यात स्वखुशीने,स्वेच्छेने पैसा, प्रतिष्ठा, मान, पद, प्रमोशन अशा स्वत:च्या महत्वाकांक्षेला पूर्णत्व देण्यासाठी बाई स्वत:चं शोषण करून घ्यायला तयार होते.

भेटी होतात, ओळख होते, करार होतात, मोहाच्या, आकर्षणाच्या, महत्त्वाकांक्षेच्या पेटलेल्या आगीत अनेक रात्री जळतात. त्याची किंमत बाईला एक तर तिची या अश्विनी बिंद्रे सारखी स्वत:च्या आयुष्याची राख करून चुकवावी लागते.

आणि चुकून माकून ती जिवंत राहिलीच तर समाज तिच्यासाठी वेगळी मानहानीची चिता पेटवत असतो. त्यात त्या बाईला रखेल, डेम, ठेवलेली, कुलटा, अशा शब्दपुष्पांनी सजवून ती आयुष्यभर त्या चितेत जळत राहिली पाहिजे अशी व्यवस्था ही करत असतो. आहे हे असं आहे.

समजा एखादा पैशाने खूप श्रीमंत पण मनाने खूप नीच असा पुरुष समाजामध्ये खूप प्रतिष्ठित आहे तरी त्याच्या घरात बायकोला उंबरठा ओलांडण्याची ही सोय नसते. पदरात एक दोन मुलं टाकून घराण्याचे वारस आणि घराण्याची कीर्ती सांभाळण्याची जबाबदारी तिच्या खांद्यावर आलेली असते.

अशा पुरुषाने बाहेर कितीही तोंड मारलं, त्याने कितीही बायकांशी संबंध ठेवले तरी त्याच्या प्रतिष्ठेला, सन्मानला, कुळाच्या कीर्तीला धक्का पोहोचत नाही पण बाईने जर असं काही केलं तर अर्थात तिच्या सासरच्या माहेरच्या मिळून ४२ पिढ्या नरकात जातात.

बहुदा पुरुषांना विश्वास तोडल्याचे अथवा लफडे केल्याचे पाप लागत नाही असे दिसते कारण पुरुषाने विवाहबाह्य संबंध ठेवले तर त्याच्या शिक्षा काय असतात याचे उल्लेख मी धर्मग्रंथात वाचलेले नाहीत.

मग लैंगिक स्वातंत्र्य उपभोगण्याच्या नावाखाली बाईने स्वत:चा बळी का जावू द्यायचा? कितीही म्हटलं की जगात बाई स्वतंत्र आहे आणि ती तिला काय करायचं ती ते करू शकते.

 

freedom-inmarathi

 

तिला लैंगिक स्वातंत्र्य उपभोगण्याचा हक्क आहे. पण जे स्वातंत्र्य बाईला तिचं झालेलं लग्न, लग्नापासून झालेलं मुल, स्वत:च्या कुटुंबाप्रती,स्वत:च्या लहान मुली प्रती असलेल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, प्रेम यांचा विसर पाडत असेल ते स्वातंत्र्य आहे का स्वातंत्र्याच्या नावाखालचा फास? ज्याप्रमाणे आजपर्यंत पुरुषांनी बायकांना “राखले” आणि राखत आलेत त्या पद्धतीने एखादी बाई पण एखाद्या पुरुषाला खरंच अशी राखू शकते? पूर्णत्वाने कधीच नाही.

अशा संबंधात बाईची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक पातळीवर लूट होते यामध्ये तोटा कधीही बाईचाच होतो. पुरुषाला Contraceptive pills घ्याव्या लागत नाही. पुरुष गरोदर राहत नाही. पुरुषाच्या हार्मोन्स वर परिणाम होत नाहीत. जी काही कुचंबणा होते ती बाईचीच. पुरुषाकडून , समाजाकडून आणि निसर्ग कडून सुद्धा.!!

मुळात लैंगिकता हा स्त्रीच्या जीवनाचा अगदी लहानसा हिस्सा आहे. पिढ्यान पिढ्या ती ज्या गोष्टींपासून वंचित राहिली आहे त्या गोष्टी म्हणजे शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, संपत्तीवरील समान मालकी हक्क, स्वत:चा विकास करण्याचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हे तिच्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहे.

हे सर्व मिळाल्यावर लैंगिक स्वातंत्र्यासाठी वेगळे लढायची गरज उरणार नाही आणि ह्या सर्वांशिवाय लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे एकाऐवजी अनेकांकडून शोषण करून घेण्याचे स्वातंत्र्य. ते जरी घेतलं तरी साध्य काय होतंय?

एक तर बाईचा मुडदा पाडला जातो नाहीतर तिला वापरून फेकून दिलं जातं. यातून नक्की स्त्रीस्वातंत्र्याची किंवा विकासाची कुठली पायरी साध्य होतीये? अश्विनी बिद्रेला ही गोष्ट का नाही कळली? कळली असती तर तिची लहान मुलगी आपल्या आईच्या प्रेमाला आयुष्यभरासाठी पारखी झाली नसती.

बरं लैंगिक स्वातंत्र्य मिळावं हा मुद्दा जरी एक वेळ गृहीत धरला तरी माझ्या choice ने लैंगिक संबंध न ठेवण्याचं स्वातंत्र्य, नाही म्हणण्याचा अधिकार, नाही म्हणण्याचा choice याबद्दल तितक्या ठामपणे का बोललं जात नाही.

ते मध्ये कधीतरी ऐतिहासिक भूमिका फेम दीपिका पदुकोनचा व्हिडीओ आला होता. My choice नावाचा. त्यात सेक्स करणे तो माझा choice आहे ही एकच विवादास्पद गोष्ट जी त्या व्हिडीओला चर्चेत ठेवू शकते ती highlight केली गेली होती.

 

 

मला एक कळत नाही. entertainment industry मध्ये काम करणाऱ्या famous actress घेऊन असले व्हिडीओ काढण्यापेक्षा पोलीस, वकिली, इंजिनीअरिंग, आय टी, कार्पोरेट सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर च्या विविध क्षेत्रात काम कारणाऱ्या लहान शिकवू उमेदवार मुलींना सिनिअर्स कडून blackmail करून त्यांना बदनाम केलं जातं किंवा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरीने प्रवृत्त केलं जातं त्यांना घेवून व्हिडीओ काढा, की ज्याच्यात त्या बोलतील premarital sex बद्दल त्यांना नक्की काय choice दिला जातो.

रेड लाईट वस्त्यामध्ये जावून तिथल्या बायकांना बोलत करा ना काय choice त्यांना ह्या समाज व्यवस्थेने दिला आहे? कारण sex करणे हा जसा choice असू शकतो तसा तो नाकारण्याचा सुद्धा choice असतो जो तिला कधीच दिला जात नाही.

बाईला तुमच्या शरीरसंबंधाच्या मागणीला नकार देण्याचा अधिकार आहे आणि त्या नकाराचा सन्मान केलाच गेला पाहिजे यासाठी campaign कधी राबवले जाणार?

आज संपूर्ण बाईच्या जातीला “कमोडीटी एक्सचेंज”चं साधन समजणाऱ्या या समाजामध्ये लैंगिक स्वातंत्र्याच्या फसव्या, खोट्या गप्पांना बाईने बळी न पडण्याची गरज आहे.

त्यासाठी स्वतःच्या गरजा आणि short cut success चा मोह बाजूला सारून स्वतःचा आत्मसन्मान जपण्याची खरी गरज आहे.

पुरुषांच्या बरोबरीने काम करायचय, पोलिस , वकील, आर्मी , administration अशा male dominated fields मध्ये स्वत:ला सिद्ध करायचयं आहे तर जाहीर आहे त्या क्षेत्रातल्या उच्चपदस्थ विरूध्दलिंगी व्यक्तीकडून गळचेपी होणार, मुस्कटदाबी होणार, छळ होणार, प्रलोभनं दाखवली जाणार तेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्याकडुन प्रेमाची अपेक्षा करत नाही तो तुमच्या आयुष्याचा होम करुन त्यात तुमचा बळी देऊन स्पर्धा संपवतोय हे सत्य भावनिक न होता थंड डोक्याने विचार करुन समजुन घ्या.

इतके कष्ट करुन खडतर आव्हाने पार करुन , जेव्हा बाई पोलिस बनते , वकील बनते , आर्मी ऑफिसर बनते , पायलट बनते तेव्हा त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी वरिष्ठांविरूध्द सांविधानिक मार्गाने लढा  देऊनच तिने पुढं गेल पाहिजे. नाहीतर स्वत:चा वापर करु देऊन किड्या-मुंग्यासारखं मरण्यामध्ये बाईच्या जन्माचं सार्थक लपलय का?

sexual-harassment-inmarathi

 

कारण काय चूक काय बरोबर या समाजाने माझ्यासाठी ठरवलेल्या व्याख्या मी मनावर नाही घेतल्या किंवा नाकारल्या तरीही अश्विनी बिंद्रे सारख्या प्रकरणात जिथे ज्या माणसाला स्वत:चं शरीर दिलं, मन दिलं, भावना दिल्या, त्याच्या प्रेम संबंधापायी सामाजिक प्रतिष्ठा सोडली, इतकच काय स्वत:चं सुखी कुटुंब ही बरबाद केलं त्या माणसाकडून सर्वार्थाने लुटलं जाऊन; शेवटी स्वत:ची निघृण हत्या होईपर्यंत स्वत:चं डोकं आणि मेंदू गहाण ठेवला जात असेल तर निश्चित सावित्रीच्या लेकिंनी पुरुष जातीला किंवा कायद्याला न कोसता अगोदर आपला प्रवास नक्की कुठल्या मार्गावरून चाललाय याच आत्मपरीक्षण करावं जरुर!

गावाकडची जुणी जाणती माणसं सांगतात “गटाराच्या समोर उभं राहून दगड मारला तर गटाराचा रेंदा अंग घाण करुन जातो पण त्या मारलेल्या दगडाचा वाहत्या गटाराला कसलाच त्रास नसतो.”

पण स्वत:हून जर असल्या गटार गंगेत उडीच घेतली तर नंतर मला कुणी वाचवायला का आलं नाही हा शोक व्यर्थ ठरतो ! मग त्यानंतर त्या गटारावर चौक्या बसवा, पाणबुड्या बोलवा नाहीतर शोधमोहीम राबवा, स्वत:च्या हातांनी स्वत:च्या चारित्र्याला, स्वत:च्या आत्मसन्मानाला आणि स्वत:च्या आयुष्याला लावलेला सुरुंग ना कायदा विझवू शकतो, ना पोलीस, ना वकील!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?