' “पुरुषी” कणखरपणाच्या मिथकाला फोडून काढणाऱ्या : भारतीय रणरागिणी – InMarathi

“पुरुषी” कणखरपणाच्या मिथकाला फोडून काढणाऱ्या : भारतीय रणरागिणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – डॉ. परीक्षित शेवडे

स्त्री आणि पुरुष म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचे मूर्तिमंत स्वरूप. दोघेही तसे पाहिले तर स्वतंत्र; मात्र परस्परपूरक. या दोन्हींच्या मिलनातून सृष्टी उत्पत्ती होत असते. स्त्री-पुरुष समानतेबद्दल जरी बऱ्याचदा बोलले-लिहिले जात असले तरी प्रत्यक्षात निसर्गानेच या दोघांत अगदी हेतुतः भिन्नता ठेवली आहे.

शरीररचना शरीरक्रिया या दृष्टीनेही ही भिन्नता आहेच. दोघांमधील संप्रेरके वा अन्य काही स्राव यांतही समानता नाही.

साधारणपणे असे म्हटले जाते की पुरुष हा अधिक कणखर असतो. हे मात्र सत्य नाही. स्त्री ही निश्चितच पुरुषापेक्षा अधिक कणखर असते. नाही पटत? विचार करा; साधे बोट कापल्यावर जो रक्तस्राव होतो तो आपल्याला किती वेदनादायी असतो? आपण सतत त्या जखमेला कुठे धक्का लागू नये याची काळजी घेत असतो. स्त्रिया मात्र दर महिन्याला तीन-चार दिवस याच प्रकारच्या वेदना सहन करत असतात!

प्रसुतीच्या कळा या पुरुषांना कधी तरी कळणे शक्य आहे का? या शारीरिक आणि कित्येक मानसिक वेदना लीलया पचवून चेहऱ्यावरचे हास्य मात्र ढळू न देणारी स्त्री ही नक्कीच अधिक कणखर आहे!

 

 

गेली कित्येक शतके स्त्रियांच्या या कणखरपणावर शंका घेतली गेली. आपल्याच देशात नव्हे तर अगदी जगभरात सर्वत्र हीच स्थिती होती. अमेरिकेसारख्या बलाढ्य आणि प्रगत देशाचे अध्यक्षपद आजवर कोणाही महिलेने भूषवलेले नाही; हे याच शंकेखोर मानसिकतेचे फलित आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

भारतात कोणे एके काळी खेल राजासोबत लढलेली आणि युद्धात आपला पाय गमावून बसलेली त्याची पत्नी विश्पला, दशरथासह युद्धमोहिमेवर जाणारी महाराणी कैकयी इथपासून ते झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतिकारक दुर्गाभाभी व्होरा असे स्त्रीशक्तीचे असंख्य आविष्कार पहायला मिळतात. आताच्या घडीला पडताळून पहायचे झाल्यास भारताच्या आंतरिक व सीमारेषेवरील सुरक्षेतील महिलांचा सहभाग हा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दृश्य आहे.

भारतातील पहिल्या महिला आयपीएस आणि पोन्डिचेरीच्या विद्यमान राज्यपाल किरण बेदी यांचे नाव आपल्याला ठावूक असते.

 

Kiran Bedi 1 Inmarathi

 

मात्र त्यासोबतच क्राईम ब्रांचच्या पहिल्या महिला प्रमुख मीरा बोरवणकर, सीआरपीएफ च्या पहिल्या महिला अधिकारी उषा किरण, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या पदावर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी कांचन चौधरी भट्टाचार्य, आसाममधील बोडो अतिरेक्यांना धूळ चारणाऱ्या पहिल्या आणि एकमेव महिला पोलीस अधिकारी संजुक्ता पराशर अशी देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या स्त्रीशक्तीची यादी न संपणारी आहे.

 

ledies police officer InMarathi

 

देशाच्या सुरक्षा दलांचा विचार करता हा सहभाग तर आणखी अभिमानास्पद आहे. ज्या देशाच्या विद्यमान संरक्षणमंत्री देखील एक महिला आहेत, तिथे असे दृश्य दिसल्यास नवल ते काय?

मा. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपण कोणाही पुरुष संरक्षणमंत्र्याच्या तुलनेत मुळीच कमी नसल्याचे सिद्ध केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सीमासुरक्षा दलांतील महिलांचा सहभाग अधिकच बहरत आहे.

 

 

Nirmala-Sitharaman-InMarathi

 

१० सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘आईएनएसवी तारिणी’ या बोटीतून विश्वपरिक्रमा करण्यासाठी नौसेनेच्या पाच महिला अधिकारी निघाल्या. ‘नाविका सागर परिक्रमा’ असे नाव देण्यात आलेल्या या परीक्रमेचे नेतृत्व लेफ्टिनेंट कमांडर वर्तिका जोशी यांच्याकडे असून त्यांच्या जगप्रवास सुखरूपपणे सुरु आहे.

२६ जानेवारी २०१८ च्या राजपथावरील संचलनात महिला पथकाने मोटरसायकलवरील थरारक कसरती सादर केल्या. या पथकाचे नाव होते ‘सीमा भवानी पथक’!

 

seema bhavani pathak InMarathi

 

शौर्य गाजवण्यात वायुदलातील रणरागिणीदेखील कुठेही मागे नाहीत. फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी मिग-21 लढाऊ विमानाचे यशस्वीपणे सारथ्य केले. लढाऊ विमानाचे एकहाती सारथ्य करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. आतापर्यंत वायुसेनेतील महिला वैमानिक केवळ प्रवासी विमाने व हेलिकॉप्टरच उडवू शकत होत्या.

 

avni-chaturvedi InMarathi

 

१८ जून २०१६ रोजी अवनी चतुर्वेदी, मोहना सिंह आणि भावना कांत या तीन महिला वैमानिकांना भारतीय वायुसेनेच्या इतिहासात प्रथमच बढती प्राप्त झाली. आता या तीनही रणरागिणी मिग, सुखोई यांच्यासारखी लढाऊ विमाने उडवू शकणार आहेत. येत्या काळात हा आकडा आणखी वाढतच जाणार यात शंकाच नाही. नौदल, वायुदल आणि भूदल यांतील महिलांचा सहभाग हा अभिमानास्पद आहेच.

 

awanc-inmarathi

 

मात्र यानिमित्ताने स्त्रीशक्तीचा जो एक वेगळाच कणखर आविष्कार पाहायला मिळाला त्याचाही उल्लेख होणे गरजेचे वाटते. त्याकरता दोन प्रमुख उदाहरणे पाहू. गेल्यावर्षी उरी येथे पापस्थानने केलेल्या हल्यात महाराष्ट्राचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक हे हुतात्मा झाले. आपल्या पतीच्या अंतिम संस्काराच्या वेळी वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी लष्करात भरती होण्याची इच्छा दाखवली. त्यांचे कुटुंबही त्यांच्या पाठीशी उभे राहिले.

 

santosh mahadik 1 InMarathi

 

स्वाती यांनी लष्करात भरती ‘मागितली’ नाही तर त्या आपल्या मेहनतीने एसएसबी परीक्षेच्या पाचही राउंड उत्तीर्ण झाल्या.

लष्करात भरती होण्यात त्यांचे वय हा एक प्रमुख अडथळा होता. मात्र त्यांची जिद्द पाहता तत्कालीन लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी या अटीतून त्यांना अपवाद म्हणून वगळण्यात यावे अशी विनंती शासनाला केली.

तत्कालीन संरक्षणमंत्री मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही ती मागणी मान्य केली आणि चेन्नईमध्ये खडतर सराव पार पाडून या वीरपत्नी लेफ्टनंट पदावर लष्कराच्या सेवेत रुजू झाल्या! विंग कमांडर दुष्यंत वत्स यांना आसाममध्ये ते सारथ्य करीत असलेले चॉपर कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू आला. याच कालावधीत त्यांच्या पत्नी मेजर कुमुद डोगरा या प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये होत्या.

पती गेल्याची धक्कादायक बातमी पचवत ही वीरांगना केवळ ठामपणे उभी राहिली इतकेच नव्हे तर अवघ्या पाच दिवसांची बाळंतीण असलेल्या मेजर कुमुद आपल्या लहानग्या मुलीला कडेवर घेऊन आणि लष्कराचा गणवेष धारण करून आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी धीरोदात्तपणे उपस्थित राहिल्याचे दृश्य अवघ्या देशाने पाहिले.

 

major-dogra-army-martyred-husband-funeral-baby-inmarathi

 

हे लिहिताना आजही डोळ्यांत अश्रू आणि अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. अशा आहेत आमच्या या रणरागिणी. देशाला त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?