' भाषेच्या उगमाची कथा : रोजच्या वापरातली भाषा कशी निर्माण झाली? – InMarathi

भाषेच्या उगमाची कथा : रोजच्या वापरातली भाषा कशी निर्माण झाली?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठीचा भाषेचा गौरव करण्याचा आजचा दिवस. मराठीचा इतिहास मोठा, तिची मुळे तब्बल हजार ते तेराशे वर्ष जुनी आहेत. याचमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

भाषा हा मानवी व्यवहारातला सर्वात महत्वाचा घटक. विचारांची देवाणघेवाण आणि संवाद साधण्यासाठी भाषा वगळता दुसरी माध्यमे केवळ अपुरीच नव्हे तर गैरसोयीची ठरली, म्हणून उत्क्रांतीच्या ठराविक टप्प्यावर भाषेची उत्पत्ती झाली.

 

languages inmarathi
kevin moseri

 

शेकडो वर्ष अव्याहतपणे चालत असलेल्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत नेमकी केव्हा माणसाला भाषेची गरज लागली असेल? काय असेल भाषेच्या उत्पत्तीची कथा? या लेखातून जाणून घेऊयात…

आज आपण इतर प्राणी आणि मानव यांच्यात फरक करायला शिकलो आहोत. उत्क्रांतीच्या प्रवाहात मानवाची जडणघडण इतर प्राण्यांपेक्षा वेगळी झाली आहे.

त्याची शरीरचना, बौद्धिक विकास, या सर्व बाबतीत तो इतर प्राण्यांपेक्षा निराळा ठरला. हाताची रचना आणि कार्यक्षमता यामुळे त्याला साधनप्राप्तीची कल्पना आली.

 

ashmayugin manav inmarathi
blog.richmond.edu

 

आपल्या सोयीसाठी शरीरबाह्य साधने कशी निर्माण करावी याचे ज्ञान त्याला येऊ लागले, आणि या साधनांच्या शोधानंतर त्याने सभोवतालची सृष्टी आपल्या जगण्याला अनुकूल करून घेण्याचे प्रयत्न सुरु केले.

ही गोष्ट आहे सुमारे सत्तर ते ऐंशी हजार वर्ष जुनी. याच सुमारास वैयक्तिक अनुकुलतेबरोबरच त्याने आणखी एक वेगळे तत्व आत्मसात केले, ते म्हणजे समूहजिवनाचे.

खरंतर समूहजीवन विकसित करणारा मनुष्य हा एकटा प्राणी नाही. इतरही प्राण्यांनी समूहजीवन विकसित केलंच की!

पण त्याला आपण कळप किंवा थवा असे म्हणतो, कारण ते मानवी जीवनापेक्षा वेगळं आहे.

माणसाचं समूहजीवन नियमबद्ध, सूत्रबद्ध आणि यंत्रबद्ध आहे. ते नैसर्गिक प्रेरणांनी मर्यादित आहे. आणि नेमकी याच समूहात वास्तव्य करताना संवाद साधण्यासाठी माणसाला भाषेची गरज उद्भवली असावी.

 

scisource_bd8365
wamu

 

या आदिम काळात ही समाज नावाची संस्था जशी व्यापक होत गेली तसा माणूस भाषेच्याकडे वळू लागला. अनुभव, निरीक्षण व प्रयोग यांच्यामुळे वाढत चाललेल्या सृष्टिविषयक व जीवनाविषयक ज्ञानामुळे आणि त्यांचा संग्रह करणे,

ती टिकवणे आणि ती नष्ट होऊ नये यासाठी ती पुढील पिढीच्या स्वाधीन करुन तिचा प्रवाह चालू ठेवण्याच्या इच्छेमुळे!

परंपरा निर्मितीच्या आवश्यकतेमुळे प्रारंभीचे ज्ञान हे जीवनावश्यक साधनांचे होते. ते विज्ञान या सूत्रबद्ध अवस्थेला पोचलेले नव्हे, पण त्याचा विकास त्याचा विकास मात्र होता.

दगड, धनुष्य आणि बाण, शिकार, विस्तव, अन्न, वस्त्र, निवारा, आत्मरक्षण, उदरनिर्वाह इत्यादींशी ते निगडीत होते. पण या सर्वांचे जगण्यासाठी लागणाऱ्या साधनांत प्रतिबिंब उमटवणे, हे काम सर्वसामान्य आणि महत्वाचं म्हणजे सर्वमान्य संकेत स्वीकारल्याशिवाय जवळजवळ अशक्य.

 

ancient-origins.net

 

उत्क्रांतीच्या ज्या टप्प्यावर असे संकेत निर्माण करण्याची संकल्पना माणसाला सुचली, आणि ती अंमलात आणण्याइतकी त्याची प्रगती झाली, तेव्हाच भाषा या संस्थेच्या निर्मितीचा पाया घातला गेला.

पण आदिम काळात आशा अगणित टोळ्या (समूह) अस्तित्वात होत्या. त्या काही एकाच ठिकाणी कायमच्या राहत नसत. शेतीचा शोध लागण्याच्या आधी त्या भटकंती करून ज्या ठिकाणी शिकार उपलब्ध असेल त्या ठिकाणी जात.

या भटकंतीत अन्य टोळ्यांशी त्यांचा संपर्क येणे अपरिहार्य होतेच. आणि उदरनिर्वाहाच्या उपलब्ध साधनांवरून वादही होणे साहजिक होते.

पण प्रत्येक टोळी दुसर्या टोळीशी लढतच राहिली असेही नाही. तसे झाले असते तर माणूस म्हणून पृथ्वीवर शिल्लकच उरला नसता. म्हणजे त्यांच्यात परस्पर सहकार्य, साधनांचे आदान प्रदान, जिव्हाळ्याचे संबध, संताप, द्वेष, आदर इत्यादी भावनिक व्यवहारही होत राहिले.

याच व्यवहारात एका टोळीने विकसित केलेले शब्द दुसर्या टोळीला दिले असतील, नकळत पणे दुसर्या टोळीचे शब्द स्वतः वापरायला सुरुवातही केली असेल. आणि यातूनच शब्दांचा सांस्कृतिक विनिमय होऊन भाषेचा पाया रचला गेला.

 

shikar-inmarathi
i.dailymail.co.uk

 

रोजच्या जीवनातली, व्यवहारातली भाषा सुरुवातीला काही ‘पुढे याच भाषेचा विकास होऊन एकंदर सांस्कृतिक विकासात ती अनन्यसाधारण महत्वाची ठरेल’ या जाणीवेतून वापरली जात नव्हती.

ती एक साचेबध्द प्रक्रियेतून जाणारी आवश्यक अशी सामाजिक सवय होती. विशिष्ट संदर्भात विशिष्ट वेळी आवश्यक असणारे संकेत, लागतील तसे वापरणे एवढाच तिचा मर्यादित उपयोग होता.

पण या वापरात ज्यावेळी व्यक्तिवैशिष्ट्याची भर पडली, किंवा या नियमबद्ध रूपाबाहेर जाऊन स्वतःजवळचे संचित आपल्या पद्धतीने सांगण्याची व्यक्तीला जरूर वाटली, त्या वेळी भाषेचे जे व्यक्तीची छाप असलेले स्वरूप अस्तित्वात आले ते म्हणजे त्या भाषेची स्वतंत्र शैली.

आपले शिकारीतले अनुभव शब्दात व्यक्त करताना, एखाद्याच्या गैरहजेरीत घडलेल्या घटना त्याला सांगत असताना, शैलीचा वाटा मोठा असतो.

शुद्ध आशयाच्या पार जाऊन व्यक्तीचा द्वेष, नाराजी, आनंद, मत्सर, प्रेम, वासना इ. मानवी भाव भावनांचे त्यात कळत नकळत मिश्रण होते.

 

Chandler, Allen, 1887-1969; Later Old Stone Age

 

बोलणे ही जरी शारीरिक क्रिया असली तरी आशय, अनुभव व्यक्त करणे ही मानसिक क्रिया आहे. भाषा हा सामाजिक वारसा असला, तरी तिचा उपयोग ही व्यक्तिनिष्ठ क्रिया आहे आणि तिच्यातून व्यक्तिभिन्नत्व प्रतिबिंबित होणे अपरिहार्य आहे.

पण भाषेची उत्पत्ती आणि विकास हा एका ठराविक कालावधीच्या दरम्यान झाला असे म्हणणे चूक ठरेल.

तिच्या विकासाची प्रक्रिया प्रवाही आणि निरंतर आहे. टी आजही तशीच चालू आहे. आणि महत्वाचं म्हणजे भाषा नष्ट होत नसते. तिचा गाभा आदिम असतो. कितीही आक्रमणे झाली तरी फारतर तिचे वरपांगी असणारे स्वरूप बदलले जाऊ शकते. गाभा तसच राहतो.

 

barakhadi-inmarathi
encrypted-tbn0.gstatic.com

 

आज “मराठीचे अस्तित्व नामशेष होत आहे काय?” असा प्रश्न विचारणार्यांनी हे ध्यानी घेणे गरजेचे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?