'जेव्हा खिलजी "पुण्यातल्या पोरी" शोधायला बाहेर पडतो तेंव्हा...

जेव्हा खिलजी “पुण्यातल्या पोरी” शोधायला बाहेर पडतो तेंव्हा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक: डॉ. बिपीन राजन कुलकर्णी 

===

लढाया करायच्या, अधाश्यासारखं खायचं आणि रिकाम्या वेळात सुंदर मुलींचा माग काढत फिरायचं हीच खिलजी ची लाइफस्टाइल होती. हॉस्टेल च्या पोरांची असते बहुतेकदा तशी.

तर पुण्यातल्या पोरी भारी दिसतात अशी माहिती एकदा त्याला कट्टयावर समजली.

 

khilji-inmarathi
thehindu.com

 

मग काय तो मलिक ला बोलला चल रे मल्लू, जरा चक्कर मारून येऊ. पार्किंग चा प्रॉब्लेम नको असं म्हणून एकाच घोड्यावर दोघे निघाले.  मलिक पुढे. खिलजी मागे.

मलिक ने सांगितलं होतं की व्यवस्थित बसायचं, मागून काही टोचवायच नाही, नाहीतर मी नाय येणार तुझ्यासोबत. चिल्ड बियर पाजतो च्या अटीवर खिलजीने त्याला कसंबसं तयार केलं.

झालं यांची स्वारी निघाली.

कर्वेरोड वरून दर दोन मिनिटाला लागणाऱ्या सिग्नल मुळं दोघे परेशान झाले.

 

pune traffic inmarathi
hindustan times

 

तरी बरं अजून मेट्रो च काम सुरु झालं नाही, मग बघा मजा हे मलिक चे वाक्य ऐकून सिग्नल ला दोन अपरिचित पुणेकर एकमेकांकडे पाहतात तश्या नजरेने त्याच्याकडे एका काकांनी कटाक्ष टाकला.

यथावकाश गुडलक चौकात पोचेपर्यंत मागून टोचवू नको हां खिल्लू असं मलिक दोन तिनदा बोलला. वाडेश्वर च्या समोर थांबलेला एक घोळका पाहून खिलजीने घोड्यावरून उडी मारली.

मलिक पार्किंग साठी जागा शोधू लागला. तोवर खिलजीने हावऱ्या सारखं जितकी लाईन मारता येईल तेवढी मारली. घोडा पार्क करून मलिक ने येऊन खिल्जीच्या पाठीवर थाप मारली. खिलजी दचकला.

 

wadeshwar-inmarathi
cdn.tripadvisor.com

 

म्हणाला “अरे मज्जाच झाली. मगापासून त्या लांब केसाच्या मुलीकडे पाहत होतो, नंतर लक्षात आलं तो मुलगा आहे. सॉलिड कन्फ्युजन झालं यार”…

“यात नवीन काय?” असं म्हणून मलिक ने मान झटकली.

“मल्ल्या लै शांपणा करू नको, तुझी तर…”

“गप लका. मला आता सवय झालीय. अन मल्ल्या मल्ल्या म्हणू नको, तुला आणि मला कुणीतरी बँकवाले घेऊन जातील”

आलेला राग मावा थुंकावा तसा थुंकून दोघे चालत फिरू लागले. चर्चेत त्यांना मस्तानी बद्दल कळलं.

मग ती कुठं आहे पहावं म्हणून ते आपल्या घोड्याकड आले तोवर व्हाईट लाईन च्या बाहेर घोड्याच्या शेपटीचा केस आला म्हणून ट्रॅफिक वाल्यानी घोडा टो केला होता.

तो सोडवून घेता घेता याना बरंच मनस्ताप झाला.

“आयला आज या घोड्यान घोडा लावला यार” खिलजी बोलला.

मलिक ने ऐकून न ऐकल्यागत केलं. मग दोघे मस्तानी च्या शोधात निघाले. गुगल मॅप ने त्यांना सुजाता मस्तानी दाखवली. तिथं गेल्यावर त्यांना आपण चुकीच्या ठिकाणी आल्याचं जाणवलं.

मुघल ला गुगल ची काय गरज असं म्हणत आता आपण विचारत विचारत जाऊ असं त्यांनी ठरवलं.

 

sujata-mastani-Ice-creame-parlour-inmarathi
marttalk.com

 

मग एका काकांना थांबवून त्यांनी विचारलं “मस्तानी कुठं राहते?” काका म्हणाले” तुला का सांगू?” अन निघून गेले.

मग एक कॉलेज कुमार भेटला. त्याने कानात हेडफोन घातले होते त्यामुळं यांचा आवाज त्याच्यापर्यंत पोचलाच नाही.  मग एका पानवाल्याला विचारलं. त्याने पहिल्यांदा एक लांब लाल पिचकारी मारली अन बोलला,

“इथून कॉर्पोरेशन पर्यंत सिद्दे जा. सरळ. इकडं तिकडं न पाहता. मग काय येईल?”

“मस्तानीच घर?”

 

paanwala inmarathi
justdial

 

“चूक. कॉर्पोरेशन….साला एवढं पण नाय कळत. बरं. कॉर्पोरेशन च्या तिथं एक ब्रिज आहे त्यावरून जा. मग अजून सरळ गेल्यावर चौक येईल. तिथून राईट मारा. मग शनिवारवाडा येतो. तिथं विचारा कुणाला पण…”

ओके म्हणून निघाले. नेमका राईट न घेता यांनी लेफ्ट घेतला मग सरळ गेले. तर कुंभारवस्ती आणि त्याच्या पुढं जुना बाजार लागला.

त्यात हे इतके हरवून गेले की मलिक ने डंबल, शूज, लोखंडी पेटी काय वाट्टेल ती खरेदी केली. पैसे संपून गेले. एवढ्या लगेज चे एक्स्ट्रा चार्जेस लागतील असं घोड्यान सांगितलं. वैतागून सगळं कॅन्सल करून दोघे माघारी आले.

अन राग आल्यानं खिलजीने डान्स केला.

 

khilji-dance-inmarathi
freepressjournal.in

 

हाच तो सुप्रसिद्ध खलीबली डान्स. मलिक ने हळूच तो शूट केला आणि युट्युब वर टाकला. तो भन्साळी ने पाहिला आणि पुढं जे घडलं ते आपणास ठाऊक आहेच.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?