' काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २ – InMarathi

काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग २

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पहिल्या भागाची लिंक: काश्मिरी पश्मिना: गुंतागुंतीच्या, नाजूक प्रश्नाचा तरल पडदा: भाग १

काश्मीर या मुद्द्यावर चर्चा करताना एक मूलभूत चूक आपण सगळेच भारतीय करत असतो ती म्हणजे केवळ काश्मीरचा मुद्दा. जम्मू हा भागच आपण पूर्णपणे विसरतो. प्रत्यक्षात प्रश्न जम्मू आणि काश्मीर या एकसंध राज्याचा होता. ह्या एकसंध राज्याचा सर्वेसर्वा महाराजा हरिसिंग होता.

एकदा हा मूलभूत घटक लक्षात घेतला की समजेल समग्र जम्मू काश्मीर हा एकमेव एकसंध प्रश्न नाही. त्याला वेगवेगळे पैलू आहेत. या सगळ्याचा पैलूंचा अभ्यास त्या प्रदेशाच्या भौगोलिक स्थिती आणि मानववंशशास्त्रासकट सेंद्रिय पद्धतीने व्हायला हवा. तो नं केल्यामुळे आपल्याकडून होणारी आणखी एक सर्वात मोठी चूक म्हणजे काश्मीरचा प्रश्न बहुतेकदा भारतीय विरुद्ध काश्मिरी, हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि आजकालच्या परिभाषेत देशप्रेमी विरुद्ध देशद्रोही अश्या तऱ्हेने चर्चेला येत असतो.

jammu kashmir 00 marathipizza

काश्मीर हा एकसंध भाग नाही. काश्मीरमध्ये सरसकट सगळे मुसलमान एकाच पठडीतले नाहीत. काश्मीरमध्ये भौगोलीकदृष्ट्या तीन भाग आहेत. पहिला जम्मू (२५%), दुसरा काश्मीर खोरे (२१%) आणि तिसरा लडाख(६१%). जम्मू मधून बनिहाल किंवा हाजीपीर खिंड ओलांडून गेलं काश्मीर सुरु होतो. भूगोल वेगळा, भाषा वेगळी , पेहराव वेगळा, खाण्यापिण्याची पद्धती वेगळी. थोडक्यात संस्कृती वेगळी. ‘धर्म म्हणजे जगण्याचा मार्ग’ असं कोणीतरी बदमाशाने सांगितलंय आणि अनेक मूर्खांनी खरं मानलंय. जगण्याचा मार्ग संस्कृती असते.

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटिश काळात भारतातल्या सर्व मुस्लिमांना वेगळा देश हवा होता हा एक चुकीचा समज आहे. तिसरा चुकीचा समज म्हणजे भारताबाहेर जायचं होतं, थोडक्यात वेगळं राहायचं होतं अश्या सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात जायचं होतं हा.

थोडक्यात भारताल्या मुस्लीमांमध्यें तीन प्रमुख विचार होते. एक पाकिस्तान, दुसरा हिंदुस्थान आणि तिसरा स्वतंत्र राष्ट्र. (यावर मग पाकिस्तानात जाता येत नव्हतं म्हणून स्वतंत्र राहावं लागत होतं की अजून कसं यावर वाद घालता येईल पण ही ती जागा नव्हे.)

गेल्या लेखात भुजंगाची उपमा दिली गेलेले शेख अब्दुल्ला स्वतःला काश्मिरी जनतेचे हृदयसम्राट मानत. शेख अब्दुल्लांचा इतिहास आणि काश्मीरचा इतिहास हा एकच आहे. इतका की त्यामुळेच आजही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना स्थान आहे. (आणि इतका महत्वाचा मनुष्य आमच्या इतिहासाच्या पुस्तकात एका वाक्यात गुंडाळलाय. अनुल्लेखाने मारला की अजून काही?)

shaikh-abdullah-nehru-marathipizza

 

शेख अब्दुल्लांचे राष्ट्रीय गुरु म्हणजे कवी महंमद इकबाल. तेच ते “सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्तां हमारा” लिहिणारे. हा मूळचा काश्मिरी कवी पुढे पाकिस्तानची प्रेरणा बनला हा भाग अलहिदा. मुर्त्या आणि मूर्तिपूजा करणारे नष्ट करून इस्लामने फार मोठं कार्य केलं आहे असं मानून सुफी पंथाच्या विरोधात प्रचार करणारे महंमद इकबाल अब्दुल्लांना आपला वारसा देऊन गेले.

थोडक्यात शेख अब्दुल्ला एक धर्मांध मुसलमान आणि स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचे कट्टर पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्याआधी काश्मीरमध्ये झालेल्या दंगलींना त्यांची उघड चिथावणी असे. महाराजा हरीसिंगांना ते हिंग लावून विचारत नसत. उलट स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा तोच तर शत्रू होता. आजच्या तरुणांना शेख अब्दुल्लांची भाषणे वाचायला दिली तर झैद हमीद वगैरेची भाषणे वाचतोय असे वाटेल आणि फेसबुक ट्विटरवर याची टिंगल टवाळीसुद्धा सुरु होईल. पण या त्यांच्या पावित्र्याचा सरळ सरळ प्रभाव काश्मिरी जनतेवर पडे. एकदा एका सभेत चिथावणीखोर भाषण देऊन शेख अब्दुल्ला निघून गेले. त्यांच्या मागे अब्दुल कादीर नावाचा एक तरुण त्यांनाही लाजवेल असा चिथावणीखोर विचार मांडून गेला. या अब्दुल कादीर विरुद्ध राजद्रोहाचा खटला सरकारने भरला. १३ जुलै १९३१ ला याची सुनावणी होत असताना शेकडोंच्या संख्येने मुस्लिम बांधव कोर्टावर चाल करून आले. पोलीस गोळीबारात २२ मृत्युमुखी पडले. १३ जुलै ही तारीख आजही काश्मिरात “राष्ट्रीय हुतात्मा दिवस” म्हणून पाळली जाते. शेख अब्दुल्ला हिरो झाले ते तेव्हापासून.

१६ ऑक्टोबर १९३२ साली ‘ऑल जम्मू अँड मुस्लिम कॉन्फरेन्स’ स्थापन झाली. बेत होता जम्मू आखणी काश्मिरातल्या साऱ्या मुस्लिमांना एका झेंड्याखाली आणण्याचा.

वर विषद केल्याप्रमाणे जम्मू आणि खोऱ्यातील मुस्लिम एकत्र नाहीत. जम्मूत हिंदू दोन तृतीयांश आहेत. तिकडचे मुसलमान अधिक कडवे आणि पाकिस्तानी मनोवृत्तींशी मेळ खाणारे आहेत. त्यांची भाषाही पंजाबी आहे. त्यांनी शेख अब्दुल्लांना कधीच थारा दिला नाही. खोऱ्यातले मुसलमान मात्र धर्मांतरित आहेत. (भट, लोन, चौधरी, गुरु आडनावे पहा. ही मूळची ब्राह्मण मंडळी) शेख अब्दुल्लांचे पणजोबा हिंदू होते. आजही अनेक मुस्लिम आपल्या हिंदू पूर्वजांची आठवण काढतात. अमरनाथ यात्रा हेच पार पडतात. पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग सारख्या ठिकाणी हिंदू यात्रेकरूंना हेच मदत करतात. काश्मीरमधल्या शंकराचार्य किंवा जम्मूतल्या वैष्णवदेवी मंदिराशी हेच लोक अधिक असतात. शेख अब्दुल्लांनाही याच मुसलमानांचं प्रेम अधिक होतं.

पंडित प्रेमनाथ बजाज या रॉयवादी पुरोगाम्याच्या सल्ल्याने शेख अब्दुल्लांनी मुस्लिम कॉन्फरेन्सचे नाव नॅशनल कॉन्फरेन्स केले. नेहरूंनी त्यांना आपला पक्ष हिंदूंसाठीसुद्धा खुला करण्याचा सल्ला दिला. संधी साधली नाही तर ते शेख अब्दुल्ला कसले? महंमद अली जिनांनी १९४० साली पाकिस्तानच्या मागणीचा ठराव पास करून घेतल्यावर अब्दुल्ला धर्मनिरपेक्ष, पुरोगामी मुसलमान म्हणून पुढे आले. प्रत्यक्षात त्यांचा पक्ष मुस्लिमच राहिला. पुढेही त्यांच्या सभा मशिदीतच होत. सभांची सुरवात आणि अंत कुराणातील आयतींनीच होई. मिरवणुकांमध्ये अल्लाहो अकबरच्या घोषणा होत. नेहरू आणि सरदार पटेलांना तर अब्दुल्ला हिंदु जातीयवादी म्हणून ओळखत.

इतकं सगळं होऊनसुद्धा शेख अब्दुल्लांना स्वतंत्र राहायचं होतं हे लक्षात घ्यायला हवं. काश्मिरीयतच्याच मुद्द्यावर त्यांचा जीनांशी खटका उडाला होता. त्याच भावनेतून भारताची संस्थानांच्याच संख्येएवढी शकले करणारी क्रिप्स योजना त्यांनी उचलून धरली कारण त्यात स्वतंत्र काश्मीर होता. जिना तर नॅशनल कॉन्फरेन्सला गुंडांचा पक्ष म्हणत. परंतु मौलाना आझाद, बादशाह खान, जवाहरलाल नेहरू यांच्याशी सख्य जमवत जिनांविरुद्ध एकी दाखवत शेख अब्दुल्ला पुरोगामी गोतावळ्यात शुचिर्भूत झाले. नेहरूंमार्फत काश्मिरी हिंदूंना आपल्या पक्षाला साथ देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या दिवसांत चक्रे उलटी फिरली. प्रिव्ही कौन्सिल स्थापन होऊन राजे मंडळींनी आपल्याला राज्य टिकवता यावे याची खटपट केली. पण ती व्यर्थ ठरली. महाराजा हरिसिंगाना परके मानून अब्दुल्लांनी ‘क्वीट काश्मीर’ चळवळ सुरु केली. जनतेचा लढा असा भाबडा समज बाळगून त्यात नेहरूही सामील झाले.

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास झाला. संस्थानांना भारतात रहा, पाकिस्तानात रहा किंवा स्वतंत्र असा पर्याय दिला गेला. नेहरूंनी घोषणा केली. “भारत किंवा पाकिस्तान”.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्रक प्रसिद्ध करून सांगितले:

संस्थानांना स्वतंत्र होताच येणार नाही. ही संस्थाने भारताची आहेत आणि त्यांचे सार्वभौमत्व संपवण्याचा अधिकार ब्रिटिश संसदेला नाही.

त्यातला व्यावहारिक शहाणपणा मांडला माउंटबॅटन यांनी.

या सगळ्यात काश्मीरचे काय हाल झाले त्याचे तपशील पुढील लेखात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Sourabh Ganpatye

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

sourabh has 32 posts and counting.See all posts by sourabh

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?