' मोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा – InMarathi

मोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – शुभम क्षीरसागर

===

“Bajirao has head to plan and Hands to execute” बाजीरावांचे असलेले हे वर्णन अतिशय चपखल आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राला लाभलेल्या या योद्धयाला अनेक लोकं फक्त मस्तानीपुरतेच बघतात.

अश्या सर्वांसाठी, बाजीरावांचा हा रणसंग्राम लिहित आहे.

“जो गती ग्राह गजेंद्र की,
सो गती भई जानहू आज |
बाजी जात बुंदेलन् की,
राखो बाजी लाज ||”

बुंदेलखंडाचे महाराज श्री छत्रसाल यांनी आपल्या विश्वासू दुर्गादास राठोड नावाच्या सेवकाकरवी हे पत्र थोरल्या बाजीरावसाहेबांना फेब्रुवारी १७२९ साली पाठवले.

महंमदखान बंगश याने मोठ्या फौजेसह बुंदेलखंडावर आक्रमण केले आणि आघाडीवर लढत असणारा वृद्ध छत्रसाल घायाळ होऊन जैतापूरजवळ असणाऱ्या किल्ल्यात आश्रय घेता झाला.

त्यावेळी मध्यप्रदेश येथे गढामंडलानजीक बाजीरावांना ते पत्र मिळाले. त्याच वेळी उज्जैनला वेढा घालून बसलेल्या चिमाजी

अप्पांना राऊंनी बुंदेलखंडास जात असल्याचे लिहून कळवले. (सोबत पत्राचा फोटो).

 

 

दि १२ मार्च १७२९ रोजी महोबा गावानजीक छत्रसाल व बाजीराव पेशव्यांची भेट झाली. आणि महोबा गावापासून मराठ्यांची सेना जैतापूरच्या रोखाने दौडत निघाली.

दि ३० मार्च १७२९ रोजी मराठे व बुंदेले विरुद्ध बंगश अशा लढाईला तोंड लागले.

आपल्या अश्वावर बसून स्वतः पराक्रमाचे मूर्तिमंत अवतार थोरले बाजीरावसाहेब आपला पराक्रम गाजवीत होते. अवघं मराठी लष्कर शौर्याची परिसीमा गाजवून लढत होतं.

तुंबळ युद्ध झालं. मराठ्यांच्या सैन्याने बंगश व सैन्याला पुरतं झोडपून काढलं. बंगश बाजीरावांचा आवेश बघून थक्क झाला असेल.

बाजीरावसाहेबांची २५००० संख्येची फौज तर हर हर महादेवच्या गर्जनावर गर्जना करत होती. एवढ्या मोठ्या फौजेसमोर मुळातच निभाव लागणं अगदीच कठीण त्यात भरीस भर म्हणून स्वतः थोरले पेशवे युद्धनेतृत्व करत होते.

मग त्यासमोर त्या बंगशाचा निभाव तो काय लागणार?

काही घटिकांचं युद्ध होऊन चांगलाच झोडपलेला बंगश सैन्यासह जैतापूर किल्ल्याचा आश्रय घेता झाला.

दुसऱ्या दिवशी बुंदेल्यांच्या व मराठ्यांच्या संयुक्त फौजेने जैतापूर किल्ल्याला वेढा घातला. स्वतः थोरले बाजीरावसाहेब घोड्यावर बसून वेढा आवळून बसले होते.

जैतापूर किल्ल्याला वेढा घातल्यापासून बंगश निसटायची संधी शोधत होताच.

त्याचा भाग म्हणून आणि थोरले पेशवे बेसावध असतील तर त्यांना हरवणे सोपे होईल या हेतूने जैतापूर किल्ल्यातून उरलेसुरले अवसान एकत्र करून बंगशाने एक फौज मराठयांच्या सैन्यावर पाठवली.

 

peshva-bajirao-inmarathi

 

पण, साक्षात समर्थांच्या उक्तीचे बाळकडू मिळालेल्या महाराष्ट्रात छत्रपतींच्या वंशजांची फौज “अखंड सावधान असावे” या नीतीने वागणार याची कल्पना त्या बंगशाला नसावी.

बाजीराव सावधच होते. आलेला हल्ला तितक्याच त्वेषाने परतवुन लावला.

नंतर, बंगशाने दिल्लीला कुमक पाठवावी म्हणून खलिता धाडून दिला होता. त्यानुसार स्वतः बंगशाचा पुत्र कायुमखान दहा हजार (१००००) फौजेनिशी बुंदेलखंडाकडे निघाला होता असे बाजीरावसाहेबांना समजताच त्यांनी बाजीपंत रेठरेकर व काही सैन्यास या फौजेचा बंदोबस्त करण्यास पाठवुन दिले.

बाजीपंतांनी कायुमखानाच्या सैन्यास फारशी लढाई न करता झोडपून बुडवले. इकडे बिचारा बंगश कुमक येण्याची वाट बघत बसला.

शेवटी कुठलाच उपाय चालेना, बंगशाच्या सैन्याला उपासमार व्हायला लागली.

सैन्यात असणाऱ्या मुसलमान सैनिकांनी किल्ल्यातील जनावरं मारून खाल्ली. आता कुठून मदत मिळणार नाही हे बंगशाच्याही लक्षात आले.

एकीकडे निराशा तर दुसरीकडे सैन्याची उपासमार . बंगशाने शरणागती स्वीकारावी असा निर्णय घेतला आणि पांढरे निशाण घेऊन शरण आला.

शरण आलेल्याला मरण नाही म्हणून बाजीरावसाहेबांनी बंगशाला माफ केले. पुन्हा बुंदेलखंडावर चढाई करणार नाही असे लिहून घेतले व जाऊ दिले.

दि ३० एप्रिल १७२९ रोजी मराठ्यांना जैतापूरचा किल्ला मिळाला. बाजीराव आणि सैन्याला मोठा जय मिळाला. छत्रसाल महाराजांनी थोरल्या पेशव्यांच्या सन्मानार्थ पन्ना येथे दरबार भरवला.

अनेक नजराणे बाजीरावांना पेश केले गेले.

 

छत्रसाल महाराजांनी खुश होऊन झाशी, हट्टा, सिरोंज, बांदा, गडकोटा, काल्पी हे प्रदेश तसेच झाशी प्रदेशात येणारा किल्ला, व दोन ते अडीच लक्ष उत्पन्नाचा मुलुख नजर केला.

तसेच, मृत्यूसमयी छत्रसाल महाराजांनी आपल्या सगळ्या राज्याचा एक तृतीयांश (३३%) हिस्सा थोरल्या पेशव्यांना दिला.

 

bajirao-peshwa-inmarathi

 

असा मोठा जय मिळवून बाजीरावसाहेब २३ मे रोजी जैतापूरहुन निघाले आणि १६ जुलै रोजी पुण्यात पोहोचले.

संदर्भ –
मराठा रियासत – गो स सरदेसाई
पेशवाई – श्री कौस्तुभ कस्तुरे
पेशव्यांची बखर

टीप – भारतात झालेल्या प्रत्येक योद्धयाने केवळ राष्ट्रीयत्वाची कास धरून आपले पराक्रम गाजवले आहेत. त्यात जातीपातीसारख्या फालतू गोष्टींना कुठलाही थारा दिलेला नाही. थोरले पेशवे असोत किंवा दुसरे बाजीराव असोत सर्वानी केवळ थोरल्या कैलासवासी स्वामींच्या या श्रींच्या राज्याची आपल्या परीने सेवा केली आहे. तेव्हा कृपया जातीवाचक विशेषणे लावून त्यांना उगीच बाटवू नये!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?