'"आपला मानूस" चित्रपटात हरवलेलं "आपलं" पण

“आपला मानूस” चित्रपटात हरवलेलं “आपलं” पण

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

नटसम्राट नंतर नाटकाचे चित्रपट बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला, त्यासोबत काही मूलभूत चुकांची परंपरा ही सुरू झाली. चित्रपट म्हणजे रिअल लोकेशनवर शूट केलेलं नाटक पडद्यावर बघणं नसतं. हा एक स्वतंत्र कला प्रकार आहे.

नाटकाची आणि चित्रपटाची पटकथा, अभिनय यांत मूलभूत बदल तर असतातच पण सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणचे चित्रपटात कॅमेराही बोलत असतो, इथं सगळं कॅमेऱ्यासाठी केलं जातं. नेमक्या याच गोष्टी “आपला माणूस” बनवताना निर्माते विसरल्याचं दिसतंय.

गॅलरीतून पडलेल्या वृध्दाच्या केसची तपासणी करणारा पोलीस आणि त्याने एका विवाहित जोडप्याची त्यातून केलेली दमछाक म्हणजे हा चित्रपट. सोबतच सस्पेन्सचा तडका देऊन उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. “काटकोन त्रिकोण” या सुप्रसिद्ध नाटकावर हे कथानक आधारलेलं आहे. एक मिश्किल, काहीसा त्रासदायक वृद्ध, त्याचा मुलगा आणि सून या त्रिकुटांच्या काटकोन त्रिकोणाची ही गोष्ट.

इतरवेळी कथा तर्काच्या दृष्टीने काटेकोर असावीच अस नसतं पण एका संशयित अपघाताची रहस्यकथा पोलीस पात्राकडून उकलताना कथेत तर्क नसेल तर वास्तवाशी आणि म्हणून आपल्याशी कथा रिलेट करतच नाही.

 

aapla-manus-inmarathi
youtube.com

पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालेल्या गोष्टी योग्य धक्का द्यायच्या पॉइंटलाच मुद्दाम सांगितल्या जातात. मुळात कुठला पोलीस आपलं सगळं कौशल्य संशयितांच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या सोडवण्यात घालेल? इथेच सिनेमाची रिलेटिबिलिटी संपते.

‎AK 47 बंदुकीने फुगे फोडले तर कसं वाटेल? तसं या चित्रपटात नाना पाटेकरचं झालंय. यशवंत, अब तक छप्पन सारख्या चित्रपटातून नानांनी नेहमी लक्षात राहतील अशा पोलिसांच्या भूमिका निभावल्यात, इथे मात्र या बंदुकीच्या नशिबी फुगे आलेत. एवढ्या ताकदीच्या नटाकडून वाईट काम करून घेण्याचे श्रेय मी आधी दिग्दर्शक सतीश राजवाडेना देईल आणि नंतर नानाला सुद्धा.

चित्रपटाच्या पोस्टरवरच नानांचा एवढा मोठा फोटो लाऊन जाहिरात होत असताना अशा मध्यवर्ती पात्राच्या निवडीबाबत या वेळेस नाना चुकला.

नाटकात असतात तसे पल्लेदार, मोठे संवाद पाठ करुन बोलल्या सारखं वाटत राहतं. त्यात थोडासा गावठी टोन, मध्येच इंग्रजीत बोलणं, या गोष्टी असंबंध वाटतात. नाटकात सगळ्यांना तुमचा चेहरा अगदी जवळून दिसत नसतो, आणि सगळ्या अँगलनेही दिसत नसतो. मात्र चित्रपटात बऱ्याच गोष्टी न बोलता वास्तविक आयुष्यात होतात तश्या दृश्यांच्या हालचालीतून आणि त्याला पूरक असणाऱ्या संयमी अभिनयातून सांगितल्या जातात. याच्या अनुशंगाने अभिनय कमी पडला.

 

eravati-and-sumit-inmarathi
youtube-inmarathi

इरावती हर्षे आणि सुमित राघवन यांनि नवरा बायकोची भूमिका सुंदर प्रकारे साकारली आहे. त्यांचा अभिनय विशेष संयमी झालाय, प्रसंगी जास्त उजवा झालाय.

स्वतःच्या वडिलांवर चिडतानाच्या एका प्रसंगात तर सुमित मस्त छाप पाडून जातो. अपघात, आत्महत्या, खून अशा गोंधळात टाकणारी कथा असताना सस्पेंस निर्माण करत राहणं ही प्राथमिक गरज असते, या भागात दिग्दर्शकाला चांगलं यश आलय. नात्यांचा उलगडत जाणारा प्रवास, मुलाला आणि सुनेला आपल्या चुकांचा होणारा साक्षात्कार, त्यांच्यासोबत खेळणारा चाणाक्ष पोलीस या गोष्टी छान जमल्यात.

तांत्रिक बाबीत बरच सामान्य, सुमार काम झालंय. एवढा सस्पेंस असल्याने कॅमेऱ्याने तो गोंधळ टिपायला चांगली संधी होती. किंबहुना यासाठी संभाषण आणि कथेइतकाच महत्वाचा भाग कॅमेरा वर्कचा होता.

गॅलरीतून उडी घेण्याच्या प्रसंगी ड्रोन का नाही वापरला हे खटकत राहतं. ( कॅमेऱ्याने सस्पेंस दाखवण्याचं उत्तम काम “भूत” या चित्रपटात झालय) पण त्याच घरगुती मालिका शूट केल्याप्रमाणे शोल्डर शॉट्सचा भडीमार केलाय. एडिटिंग स्टाईल काहीशी “तलवार” चित्रपटातून घेतलेली वाटली.

 

Aapla-Manus-2018-Marathi-Movie-inmarathi
starmarathi.in

तसं एडिटर ला करायला फार काही काम ठेवलंच नव्हतं कारण सगळ्या चढ उताराची जबाबदारी पल्लेदार संवादांची होती.

संगीत तर अतिसामान्य. शेवटच्या लॉंगटेकला टिपिकल व्हायोलिन चा आवाज सुरू झालाकी कळून चुकत हाच शेवट आहे, आणि आणखी एक टिपिकल The End बघितला म्हणून प्रेक्षकांची चुळबुळ सुरू होते. पोस्टरवरचा नानाचा भारी फोटो किंवा त्याच्या अभिनयाची आस ठेऊन जाणाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत.

क्राईम, सस्पेंस या प्रकारासाठी लागणाऱ्या तांत्रिक कौशल्याची कमतरता, नाटकाचा चित्रपट करताना अनिवार्य असणारे बदल, जास्तीचे संवाद आणि रिपीट होणारे सीन्स यामुळे सिनेमा सुमार झालाय.

संस्पेन्स, नात्यांतला गुंता आणि इरावती, सुमित यांच्या अभिनयासाठी चित्रपटाला मी देतोय पाच पैकी दोन स्टार

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?