'"रावण : राजा राक्षसांचा", रावणाची बाजू मांडणारी, पराभूताचा इतिहास दाखवणारी कादंबरी

“रावण : राजा राक्षसांचा”, रावणाची बाजू मांडणारी, पराभूताचा इतिहास दाखवणारी कादंबरी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

लेखक : रामदास कराड

===

कुठलंही पुस्तक वाचून झाल्यावर स्वाभाविकच मी काही प्रश्न स्वतःला विचारतो. या पुस्तकातून मला काय घेता आलं? या पुस्तकाने मला काय दिलं? मात्र कधी कधी उत्तर शोधायची धडपड असूनही ते अनेकदा सापडत नाही. मनही हवं असलेलं उत्तर कधी कधी देत नाही. कारण खोलवर कुठेतरी त्या पुस्तकाने मनाचा ठाव घेतलेला असतो. ‛रावण – राजा राक्षसांचा लेखक श्री. शरद तांदळे’ यांच्या कादंबरीचंही अगदी तसंच आहे.

 

Ravan Raja Rakshsancha inmarathi

 

ही कादंबरी मी तीन वेळा वाचली. पण प्रत्येक वेळी ती मला अगदी नवीनच भासली. सर्व पात्रांची पुन्हा नव्याने ओळख झाली.

असंख्य जाती, जमाती रावणाच्या साम्राज्यात सुखनैव नांदत होत्या. त्याने स्वतःची राक्षस संस्कृती उभी केली होती. त्याच्या राज्यात प्रत्येकाला राहायला, स्वतःची जात, धर्म, संस्कृती जपण्याचा, विचार मांडण्याचा हक्क, अधिकार होता. मुक्त, स्वातंत्र्य होतं.

आजोबा, मामा, आई, मावशी, बंधू, भगिनींना आणि साम्राज्यातील जनतेला सुख, समाधान, स्थेर्य देत सोन्याचं घर बांधून देणारा रावण हा एकमेवच राजा असेल. रावण एक मातृभक्त, महान शिवभक्त, आज्ञाधारक शिष्य, विख्यात ज्ञान पंडित, जवाबदार बंधू, लढावू वृत्तीचा जिद्दी योद्धा, प्रेमळ पती, मार्गदर्शक पिता अश्या अनेक रक्तांच्या नात्यातील उपाध्यांनी बांधला गेलेला प्रगतशील विचारांचा कुशल राज्यकर्ता होता.

दशग्रीव ते रावण राजा राक्षसांचा असा घडलेला वाखण्याजोगा त्याचा प्रवास लेखकाने अत्यंत खुबीने यात लिहला आहे. अनेक रूपांत नाविन्याचा शोध घेत लेखकाने रावणाचे व्यक्तिचित्रण केलं आहे. रावणाच्या व्यक्तिमत्वाचे नव्याने पैलू उलगडून त्याच रुपडं पालटल्यालं चित्र या कादंबरीत या कादंबरीकाराणे सुस्पष्ट शब्दांत अधोरेखित केलं आहे…!

“दुष्ट, कपटी, खुनशी, पाताळयंत्री” या यादीत आजवर ज्या रावणाला गणलं गेलं, त्या यादीतील बहुतांश उपमा या कादंबरीत कादंबरीकाराने खोडून काढल्या आहेत. परिस्थितीच्या फेऱ्यात गुरफटलेलं त्याचं जीवन नियतीचे अनेक फटकारे आजवर खात होतं, “रावण: राजा राक्षसांचा” या कादंबरीत श्री.शरद तांदळे या लेखकाच्या लेखणीने त्याच्या आयुष्याचा सारा लेखाजोखाच मांडला आहे.

रावणाच्या आयुष्याचं सार त्यांनी मुक्त हस्ताने कादंबरी लिखित करून त्याच्या वेदनेची उणीव भरून काढली आहे,. त्याच्या मनातील खंत नव्या स्वरूपात व्यक्त केली आहे.

अनार्य दासीपुत्र असल्याने तो आर्य होऊ शकत नाही. स्वतः जन्माला घातलेल्या पोरापेक्षा धर्माला महत्व देणाऱ्या धर्मनितीने त्याच्या बालमनावर झालेला परिणाम, कर्तृत्वार नाही तर कुळावर श्रेष्ठत्व ठरवणाऱ्या लोकांकडून त्याच्या पदरी पडलेली उपेक्षा, अहवेलना, अपमान त्या बाल्यावस्थेतुन क्रूरतेकडे होऊ घातलेल्या त्याचा प्रवास यात शब्दबद्ध केला आहे.

ही कादंबरी वाचून मनांत भाव-भावनांचा कल्लोळ होतो. देवादी देव इंद्रदेवांना बंदिस्त करणारा रावण अनेक ठिकाणी कुतूहल जागं करतो. ‛रक्ष इति राक्षस’ लोकांचं रक्षण करणारी जमात म्हणजे राक्षस! स्वकर्तुत्वाने सोन्याच्या लंकेसारखं बलाढ्य साम्राज्य उभं करून सर्वांना समानता देण्याचं काम तो करतो याने त्याचं कौतुक वाटतं…!

रावणासारखा आप्तांवर, बंधुवर निर्व्याज प्रेम करणारा भाऊ असावा…

कुंभकर्णासारखा रावणाच्या प्रत्येक निर्णयात पाठराखण करणारा पाठीराखा असावा…पण…

बिभीषणासारखा निर्वाणीच्या वेळेला साथ सोडणारा घरभेदी कोणालाही असू नये…!

असे अनेक किंतु, परंतु, यथामती, यथाशक्ती कादंबरीत वर्णिलेले आहेत. यातील युद्धाचे प्रसंग तर अंगावर शहारे आणतात.

 

Ravan-inmarathi06
mugdhasays.blogspot.in

‛मी मरणार नाही’ हे वाक्य तर कायमच प्रेरणा देतं. आई कैकसीने दिलेलं ध्येय, सुमाली, पौलत्स्य आजोबांनी दाखवलेली प्रकाशाची वाट, प्रहस्त मामाने लढण्याची दिलेली उर्मी, भावांचे वैचारिक संभाषण, स्वतःशी संवाद करत खेळलेलं बौद्धिक द्वंद्व, ब्रम्हदेवाचे मार्गदर्शन, नारदमुनींचा सल्ला, महादेवांनी दिलेली संघर्ष करण्याची प्रेरणा, पुत्र मेघनादाला स्वतःच कौशल्य वाढवण्यासाठी स्वतःच्या क्षमतेशी संघर्ष करायला जागं करणारा प्रेरणादाई पित्याचा मुलाशी संवाद तर एक संदेश आहे…असे असंख्य उल्हसित करणारे रोमहर्षक प्रसंग या कादंबरीत लेखकाने यथोचित रेखाटले आहेत.

रावण हा विषय तसा खुपसा उपेक्षित आणि बराचसा अनपेक्षित राहिला होता. पण इतिहासात अन्याय झालेल्या रावण या व्यक्तिरेखेला खऱ्या अर्थाने या लेखकाच्या न्याय बुद्धीने या कादंबरीत न्याय मिळवून दिला आहे – हीच खरी या लेखकांच्या साचेबद्ध लेखणीची किमया आहे. या त्यांच्या कल्पनेला सलाम आहे.

बिभिषण हा रामाला जाऊन मिळणार, त्यासोबत आपले, आपल्या राज्याचे गुपितंही जाणार आहेत हे ज्ञात असूनही फक्त आईला दिलेल्या वचनाला जागणारा तत्ववादी पुत्र रावण त्याला कोणतीही शिक्षा करत नाही. समोर अनितीने लढणारे असूनही शास्त्रा बरोबर शस्त्राच्या ज्ञानात पारंगत असलेला रावण स्वतः मात्र आपले नीतीची नियम मोडत नाही. रावणाला पराजित करण्यासाठी कपटनितीचा आधार घ्यावा लागतो हाच रावणाचा विजय आहे, यांतच त्याचं खरं सामर्थ्य दिसून येतं.

– असे अनेक प्रश्न, विचार, समज, अपसमज मनात घोळत राहतात.

स्त्रीवर शस्त्र उचलणं हा त्याकाळी अधर्म होता. सीतेचं अपहरण रावणाने केलं तर अधर्म होतो तर मग त्याची भगिनी शूर्पणखेचे कान, नाक कापले हा कोणता धर्म..? नि ही कोणती धर्मनिती..? एकाचं पुण्य आणि रावणाचंच पाप हा एकास एक न्याय कसा काय ठरू शकतो?दूषणाबरोबर दंडकारण्यात १४ हजार सैन्य, राम-लक्ष्मण या बंधूंच्या हातून मारलं गेलं. ह्यावरून, ते निश्चित धुरंधर योद्धे आहेत हे लक्षात घेऊन रावणाने त्याचवेळी सावध पवित्रा घ्यायला हवा होता. पण तो त्याने का घेतला नाही..? अश्या कित्येक उलट सुलट प्रश्नांचा, विचारांचा भस्मासुर डोक्यात घोंगावू लागतो.

 

ravana-marrathipizza03
4.bp.blogspot.com

आजवर कुठल्याच पुस्तकात न कळलेला रावण या कादंबरीत अनेक अंगांनी अगदी भरभरून बोलला आहे. अर्थातच तो शरद सरांनी बोलता केला आहे.

नवनिर्मिती ही आनंद देत असते. रावण स्वतःच्या ताकदीच्या जोरावर एवढं मोठं साम्राज्य उभारतो. लंका निर्माण करतो. आयुर्वेदाचा गाढा अभ्यासक असलेला रावण हा व्यापारी, व्यावसायिक असतो. दर्शन, राज्यशास्त्र आदी विषयात पांडित्य मिळवूनही विध्वंसक, दुष्टच का?

शिवतांडव स्त्रोत्र रचणारा, रुद्रवीणा, बुद्धिबळ, रावणसंहीता, कुमारतंत्र हे तयार करून ज्ञानार्जन करणारा रावण खलनायक कसा? असे कित्येक निरुत्तरीत प्रश्न या कादंबरीत उत्तरीत तर होतातच, पण काही रावणाच्या उदार अंतःकरणावर विचार करायला भाग पाडतात.

जसे की शेवटच्या क्षणी तो लक्ष्मणाचे शिष्यत्व स्वीकारून त्याला मार्गदर्शनपर संदेश देतो. हा रावणाचा विचार आपल्या दृष्टिकोनात नव्याने भर घालतो. काही प्रसंग तर अगदी कायमचे मनाला स्पर्शून राहतात. राक्षस संस्कृतीत आईला मारणं हा सर्वात मोठा गुन्हा आणि आईचा शब्द हा प्रमाण असेल – असा मातृभक्त असलेला रावण, महादेवाचा निस्सीम भक्त होता. महादेवाच्या भेटीचं वर्णन तर अगदी पराकोटीचं सुरेख आहे. हा प्रसंग वाचकाला साक्षात महादेव भेटीची अनुभूती देतो. ब्रम्हदेवाच्या आश्रमाचे, कैलासाचे, निसर्गाचे वर्णन तर अप्रतिमच!

आई कैकसी, आजोबा सुमालीच्या मृत्यू नंतर आपल्या पुत्र मेघनादाचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने एका पित्याचे काय हाल होतात ती हळहळ वाचून हृदयाला पीळ पडतो. लंकेत प्रत्येकाला जगण्याचं, धर्माचं, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, तर मग मला माझ्या पती सोबत सती जायचं आहे…‛मला मरण्याचं स्वातंत्र्य हवंय’ हे सुलोचनेचं वाक्य हदरवून टाकतं. अश्या प्रसंगाचे वर्णनं तर आपली मती गुंग करतात.

वामानाच्या कपटाला भुलून महान बनण्याच्या अभिलाषेपोटी बळींनं स्वतःचं राज्य दान दिलं. ‛राजा हा राज्याचा विश्वस्त असतो मालक नाही’ हे आचार्य शुक्राचार्यांनी वामनाचे कपट बळीला समजून सांगूनही बळींनं ते ऐकलं नाही, म्हणून वामनाने त्यांना ‛झारीतले शुक्राचार्य’ म्हटलं. तेही आजवर आचार्यांना त्याच नावाने हिणवलं जातं.

‛बुद्धीमान आहेस तर कर्तृत्वाने प्रमाण दे’ हा आचार्यांनी रावणाला दिलेला सल्ला आपलं स्वत्वं जागं करून आपल्यात सकारत्मक बदल घडवून आणतो. ‛जगण्यासाठी मला श्रेष्ठत्व हवंय’ अशी प्रेरणादायी गर्भवाक्य मनाला भारून उभारी देणारे आहेत. ‛स्वातंत्र्य हा राक्षस संस्कृतीचा पाया आहे पण त्या सांस्कृतीत जोडीदार निवडीण्याचा अधिकार कुठं आहे? खऱ्या स्वातंत्र्यामध्ये जोडीदार निवडीचाही अधिकार असतो’ हा कुंभीसनीचा नवा विचार संस्कृतीत नवी भर घालताना दिसतो. ‛ज्या धर्माच्या धारणा कालानुरूप बदलत नाहीत तो धर्म गुलामांची फौंज तयार करत असतो’ असे परिवर्तनीय विचार लेखकाने रावणाचा तोंडुन वदवून घेणं वाचक मनाला विचार करायला भाग पाडणारे आहेत.

मेघनाद, अक्षयकुमार, खर, दूषण, प्रहस्त, कुंभकर्ण, महोदर, महापार्श्व यांना युद्धांत आलेल्या मृत्यूवर मंदोदरीचा रावणाशी झालेला पराजयातील कारणांचा संवाद उल्लेखनीय आहे. पण ‛उशिरा सुचलेलं शहाणपण हे फक्त शोकांतिकाच देत असतं’ हेच यातून सिद्ध होतं. हा संवाद वाचकाला वेळीच सावध करतो, हे तत्व आत्मसात करून आत्मभान जागृत करतो – हीच या लेखकाच्या लेखणीचं तेजस्वी व देखणं कसब आहे. त्याची ताकद आहे.

‛लक्ष्मणा, तुझ्या भावाला सांग, दोन बुद्धीमान पुरुषांनी संवाद न करता लढलं तर त्यात धूर्त आणि लबाड लोकांचा फायदा होत असतो. जसा सुग्रीव आणि बिभीषणाचा होणार आहे. कपटी लोकांचा आधार घेऊन मिळालेला विजय निराशेच्या गर्तेत नेत असतो’

हे रावणाचं वाक्य रामायणाचे आयाम बदलून टाकणारं आहे.

शरद सरांनी आपला ऐन उमेदीचा काळ ही कादंबरी लिखित करायला दिला आहे. त्यांच्या ४ वर्षाच्या दीर्घ चिंतन चाळणीतुन, गाढया अभ्यासातून रावणाला न्याय देणारी ‛रावण – राजा राक्षसांचा’ ही आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक असणारी, पिढीवर सकारात्मक परिणाम करणारी साहित्यकृती निर्माण झाली आहे. हे त्यांचं पहिलं-वहीलंचं पुस्तक आहे. एक वाचकस्नेही म्हणून मला शरद सरांचा अभिमान वाटतोय.

रावण खराच राजा होता. रावण दहनात मी या आधी कधीच सहभागी नव्हतो. पण या पुढे तर निश्चितच विचाराने पण सहभागी नसेन. विविध अंगांनी अनेक ढंगांनी या कादंबरीतील प्रसंगांचा लपंडावं मनाला भुरळ घालतो. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या माझ्या सारख्या पुस्तक प्रेमींसाठी ही कादंबरी लिखित करून वाचकांना पुन्हा एकदा लेखक आणि पुस्तकांच्या प्रेमात पाडलं, त्यात आणखी भर पडली आहे, त्याबद्दल सरांचे एक वाचक म्हणून मानावे तेवढे आभार थोडेच आहेत…!

 

ravana-marrathipizza01
i.pinimg.com

‛अन्यायात दडपल्या गेलेल्या स्वकर्तृत्ववान पुरुषाला आपल्या लेखणीतून न्याय देणारा ‛कर्तुत्ववान लेखक’ ही उपाधी ‛शरद तांदळेंना’ शोभणारी आहे’ असं आज मला मनोमन वाटतं. ही कादंबरी माझ्या सारख्या पामराला भावली, ती इतरांच्याही मनालाही स्पर्शून जाईल आणि कायमच साहित्यात रावणाच्या इतिहासाची खरी साक्ष देत राहील, ती देत राहो हीच आशा करतो. आपण चोखाळलेली लेखणीची वाट ही इतिहासाच्या पानापानांत झोकाळुन गेलेल्या रावणासारख्या असंख्य कर्तृत्वान व्यक्तीरेखांना प्रकाशात आणणारी आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैभवशाली मंदिर हे साहित्यारुपी एका खांबावर उभं आहे आणि त्याचं ओझं हे आपल्या सारख्या नव्या दमाच्या, उमद्या लेखकांनी आपल्या अंगा-खांद्यावरच पेललेलं आहे.

“महादेव सर्वांचं भलं करो’’

===

हे पुस्तक इथे विकत घेता येऊ शकेल : बुकगंगाअक्षरधाराफ्लिपकार्टऍमेझॉन

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

6 thoughts on ““रावण : राजा राक्षसांचा”, रावणाची बाजू मांडणारी, पराभूताचा इतिहास दाखवणारी कादंबरी

 • February 11, 2018 at 7:40 pm
  Permalink

  कोणी रावणाचे उद्दात्तीकरण करत असेल तर त्याच्या बुद्धीची कीव करणे एवढेच करू शकतो. दुसरे काय?

  Reply
 • September 5, 2019 at 8:57 am
  Permalink

  उगाच काही तरी फालतू लेख,स्त्री जाती द्वेष्टा, युद्ध समयी बहिणीला पुढे करून पळून जाणारा भित्रा स्वार्थी मनुष्य, गरीब जनतेचे धन दौलत लुबाडून स्वतःसाठी सोन्याचा महल बांधून घेणार रक्तपिपासू माणूस, स्वतःच्या अट्टाहासी,अश्लील वृत्ती करीत 12 हजार गरीब जनतेला जीवपासून मुकायला लावणारा निर्दयी राजाचे उदात्तीकरण करणे अगदी निदनिय, लेखकाने आपली पत्नी हि एखाद्या रावणाकडे देऊन पहावी म्हणजे त्याना त्याचे गांभीर्य कळेल

  Reply
 • September 5, 2019 at 9:02 pm
  Permalink

  राम असो की रावण, जर एखाद्याने लिहिलेल्या कादंबरीतून आपण त्यांना नाव ठेवणार असू किंवा त्यांचा जयजयकार करणार असू तर तो आपलाच मूर्खपणा आहे…इतिहास हा फक्त जिंकणाऱ्या व्यक्तिकफुं लिहिला जातो…हरणाऱ्या व्यक्तीला आपली बाजू मांडायची संधीही मिळत नाहि…त्यामुळे हि फक्त कादंबरी म्हणूनच वाचणे योग्य ठरेल….राम किंवा रावण यापैकी कोण श्रेष्ठ यावर वाद करणे हेच मुळात व्यर्थ आहे…

  Reply
 • September 5, 2019 at 10:22 pm
  Permalink

  मला पुस्तक कुठं मिळणार

  Reply
 • September 5, 2019 at 11:08 pm
  Permalink

  राम असो की रावण, जर एखाद्याने लिहिलेल्या कादंबरीतून आपण त्यांना नाव ठेवणार असू किंवा त्यांचा जयजयकार करणार असू तर तो आपलाच मूर्खपणा आहे…इतिहास हा फक्त जिंकणाऱ्या व्यक्ति कडून लिहिला जातो…हरणाऱ्या व्यक्तीला आपली बाजू मांडायची संधीही मिळत नाहि…त्यामुळे हि फक्त कादंबरी म्हणूनच वाचणे योग्य ठरेल….राम किंवा रावण यापैकी कोण श्रेष्ठ यावर वाद करणे हेच मुळात व्यर्थ आहे…

  Reply
 • September 5, 2019 at 11:09 pm
  Permalink

  राम असो की रावण, जर एखाद्याने लिहिलेल्या कादंबरीतून आपण त्यांना नाव ठेवणार असू किंवा त्यांचा जयजयकार करणार असू तर तो आपलाच मूर्खपणा आहे…इतिहास हा फक्त जिंकणाऱ्या व्यक्ति कडून लिहिला जातो…हरणाऱ्या व्यक्तीला आपली बाजू मांडायची संधीही मिळत नाहि…त्यामुळे हि फक्त कादंबरी म्हणूनच वाचणे योग्य ठरेल….राम किंवा रावण यापैकी कोण श्रेष्ठ यावर वाद करणे हेच मुळात व्यर्थ आहे…

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?