' ज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरचीचा ठेचा: मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग ३) – InMarathi

ज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरचीचा ठेचा: मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग ३)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – उदय सप्रे 

===

फकिराचा आशिर्वाद अन अविश्रांत मेहनत : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग १)

“सामने शेर है, डटे रहीयो!” : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग २)

===

गाण्याबद्धल लिहायचं नाही असं ठरवूनही हे सगळं लिहिण्याचा मोह आवरला नाही याचं कारण म्हणजे ही रफीची मानसकन्या उषा तिमोथी आज ६५ वर्षाची झाली आहे आणि रफी फॅन्स क्लब — तर्फे उल्हासनगर इथल्या टाऊन हाॅलमधे रफी पुण्यतिथीनिमित्त डाॅ.आहुजांच्या सौजन्याने विनामूल्य असलेल्या साहिर—रफी नाईट या आॅर्केस्ट्राला उषा तिमोथी मालाडहून आली होती.

वरील नागपूर व हिमालयकी गोदमें हा किस्सा दस्तुरखुद्द उषा तिमोथीने सांगितला. उषा तिमोथी म्हणाली,

रफीसाहाब बहोतहि नेकदिल इन्सान थे — clean character वाले इन्सान थे, उनका नाम किसीकेभी साथ नही जुडा और उस वक्त एक बापकी हैसियतसे जो हाथ अब्बा ने मेरे सरपे रखा, उसे मैं आजभी महसूस करती हूँ!

मंडळी, काल हे ऐकल्यावर जेवढा कंठ दाटून आला आणि अश्रू निखळले ना, तितकाच आजही मी भावुक झालोय. या रफी नावाच्या देवमाणसाबद्धल हे ऐकलं, उषाला पण भरून आलं होतं… हे सगळं अनुभवलं आणि म्हणून हे सगळं आज बोललो..

 

Usha-Timothy-with-Rafi-inmarathi
mohdrafi.com

 

रफी खाण्याचा प्रचंड शौकिन होता. वर सांगितल्याप्रमाणे रफीने जिला मानसकन्या मानलं होतं ती उषा तिमोथी, रफी, संगीतकार सी. रामचंद्र आणि दिलीपकुमार हे मालेगांवच्या एका चॅरिटी शोसाठी निघाले होते. नाशिकजवळ वाटेत रफीला काही बायका फडक्यातून शिदोरी घेऊन जात असताना दिसल्या. तेंव्हा अण्णांनी  (C.Ramchandra) रफीला सांगितलं की,

“या बायका फडक्यातून ज्वारीच्या भाकर्‍या व लाल मिरचीचा ठेचा घेऊन जातात.”

तोंडाला पाणी सुटलेल्या रफीने गाडी थांबवून त्या बायकांकडे चौकशी केली असता खरंच शिदोरीत ज्वारीच्या भाकर्‍या व ठेचा घेऊन निघाल्याचं कळलं. रफीच्या विनंतीवरून त्या बायकांनी ती सगळी न्याहारी या चौघांना दिली. ते खाऊन झाल्यावर तृप्त मनाने रफीने शंभराच्या काही नोटा त्या बायकांना देऊ केल्या.

रफीच्या उदारपणाचं त्या बायकांना कौतुक वाटलं. पण गावात अतिथींना खाऊपिऊ घालणं ही एक पर्वणी समजली जाते. त्यामुळे त्या बायकांनी अर्थातंच पैसे घ्यायला नकार दिला.

त्या खेडवळ बायकांना कल्पनाही नव्हती की, हिंदुस्तानचा शहेनशहा रफी, संगीत शिरोमणी सी. रामचंद्र, ट्रॅजिडी किंग दिलीपकुमार व १३ वर्षाची असताना कल्याणजी आनंदजींच्या संगीतात रफीबरोबर ओय् तू रात खडी थी छतपे नी मैं समझा के चाँद निकला हे गाणं गाणारी उषा तिमोथी या चौघा महारथींना आपण आत्ता खाऊ घालून तृप्त केलंय!

आपल्याला त्यांनी ओळखलं नाहि याविषयी जराहि रुखरुख न वाटलेल्या रफीसोबतच्या दिलीपकुमारच्या चहेेर्‍यावर मात्र विशादाच्या काही छटा आढळून आल्या…

 

Usha-Timothy-with-Rafi-inmarathi01
christianfort.com

 

रफीच्या उदारतेचे अनेक किस्से सांगितले जातात. या रुपेरी सृष्टीत त्यांनी अनेकांना मदत केली, एवढंच नाही तर कोणीही असूदेत अगदी कोणीही त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलेला कधीच रिकाम्या हाताने परत जात नसे. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या हातावरही काही ठेवल्याशिवाय ते पुढे जात नसत.

एकदा एका संगीतकाराचा हलाखीच्या परिस्थितीत मृत्यू झाला. रफी त्या संगीतकाराच्या आजारपणात ( फिरोझ निझामी — रफीचे गुरु ) त्याला भेटायला गेला होता.आणि तिथून परत येण्यापूर्वी त्याच्या उशाशी पण त्याला नकळत, दहा हजारचं बंडल ठेवून आला होता. नकळत का ? तर त्याचा आत्मसन्मान दुखावू नये म्हणून. किती काळजी करावी दुसर्‍यााचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून! रफी तुला शिरसाष्टांग नमस्कार.

 

Usha-Timothy-with-Rafi-inmarathi02
indianexpress.com

 

असंच एकदा एका तंगीला आलेल्या कलाकाराला (चंदू, २४ घंटे, बस कंडक्टर चे संगीतकार बाबुल) आपल्या कारनं रफीनं त्याच्या घरी सोडलं होतं. पण बोलता बोलता हळूच रफीने पैशांनी भरलेलं पाकिट त्या कलाकाराच्या नकळत त्याच्या बॅगमधे सारलं होतं !

मंडळी , MOHAMMED RAFI – Golden Voice of the Silver Screen या Sujata Dev लिखित पुस्तकासोबत ४०—४५ मिनिटांची एक DVD FREE आली आहे.

हे पुस्तक काल रात्री हातात पडलं, त्यातली DVD ऐकली — ज्यात फिल्म इंडस्ट्रितला एक बुजुर्ग कलाकार सांगतो की कलाकारांच्या अपरोक्ष बोलण्याच्या वाईट प्रथेसाठी कुप्रसिद्ध असणार्‍या या इंडस्ट्रीमधे रफी हा एकटाच असा कलाकार होता की जो स्वत: तर कुणाबद्धलही वाईट बोलत नसेच पण कुणी कुचाळक्या करू लागलं तर त्याला सांगत असे , ” ऐसा मत कहो! सभी नेक और खुदाके बंदे हैं! ”

बाकिच्यांचं माहित नाही पण रफी नक्कीच खुदाका बंदा होता !

 

Usha-Timothy-with-Rafi-inmarathi03
nasheman.in

 

विपन्नावस्थेत संगीतकारांना, गायक—गीतकारांना व वादकांना रफी दरमहा काही ना काही मदत करायचा. प्रत्येकासाठी शंभरपासून ते हजारापर्यंत काही ठराविक रक्कम रफीने ठरवून ठेवली होती व त्याची यादी तयार करून ठेवलेली होती.

प्रत्येक महिन्याच्या २८ तारखेला ही यादी उघडून रफी व त्याचा सेक्रेटरी जहिर बसायचे आणि प्रत्येकाची ठरलेली रक्कम एका पाकिटात घालून त्यांच्या नावाचे पाकिट तयार करायचे.

एक तारखेपर्यंत ही सारी पाकिटे तयार होऊन प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला ही पाकिटे घेऊन जाणार्‍या मंडळींची मोठी रांग बांद्र्याच्या रफी व्हिलासमोर लागायची.

रफी व जहिर घरात नसले तरी रफीची बेगम बिल्किस रफी ही पाकिटं ज्याची त्याला सुपुर्द करत असे. अनेक वर्षांचा हा उपक्रम ठरलेला होता.

रफी दरमहा जवळ जवळ २८ हजाराची रक्कम दान म्हणून वाटत होता !

 

Usha-Timothy-with-Rafi-inmarathi04
mohdrafi.com

 

मंडळी, १८ जानेवारी १९८० ला अभिनेता मिथून चक्रवर्तीने कलकत्त्याच्या दुर्गापूरमधे एक रफीच्या गाण्यांचा शो आयोजित केला होता. रफीने त्यावेळी नागपूरमधे असलेल्या उषा तिमोथीला दुर्गापूरला शो साठी बोलावून घेतले.

रफीच्या शोमधे साजिंदे वगळता निवेदक शाहिद बिजनौरी, नकलाकार जाॅनी व्हिस्की, स्वत: रफी आणि उषा असे चारंच कलाकार होते. शो मधे सुरुवातीला उषा तिमोथीची चार—पाच सोलो गाणी, मग रफी—उषाची duets असा क्रम ठरलेला होता.

पण त्या रात्री मात्र हा नियम रफीने मोडला होता आणि सुरुवातीला पटापट एकट्याने काही गाणी गायली. नंतर साजिंद्यांकरवी उषाने यानंतर जितकी जमतील तितकी जास्त गाणी गावीत असा निरोप ठेवला.

उषाने पण सांगितल्याप्रमाणे पंचवीस एक गाणी गायली. नंतर उषाला कळलं की रफीला mild heart attack आला होता व म्हणून त्याला नंतर उपचार व सक्तीची विश्रांती लादावी लागली.

 

Usha-Timothy-with-Rafi-inmarathi05
papertastebuds.com

 

१ जुलै १९८० ला रफी होमी वाडियांच्या महाबली चित्रपटासाठी कमलाकांत या संगीतकाराकडे गीत रेकाॅर्ड करण्यासाठी निघाला होता. १९५० ला रफीच्या मोठ्या भावाचा मित्र बंगलोरला निघून गेल्यानंतर रफीचे सेक्रेटरी म्हणून त्याचे मेव्हणे — बायको बिल्किस रफीचे बंधू जहिर बारी काम बघायचे. रेकाॅर्डिंगसाठी बाहेर पडतानाच रफीने जहिरला बजावलं,

“वाडियासाहेब या इंडस्ट्रीतले बुजुर्ग प्रोड्यूसर आहेत. माझ्या करियरच्या सुरुवातीला त्यांनी मला बरीच मदत केली आहे. तेंव्हा त्यांच्याशी देण्याघेण्याच्या गोष्टि न करता पाकिटात घालून ते जे काहि देतील ते मुकाट घ्यायचं !”

२ जुलै १९८० ला रफी अब मेरी बारी या सिनेमातील भप्पी लाहिरींच्या संगीतात एक गाणं आशा व किशोरकुमार बरोबर गाणार होता. रेकाॅर्डिंगसाठी घरातून बाहेर पडताना रफी जहिरला म्हणाला,

“आज किशोरबरोबर गायचंय म्हणजे आजचा दिवस हसण्याचा आहे म्हणायचा!”

— कारण किशोरचं तसंच खट्याळ वागणं!आणि त्या दिवशीहि किशोर रेकाॅर्डिंग स्टुडिओमधे कुणा म्युझिशियनची छत्री उघडून चाळे करत बसला होता! रफीची किशोरविषयीची भावना इतकी स्वच्छ होती की तो खरंच गमत्या स्वभावामुळे रफीला खूप आवडायचा.

रफी, असशील तिथे सुखी रहा!

 

Usha-Timothy-with-Rafi-inmarathi06

 

रफी

मनामनातुन अढळ सुरांचे स्थान ठेउनी मागे
निद्राधिन का झालासी तू, ठेऊन आम्हां जागे ?

आठव येण्या विसर कुणाला पडावा तर लागे !
सुराहूनही श्रेष्ठ तुझे मन , जुळले अतुट धागे !

दुखवलेस ना कधी कुणा तू , कधी न भरले रागे
नेक—ख़ुदाके बंदे हैं सब! सदा असा तू सांगे !

चेहेर्‍यावरचे हास्य तुझे हे निर्मळ स्वभाव सांगे
कंठामधुनी स्वरहि पावन जसा सदा तू वागे !

हवी कशाला तुला# कुणाशी? रफी न होगा आगे!
श्रद्धांजलीचे पुष्प वाहुनी उदय जगाला सांगे !

#तुला : तुलना

रफी, तू साहिरचं केवळ गाणं म्हटलं नाहीस तर त्यातील संदेशावर अंमल पण केलास :

तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सानकी औलाद है इन्सान बनेगा!

तुला शिरसाष्टांग सप्रेम नमकार!
तुझा अमर्याद वेडा चाहता ,
उदय गंगाधर सप्रे म—ठाणे

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?