टॉम अॅण्ड जेरी ने शेवटच्या एपिसोडमध्ये खरंच आत्महत्या केली होती? जाणून घ्या…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
टॉम अॅण्ड जेरी… जर एव्हरग्रीन ह्या शब्दाला कुठली गोष्ट डीफाईन करत असेल तर ते म्हणजे हे दोघे. टॉम आणि जेरी… ९० च्या दशकातील प्रत्येकाचे आवडते कार्टून म्हणजे टॉम अॅण्ड जेरी असायचे आणि ते आजही आहे.
डोरेमॉन, शिंचॅन ह्या सारखे कार्टून जरी आजच्या पिढीला ‘बेष्ट’ वाटत असले तरी त्यात टॉम अॅण्ड जेरी सारखी मजा नाही.
हे ते कार्टून आहे, ज्याचे चाहते फक्त लहान मुलेच नाही सर्वच वयोगटातील व्यक्ती होते. कित्येकांनी तर आपल्या आई बाबांसोबत बसून जेरीच्या त्या खोडकर आणि टॉमला सतत त्रास देणाऱ्या व्यक्तिमत्वाची मजा घेतली असेल.
हे कार्टून एकमेव असे कार्टून असेल जे बघताना आई ओरडायची नाही, कारण तिलाही टॉम अॅण्ड जेरी तितकंच आवडायचं! लहान मुलांना जन्मभर लक्षात राहील अशी गोड आठवण म्हणजे टॉम अॅण्ड जेरी.
आणि ही आठवण आपल्याला देण्याचं श्रेय जाते ते विलियम हना आणि जोसफ बारबरा या जोडीला. ह्याच दोघांनी टॉम अॅण्ड जेरी ला जन्माला घातलं. म्हणजे हे कॅरेक्टर्स आणि ही सिरीज बनविली.

पण सर्वांना नेहमी हसविणाऱ्या ह्या सिरीजमध्ये एक एपिसोड असा देखील आहे, ज्यात आपल्याला हसायला येत नाही. एक असा एपिसोड ज्यात टॉम अॅण्ड जेरी चा शेवट दाखविण्यात आला होता.
विलियम आणि जोसेफ यांनी MGM स्टुडिओ करिता टॉम अॅण्ड जेरी चे एकूण ११४ एपिसोड बनवले होते. ज्यानंतर आणखी काही लोकांनी आपल्या आपल्या हिशोबाने ह्याला रिक्रीएट केले.
तशा तर ह्या दोन्ही लोकांना हसविण्यात यशस्वी ठरल्या, पण सर्वात जास्त लोकप्रिय झाली ती विलियम आणि जोसेफ ह्यांची ओरिजिनल सिरीज.
आपण सर्वांनीच टॉम अॅण्ड जेरी बघितलं असेल. त्याची कहाणी अगदी साधी-सरळ होती. त्यात एक मांजर दाखविण्यात आली होती म्हणजेच आपला टॉम आणि एक उंदीर होता म्हणजेच जेरी. हे दोघेही नेहेमी भांडत राहायचे.
टॉमला जेरी हवा असायचा आणि जेरी त्याच्यापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवायचा. जेरी हा नेहेमी टॉमला त्रास देत राहायचा. पण एवढीच होती का ह्यांची कहाणी? त्यांच्या कहाणीचा शेवट कसा झाला असणार?

MGM च्या ओरिजिनल टॉम अॅण्ड जेरी सिरीज मध्ये एक एपिसोड आहे, ब्लू कॅट ब्लूज म्हणून. हा एपिसोड नंबर १०३ म्हणजे ह्या सिरीजचा शेवट असल्याचे मानल्या जाते.
टॉम अॅण्ड जेरी ह्यांची कहाणी कुठल्या सिरीयल सारखी नव्हती, तर ह्यांच्या प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी नवीन असायचे. पण जसं प्रत्येक सिरीयलला एक शेवट असतो, तसेच ह्या सिरीजला देखील कधी ना कधी संपायचेच होते.
हे कार्टून बनविणाऱ्या विलियम आणि जोसेफ ह्यांनी विचार केला की, ह्या सिरीजचा अंत म्हणजे टॉम अॅण्ड जेरी ह्यांचा अंत असे दाखवावे. म्हणून ह्या सिरीजच्या शेवटच्या एपिसोड मध्ये टॉम अॅण्ड जेरी या दोघांना मरताना दाखविण्यात आले आहे.
पण ते काही थेट दाखविले गेले नाही. तर ते अशा प्रकारे मांडण्यात आले आहे की, बघणाऱ्याला कळून जाते की ह्यात टॉम अॅण्ड जेरी चा मृत्यू झाला.
ह्या एपिसोडची सुरवातच नकारात्मक आहे. ह्यात सुरवातीला दुखी टॉम दाखविण्यात आला आहे. तो एवढा दु:खी असतो की जाऊन रेल्वे रुळावर बसतो, आणि त्याच्या बाजूला जेरी देखील येऊन बसतो.
आणि मग कहाणी फ्लॅशबॅकमध्ये जाते. ह्यात बॅकग्राऊंड मध्ये जेरीचा आवाज येत असतो आणि समोर सीन सुरु असतात. जेरी टॉम दु:खी का आहे हे सांगत असतो.
त्याच्या दुखी असण्याचं कारण म्हणजे एक पांढरी मांजर. टॉमला ती मांजर खूप आवडायला लागते. तो तिच्यासाठी काहीही करायला तयार असतो.
टॉम आपल्या सर्व मौल्यवान वस्तू विकून तिच्यासाठी एक हिऱ्याची अंगठी विकत घेतो आणि त्या मांजरीला प्रपोज करतो. तिथे ती पांढरी मांजर त्याला त्याहून मोठा हीरा दाखवते. जो तिला दुसऱ्या एका श्रीमंत मांजराने दिलेला असतो. मग आता टॉम काय करणार?
त्याच्याकडे आता विकायला काहीही उरत नाही म्हणून तो स्वतःलाच विकून टाकतो, गुलाम बनतो आणि तिच्यासाठी एक गाडी विकत घेतो. पण तिथे देखील श्रीमंत मांजर त्याची महागडी आणि मोठी गाडी घेऊन येतो आणि त्या पांढऱ्या मांजरीला घेऊन निघून जातो.
एवढं सर्व करून देखील ती पांढरी मांजर टॉमला भाव देत नाही. त्यामुळे टॉम हताश होऊन जातो, खूप दु:खी होतो. म्हणून तो खूप दुध पितो.
हे एक कार्टून आहे आणि ते लहान मुलं जास्त बघतात म्हणून यात दारू ऐवजी त्याला दुध पिताना दाखविण्यात आले आहे.
कारण जर दारू पिताना दाखविले असते तर त्यावर वाद झाला असता. पण दाखविणाऱ्याला हेच दाखवायचे होते की टॉम दुखी असल्यामुळे तो दारू पितो आहे. हे सर्व जेरी बघत असतो.
हताश टॉमकडे आता जगायचे कुठलेही कारण उरलेले नसते त्यामुळे तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. टॉम स्विमिंगपूल मध्ये उडी घेतो. पण त्यातून जेरी त्याला वाचवतो. पण तेव्हाच त्याला कळते, की त्या पांढऱ्या मांजरीने त्या श्रीमंत मांजरीशी लग्न केले.
आता मात्र टॉम अतिशय निराश झालेला असतो. त्याच्याकडे जगण्यासाठी कुठेही कारण उरलेले नसते. त्यामुळे तो रेल्वे रुळावर जाऊन बसतो.
ह्या सिरीज मधला हा कदाचित एकच असा एपिसोड असेल ज्यात टॉम आणि जेरी भांडण करत नाही. जेरी टॉमला त्रास देत नाही तर त्याची काळजी घेतो आहे. त्याच्या वाईट काळात त्याच्या सोबत आहे. हा एपिसोड बघून आपल्याला हसायला येत नाही तर आपणही दु:खी होऊन जातो.
तेव्हा जेरी त्याच्या दु:खी असण्यावर चिंता व्यक्त करतो आणि खिश्यातून एक फोटो काढतो. तो फोटो असतो एका पांढऱ्या उंदराचा, जी जेरीला आवडत असते. पण पुढच्या सीन मध्ये ती उंदीर देखील एका दुसऱ्या श्रीमंत उंदराशी लग्न करून जाताना जेरीला दिसते.
आता मात्र हे दोघेही दुखी असतात. मग जेरी देखील टॉमच्या बाजूला जाऊन बसतो. त्यानंतर एक ट्रेन त्यांच्यावरून जाते आणि एक रक्ताचा सडा दिसतो. ह्यावरून कळते की टॉम आणि जेरी आता नाहीत.
पण लहान मुलांच्या शो मध्ये एवढी उदासी एवढी निराशा दाखविणे हे चुकीचे आहे. आधी दारू म्हणून दु:ख दाखवणे त्यानंतर आत्महत्या हे सर्व लहान मुलांच्या हिशोबाने चुकीचे आहे. म्हणूनच कार्टून नेटवर्क आणि बुमबर्गने त्यावेळी हा एपिसोड बॅन केला.
सध्या हा एपिसोड युट्युबवरच उपलब्ध आहे:
वाहिनीने हा भाग न दाखवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विलियम आणि जोसेफ ह्यांना देखील असे वाटले असेल की, सर्वांच्या आवडत्या टॉम आणि जेरीचा असा अंत नको व्हायला.
म्हणून ह्यानंतर देखील सिरीज चालू ठेवण्यात आली. आणि त्यात टॉम-जेरी नेहेमीप्रमाणे भांडताना, मस्ती करताना दाखविण्यात आले.
एपिसोड नंबर ११४ ‘टॉट वॉचर्स’ने ह्या सिरीजचा शेवट झाला. पण ह्या एपिसोड मध्ये देखील काहीही शेवटासारखे नव्हते. हा एपिसोड देखील इतर एपिसोड्स प्रमाणेच होता. कदाचित ह्या सिरीजीच्या प्रोड्युसरला वाटले असावे की शेवट करण्यासाठी शेवट दाखविण्याची गरज नाही.
खरे पाहता टॉम अॅण्ड जेरी ह्यांचा जन्म हा चित्रप गृहात चित्रपट सुरु होण्याआधी तसेच मध्यांतर दरम्यान प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी झाला होता.
त्यानंतर ह्या कार्टूनला टीव्हीवर दाखविण्यात आले. ह्याच्या प्रत्येक एपिसोडची कहाणी वेगळी असायची. ह्यातले टॉम अॅण्ड जेरी आणि इतर कॅरेक्टर्स तेच असले तरी कहाणी प्रत्येक वेळी वेगळी असायची.
टॉम अॅण्ड जेरी ही सिरीज जरी संपली असली तरी त्याला बघण्याची मजा आजही तशीच आहे. टॉम अॅण्ड जेरीने ९० च्या दशकातील मुलांचे बालपण विस्मरणीय केले आहे.
त्यामुळे त्यांचा अंत न दाखवता त्यांना नेहेमी आमच्या मनात जिवंत ठेवण्यासाठी टॉम अॅण्ड जेरी सिरीजचे खूप खूप आभार…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.