' "सामने शेर है, डटे रहीयो!" : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग २)

“सामने शेर है, डटे रहीयो!” : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग २)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – उदय सप्रे

===

१९५२ मध्ये बनलेल्या ‘बैजु बावरा’ या सिनेमाशी निगडीत एक आठवण आहे. खरंतर यातली सर्व गाणी तलत मेहमूद हे गाणार होते. पण संगीतकार नौशाद यांनी एकदा त्यांना स्टुडिओत धुम्रपान करताना पाहिलं आणि ती सर्व गाणी मग रफीजींना मिळाली.

‘मन मोरा बावरा’ (चित्रपट – रागिनी) आणि ‘अजब है दास्तां तेरी ये जिंदगी’ (चित्रपट – शरारत) ही दोन गाणी त्या त्या संगीतकारांनी ( किशोरकुमार अभिनेता असलेली ) चक्क रफीजींकडून गाऊन घेतली होती. पुढे किशोरकुमार यांना अभिनय क्षेत्रात फारसा वाव उरला नाही. त्यावेळी त्यांनी आपल्यातल्या गायकावर लक्ष केंद्रीत केलं.

 

baiju-bawra-inmarathi
i.pinimg.com

 

६९-७० मध्ये आराधनातली ‘मेरे सपनोंकी रानी’ आणि ‘रूप तेरा मस्ताना’ गाजल्यावर सुपरस्टार राजेश खन्ना नेहमी किशोरकुमारजींचीच शिफारस जिथे तिथे करू लागला. त्यामुळे रफीसाठी गायनाच्या संधी कमी होत गेल्या. अगदीच कव्वाली, शास्त्रीय, गजल.. अशा प्रकारची संगिताची बैठक असलेली गाणी त्यांना मिळू लागली.

पण त्यातूनही ‘हम किसीसे कम नही’ मधल्या ‘क्या हुवा तेरा वादा’ या गाण्याने रफीजींना पुन्हा एकदा नव्याने प्रकाशझोतात आणलं.

हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्याकाळी चित्रपटक्षेत्रात खूप वेगाने बदल होत होते. एक लाट आली ती संपूर्ण डायलॉगबाज सिनेमांची. शोले सारख्या सिनेमांनी तर प्रेक्षकवर्गांचं सगळं लक्ष वेगळीकडेच वेधलं. मग हे क्षेत्रं डिस्कोने व्यापलं.

त्यातही मोहम्मद रफी यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या मदतीने ‘कर्ज’ साठी ‘दर्द्-ए-दिल’ गात नविन प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं खरं, पण सिनेमातून आता ‘संगीत’ हद्दपार होतंय हे त्यांना पुर्णपणे कळून चुकलं होतं.

संगीतकार सी.रामचंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे,

रफी हा एकमेव कलाकार असा होता की ज्याने गायनातले कितीतरी आदर्श डोळ्यांसमोर असूनहि कुणाचीहि नक्कल न करता स्वत:च्या आवाजात गायला!

रफी लवकरंच गायनाच्या कार्यक्रमासाठी परदेशी जाणार होता आणि परतताना एक डायलिसीस मशिन घेऊन येणार होता—कशासाठी? तर गोरगरिबांना आजारपणात डायलिसीस मशीनची सेवा मोफत उपलब्ध व्हावी म्हणून रफी ते मशिन एखाद्या हाॅस्पिटलला दान देणार होता !…. पण या दौर्‍यापूर्वीच रफी आपल्यातून निघून गेला होता.

 

mohdrafideath-inmarathi
mohdrafi.com

 

रफीबद्दलच्या आठवणी सांगताना गीतकार आनंद बक्षी म्हणतात,

“माझ्या उमेदीच्या व झगडत्या काळात जब जब फूल खिले च्या माझ्या गीतांना रफीसाहेबांच्या आवाजाचा परीसस्पर्श झाला आणि मला सोनेरी यश लाभलं, नंतर मी मागे वळून पाहिलं नाही.”

रफीसाहेबांच्या माणूसकीविषयी पण आनंद बक्षी हेलावून जाऊन सांगतात…..

“मी बांद्र्याला नवीन घर घेतल्यानंतर प्रचंड द्विधा मन:स्थितीत सापडलो कारण माझ्या मुलाच्या — राकेशच्या शाळेच्या प्रवेशासाठी वणवण करूनही मला यश मिळंत नव्हतं!

तेंव्हा माझ्या चिंताक्रांत चेहेर्‍यामागील विवंचनेचं कारण विचारणारा रफीसाहेबांचा हात माझ्या खांद्यावर पडला अाणि माझा बांध फुटला. राकेशच्या शाळेचं कारण समजताच रफीसाहेबांनी फार आश्वासक स्मितहास्य करत मला मुलाला घेऊन दुसर्‍या दिवशी बांद्र्याच्या एका प्रसिद्ध शाळेत यायला सांगितलं.”

“दुसर्‍या दिवशी आम्ही शाळेत पोचतांच शाळेच्या प्रिन्सिपलनी रफीला पहाताच कंबरेत वाकून अभिवादन केलं अाणि तात्काळ राकेशचा त्या शाळेतला प्रवेश नक्की केला. शाळा प्रवेशाची औपचारिकता आटोपल्यावर आम्ही प्रिन्सिपलसाहेबांचा निरोप घेण्यासाठी गेलो असता त्यांनी रफीसाहेबांना माईकवरून शाळेतल्या मुलांसाठी एखादं गाणं म्हणण्याची विनंती केली.

जी रफीसाहेबांनी अत्यंत विनम्रतेने मान्य केली.सगळ्यांसाठी जिव्हाळा असलेल्या रफीसाहेबांचं व्यक्तिमत्व मी आश्चर्यचकित होऊन पहातंच राहिलो! खरंच रफीसाहेबांसारखी माणसं शतकांमधे एखाद्या वेळेसंच जन्मतात!”

 

rafi-with-anand-bakshi-inmarathi
hindilyrics.net

 

रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. काही संगितकारांना रफीजींच्या गाण्याचे मानधन देणे परवडत नसे, अशा वेळी ते फक्त छोटेसे मानधन घेत. प्रसिद्ध अभिनेता राकेश रोशन यांच्या (दिग्दर्शक आणि निर्देशक म्हणून) पहिल्या चित्रपटासाठी ‘आप के दिवाने’ साठी रफीजींनी शिर्षकगीत गायलं.

पण गाण्याचं मानधन म्हणून एक रूपयासुद्धा घेतला नाही. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ ‘एक रुपया’ मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं.

रफींचं एक साम्राज्य होतं आणि त्याला टक्कर देण्यासाठी किशोर सज्ज होता. पण ही स्पर्धा फक्त व्यावसायिक स्तरावर होती, व्यक्तिगत जीवनात हे दोघे अतिशय चांगले मित्र होते.

आपली जागा कोणीतरी घेऊ पहात आहे म्हणत रफींनी कधीही किशोरचा दुस्वास केला नाही, उलट किशोरला आपला लहान भाऊ मानलं आणि किशोरनेही आपल्याला मिळणाऱ्या यशाचा माज रफींसमोर कधीही दाखवला नाही, किशोरच्या मनातही या भावना कधीच नव्हत्या.

या दोघांच्या घट्ट मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात.

रफी गेल्याची बातमी जेव्हा पसरली आणि ती किशोरच्या कानावर आली तेव्हा तडक किशोरने रफींचं घर गाठलं. त्या वेळी रफींच्या घरी येणारं पहिलं जर कोणी असेल तर तो होता किशोर कुमार. रफींच्या पार्थिवाजवळ बसून किशोर कित्येक तास रडत होता, अगदी जनाजा उठेपर्यंत…

 

Rafi-Kishore-inmarathi
firstpost.com

 

रफींच्या घराजवळ एक विधवा बाई रहायची. तिला दर महिन्याला ठराविक दिवशी एका निनावी व्यक्तीकडून मनी ऑर्डर मिळायची. दर महिन्याला अगदी न चुकता हे घडायचं. एकदा सलग दोन तीन महिने तिला ही मनी ऑर्डर मिळाली नाही.

तिने डाकघरात जाऊन चौकशी केली. तेव्हा तिला कळलं की आपल्या शेजारी राहणारे मोहम्मद रफी तिला दर महिन्याला पैसे पाठवायचे. ती बाई हे कळल्या कळल्या तिथे पोस्टातच ढसाढसा रडायला लागली.

सुधीर फडकेंच्या संगीतात दरार साठी रफी गाणार होता.सुधीर फडकेंनी रफीच्या घरी रिहर्सलला येण्यासाठी म्हणून सुधीर फडकेंचा फोन येऊन गेल्याचं जहिरनी सांगताच रफी म्हणाला ,

“सुधीर फडके माझ्याहून सिनिअर आहेत.तेंव्हा रिहर्सलसाठी माझ्या घरी यायचा त्रास त्यांना द्यायचा नाहि.त्यांचा मान ठेवण्यासाठी मलाच त्यांच्या घरी रिहर्सलला गेलं पाहिजे. “

या प्रमाणे जहिरला त्यांनी सुधीर फडकेंना निरोप देण्यासाठी बजावलं. तसा निरोप सुधीर फडकेंना मिळालाय याची खात्री झाल्यानंतर रफी दरार च्या गाण्यांच्या रिहर्सलसाठी ठरल्याप्रमाणे शिवाजी पार्कच्या त्यांच्या निवासस्थानी पोचला.

तेंव्हा ललिताबाई देऊळकर फडके यांच्याशी रफीची भेट झाली. तेंव्हा साजन मधल्या ‘हमको तुम्हाराहि आसरा’ या द्वंद्वगीताच्या वेळी नवख्या असलेल्या आपल्याला ललिताबाईंनी कसं सांभाळून घेतलं होतं हे रफीला आठवलं.

 

lata-rafi-inmarathi
youtube.com

 

इतक्या वर्षांनी रफीची भेट — तीही घरी म्हटल्यावर कुटुंबवत्सल ललिताबाईंनी डिंकाचे लाडू आणि चकली देऊन रफीचा पाहुणचार केला.तेंव्हा रफी त्यांना म्हणाला , ” मला आठवतं , फिल्मिस्तानमधे तुम्हि असंच काहितरी खायला डब्यातून घेऊन यायच्यात आणि त्याचा आस्वाद मीही तेंव्हा घ्यायचो. “

एकदा नागपूरमधे एके ठिकाणी कल्याणजी आनंदजी नाईट शो होता व यासाठी मुकेश, रफी, हेमंतकुमार, मन्ना डे असे सगळे आले होते. पण काहि कारणाने सुमन कल्याणपूर व कमल बारोट येऊ शकल्या नव्हत्या.

कल्याणजी आनंदजी पुढे स्थानिक गायिकांच्या आॅडिशन्स घेण्याखेरीज पर्यायंच नव्हता. पण ते करूनही कुणी सुयोग्य आवाजाची गायिका त्यांना मिळेना.

तेंव्हा मधुसूदन नामक एका माणसाने आपल्या ९ वर्षाच्या बहिणीला संधी देण्याविषयी कल्याणजी आनंदजीना विनंती केली. पण ही कल्पनाच हास्यास्पद वाटल्याने कल्याणजी आनंदजीनी त्याकडे दुर्लक्ष करत पुरुष गायकांची गाणी घेत कार्यक्रम सुरु केला.

मध्यंतरानंतर परत मधूसूदनच्या आग्रहामुळे नाइलाजाने त्या ९ वर्षाच्या मुलीला गाण्याची संधी दिली.

९ वर्षाच्या चिमुरडीने लताचं रसिक बलमा सुरेख म्हटलेलं पाहून स्तिमित झालेल्या रफीने तिला स्टेजवर विचारलं,

“तू माझ्यासोबत सौ साल पहले — गाशील का? “

ती चिमुरडी नुसतं हो म्हणून थांबली असती तरंच नवल! तिनं रफीबरोबर सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था तर म्हटलंच पण नंतर मुकेशसोबत ये वादा करो चांदके सामने पण गायलं. आत्यंतिक कौतुकाने रफीने त्या ९ वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. त्यानंतर रफीच्या प्रत्येक स्टेज शो मधे ती चिमुरडी गायली.

 

usha-timothy-moh-rafi-inmarathi
christianfort.com

 

पुढे ही चिमुरडी मुंबईला आली आणि ती १३ वर्षांची असताना १९६५ मधे ‘हिमालयकी गोदमें’ या चित्रपटासाठी संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी रफीसोबत गायला तिला उभं केलं. स्टेज शो मधे गाणं वेगळं आणि रेकाॅर्डिंग स्टुडिओमधे शेकडो साजिंद्यांसह गाणं वेगळं महाराजा! त्यात कल्याणजींनी तिला सावध करण्यासाठी म्हटलं ,

“सामने शेर है , डटे रहियो !”

झालं हिचं त त प प झालं ना राव! चौकशीअंती रफीच्या लक्षात सारा प्रकार येताच रफीने तिला चुचकारत आशीर्वादाचा हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि गाण्यासाठी तिला आत्मविश्वास मिळवून दिला.

ते गाणं होतं “ओय तू रात खडी थी छतपे नी मैं समझा के चांद निकला” आणि ती १३ वर्षाची मुलगी होती उषा तिमोथी जिला रफीने आपली मानसकन्या मानली.

पुढे अनेक वर्ष रफीने उषाला आपल्या प्रत्येक स्टेज शोमधे गावोगावी — परदेशात सुद्धा गाण्याची संधी दिली. इतकंच नव्हे , रफीला अब्बा व रफीच्या बेगमना बा जी म्हणणार्‍या रफीनं उषाला सांगितल की “मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधीन!” नंतर उषाने आपला जोडीदार निवडल्याचं कळताच रफीनं आधी सगळी चौकशी केली आणि खात्री पटताच तिचं लग्न approve केलं.

क्रमशः

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?