'उर्वशीने दिलेला 'नपुंसकत्वाचा' शाप अर्जुनासाठी 'वरदान' कसा ठरला? - जाणून घ्या!

उर्वशीने दिलेला ‘नपुंसकत्वाचा’ शाप अर्जुनासाठी ‘वरदान’ कसा ठरला? – जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

महाभारत तर तुम्हाला सर्वाना माहित असेलच. महाभारतामध्ये खूप काही अशा गोष्टी होऊन गेल्या, ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत, ज्याच्यामुळे अर्जुनाला एक वर्षासाठी आपले पुरुषत्व गमवावे लागले होते.

कौरवांकडून द्यूताच्या खेळामध्ये हरल्यानंतर पांडव आपले राज्य सोडून वनवासात राहण्यासाठी निघून गेले.

आपला वनवास भोगताना एकदा पांडव वेदव्यासांच्या आश्रमामध्ये पोहोचले आणि त्यांना आपले दुःख सांगितले. युधिष्ठीराने वेदव्यासांना प्रार्थना केली की, त्यांनी त्यांना आपले राज्य परत मिळवण्यासाठी काहीतरी उपाय सांगावा.

 

Urvashi cursed arjun.Inmarathi
wikimedia.org

 

तेव्हा महर्षी वेदव्यासांनी त्यांना सांगितले की, तुम्हाला जर तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्हाला दिव्य अस्त्रांची गरज भासेल, कारण कौरवांकडे  भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण यांसारखे  महान योध्ये आहेत.

त्यामुळे दिव्य अस्त्रांशिवाय तुम्हीं त्यांचे काहीही बिघडवू शकत नाही. युधिष्ठिरने वेदव्यासांना ते अस्त्र कसे मिळवायचे याबाबत विचारल्यावर, व्यासांनी त्याला सांगितले,

तुमच्या सर्वांमध्ये फक्त अर्जुनच देवतांना प्रसन्न करून ही अस्त्रे मिळवू शकतो. त्यामुळे अर्जुनाने देवांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले पाहिजे.

 

अर्जुन गेला तपश्चर्या करायला 

वेदव्यासांचे ते बोल ऐकून अर्जुन तपश्चर्या करायला एकटाच पुढे निघून गेला. अर्जुन उत्तराखंडच्या पर्वतांना पार करत सुंदर वनात पोहोचला.

तेथील शांत वातावरणामध्ये तो भगवान शंकराची तपश्चर्या करायला लागला. अर्जुनाच्या तपाची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर एका भिल्लाचा वेश धारण करून त्या वनामध्ये आले.

त्या वनामध्ये आल्यांनतर भिल्लरुपी भगवान शंकरांनी पाहिले की, एक दैत्य शूकराचे रूप घेऊन तपश्चर्या करणाऱ्या अर्जुनचा घात करण्यासाठी आलेला आहे.

 

Urvashi cursed arjun.Inmarathi1
wordpress.com

 

भगवान शंकरांनी त्या राक्षसावर बाण सोडला. ज्यावेळी भगवान शंकरांनी त्या राक्षसावर बाण सोडला, त्याचवेळी अर्जुनाची तपश्चर्या भंग पावली आणि त्याने त्या राक्षसाला पाहिले.

त्याने देखील आपले गांडीव धनुष्य उचलून त्या राक्षसावर बाण सोडला. त्या शूकराला दोन्ही बाण एकाचवेळी लागले आणि तो मृत्यु पावला.

तो शूकर मरण पावल्यानंतर अर्जुन आणि भिल्लाचे रूप धारण केलेले शंकर दोघेही आपल्या बाणाने शूकर मेला आहे, असा दावा करू लागले.

त्या दोघांमधील वाद वाढत गेला आणि त्या वादाचे युद्धामध्ये रूपांतर झाले.

अर्जुनाने निरंतर भिल्लावर गांडीव धनुष्याने बाणाचा वर्षाव करायला सुरुवात केली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्याचे बाण त्या भिल्लाचे काहीही बिघडवू शकले नाही.

 

Urvashi cursed arjun.Inmarathi3
theholidayspot.com

 

अर्जुनाचे सर्व बाण त्या भिल्लाला लागून खाली पडायचे आणि भिल्ल शांत उभा राहून हसत रहायचा. शेवटी अर्जुनाचे सर्व बाण संपले.

त्याने त्या भिल्लावर तलवार चालवली, पण तलवारीचे देखील त्या भिल्लाच्या शरीराला लागताच दोन तुकडे झाले. आता अर्जुन चांगलाच संतापला आणि त्याने आपल्या बळाचा उपयोग केला.

पण मल्लयुद्धामध्ये भिल्लाच्या एका प्रहाराने अर्जुन बेशुद्ध झाला.

 

देवतांनी दिले अर्जुनाला दिव्यस्त्र 

थोड्या वेळाने अर्जुन शुद्धीत आला आणि त्याने पाहिले की, भिल्ल आताही तिथे उभा राहून हसत आहे.

भिल्लाची शक्ती पाहून अर्जुनाला आश्चर्य झाले आणि त्याने भिल्लाला मारण्यासाठी लागणारी शक्ती प्राप्त करण्यासाठी शिवाच्या मूर्तीवर पुष्पमाळ टाकली.

पण ही पुष्पमाळ शिवाच्या मूर्तीवर न जाता, त्या उभा असलेल्या भिल्लाच्या गळ्यामध्ये गेली.

यावरून अर्जुन समजला की, भगवान शंकरच भिल्लाचे रूप घेऊन येथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर अर्जुनाने भगवान शंकरांचे चरण स्पर्श केले. भगवान शंकरांनी आपले खरे रूप धारण केले आणि अर्जुनाला सांगितले की,

“हे अर्जुन, मी तुझी तपश्चर्या आणि पराक्रमाने अतिप्रसन्न झालो आहे, त्यामुळे मी तुला पशुपत्यास्त्र देत आहे.”

 

Urvashi cursed arjun.Inmarathi2
ytimg.com

 

भगवान शंकरांनी त्याला पशुपत्यास्त्र दिले आणि ते निघून गेले. त्यानंतर तिथे वरुण, यम, कुबेर, गंधर्व आणि इंद्र आपापल्या वाहनांवर स्वार होऊन आले. अर्जुनाने सर्वांची विधिपूर्वक पूजा केली. हे पाहून यम म्हणाले की,

“अर्जुन तू नराचा अवतार आहेस, तसेच श्रीकृष्ण नारायणाचा अवतार देखील आहेस. तुम्ही दोघे मिळून या पृथ्वीवरचा भार हलका करा.”

याप्रकारे सर्वानी अर्जुनाला आशीर्वाद दिले आणि विविध प्रकारची दिव्य अस्त्र देखील दिली आणि आपापल्या स्थानी निघून गेले.

 

अर्जुन स्वर्गात पोहोचला 

अर्जुनाकडून आपल्या राज्यामध्ये परत येत असताना देवराज इंद्राने त्याला सांगितले की,

“अर्जुना, तुला देवतांचे खूप कार्य संपन्न करायचे आहेत, तर त्यासाठी तुला घेण्यासाठी माझा सारथी येईल.”

त्यामुळे अर्जुन त्याच वनामध्ये राहून त्याची वाट पाहू लागला. काही काळानंतर त्याला घेण्यासाठी इंद्राचे सारथी मातली तिथे पोहचले. अर्जुन त्याच्या बरोबर पुष्पक विमानात बसून देवराज इंद्राची नगरी अमरावती येथे पोहोचले.

अमरावतीमध्ये राहून अर्जुनाने देवतांनी त्याला दिलेल्या दिव्य शास्त्रांचा प्रयोग कसा करायचा याबद्दलची शिक्षा घेतली, तसेच त्याने या शास्त्रांना चालवण्याचा अभ्यास करून त्यामध्ये तो निपुण झाला.

त्यानंतर एक दिवस इंद्र अर्जुनाला बोलले की,

“वत्स, तू चित्रसेन नावाच्या गंधर्वाकडून संगीत आणि नृत्याची कला शिकून घे.”

चित्रसेनने इंद्राच्या आदेशाचे पालन करत, अर्जुनाला संगीत आणि नृत्य या कलांमध्ये निपुण केले.

 

उर्वशीचा अर्जुनाला शाप 

एक दिवस चित्रसेन जेव्हा अर्जुनाला संगीत आणि नृत्याची शिक्षा देत होता, त्यावेळी तिथे इंद्राची अप्सरा उर्वशी आली आणि अर्जुनावर मोहित झाली.

संधी पाहून उर्वशीने अर्जुनाला म्हटले की,” हे अर्जुना, तुला पाहून माझी काम-वासना जागृत झाली आहे, तर कृपया माझाबरोबर विहार करून माझ्या काम-वासनेला शांत करावे.”

हे उर्वशीचे बोलणे ऐकून अर्जुन बोलला,

“हे देवी ! आमच्या पूर्वजांनी तुमच्याशी विवाह करून आमच्या वंशाचा मान वाढवला होता, त्यामुळे तुम्ही पुरु वंशाच्या जननी होण्याच्या नात्याने तुम्ही मला माझ्या मातेसमान आहेत. देवी मी तुम्हाला प्रणाम करतो.”

 

Urvashi cursed arjun.Inmarathi4
sagarworld.com

 

अर्जुनाच्या या बोलण्याने उर्वशीच्या मनामध्ये संताप निर्माण झाला आणि तिने अर्जुनाला म्हटले,

“तू एखाद्या नपुसंकासारखे बोल बोलला आहेस, त्यामुळॆ मी तुला शाप देते कि, तू एका वर्ष नपुंसक म्हणून राहशील.”

एवढे बोलून उर्वशी तेथून रागाने निघून गेली. जेव्हा इंद्राला या घटनेविषयी समजले, तेव्हा ते अर्जुनाला म्हणाले,” वत्स ! तू जसा वागलास, ते योग्यच होते.

उर्वशीचा शाप ही देवाची इच्छा होती, हा शाप तुझ्या अज्ञातवासामध्ये तुझ्या कामी येईल.

तू तुझ्या एक वर्षाच्या अज्ञातवासाच्या वेळी नपुंसक म्हणून राहशील आणि तुझा अज्ञातवास पूर्ण झाल्यावर परत पुरुषत्वाची प्राप्ती तुला होईल.”

 

अर्जुन बनला बृहन्नळा

याच शापामुळे अर्जुन एक वर्षाच्या अज्ञातवासाच्या दरम्यान बृहन्नळा बनला होता. या बृहन्नळाच्या रूपामध्ये अर्जुनाने उत्तराला एक वर्ष नृत्य शिकवले होते.

उत्तरा ही विराटनगरचे राजा विराट यांची मुलगी होती. अर्जुनाच्या अज्ञातवासानंतर उत्तराचा विवाह अर्जुनचा मुलगा अभिमन्यू याच्याशी झाला.

 

Urvashi cursed arjun.Inmarathi5
wikimedia.org

 

अर्जुनाला या शापाचा फायदा त्याच्या अज्ञातवासात झाला. अज्ञातवासात राहताना अखंड ब्रह्मचर्य पाळावे लागत असे. उर्वशीच्या शापाने अर्जुन नपुंसक झाल्यामुळे त्याला ब्रह्मचर्य पाळणे अनिवार्य होते.

उर्वशीने दिलेला शाप अर्जुनासाठी वरदान ठरला.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?