'छत्रपतींच्या ह्या ४ किल्ल्यांचा इतिहास दैदीप्यमान आहे...

छत्रपतींच्या ह्या ४ किल्ल्यांचा इतिहास दैदीप्यमान आहे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

स्वराज्य! सह्याद्रीला पडलेलं मोहक स्वप्न. अन्यायात पिचून निघालेल्या मराठी मुलखाला जागे करून त्याच अन्यायाच्या विरोधात युद्ध पुकारून स्वातंत्र्य मिळवण्याची अव्याहत प्रेरणा देणारा धगधगता महायज्ञ. आणखी कितीही काळ गेला तरी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वराज्याच्या स्थापनेची आणि शिवचरित्राची पारायणे भारतीयांना करावी लागतील.

अठरापगड मराठ्यांना हाताशी घेऊन शून्यातून उभ्या राहिलेल्या या असामान्य राज्याचा महत्वाचा भाग म्हणजे सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगात वसलेले बेलाग बुलंद गड किल्लेऐसपैस मोकळ्या वाळवंटात युद्ध करण्याची सवय असणाऱ्या यवनी फौजांना जीव मेटाकुटीला येईस्तोवर झुंजवण्याचे आणि शेवटी पराभव पत्करायला भाग पडण्याचे श्रेय जेवढे स्वराज्याच्या मर्द मावळ्यांचे तेवढेच या छातीचा कोट करून कायम उभ्या राहिलेल्या किल्ल्यांचेही. हिंदवी स्वराज्याच्या दिमतीला असणाऱ्या प्रत्येक किल्ल्याने स्वराज्याच्या निर्मितीत आपला वाटा उचलला आहे.

याची साक्ष शिवचरित्राच्या पानापानावर दिसल्यावाचून रहात नाही…!

 

Shivaji_Maharaj_Raigad-inmarathi
2.bp.blogspot.com

शहाजी महाराज विजापूर दरबारी असताना जिजाऊना सुरक्षितता देणारा शिवनेरी असो, किंवा स्वराज्याच्या आरमाराच्या सामर्थ्याचे मूर्तिमंत उदाहरण असणारा जंजिरा, सिंधुदुर्ग असो.

प्रत्येक किल्ला म्हणजे शिवरायांच्या गळ्यातल्या मोत्यांच्या माळेतला एक एक मणी! स्वराज्याची सेवा करणाऱ्या आणि आजही, तब्बल तीनशे साडेतीनशे वर्षानंतर मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभ्या असणाऱ्या काही दुर्गांच्या या कथा…

शिवनेरी:

पुण्यात जुन्नर तालुक्यात वसलेला हा किल्ला. १६३९ साल. जिजामाता गरोदर असताना शहाजीराजांनी त्यांच्यासोबत अवघे पाचशे घोडेस्वार देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर पाठवले.

किल्ल्यावर भवानीमातेचे प्राचीन मंदिर. या मंदिराला जिजाऊंनी नवस केला, “आपल्याला पुत्र झाला तर त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवीन”. त्याउपर फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर बाळाचा जन्म झाला. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.

 

shivneri-inmarathi
3.bp.blogspot.com

 

बाल शिवाजीच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गड! त्यांच्या काही बाललीलांचे वर्णन कवींद्र परमानंद यांनी शिवभारतात केले आहे. स्फाटीकांच्या भिंतीवर पडलेले सूर्याचे प्रतिबिंब पाहून “ते मला हवे” असा हट्ट करीत असत, याच शिवनेरीवर.

बाल सवंगड्यांना हाताशी घेऊन मातीची शिखरे बनवत आणि ‘हे माझे किल्ले’ असं म्हणत असत, याच शिवनेरीवर. किल्ल्यावर लागणाऱ्या साधनसामग्रीच्या बाबतीत तर शिवनेरी ऐश्वार्यसंपन्न होता.

७८ विहार, ३ चैत्यगृह. ६० पाण्याची टाके. तीन लेणी, ९ शिलालेख, धान्याची कोठारे. आणि अजूनही बरंच काही.

पहिली दोन वर्षे शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरीवर गेले. १६३२ साली जिजाऊ साहेबांनी शिवनेरी सोडला. जिथं राजांचा जन्म झाला त्या किल्ल्यावर फक्त दोन वर्ष वास्तव्य. तिथून पुढे स्वराज्यात ते कधी आला नाही.

तोरणा:

प्रचंडगड याही नावाने ओळखला जाणारा पुण्याजवळचा सर्वांत उंच डोंगर म्हणजे तोरणा. वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या चिंचोळ्या रांगांतून दोन पदर पूर्वेला पसरत गेले आहेत. त्यापैकी एक पदर म्हणजे राजगड आणि तोरणा, दुसरा म्हणजे भुलेश्वरच्या रांगा. शिवाजी महाराजांनी सुरुवातीला जे किल्ले घेतले त्यापैकी एक म्हणजे तोरणा.

जेम्स डग्लस नावाचा इंग्रज इतिहासकार म्हणतो, “सिंहगड ही जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे.”

 

torna-inmarathi
static2.tripoto.com

 

महाराजांनी ताब्यात घेण्याच्या आधी हा किल्ला निजामशाहीत होता. नंतर तो महाराजांकडे आला आणि त्याचे नाव प्रचंडगड ठेवण्यात आले. गडावर महाराजांनी काही इमारती बांधल्या. आग्र्याहून आल्यानंतर पाच हजार होन खर्चून त्यांनी तोरण्याचा जीर्णोद्धार केला. गडावर सर्व बाजूंना गोड पाण्याचे टाके आहेत.

मावळ मुलखातल्या सृष्टीचे अलौकिक सौदर्य किल्लावरून वसंत ऋतूत अनुभवणे म्हणजे संपन्न करणारा अनुभव. स्वराज्याच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरलेला तोरणा आजही तितक्याच दिमाखात उभा आहे.

राजगड

तोरण्याच्या शेजारच्या डोंगरावर कानंदी, वेळवंडी आणि गुंजवणी नदीच्या खोऱ्यात पक्षाच्या डोळ्याने पाहिले तर अंगठीच्या खोबणीत हिरा बसवल्यासारखा एक अवाढव्य खडक दिसतो. तो म्हणजे राजगडाचा बालेकिल्ला. आणि त्याच्या तिन्ही बाजूला ऐसपैस पसरलेल्या राजगडाच्या तीन माच्या. पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा. राजगडाचा व्याप मोठा.

 

trekking-to-rajgad-fort-inmarathi
indiamike.com

 

पद्मावती मंदिर, सदर, शिलेखाना, जासुद्खाना, अंबारी, राजमहाल, दफ्तरखाना, दारूचे कोठार या दागिन्यांनी सजलेला सह्याद्रीच्या स्वर्गातला हिरा म्हणजे राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी. त्याच्या सौंदर्याचे वर्णन करताना शाहीर थकून जात.

राजगड हा प्रशासकीय दृष्टीने अत्यंत महत्वाचा किल्ला. १६४७ च्या आसपास हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला.

आणि त्याची भव्यता, तिथपर्यंत पोहोचायला करावी लागणारी कसरत हे सर्व ध्यानी घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने राजगडला स्वराज्याची पहिली राजधानी बनवायचे ठरवले आणि लागोलाग त्याचे बांधकाम सुरू केले. खेडबारेच्या रानात आंब्याची झाडे लावून पेठ वसवली. त्याचे नाव शिवापूर असे ठेवले.

 

rajgad-fort-inmarathi
aroundpune.com

 

१६६५ मध्ये मिर्झाराजा स्वराज्यावर चाल करून आला. त्याने राजगडाकडे आपली फौज पाठवली. दाउदखान आणि रायसिंग यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या मुघल सैन्यावर गडावरून अचूक मारा करत मराठी सैन्याने त्यांना पाणी पाजले. मुघलांनी माघार घेतली. पुढे पुरंदरच्या तहात तेवीस किल्ले मुघलांना दिले तेव्हा बारा किल्लेच फक्त स्वराज्यात राहिले. त्या बारा किल्ल्यात राजगडाचाही समावेश होता.

आग्र्याहून सुटका झाल्यानंतर महाराज बदललेल्या वेशात परत आले ते राजगडावर. शिवबाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या जिजाउंच्या समोर साक्षात शिवबा जेव्हा साधूच्या वेशात आला तेव्हा कृतकृत्य होणाऱ्या मातेचे वात्सल्य या राजगडाने उघड्या डोळ्याने पहिले.

सईबाईंचा मृत्यू, पुरंदरचा तहाच्या रूपाने स्वराज्यावर आलेले संकट असे कितीतरी प्रसंग राजगडाने पहिले आहेत. शिवरायांच्या काळजाच्या कुपीत स्थान मिळवलेला बुलंद राजगड आजही एखाद्या म्हाताऱ्या पोक्त माणसासारखा स्वराज्याची महती सांगत उभा आहे.

रायगड

महाडच्या उत्तर दिशेला चहूबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला, गांधारी आणि काळ नदीच्या खोऱ्यात वसलेला किल्ला. शत्रूला दुर्गम वाटणारा हा भाग आणि त्यातल्या अतिदुर्गम डोंगरावर रायगड वसला आहे. जेव्हा महाराजांनी जय्यत तयारी करून जावळीच्या खोऱ्यात माजावर आलेल्या मोऱ्यावर हल्ला करून त्याचा धुव्वा उडवला.

तेव्हा यशवंतराव मोरे जावळी सोडून रायगडावर गेला. त्याला पकडण्यासाठी महाराजांनी रायरी म्हणजेच रायगडला वेढा घातला.

व थोड्याच दिवसात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. तेवढ्यात कल्याणचा सुभेदार खजिना घेऊन विजापुरकडे जात असल्याची माहिती महाराजांना मिळाली. तो खजिना लुटून त्याची संपत्ती रायगडाच्या बांधकामासाठी महाराजांनी कामी आणली.

 

rajgad_inmarathi
outlookindia.com

 

हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रसंग म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. रायगडावरील राजसभेत दिनांक ६ जून १६७४ या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. स्वराज्याच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातली ही एक महत्वपूर्ण घटना.

रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुर्दैवी प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. ३ एप्रिल १६८० या दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांनी देह ठेवला. अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा सह्याद्रीचा तळपता सूर्य रायगडाच्या कुशीत शांत झाला.

पुढे रायगडावर औरंगजेबाने स्वारी केली, मुलुख जाळला. सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे रायगड मोगलांना मिळाला.

स्वराज्याच्या वाटचालीत कित्येक मोहरे कामी आले. अतुलनीय पराक्रम दाखवत त्यांनी आपले नाव अजरामर केले. त्या ऐन यौवनातल्या फाकड्या वीरांच्या पराक्रमाची खूण हवी असेल तर जा…सह्याद्रीच्या अनवट मुलखात पाय रोवून उभ्या असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर त्यांचे अस्तित्व दिसेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “छत्रपतींच्या ह्या ४ किल्ल्यांचा इतिहास दैदीप्यमान आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?