' कधी प्रेडिक्टेबल, तर कधी परिणामकारक : मुक्काबाज चा रसास्वाद

कधी प्रेडिक्टेबल, तर कधी परिणामकारक : मुक्काबाज चा रसास्वाद

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सातत्यानं प्रयोगशील असणारा आणि वैविध्यपूर्ण स्वरूपाची निर्मिती करणारा दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप सुप्रसिद्ध आहे. ‘सत्या’ या पाथब्रेकर फिल्मची ची कथा लिहिणारा अनुरागच. राम गोपाल वर्माच्या या फिल्मनं, बॉलिवूड फिल्म्सची व्याख्या बदलून टाकली. फिल्मस अशाही असू शकतात, गुन्हेगार व्यक्तीही माणसेच असतात…त्यांच्याही विवक्षित प्रकारच्या मनोभूमिका असतात! त्यांचं काही मागणं असतं.

 

anurag-inmarathi
madaboutmoviez.files.wordpress.com

 

सिस्टिम कशी बनते, त्याचे घटक कोण असतात, हे घटक परिस्थिती बदलानुसार एकमेकांवर कुरघोडी कसे करतात आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन सिस्टिम काही ठिकाणी, काही अंशी कशी बदलते…सामान्य माणूस, राजकारणी, गँगस्टर्स, पोलिस या सगळ्या समाजघटकांवर, या सिस्टिम मधे होणार्या तात्कालिक बदलांचा परिणाम कसा होतो, इत्यादी गोष्टींचं यथार्थ व प्रभावी चित्रण ‘सत्या’ मधे पहायला मिळालं होतं.

सत्या नंतर, सहा वर्ष सेन्सॉरच्या कात्रीत अडकलेला, मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित अशा हुसेन झैदींच्या ‘ब्लैक फ्रायडे’ नावाच्या कादंबरीवर आधारलेला याच नावाचा सिनेमा, यानंतर, कॉलेजमधलं यूथ, राजपूत लोक आणि प्रादेशिक राजकरणाचा अफलातून ठळकपणे वेध घेणारा ‘गुलाल’, स्टीवन किंगच्या क्विटर्स इंक. या शॉर्ट स्टोरीवर आधारलेला ‘नो स्मोकिंग, गुन्हेगारीमागची मानसिकता तपशीलात जाऊन उलगडणारे व मानवी स्वभाव-विभावांचे कंगोरे दाखवणारे ‘रमन राघव 2.0’ आणि ‘अग्ली’, एकदम तरलतेनं काढलेली शॉर्ट फिल्म ‘मुरब्बा’ या कश्यपनं डिरेक्ट केलेल्या माझ्या आवडत्या काही फिल्मस्.

अनुरागच्या फिल्मोग्राफीकडे नजर टाकली तर चकीत व्हायला होतं. कमीत कमी वेळात जास्तीतजास्त काम करणारी ही व्यक्ती आहे. निर्माता, दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार, अभिनेता अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारं हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे.

आत्तापर्यंत आलेल्या म्हणजे अगदी ‘अग्ली’ आणि ‘रमन राघव 2.0’ या फिल्मसवर जर नजर टाकली, तर कश्यप दिग्दर्शित सिनेमे हे डार्कनेस, विकृती, व्हॉयलन्स आणि ब्लडस्पोर्टचा भरपूर प्रमाणात शिडकावा असलेले दिसतात. व्यावसायिक सिनेमांच्या प्रस्थापित समीकरणांना फाट्यावर मारून, हे सिनेमे निर्मिले गेले. व्यावसायिक व समांतर फिल्मसचा मेळ घालण्याचं अवघड कार्य जे मोजके दिग्दर्शक करत आहेत त्यात अनुरागचं नाव प्रथम क्रमांकावर येईल.

 

raman-navaz-inmarathi
s3.india.com

 

हिंसा, शोषण, विकृती आणि गुंतागुंतीचा मनोव्यापार हे अनुरागच्या सिनेमाचे महत्वाचे घटक असतात. ‘बॉम्बे वेलवेट’ हा महत्वाचा प्रयोग त्यानं काही वर्षांपूर्वी केला होता. तो बराचसा फसलाही. पण त्यातली कथनाची पद्धत, सादरीकरणातले प्रयोग, 96 kHz डॉल्बी एटमॉस साऊंड टेक्निक वापरून केलेली पहिली फिल्म, जबरदस्त संगीत आणि पार्श्वसंगीत या गोष्टी खचितच दुर्लक्ष करता येण्यासारख्या नाहीत.

एवढी सगळी जबरदस्त कारकिर्द असलेला मनुष्य जेव्हा ‘मुक्काबाज’ सारखा सिनेमा घेऊन येतो तेव्हा त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा साहजिकच उंचावलेल्या असतात. ‘मुक्काबाज’ या अपेक्षा पूर्ण करण्यात अंमळ अपयशी ठरतो. एखादा सिनेमा पहायचाच असेल, तेव्हा सिनेमाची टीझर्स आणि ट्रेलर्स वगळता मी त्याविषयी आधी काहीही वाचत किंवा बघत नाही. स्वतः फिल्म पाहिल्याशिवाय इतरांची मते, रिव्ह्यूज, आर्टिकल्स हे सर्व पाहणं/ वाचणं टाळतो.

खूप वाचून किंवा पाहून आपली ठराविक प्रकारची साचेब्द्ध मनोभूमिका बनते आणि फिल्म रिसीव्ह करताना आपण तितकेसे मोकळे नसतो. वाचलेल्या गोष्टींची मनातल्या मनात अकारण तुलना करत राहतो. ठराविक अपेक्षा घेऊन सिनेमा कधीही पाहू नये.

यावेळीही, ट्रेलर वगळता काहीच न वाचता/पाहता मी सिनेमा बघितला. अनुरागनं या वेळी बराचसा व्यावसायिक वळणाचा सिनेमा द्यायचा प्रयत्न ठेवला आहे. खऱ्या आयुष्यात, शिक्षणानं एमबीबीएस म्हणजे डॉक्टर असणारा व आजवर छोटेमोठ्या महत्वपूर्ण भूमिका केलेला विनीत कुमार बॉक्सरच्या प्रमुख भूमिकेत आहे. झोया हुसैन ही प्रथमच पदार्पण करणारी नवोदित अभिनेत्री , रवी किशन हा भोजपुरी व हिंदी सिनेमांमधे काम करणारा तगडा अभिनेता आणि गुणी असूनही कायमच साईडच्या भूमिका करत असलेला जिमी शेरगिल अशी प्रमुख स्टारकास्ट आहे.

 

mukkabaz-vineet-inmarathi
hindustantimes.com

 

मुक्काबाज कहाणी आहे एका ताज्या दमाच्या आणि भक्कम निर्धार असलेल्या एका बॉक्सरची आणि त्याच्या आयुष्यात येणार्या उतार-चढावांची. हा बॉक्सर करारी, निग्रही आहे. विपरित परिस्थिती असूनही त्याला तोंड देऊन, बॉक्सिंगमधे कारकिर्द घडवायचं त्याचं उद्देष्य आहे. हे उद्देष्य गाठताना येणारे अडथळे, अडचणी आणि या सगळ्यावर त्यानं केलेली मात, हे मुक्काबाजचं बिग पिक्चर आहे.

सहा पटकथाकारांनी एकत्र येऊन मुक्काबाजची कहाणी पडद्यावर उभी केली आहे. आश्चर्यकारकरित्या कश्यपच्या या सिनेमात, त्याच्या आधीच्या सिनेमांत दिसतात तशी ग्रे-शेडेड पात्रे नाहीतच ! सगळं काही ब्लैक अॉर व्हाईट आहे. बर्याचशा पात्रांना पदर किंवा कंगोरे नाहीतच. त्यांचा एक ठराविक स्वभाव आहे आणि तो घेऊनच चित्रपटभर ते वावरतात.

श्रवणकुमार हे विनीत कुमार अभिनित पात्र वगळता बाकीची पात्रे नीट डेव्हलपच केलेली नाहीत असं सतत वाटत राहतं. नवोदित अभिनेत्री झोया हुसैन आपली छाप सोडते. पहिला सिनेमा असूनही ती नवखी आहे हे कुठेही जाणवत नाही. जिमी शेरगिलचा व्हिलन कुठेही भयंकर किंवा रौद्र वाटत नाही. हिरोच्या जीवनात विविध पद्धतीने अडचणी उभ्या करत राहण्याचं काम तो पटकथाकारांनी आखून दिलेल्या मार्गावर चालून चित्रपटभर करत राहतो.

व्हिलन भयंकर आहे, त्याचा दरारा समाजाच्या सर्व थरांमधे पसरला आहे, त्याची आर्थिक व राजकीय ताकद इत्यादी गोष्टी इतर पात्रांच्या तोंडूनच कळतात. हे पात्र म्हणावं तितकं कन्व्हिन्सिंगच नाही. प्रेक्षकाला ते समोरासमोर भिडतच नाही. जिमी कितीही चांगला अभिनेता असला, तरीही यातला खलनायक साकारताना तो दुबळा ठरला आहे.

 

mukaabaaz-jimmy-inmarathi
i.ndtvimg.com

 

वेशभूषाकार व पटकथाकारानं डिझाईन केलेलं पात्र वाटतं हे. अभिनेता म्हणून स्वतःचा एक्स फैक्टर देण्यात जिमी असमर्थ ठरतो. हे पात्र मनावर ठसतच नाही. तो भयंकर का आहे, त्याची ताकद इतकी का आहे, हे फक्त त्यानं हिरोच्या मार्गात इभे केलेले अडथळे, इतर पात्रांची बोलणी व एकंदर घटनाक्रमातून जाणवतं. परिणामकारकपणे पोचत नाहीच.एक अभिनेता म्हणून या खलनायकाची दहशत समर्थपणे उभी करण्यात जिमी निष्प्रभ ठरतो.

जिमी ऐवजी प्रकाश राज, नवाझुद्दीन सिद्दीकी, मनोज वाजपेयी, पियूष मिश्रा, संजय मिश्रा, रोनित रॉय, गिरीश कुलकर्णी या कलाकारांपैकी कुणीही ही भूमिका सामर्थ्यानं वठवली असती असं वाटतं.

याऊलट हिरोचं पात्र डिटेल्ड लिहिलं आहे आणि विनीतनं ते जबरदस्त मेहनतीनं साकारलंय. या पात्राला बर्याच शेडस् आहेत. विनीत आणि झोयाची केमिस्ट्री सुरेख रंगली आहे. रवी किशनला फारच छोटीशी भूमिका आहे. त्याला जरासा वायाच घालवल्यासारखा वाटला. रवी किशनचं पात्र हाफ बेक्ड किंवा अंडर डेव्हलप्ड आहे. सहा पटकथाकार आणि सहा डिरेक्टर अॉफ फोटोग्राफी घेण्यामागचं प्रयोजनही समजत नाही.

सिनेमाचा उत्तर भारतीय फील अस्सल आहे. प्रॉडक्शन डिझाइन,मेकअप, वेषभूषा, खमंग संवाद, लोेकेशन्स आणि सुंदर संगीतामुळे हा फील प्रेक्षकांपर्यंत सहजी पोचतो. साहसदृश्ये कमालीच्या ताकदीनं साकारली आहेत. यातली एक्शन रॉ आहे. रियल वाटते. पार्श्वसंगीत भयंकर लाऊड आहे, ज्याचा बरेचदा त्रास होतो. अतिरेक होतो. सात पैकी दोन गाणी अतिशय सुमधूर आहेत. गाणी अधेमधे येत राहतात. एखाद दोन कडव्यांच्या रूपात. पण ती घुसडल्यासारखी वाटत नाहीत.

मुक्काबाज मधे केलेले साऊंड मिक्सिंगचे प्रयोग वाखाणण्याजोगे आहेत. अनुरागचा साऊंड आणि म्यूझिक सेन्स जबरदस्त आहे. त्याच्या मागच्याही कामात हे अनेकवार जाणवतं.

‘मुक्काबाज’ ही खरेतर प्रेमकथा व बॉक्सिंगचा मिलाफ करून तयार केलेली सूडकथा आहे. हा प्रयोग राजकुमार संतोषी – सनी देवलच्या ‘घायल’ मधे आणि विक्रम भट्ट – आमिर खानच्या ‘गुलाम’ मधे आपण बघितलेला आहे. ते प्रयोग खूपच रंजक आणि व्यावसायिक वळणाचे होते. ‘मुक्काबाज’ घायल आणि गुलाम पेक्षा खूपच वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे. यात

“उनकी बीडी में तमाखू ही नही है”, “आप दोनो शून्य मिलाके हम कहाँ से आर्यभट्ट पैदा होंगे”, “उत्तर परदेस के माईक टायसन है हम”

यांसारखे तडकेदार संवाद, साहसदृश्ये व मसाला ठासून भरलेला आहे. तरीही, संधी असूनही, डार्क प्रसंगांची भरमार, हिंसाचार व रक्तपात या सगळ्याला कश्यपनं चक्क फाटा दिला आहे. समांतर व व्यावसायिक स्वरूपाचा मिलाफ या कश्यप स्टाईलचाच हा सिनेमा आहे. यातला व्हायलंस, हाणामार्या बर्याच प्रमाणात टोन डाऊन केलेेल्या आहेत. दृश्ये अंगावर येत नाहीत.

 

new-mukkabaaz-inmarathi
titosgoa.com

 

ती डोळे नीट उघडे ठेऊन बघवली जातात. धक्केही देतात. पण यातली पात्रं अधिक खोली असलेली व पूर्णपणे फुलवलेली वाटत नाहीत. पात्रांचा परस्परांतला मनोव्यापार किंवा मानसिक गुंतागुंत या गोष्टी खूप कमी ठिकाणी पहायला मिळतात. घटनांची संख्या प्रचंड प्रमाणात असल्यानं आणि सिनेमाची कथा दोन मार्गिकांवरून समांतर पद्धतीनं चालल्यामुळं, त्याची लांबी नकोइतकी वाढली आहे. नायक आणि नायिकेचं पात्र वगळता, इतर पात्रांचा मनोव्यापार तपशीलात उभा केलेलाच नाही.

सेकंड हाफ अतिशय संथ आहे. मध्यंतराच्या मागेही सिनेमा चक्क रेंगाळला आहे. मध्यांतर चुकीच्या जागी येतं. सिनेमा वीस मिनिटं कमी करता आला असता. अडीच तास लांबीचा हा संथ सिनेमा एका क्षणी अर्धवटपणे संपतो !

आयुष्यात आपल्याला नक्की काय हवं आहे?

जे हवं आहे ते मिळाल्यावर, आपण आपलं उर्वरित आयुष्य सुखासमाधानानं जगू शकू का? हवं ते मिळवण्यात जर काही अत्यंत कठीण अशा अडचणी आल्या, तर त्या त्या वेळी घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयामुळे नंतर चुकवावी लागणारी किंमत या सगळ्याचा आपण थंडपणे विचार करतो का? भावनेच्या भरात वाहवणे कितपत योग्य ठरते?

आयुष्यातले महत्वपूर्ण निर्णय हृदयापासून विचार करून घ्यायचे की मेंदू वापरून ? अशा असंख्य प्रश्नांचं मोहोळ या सिनेमाचा शेवट उठवतो. हिरोनं शेवटी जे केलं ते योग्य की अयोग्य? सगळा विचार करता, झालं ते योग्य झालं का? प्रस्थापित धारणांनुसार नायक व खलनायक कोण ठरतं ? असे मूलभूत प्रश्न सिनेमा उभे करतो.

सिनेमाच्या सुरवातीला प्रेक्षकाच्या मनात निर्माण झालेले सेट पॉईंटस् सिनेमा संपताना बदलतात. कौन हारा और कौन जीता? हा प्रश्न आपण जेव्हा स्वतःला विचारतो, तेव्हा खूप वेगवेगळी उत्तरं मिळतात.

 

mukkabaz-movie-review-inmarathi
http://cdn.jinnions.com

 

सिनेमाचा किंचित अर्धवट असणारा शेवट प्रेक्षकाच्या बुद्धीला चालना देणारा असला, तरी, (काही पात्रे सोडून ) अर्धवट उभी केलेली पात्रे, त्यांचे फारशा तपशीलात न जाता रेखाटलेले परस्परसंबंध, काही पात्रे व प्रसंग वगळता अर्धवट उभारलेला मनोव्यापार या सगळ्यामुळे सिनेमा परिपूर्ण बनता बनता राहतो.

बरेचसे प्रेडिक्टेबल प्रसंग, काही क्लीशेड प्रसंग, धक्का टेक्निकचा फारसा नसलेला वापर, प्रचंड वेळ चालणारी व मधे कंटाळा आणणारी अगणित प्रसंगांची मालिका आणि अधांतर स्थितीत केलेला शेवट यामुळे ‘मुक्काबाज’ माफक प्रमाणात निराश करतो.

उत्तर प्रदेशचा अस्सल फ्लेवर, तिथल्या जातियवादी राजकारणाची चुणूक, विनीत कुमारचा जीव तोडून उभा केलेला बॉक्सर श्रवण, झोया हुसैन या अभिनेत्रीचा दृष्ट लागण्याजोगता मूकाभिनय, अनुरागनं फिल्मच्या स्वरूपात केलेला आगळावेगळा प्रयोग आणि दणकेबाज साहसदृश्ये याकरता ‘मुक्काबाज’ एकदा पहायला हरकत नाही.

रेटिंग – ***

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?