' सुरावटींच्या बादशहाची अज्ञात साथीदार : मीरा दास गुप्ता (बर्मन) – InMarathi

सुरावटींच्या बादशहाची अज्ञात साथीदार : मीरा दास गुप्ता (बर्मन)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आज राज्यसभा चानेल वर S.D.Burman वर चांगला १ तासाचा कार्यक्रम पहिला. अतिशय उत्तम. आज काही  त्यांचा जन्मदिवस(१ ऑक्टोबर १९०६) नाही की आज त्यांचा स्मृतीदिनही नाही (३१ ऑक्टोबर १९७५). मग का दाखवला असेल? कुणास ठावूक! पण जे काही कारण असेल ते असो, कार्यक्रम अत्यंत चांगला आणि पुरेसा विस्तृत होता. हा कार्यक्रम पाहताना ते कदाचित बर्मनदाच्या आयुष्यात, त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीत त्यांच्या पत्नी म्हणजे मीरा देवी ह्यांच्या योगदानाबद्दल बद्दल काही माहिती देतील असे वाटले होते. पण नाही दिली.

अर्थात त्यांचे लग्न कसे झाले, बर्मनदानी सुरु केलेलं संगीत विद्यालय, तेथे त्यांची शिष्या म्हणून आलेली मीरा, त्यांचे प्रेम कसे जुळले लग्नानंतर त्रिपुरा राजघराण्याशी त्याचे झालेले वितुष्ट असली चटपटीत माहिती पुरवली आणि ती काही कमी महत्वाची आहे असेही नाही.

( हो! बर्मनदा  त्रिपुरा राजघराण्यात जन्माला आले होते – आई राजकुमारी निर्मला देवी ह्या मणीपुरच्या राजकन्या तर वडील नवद्वीपचंद्रदेव बर्मन हे त्रिपुराचे महाराज ईशानचन्द्र माणीक्य देव बर्मन ह्यांचे सुपुत्र …काय नावं आहेत, जबरा! नशीब मुलाचे नाव सचिन ठेवले नवद्वीपत्सूर्य किंवा नवद्वीपतारा नाही ठेवले ..असो)) पण मीरा देवी ह्यांची संगीत प्रतिभा आणि कला आवड ह्यावर अंधुकसा कवडसासुद्धा टाकला नाही म्हणून हा छोटेखानी लेख.

मीरा दास गुप्ता ह्या ढाक्याचे Magistrate रायबहादूर कमलनाथ दास गुप्ता ह्यांच्या सुकन्या.पण त्या राजघराण्यातल्या नसल्याने त्यांचा अपमान केला गेला आणि संतापून सचिनदांनी राजघराण्याशी असलेले संबंध पूर्णतया तोडले.

 

sd_burman_meera_inmarathi
outlookindia.com

मीरादेवी स्वत: उत्तम नर्तिका अन गायिका होत्याच पण प्रतिभाशाली संगीतकार देखील होत्या.१९७० सालापर्यंत ६४ वर्षांचे झालेले सचिनदा थकले होते आणि आधीच कृश असलेले आणि निरनिराळ्या आजारानी जर्जर झालेले शरीर त्याना साथ देत नव्हते. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घरीच अंथरुणाला खिळले होते आणि घरूनच संगीत दिग्दर्शन करू पाहत होते. त्यांचा मुलगा पंचम( राहुलदेव बर्मन) आतापर्यंत त्यांचा सहायक म्हणून काम करीत होता पण तो ही आता त्याच्या कामात व्यस्त झाला होता.

सचिनदा सगळे काम घरून करु शकत नव्हते. म्हणजे गाण्याच्या तालमी, सुरावट बसवणे वगैरे ठीक पण प्रत्यक्ष ध्वनी मुद्रण, संगीत आणि वाद्यवृंद समायोजन ते कसे जमायचे? ह्यावेळी मीरा देवी ह्या त्यांच्या प्रमुख संगीत निर्देशक बनल्या.

हा कालखंड थोडा थोडका नव्हे तर १९७१ ते १९७५ असा प्रदीर्घ आहे. ‘तेरे मेरे सपने’ पासून सुरु झालेली ही त्यांची कारकीर्द ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘मिली’, ‘उस पार’ अशी भरपूरच सजली आणि गाजलीही. ह्या प्रत्येक चित्रपटाचे संगीत प्रचंड गाजले. ‘अभिमान’साठी तर सचिनदांना फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला. त्याकाळी बर्मनदा दरवर्षी दुर्गापूजेच्या निमित्ताने बंगालीत ३-४ गाणी गात/ध्वनी मुद्रित करत असत. ह्यापैकी अत्यंत गाजलेली (बंगाली भाषेत) ‘के जाशी रे… ‘( कुठे जाशी रे), बन्सी शुने आज… ही अशी काही गाणी मीरादेवीनीच लिहिलेली आहेत त्यांचे आणि व बर्मनदांचे शेवटचे गीत ‘बडी सुनी सुनी है’ हे अत्यंत भावस्पर्शी तर आहेच पण मीरादेविच्या आयुष्याच्या संध्याकाळचे यथार्थ वर्णन करणारे असेच आहे.

पंचम हयात असे पर्यंत ती दोघे एकत्रच होती पण मुलाच्या मृत्यू नंतर मात्र त्या हळू हळू नैराश्यात आणि झपाट्याने आपल्या सगळ्यांच्या विस्मृतीतही गेल्या. वाढते वय, अशात पक्षाघाताचा आजार, वारंवार कराव्या लागणार्या इस्पितळाच्या वाऱ्या, काळजी घ्यायला कुणी नाही अशा अवस्थेत त्यांच्या सुनबाई आणि विख्यात गायिका आशा भोसले ह्यांनी त्याना ‘शरण’ ह्या मुंबईच्या वृद्धाश्रमात हलवले.

 

 

मीरा दास गुप्ता(बर्मन), सचिनदा आणि मीरा देवी …

२००६-०७ हे बर्मनदांचे जन्म्शाताब्दीवर्ष म्हणून त्रिपुरा सरकारने साजरे केले त्यानिमित्ताने त्याने मीरा देव बर्मन ह्यांचा सत्कार करायचे ठरवले तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी उजेडात आल्या. अनेकजण हळहळलेही पण तेवढेच.

असो १४ सप्टे २००७ साली त्रिपुरा सरकारचे तत्कालीन सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री अनिल सरकार ह्यांनी  मुंबईत वृद्धाश्रमात जाऊन त्यांची भेट घेतली अन सत्कार केला. त्यानंतर एकाच महिन्याने म्हणजे १५ ऑक्टो २००७ रोजी  वयाच्या ८४ व्या वर्षी त्या वारल्या.

सचिन देव बर्मन आणि राहुल देव बर्मन हे दोघे पितापुत्र अतिशय प्रतिभासंपन्न आणि सृजनशील कलाकार होते ह्यात शंकाच नाही पण ह्या दोघांच्या पाठीमागे उभी असणारी मीरा देव बर्मन ही त्याच तोडीची कलाकार होती पण तिची कला आणि प्रतिभा खर्या अर्थाने जोखली गेली नाही हे त्यांचे आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे दुर्दैव! आणखी काय म्हणणर ….

बड़ी सूनी सूनी है ज़िंदगी ये ज़िंदगी
मैं खुद से हूँ यहाँ अजनबी अजनबी
बड़ी…

कभी एक पल भी, कहीं ये उदासी
दिल मेरा भूले
कभी मुस्कुराकर दबे पाँव आकर
दुख मुझे छूले
न कर मुझसे ग़म मेरे, दिल्लगी ये दिल्लगी
बड़ी…

कभी मैं न सोया, कहीं मुझसे खोया
सुख मेरा ऐसे
पता नाम लिखकर, कहीं यूँही रखकर
भूले कोई कैसे
अजब दुख भरी है ये, बेबसी बेबसी
बड़ी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?