' जातीय राजकारण : मराठी माणूस गुजरात्यांकडून धडा शिकेल काय?

जातीय राजकारण : मराठी माणूस गुजरात्यांकडून धडा शिकेल काय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

नुकतीच गुजरात विधानसभा निवडणूक पार पडली. कॉंग्रेस आणि त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय जनता पक्षाला त्यामुळे ही निवडणूक नक्कीच कठीण गेली. पण विरोधकांच्या ‘जातीयवादी’ प्रचारामुळे निवडणूक कठीण जाणे हे गुजरात भाजपसाठी अपमानास्पद नक्कीच नाही उलट या प्रकारामुळे भाजपविरोधकांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.

महाराष्ट्रात मात्र याच भाजपाने जातीय ध्रुवीकरण करून सत्ता मिळवली हे देखील नाकारता येणार नाही. आपण गुजरात निवडणुकीतील जातीय ध्रुवीकरण आणि त्याचे परिणाम पाहू.

या आधीच्या प्रत्येक निवडणुका या कॉंग्रेस गुजरात दंगलीचे भांडवल करून जिंकू पहात होती. परंतु त्यात कॉंग्रेसला फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे यावेळेस कॉंग्रेसने धर्मवाद सोडून जातीयवादावर लक्ष केंद्रित केले. पण त्यातही कॉंग्रेस यशस्वी झाली नाही…!

गुजरातमधील जातीय मतांच्या टक्केवारीकडे नजर टाकल्यास हे सत्य लक्षात येईल.

“लोकनीती – सीएसडीएस २०१७” च्या सर्वे नुसार कॉंग्रेसची ब्राह्मण मतांची टक्केवारी २०१२ निवडणुकीत २७% इतकी होती ती ३१% इतकी झाली.

देवळांचे खेटे आणि जानव्याचा प्रयोग हा कॉंग्रेसची ब्राह्मण मतांची टक्केवारी वाढवण्यात नक्कीच यशस्वी झाला. पण –

 

Congress-BJP-inmarathi
india.com

भाजपाची ब्राह्मण मतांची टक्केवारी मात्र केवळ एका टक्क्याने कमी झाली आहे. ६५% वरून ६४% इतकी ब्राह्मण मतांची घसरण झाली.

म्हणजेच कॉंग्रेसला मिळालेली मते ही मतदानाला न उतरलेल्या ब्राह्मणांची होती किंवा जे इतरांना मतदान करीत होते त्यांची होती. कॉंग्रेस ब्राह्मण मतांचे ध्रुवीकरण करण्यात मात्र अपयशी ठरली. या जानवी प्रचारात विकास कुठेही नव्हता.

पुढील जात आहे राजपूत.

कॉंग्रेसने या जातीचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न फारसा केला नाही. या जातीसाठी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात काहीही नव्हतं. कदाचित इतर जातीकडे कॉंग्रेसचा झुकता कल पाहून या जातीने कॉंग्रेसला मत देण्याचे टाळले. जवळपास या जातीची ११ टक्के मतं कॉंग्रेसने गमावली.

भाजपची राजपूत मते राजपुतांसाठी कोणतीही खास घोषणा नसताना १२ टक्क्यांनी वाढली. भाजपचा हा वाढलेला टक्का विकासासाठी होता असं म्हणायला वाव आहे.

आता सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या पटेलांकडे पाहू.

पटेल हे दोन प्रकारचे आहेत. एक कडवा आणि एक लेवा. या मतांसाठी कॉंग्रेसने विशेष लक्ष पुरवले होते. शक्य नसतानादेखील पटेलांना आरक्षण द्यायला कॉंग्रेस तयार होती ती केवळ येनकेन प्रकारेण गुजरातमध्ये सत्तेत येण्यासाठी किंवा राहुल गांधी यांचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी.

भाजपाने समोर काठावरचं यश दिसत असूनही या आरक्षणाला केराची टोपली दाखवली हे विशेष. कदाचित भाजपाने आरक्षण उचलून धरलं असतं तर कॉंग्रेस इथेही त्यांच्या पारंपारिक जातीवादी राजकारणात अपयशी ठरली असती.

२०१२ साली भाजपला ७०% पटेलांची मते मिळाली होती ती २०१७ साली ६०% इतकी मिळाली. हे लक्षात घेतलं पाहिजे की इतकं रान उठवून देखील भाजपाची पटेल मते केवळ १० टक्क्यांनी कमी झाली. त्या विरुद्ध कॉंग्रेसला २०१२ साली पटेलांची १२% मते मिळाली जी या वर्षी ३७ टक्क्यांपर्यंत वाढली.

सरकारी नोकऱ्या कमी होत असताना आरक्षणचं हे आकर्षण अचंबित करतं. कदाचित आरक्षणाचं हे आकर्षण शिक्षण क्षेत्रात असलेल्या आरक्षणामुळे असू शकेल.

हार्दिक पटेल हा माणूस थेट निवडणुकीच्या रिंगणात कॉंग्रेसतर्फे उतरला असता तर ही टक्केवारी आणखी वाढू शकली असती.

 

hardik-patel-inmarathi
indiatvnews.com

कॉंग्रेसने केलेले जातीयवादी प्रयत्न त्यांना पटेलांची मते खेचण्यात यश देऊन गेले. पण तरीही ती मते विकासाच्या राजकारणाला हरवू शकली नाहीत हे विशेष.

पुढे क्षत्रिय आणि कोळी मते येतात.

अल्पेश ठाकोर हा क्षत्रिय मते कॉंग्रेसकडे खेचण्यात फारसा यशस्वी झालेला नाही. भाजपची क्षत्रिय मते ही पाच टक्क्यांनी कमी झाली आहेत तर कॉंग्रेसची दोन टक्क्यांनी वाढली आहेत. कदाचित भाजपाने क्षत्रियांना फारसं प्रतीनिधीत्व दिलेलं नाही त्यामुळे हे झालं असावं किंवा पटेल मतांचा या मतांवर परिणाम झाला असावा.

पुढे बहुजन आणि दलित मते येतात. ही जिग्नेश मेवाणी यांची जहागिरी.

इथे कॉंग्रेसची बहुजन मते ११ टक्क्यांनी वाढली आहेत तर भाजपची १ टक्क्याने कमी झाली आहेत. याचाच अर्थ विकास हा बहुजन समाजापर्यंत नक्कीच पोहोचला आहे. तसं नसतं तर भाजपची मतांची टक्केवारी इथे मोठ्याप्रमाणात घसरली असती.

jignesh-mevani-dalit-leader-inmarathi
theweek.in

कॉंग्रेसची वाढलेली टक्केवारी हे दाखवून देते की २०१२ साली विरोधकांमध्ये विखुरलेली मते कॉंग्रेसने ध्रुवीकरण करून एकत्र आणण्यात यश मिळवलं. पण हे अश्याप्रकारचं जातीचं राजकारण करून मिळवलेलं यश गुजरातला आणि देशाला कुठे घेऊन जाणार हे कॉंग्रेसला समजायला हवं.

शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब यांची मते खूप काही सांगून जातात.

२०१२ साली भाजपला ३०% मते या वर्गातून मिळाली होती, जी २०१७ साली ४०% इथपर्यंत वाढली. आणि या विरुद्ध कॉंग्रेसची मते जी २०१२ साली ५३ % इतकी होती ती २०१७ साली ४५ टक्क्यांपर्यंत घसरली.

पटेल आणि ब्राह्मण जातींचे ध्रुवीकरण करायच्या नादात कॉंग्रेस स्वतःच्या हक्क्याच्या ७% मतांना मुकली. विशेष म्हणजे ही मते भाजपकडे थेट गेली – यातच भाजपच्या विकासाच्या राजकारणाचा मोठा विजय आहे.

जर भाजपने विकास केलाच नसता तर ही मते इतरत्र विखुरली असती. पण तसे झालेले नाही. जातीय राजकारणावर भर असलेला जिग्नेश मेवाणी इथे सपशेल तोंडावर आपटलाय.

शेवटी कॉंग्रेसचा पिढीजात हक्काचा मतदार येतो. तो म्हणजे मुस्लीम.

इथे कॉंग्रेसच्या धर्मवादी आणि जातीयवादी राजकारणाची झालेली प्रचंड फसगत लक्षात येते. कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार “भाजपच्या फेकू विकासाला आणि राजकारणाला कंटाळून” खरंतर हा वर्ग २०१७ साली पूर्णपणे कॉंग्रेसच्या पारड्यात मत टाकणार असंच वाटत होतं. पण उलटंच झालंय.

भाजपची गुजरात मध्ये ७% मुस्लीम मतं वाढली असून कॉंग्रेसची ६ % मुस्लीम मतं कमी झाली आहेत. हे मत विकासाला नाही तर कशाला – हे कॉंग्रेस स्पष्ट करू शकेल काय ?!!!

 

bjp-muslim-inmarathi
indianexpress.com

इथे या जातीय रगाड्यात तोंडावर कॉंग्रेस आपटल्यामुळे शहरी आणि ग्रामीण अशी वर्गवारी पुढे केली जाते आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जातीय ध्रुवीकरण हे अधिक परिणामकारक होतं हे देखील तितकंच सत्य आहे. त्याचाच फायदा कॉंग्रेसला जागा जिंकताना झाला. अर्थात –

तो फायदा हा जातीय राजकारणामुळे झालेला असल्यामुळे “भाजपचा विकास नाकारला गेलाय” हे छातीठोकपणे कुणीही म्हणू शकत नाही.

एकीकडे सातत्याने सुरु असलेलं विकासाचं राजकारण आणि दुसरीकडे धार्मिक आणि जातीय राजकारण यात गुजरात मध्ये विकासाच्या राजकारणाचा विजय झाला हे निर्विवाद सत्य आहे.

२००२ ते २०१४ पर्यंत असलेले मोदींचे नेतृत्व २०१७ साली नसल्यामुळे भाजपचं नुकसान झालं आणि कॉंग्रेस करीत असलेल्या जातीय राजकारणाचं वादळ भाजपला नक्कीच हलवून गेलं इतकंच म्हणता येईल.

येत्या प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेस आता जातीचं आणि शक्य असेल तिथे धर्माचं राजकारण करणार यात शंका नाही.

 

india.com

परंतु “बदलत असलेला भारतीय मतदार हा विकासाच्या राजकारणाला थारा देतो, जातीच्या राजकारणाला नाही!” हे जोपर्यंत कॉंग्रेसच्या लक्षात येईल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.

हे कॉंग्रेसचं हे नकारात्मक असलेलं जातीचं राजकारण यशस्वी झालंच तरीही ते यश फारसे टिकणारे नसेल.

या लेखाचा उद्देश भाजप भला, काँग्रेस वाईट हे ठरवण्याचा नाही. इथला मुद्दा – “गुजरातमध्ये जातीय राजकारण कसं निष्प्रभ ठरतंय” हे मराठी माणसाला दाखवून देणे – इतकाच आहे. गुजरात निवडणूक देखील केवळ ‘उदाहरणार्थ’ म्हणून; बाकी काही नाही.

महाराष्ट्राचा विकास हा जातीय राजकारणाचा नकारात्मक मार्ग सोडून विकासाचं राजकारण केल्यानेच होऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवं. महाराष्ट्राचा विकास हा एका जातीपुरता किंवा वर्गापुरता मर्यादित न राहता तो सर्वांगीण हवा आणि असा विकास होण्यासाठी महाराष्ट्राच्या मतदाराला जात डोक्यातून विसरावी लागेल.

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या मतदारांनी स्वतःच्या जातीसाठी काही मागण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी विकास मागावा हीच या लेखप्रपंचामागची प्रामाणिक अपेक्षा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?