' “मुक्काबाझ” चांगलाच पण…शेवटी अनुराग कश्यपने “कमाई” बाजी केलीच…! – InMarathi

“मुक्काबाझ” चांगलाच पण…शेवटी अनुराग कश्यपने “कमाई” बाजी केलीच…!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

हिंदी सिनेमाच्या सजग रसिक प्रेक्षकांसाठी अनुराग कश्यपचा चित्रपट म्हणजे एक पर्वणी असते. चित्रपटाची प्रसिद्धीच नायकाच्या नावाने नाहीतर दिग्दर्शकाच्या नावाने होते इथंच खरतर त्याच वेगळेपण सिद्ध होतं. मुख्य प्रवाही मनोरंजनपर सिनिमापेक्षा काहीतरी हटके करणे ही अनुराग ची ओळख.

वास्तविकतेचे भान देण्यासोबतच माणसाच्या भावविश्वातील नकारात्मक, कठोर, निराशाजनक, क्रूर बाजू ज्या इतरवेळी सिनेमांत दिसत नाहीत त्या अनुरागच्या सिनेमात दिसतात.

 

anurag-films-inmarathi
twimg.com

पण तरीही ‘गँगस् ऑफ वासेपुर’ नंतर चांगली कमाई करणारा एकही चित्रपट त्याच्याकडून आला नाही. चित्रपट निर्मितीच्या आणि तो प्रसिद्ध होण्याच्या भारतीय साचेबद्ध पद्धतीत तो कधी बसलाच नाही. यावेळी मात्र त्याने कमाईसाठी अपरिहार्यतेतून त्या टिपिकल पद्धतीला झुकतं माप दिलेलं दिसतय.

“मुक्काबाझ” हा अनुराग चा नवीन चित्रपट, यात बॉक्सिंगची आवड असलेला नायक, त्याची मूक असलेली नायिका, क्रीडा क्षेत्रातला भ्रष्टाचार, खेळाडूंसमोरील आव्हाने, छोट्या शहरातील वातावरण यांचा सुरेख संगम साधलाय. चित्रपटाचा नायक विनीतकुमार मिश्रा यानेच या चित्रपटाची कथा लिहिली आहे जी एका सत्य घटनेवर आधारित आहे.

दीड वर्ष विनीतने बॉक्सर बनण्यासाठी केलेली मेहनत कदाचित एखाद्या प्रस्थापित नटाने करायला स्पष्ट नकार दिला असता. जिममध्ये शरीरयष्टी बनवणे वेगळे पण एखादे पात्र साकारण्यासाठी बॉक्सर बनण्या एवढं एखाद्या पात्रात स्वतःला झोकून देणं दुर्मिळच.

 

mukkabaz-inmarathi
asianstylemagazine.com

शरीरानेच नाही तर एकंदर सगळ्याच गोष्टीत विनीतने हे पात्र स्वतःत भिनवलय. दीड वर्ष बॉक्सिंग शिकलाय म्हणून नाही तर त्याची ती मेहनत पडद्यावर त्याच्या अभिनयातून दिसती आहे म्हणून सिनेमा नेहमीच्या बॉक्सिंग सिनेमांसारखा खोटा वाटत नाही.

एका सीनमध्ये त्याची बायको सापडत नसते म्हणून तो काळजीत असतो, आणि त्यात त्याचा मित्र इंग्रजी शब्द वापरून अजून त्याचा गोंधळ वाढवत असतो. तेव्हा त्यात त्याच आलेलं चिडचिडेपण म्हणजे त्याच्या दर्जेदार अभिनयाचा कस. अजून एक सिन जेव्हा त्याची आणि त्याच्या वडिलांची शाब्दिक चकमक होते, तिथेही विनीतचे कौशल्य स्पष्टपणे पडद्यावर दिसतं.

 

vineet-kumar-inmarathi
cinestaan.com

पात्राच्या स्वभावातील एवढे बारकावे हेरणे त्याला अचूकपणे जमलंय. म्हणून यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून विनीतला गौरवणे हा सर्वमान्य निर्णय असावा, पण तरीही फिल्मफेअर सकट सगळे पुरस्कार त्याच्याकडे कशाप्रकारे कानाडोळा करताय हे बघणं मजेदार असणार आहे. याआधी फँटम सिनेमाच्याच “मसान” सारख्या जबरदस्त चित्रपटालाही अशीच वागणूक मिळाली होती. म्हणून पुरस्कार कौशल्याचा संदर्भ म्हणून वापरता येणार नाही.

‎नवोदित अभिनेत्री झोया हुसेनने सुनैना या मूक मुलीचं पात्र मस्त साकारलंय. एकही संभाषण नसताना फक्त हावभाव आणि डोळ्यांतून तिने सुनैना च व्यक्तिमत्व साकारलं. एक हट्टी, हुशार मुलगी जी आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहते, अस तीच पात्र. तीच कामही अव्वल झालय.

 

mukaabaaz-jimmy-inmarathi
i.ndtvimg.com

जिम्मी शेरगिल तर मुरलेला कलाकार, त्याने रसिकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या. डोळ्यात सातत्याने पुरुषसत्ताकपणा, राजेपणा, दडपशाही करणारा, राग दिसतो. सोबतच रवी किशन कडूनही खूपच संयमी काम झालंय. आतापर्यंत उगाच त्रास देणारा, अपमान करणारा, अतिहुशार कोच आपण बऱ्याच सिनेमांनाधून बघितला होता पण संजय कुमार या पात्रातून पहिल्यांदाच स्वतःची एक कहाणी असलेला, आतून स्वतःही त्या खेळाडू सोबत लढणारा कोच दिसला.

रवी किशन कडून स्वतःच्या पठडीतला रोल नसताना सुंदर काम झालय. राजेश तेलंग यांच नाव जास्त प्रसिद्ध होत नाहीय, चित्रपटात त्यांनी श्रवण च्या वडिलांच पात्र साकारलय. पात्र छोटं असलं तरी त्यांनी एक विशेष छाप सोडली आहे. अशाप्रकारे सगळ्यांचाच अभिनय एका अपेक्षित उंचीवर आहे. यासाठी पैकीच्या पैकी गुण.

वास्तवाशी जवळीक ठेवण्यासाठी सगळ्या खऱ्या जागी शूटिंग केली गेली.

संभाषण आणि कला दिग्दर्शकांनीही चांगली मेहनत घेतलेली दिसते. यामुळे चित्रपट भयंकर वास्तवदर्शी झालाय. तरी चित्रपटाला पैकीच्या पैकी गुण देता येत नाहीत. मूळ कथानकाला पुढं नेणारे संदर्भ आणि संभाषण वाढले तरी त्यांचा फायदाच होत असतो पण इथं कथेचा मूळ प्रवाह सोडून भरकटवणारे सीनही बरेच आलेत.

 

mukkabaz-vineet-inmarathi
hindustantimes.com

काही गोष्टी फक्त विनोद निर्मितीसाठी केलेल्या आढळल्या. वातावरण निर्मितीसाठी काही वेगळ्या संदर्भाने कथा बदलण गरजेचं असतं पण मुक्काबाझ च्या उदाहरणात अशा संदर्भामुळे कथेचा मूळ प्रवाह भरकटतो. ‘पैंत्रा’ सारखं सुंदर रॅप, मुश्किल है अपना मेल प्रिये सारख सुंदर गाणं बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त वापरलं गेलय.

एका टिपिकल बॉलिवूड चित्रपटात ज्याप्रमाणे दृश्यांना जास्तीच भावनिक बनवण्यासाठी ज्या ट्रिक वापरल्या जातात त्या यावेळेस प्रथमच अनुरागने वापरल्यात.

उदा. चित्रपटाच्या पहिल्याच 2 सीनमध्ये मी डोक्याला हात लावला. कारण पहिल्या नजरेत प्रेमकहाणी सुरु होते, ती गच्चीवर स्लो मोशनमध्ये पळत असते आणि मग स्लो मोशन मध्ये तिच्या डोळ्यात बघत आपला हिरो फायटिंग करत असतो. सिनेमा सुरू करण्यासाठी ही बॉलीवूडची अगदी ठरलेली पद्धत आहे.

जास्त प्रकाशयोजना न वापरणं ही अनुरागची खासियत, पण या चित्रपटात त्याने ती पद्धत बदलली आहे.

याआधीच्या चित्रपटातील संगीत त्या कथानकातील भावनांना अधिक चांगल्या पद्धतीने दाखवण्यासाठी वापरलं गेलय, पण या वेळेस संगीत बरच लाऊड झालय. “मुश्किल है अपना मेल प्रिये” हे गाणं चित्रपटातला महत्वाचा भाग आहे. प्रकाशझोतात नसलेल्या या कवितेचा खुबीने वापर केलाय.

 

new-mukkabaaz-inmarathi
titosgoa.com

नेहमी फक्त मेडल जिंकलेल्या खेळाडूंच्या कथेवरच चित्रपट बनतात पण सामान्य खेळाडूंच्या सामान्य कथेचं चित्रण कधी होत नाही, त्यांचीही एक व्यथा असते. त्यांचा संघर्ष खेळाचा वापर करून नोकरी मिळवण्याचा असतो. या दृष्टीने मुक्काबाझ महत्वाचं पाऊल होतं. पण मुख्य प्रवाहातल्या सिनेमात काहीसा बसणारा हा सिनेमा असला तरी अनुरागचा सिनेमा म्हणून त्याला विशेष महत्व द्यायला हरकत नाही.

आर्थिक गणितांसाठी ‘बॉलिवूडबाझ’ पणाला झुकतं माप द्यावं लागलेल्या मुक्काबाझला मी पाच पैकी तीन गुण देईन.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?