' "असा" कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण तिन्ही लोकांत श्रेष्ठ ठरेल! : जाऊ तुकोबांच्या गावा (५१)

“असा” कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण तिन्ही लोकांत श्रेष्ठ ठरेल! : जाऊ तुकोबांच्या गावा (५१)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : देवभक्तपण सांभाळणे म्हणजे सुखाचा सोहोळा भोगणे : जाऊ तुकोबांच्या गावा (५०)

===

 

jave-tujave-tjave-tukobanchya-gaava-marathipizza01ukobanchya-gaava-marathipizza01kobanchya-gaava-marathipizza01

 

आबाला आता जाणीव झाली की रामभटांच्या घरचे आपले वास्तव्य संपत आले. आता आपल्याला परतायला हवे. पण कुठे? इथून जायचे कुठे? तुकोबांकडे? नाही, ते बरोबर नाही. त्यांच्यावर आपला भार घालणे योग्य नाही. आपल्या गावी परत जायचे? गावी परत गेलो तर आपले आईवडील हरखून जातील! हरवलेला मुलगा परत आला म्हणून! गावजेवण घालतील! आणि चटकन बोहोल्यावरही चढवतील!

आपण मग संसार करायचा? बायको, मुले, नातेवाईक, रुसवेफुगवे, भांडणे, हे आणि ते? असे चारचौघांसारखे आयुष्य जगायचे आपण? तेच करायचे होते तर हा सारा उद्योग कशासाठी केला आपण?

आपण गेली तीनचार वर्षे ज्यासाठी फिरत बसलो ते नेमकं काय होतं? मिळालं का ते आपल्याला? नेमका कशाचा शोध चालू होता आपला?

ईश्वर म्हणजे काय, तो असतो की नसतो, तो असेल तर दुष्काळ, रोगराई, युद्धे, दारिद्र्य, गुंडगिरी, लबाडी अशा हीन गोष्टी जगात का? सर्व त्याचीच जर लेकरे तर एक तगडा आणि एक पांगळा असे का? असे एक ना अनेक प्रश्न मनात होते. ते गावात सुटेनात म्हणून आपण एका तिरमिरीत बाहेर पडलो. खूप फिरलो, खूप लोकांना भेटलो. सज्जन पाहिले, दुर्जन पाहिले. विद्वान पाहिले, सुमार पाहिले.

तुकोबांकडे येईपर्यंत पायाला आणि मनाला स्थिरता नव्हती. कशावर विश्वास म्हणून बसत नव्हता. आता बदल झालाय. आता आधीपेक्षा खूप शांत वाटतंय.

ह्या शांत वाटण्यामागे मुख्य कारण ईश्वर ह्या संकल्पनेबद्दल झालेला उलगडा हे आहे. रामभटांनी आपल्याला व्यवस्थित समजावून सांगितले की, ‘कर्ता ईश्वर’ ही संकल्पनाच चुकीची आहे. हे जग चालविणारा कुणीतरी आहे हा विचार आपल्या मनात इतका पक्का झालेला होता की त्यामुळेच जगात असे का आणि तसे का हे प्रश्न आपल्या मनात उभे राहात होते. आता ती कल्पनाच नाश पावल्यामुळे हे जग आहे असे आहे, ते असेच का ह्याला कोणतेही उत्तर नाही हे आपल्याला कळले.

त्याच बरोबर जगात ईश्वर नाही असेही आपण बोलू नये हे ही कळले. उलट, कळले ते हे की –

आहे ऐसा देव वदवावी वाणी !

जगात देव आहे, परमेश्वर आहे असेच आपण बोलावे. मात्र हे बोलताना आपण देव कशास म्हणतो ह्याची खात्री करून घ्यावी. हे सर्व जग एकाच निर्मल तत्त्वापासून निर्माण झालेले आहे, त्या अर्थाने सारे त्याचीच लेकरे आहेत हे आपल्याला कळायला हवे. हाताची पांच बोटे सारखी नसतात हे आपण सारखे लक्षात ठेवले पाहिजे. ती सारखी का नसतात ह्या प्रश्नाभोवती आपले मन आपण गुंतवू नये. आपल्याला वास्तव स्वीकारता आले पाहिजे.

ज्या निर्मल तत्त्वापासून आपली उत्पत्ती झाली त्याच्यासारखे निर्मल मनाचे होण्यासाठी प्रयत्न करण्याला ईश्वरोपासना म्हणतात. ती सफल झाली की ईश्वर भेटला असे म्हणतात. तसे तुकोबा आहेत. आपणही तसेच व्हावे असा त्यांचा उपदेश आहे. तो आपण आता स्वीकारला आहे.

असे असले तरी रूढ संसार करायचा की नाही हा प्रश्न आपण रामभटांना विचारला पाहिजे. करायचा नसेल तर दुसरे काय करावे हे ही विचारले पाहिजे.

आबा पाटलाच्या मनात असे विचार होत असताना रामभटांचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला.

“अरे मुलांनो, चला, चला. तुकोबा येताहेत इकडे! अरे गोविंदा, चूल पेटव, पाणी ठेव उन करायला. गोपाळा, फुले आण लवकर. केशवा, निरांजनाचे तबक आण. मंडळी, पाद्यपूजेची तयारी तरा. गडवाभर दूध ठेवा हो तयार. फळे काही आहेत की नाही घरात?”

हे सारे ऐकून नारायण पुढे झाला आणि म्हणाला, “काका, असे काय करताय? अचानक असे का बोलायला लागलात? कुठे दिसताहेत तुकोबा तुम्हाला?”

रामभट म्हणाले, “दिसायला कशाला हवेत? कान आहेत ना? अरे, माझे कान मला सांगताहेत तुकोबांची बैलगाडी वेशीवर येईल इतक्यात. तुम्हाला नाही ऐकू येत तो आवाज? नारायणा, तुकोबांच्या गाडीचा आवाज वेगळा येतो रे. चला लवकर, टाळ घ्या हातात, उपरणे घ्या खांद्यावर, टोपी ठेवा डोईवर….चला तुकोबांच्या स्वागताला चला…त्यांना सामोरे जाऊ या…”

आणि रामभट निघाले की…म्हणू लागले….

पंढरीनाथा यावे यावे । राया तुकोबा यावे यावे ॥
येती साधु येती संत । तो चिं सण जरी अवचित ॥
पदधूळ आपुली लागो घरा । दिवाळी आणि आज चिं दसरा ॥
हरि तैसा गुरु ही मजसी । भेटीलागी ह्मणूनी असोशी ॥

असे गात गात, नाचत नाचत रामभट मोठ्या वेगाने वेशीकडे निघाले आणि तुकोबा बैलगाडीतून समोरून येताना की दिसले! त्यांना पाहून रामभट नारायणाला म्हणतात,

“हे कान सतत तुकोबांकडे लागलेले असतात म्हणून दुरूनही मी त्यांच्या गाडीचा आवाज ओळखू शकतो!”

रामभटांना असे वेशीकडे जाताना पाहून रस्त्यावरचे गांवकरीही त्यांच्याबरोबर जमा होत गेले. गाडी वेशीवर येताच हरिनामाचा एकच गजर झाला, लोकांनी बैलं सोडली आणि स्वतः गाडी ओढत रामभटांच्या घरापर्यंत आणली.

दरवाज्यावर रामभटांच्या पत्नी आणि आसपासच्या स्त्रियां तबके निरांजने घेऊन उभ्या होत्या. औक्षण झाले, पादप्रक्षालन झाले आणि तुकोबा ओटीवर येऊन बसले. गांवकऱ्यांची दर्शनाला रीघ लागली. लोक पायां पडत आणि बाजूला उभे राहात. एकच दाटीवाटी झाली. मग गावचे एक बुजुर्ग पुढे आले आणि म्हणाले, “तुकोबा, सर्वांना काही तरी सांगा. तो प्रसाद घेऊन मग सगळे पांगतील.”

तुकोबांनी सर्वांकडे पाहून एक सुहास्य केले आणि म्हणाले,

मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥
मने प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली ।
मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥
मन गुरु आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य ।
प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।
नाहीं नाहीं आनुदैवत। तुका ह्मणे दुसरे ॥

तुकोबांचे सांगून झाले. हरिनामाचा गजर झाला आणि लोक पांगले. रामभट हात जोडून उभे राहिले. मागे नारायण, आबा आणि बाकी सगळे. रामभटांनी विचारले, “देवा, आनंद झाला खूप. आधी कळलं तर थोडी तयारी केली असती…”

तुकोबांनी सर्वांना हात करून खाली बसविले आणि ते म्हणाले, “गेले काही दिवस रोज यायचे म्हणत होतो, आज शेवटी निघालोच. म्हटले पाहू या आमचे आबा काय करीत आहेत? नारायणा, तू ही आहेस होय इथे? काय चाललंय?”

नारायण म्हणाला, “आबा राहिले इथे आणि म्हणून मी ही राहिलो. शिकायचा प्रयत्न केला.”

तुकोबा म्हणाले, “छान. आता काय करणार पुढे?”

“आपण सांगाल ते करीन.” नारायण नम्रपणे उत्तरला.

“होय ना? मग ऐका.

भावभक्तिवादें करावें कीर्तन । आशाबद्ध मन करूं नये ॥
अन्न पाणी धन द्रव्य नारायण । विठ्ठला वांचून बोलू नये ॥
सप्रेम करावें देवाचे कीर्तन । भय द्या सोडून शरीराचें ॥
तरी मग जोडे विठ्ठलनिधान । केलिया कीर्तन सिद्धि पावे ॥
देव जोडिलिया तया काय उणें । तुका ह्मणे मन धीट करा ॥

नारायणा, आपली उपजीविका कशी होईल ह्याचा विचार न करता धीटपणे जीवनाला सामोरे जा. तुम्ही जन्माने ब्राह्मण लोक. जन्मतः मान तुम्हाला. तरी एक लक्षात ठेवा –

दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥
जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥

हे ऐकून नारायण आणि आबाही गोंधळलेले पाहून तुकोबांनी रामभटांना सांगितले, “रामराया, नारायणाला अर्थ सांगा बरं ह्याचा..”

रामभट बोलू लागले, “ब्रह्म आणि माया, अंग तशी छाया हे आता तुमच्या मनात वसले आहे. आता ज्ञान आणि कर्म ही शब्दांची जोडीही लक्षात ठेवा. ज्ञान म्हणजे ब्रह्म आणि कर्म म्हणजे माया. माया म्हणजे बदलणारी गोष्ट. तीतून सुटा आणि मनाने स्थिर व्हा हा अध्यात्मशास्त्राचा उपदेश तुम्ही शिकला आहात.”

ब्राह्मणांना वाटते आपली जात, आपला वर्ण श्रेष्ठ. का? तर आपण ज्ञानी लोक!

तुकोबा सांगत आहेत की, गाढवीने कितीही दूध दिले तरी तिला गायीची सर यायची नाही, कावळ्याच्या गळ्यात कितीही पुष्पमाला घातल्या तरी तो काही हंस बनायचा नाही आणि माकडाने आंघोळ करून कपाळाला टिळा लावला तरी त्याला ब्राह्मणासारखे वागून दाखवता यायचे नाही.

ब्राह्मणानेही केवळ जातीत जन्मलो आणि ब्रह्मकृत्ये केली म्हणून आपण ज्ञानी असल्याचा आव कुणी आणू नये. स्वतः सकाम कर्मे करणारा, ही कर्मे मी करतो असा अहंकार बाळगणारा ब्राह्मण हा केवळ त्या जातीत जन्माला आला म्हणून ज्ञानी असू शकत नाही. मायेतून सुटणे म्हणजे निष्काम होणे. ज्याची कर्मे निष्काम झाली त्याचा ‘आपण कर्मे केली’ हा भाव गेला. मग म्हणायचे की तो कर्मभ्रष्ट झाला.

आदि शंकराचार्य नेहमीच ज्ञान व कर्म एकमेकांचे विरोधी असल्याचे सांगतात. जे बदलत नाही ते ज्ञान. जे बदलते ते कर्म. माणसाने मनबुद्धीने स्थिर होणे म्हणजे कर्मातून मनाने मुक्त होणे. जो असा स्थिर होईल त्याला ज्ञानी म्हणायचे.

जर ब्राह्मण ‘असा’ कर्मभ्रष्ट झाला तर व तरच तो तिन्ही लोकांत श्रेष्ठ होईल. तसा तू हो असे, नारायणा, तुकोबा तुला सांगत आहेत.

(संत साहित्यात जरी आणि तरी हे शब्द अनेकदा जर व तर ह्या अर्थाने येत असतात हे लक्षात ठेवले तरी अशी अनेक कोडी उलगडतात.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?