' देवभक्तपण सांभाळणे म्हणजे सुखाचा सोहोळा भोगणे : जाऊ तुकोबांच्या गावा (५०)

देवभक्तपण सांभाळणे म्हणजे सुखाचा सोहोळा भोगणे : जाऊ तुकोबांच्या गावा (५०)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : दगडाचा देव काहीही करू शकत नाही : जाऊ तुकोबांच्या गावा (४९)

===

jave-tujave-tjave-tukobanchya-gaava-marathipizza01ukobanchya-gaava-marathipizza01kobanchya-gaava-marathipizza01

आता एका मुद्याचा उहापोह केला की तुमच्या शंकेचे पूर्ण समाधान होईल. तो मुद्दा असा की स्वतः अद्वैती असतानाही तुकोबांनी पांडुरंगास उपास्य दैवत का केले? अंतरीच्या नामरूप नसलेल्या देवाचीच उपासना लोकांसमोर का मांडली नाही?

ह्याचे उत्तर असे की तुकोबांना पांडुरंग अचानक सापडला असे झाले नाही. त्यांच्या घरीच पांडुरंगाचे मंदिर होते. मूर्ती दगडाची भले असो आणि दगडाचा देव ही कल्पनाही कितीही हास्यास्पद असो, एकदा मन त्यात ओतले की ती वस्तू पार जाते! माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणीतरी जगात आहे आणि ते मला वंदनीय आहे ही भावना निर्माण करण्यासाठी मूर्तीपूजेस पर्याय नाही. तुकोबांच्या जडणघडणीच्या काळात त्यांनाही लहानपणीच्या नामदेवांसारखे मूर्तीप्रेम होते. त्यांची सगुणोपासना सहज सुटली असे नाही. ज्या पांडुरंगावर आपण लहानपणापासून प्रेम केले, ज्या पंढरीची वारी आपल्या कुटुंबात कैक पिढ्या चालत आलेली आहे, ज्या पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबादि भावंडे लीन होत असत, नामदेवांपासून एकनाथांपर्यंतच्या संतपरंपरेने ज्या पांडुरंगापाशी आपले जीवन बद्ध केले आणि इतकेच नव्हे तर ह्या मराठीकानडी जनतेनेही जो आपल्या हृदयी सांठविलेला आहे तो पांडुरंग सोडणे म्हणजे जनताजनार्दनाचे सगुणरूप सोडणे. तरीही, अद्वैताच्या अभ्यासात त्याचा क्षणभर का होईना त्याग करायची वेळ येतेच. ते दुःख नामदेवमहाराजांनी पचविले तेव्हा ज्ञानदेव संगतीस होते. येथे तुकोबांजवळ कोणी नव्हते. तेव्हा त्यांची भावना शब्दरूपात बाहेर पडली –

अद्वैती तो माझे नाही समाधान । गोड हे चरणसेवा तुझी ॥
करूनी उचित देईं हें चि दान । आवडे कीर्तन नाम तुझें ॥
देवभक्तपण सुखाचा सोहळा । ठेवूनी निराळा दावी मज ॥
तुका ह्मणे आहे तुझें हें सकळ । कोणी एके काळें देईं मज ॥

तुकोबांच्या ह्या अभंगाची सुरुवात पाहिली तर असे दिसेल ते स्पष्टपणे पांडुरंगाला म्हणत आहेत की अद्वैत विचारात माझे मन रमत नाही. तेथे माझे समाधान होत नाही. माझे समाधान होते ते तुझ्या चरणांशी. तुझे नाम संकीर्तन करणेच मला आवडते. ती माझी आवड पुरेल ह्यासाठी जे उचित असेल ते तू कर. त्याचेच दान तू मला दे.

देवभक्तपण सांभाळणे म्हणजे सुखाचा सोहोळा भोगणे. तुझा भक्त असणे ह्यात माझा आनंद आहे. अद्वैतात तू आणि मी एक होऊन जाऊ. ते नको. तू मला तुझ्यापासून वेगळा, निराळा ठेव. तू देव आणि मी भक्त असेच ते नाते असो.

आबा, नारायणा, तुकोबांचा येथवरील अभंग सगुणोपासनेची आवड सांगणारा आहे. पण ते शेवटी काय म्हणतात पाहा –

तुका ह्मणे आहे तुझें हें सकळ । कोणी एके काळें देईं मज ॥

हा तुका म्हणतो, जे आहे ते सारे तुझे आहे. आणि बरं का पांडुरंगा, ते जे तुझे आहे ना, ते कधी तरी एका क्षणी मला देऊन टाक!

ज्या क्षणी तो पांडुरंग आपले सारे तुकोबांना देईल त्या क्षणी तुकोबा ते घेतील आणि मग त्या दोघांचे अद्वैतच होईल! सगुणोपासनेचे गुणगान करणाऱ्या तुकोबांना हेच हवे आहे!

आणि तुम्हा दोघांना काय सांगू? पांडुरंगाने तुकोबांचे ऐकले, आपले जे, ते तुकोबांना सारे देऊन टाकले! त्यामुळे जे जग पांडुरंगाचे अंकित होते ते तुकोबांचे अंकित झाले. आज सर्वांना वाटते की तुकोबा हे देहातले पांडुरंगच आहेत!

तसेच तुकोबांनाही वाटते, पांडुरंगाप्रमाणे हे जग आता आपल्याला खेळण्यास मिळालेले आहे. ह्या जगातच विश्वंभर आहे, हे जगच विश्वंभर आहे आणि त्यांची सेवा हीच पांडुरंगाची खरी चरणसेवा आहे ह्यात तुकोबांना आता संशय नाही. ते म्हणतात –

विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतींचे सार ॥
जगीं जगदीश । शास्त्रे वदती सावकाश ॥
व्यापिलें हें नारायणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥
जनीं जनार्दन । संत बोलती वचन ॥
सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी ॥

पाहिलेत? तुकोबांनी येथे स्वतःला सूर्याची उपमा दिली आहे! सूर्य जसा सर्वांना प्रकाश देण्यासाठी भ्रमणाचे कार्य करतो तशीच क्रीडा हा तुकाराम करतो आहे! शब्दकिरणे वाटीत तो ज्ञानाचा प्रकाश फैलावतो आहे!

हे ऐकून तिघांनाही थोडी भारावल्याची स्थिती आली. ती गेल्यावर आबा बोलू लागला –

“म्यां लई लई प्रश्न घीऊन तुकोबांजवळ आलो हुतो. आज माला वाईट वाटतुया की म्या त्येंना काई काई इचारीत ऱ्हायलो. शेवटाला त्येंनी इतं धाडलं. तुमी माला इतं ठीवून घेतलासा, मौन शिकवलासा आनी आता ह्ये अद्वैताचं बी शिकवलायसा. माला जेवू खाऊ घातलासा त्ये आजूनच झालं. बऱ्याच शंका हुत्या, आता वाटतुया की माजं मन शांत होतुया. आता माजा मी अभ्यास करीन. शिकत ऱ्हाईन. मातुर येक शेवटची शंका हाय ती इचारतु.”

आबाने असे म्हटल्यावर रामभट म्हणाले, “अहो आबा, अशी धन्यवादाची भाषा करू नका आणि प्रश्न विचारल्याचे वाईटही वाटून घेऊ नका. सांगणारे आहेत पण विचारणारे नाहीत अशीच स्थिती सदैव असते. कुणी विचारले तर सांगणाऱ्याला आनंदच वाटत असतो. तर, अगदी मोकळेपणे पुढील प्रश्न विचारा.”

हे ऐकून आबा विचारू लागला, “इतकं आईकलं पण ह्यो भक्तीचा इषय न्हाई कळला. त्येचं महत्त्व काय?”

हा प्रश्न ऐकून रामभट म्हणाले, तुकोबांच्या एका अभंगात ह्याचे छान उत्तर आहे. ते म्हणतात –

भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग । ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु ॥
देहाच्या निरसनें पाविजे या ठायी । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥
उदक अग्नि धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा न ये ॥
तुका मज कळे ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥

भक्तीने माणूस पहिले काय शिकतो तर नमन! माणूस नमायला शिकतो! मी कुणीतरी विशेष व्यक्ती आहे हा त्याचा ताठा दूर होतो! भक्ती काय शिकवते तर ‘माझे काही नाही’ हा विचार शिकविते. विश्वीं विश्वंभर, जगीं जगदीश हे तुकोबांचे शब्द आत्ता ऐकलेत ना? आहे हे सर्व त्याचे आहे हा तो विचार.

एकदा आपले काही नाही ही वृत्ती बळावली की त्यागाची भावना उत्पन्न होते आणि त्यातूनच वैराग्य प्राप्त होते. वैराग्याची परिणीती ज्ञानात होते आणि आपली काया आपली नव्हे ही भावना वाढत जाऊन ही काया सुद्धा ब्रह्मच आहे असा अनुभव येऊन ब्रह्मीं रमल्याचा भोग मिळतो. याचा अर्थ असा की ती काया जनीं वसत असलेल्या जनार्दनाच्या सेवेत खर्ची पडू लागते.

ज्ञान, भक्ती आणि कर्म हे असे मग एक होतात. पण सुरुवात अशी भक्तीने होते हे ध्यानी घ्या. ह्या तीनही गोष्टींशिवाय जीवन सफल संपूर्ण होत नाही. जसे, उदक म्हणजे पाणी, धान्य आणि अग्नी ह्या तिघांशिवाय जसा स्वयंपाक बनत नाही तसेच ते. यांतील एक वस्तू नसेल तरी पाक सिद्ध व्हायचा नाही.

ज्या व्यक्तीच्या आयुष्यात ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा संगम झाला त्याचे वाणी सत्य होते. ती व्यक्ती ब्रह्मस्वरूप झाली ह्याची तीच चांचणी होय. बाकीचेही बोलतात पण ती केवळ बडबड, सत्य नव्हे.

आबा, तुम्हाला तुकोबांनी नामाचा उपदेश केला होता. तुम्ही त्यावर शंकांवर शंका घेतल्यात. ते आता जाऊ द्या आणि तुकोबांचे ऐका. अनुभवानेच तुमच्या बुद्धीचे पूर्ण निरसन होईल. तुकोबांनी मोठी नामसाधना केली. तीच भक्ती मार्गाची सुरुवात होय. नामाने भगवंताची आठवण राहते आणि हे माझे आणि ते माझे हा भाव नष्ट होतो. ती भावना वाढत जाऊन हे तुझे, ते तुझे असा त्यात बदल होतो. ही कायाही आपली नव्हे हे मनात पक्के बसले की ह्या कायेकडून होणारे कर्म आणि त्या कर्माला येणारी फळेही तुझीच अशी वृत्ती बनते आणि वैराग्य अंगी बाणते.

आबा, तुम्ही ह्या मार्गाने चालावे अशी तुकोबांची इच्छा आहे, ती आता तुम्ही पूर्ण करा. तुकोबांचा एक अभंग त्यासाठी सतत आठवणीत ठेवा.

हें चि माझें तप हे चि माझे दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥
हें चि माझें तीर्थ हे चि माझे व्रत । सत्य हे सुकृत नाम तुझें ॥
हा चि माझा धर्म हें चि माझे कर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥
माझा योग हा चिं माझा यज्ञ । हें चि जपध्यान नाम तुझें ॥
हें चि माझें ज्ञान श्रवण मनन । हें चि निजध्यासन नाम तुझें ॥
हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझें ॥
तुका ह्मणे दुजें सांगायासि नाही । नामेंविण काही धनवित्त ॥

हे सारे ऐकल्यावर आबाची मान खाली गेली आणि तो इतकेच म्हणाला, “म्यां हे करीन, म्यां हेच करीन.”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?