' भीमा कोरेगाव : प्रचार, अपप्रचार आणि खरे दोषी

भीमा कोरेगाव : प्रचार, अपप्रचार आणि खरे दोषी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

३१ डिसेम्बर २०१७. गेल्या सालचा शेवटचा दिवस महाराष्ट्रात मोठं वादळ घेऊन उजाडला. त्याचे तीव्र पडसाद १ जानेवारीला उमटले. त्याहून भीषण पडसाद ३ जानेवारीच्या महाराष्ट्र बंदच्या दिवशी पडले. महाराष्ट्रभर तापलेल्या ह्या विषयावर सोशल मीडिया पासून टेलिव्हिजन चॅनेल्सपर्यंत सर्वत्र भरपूर चर्चा होताहेत. चर्चांचे विषय ३ प्रमुख मुद्द्यांभोवती फिरताहेत. मीडियाचं ‘सिलेक्टिव्ह वार्तांकन’, महाराष्ट्र बंदच्या दिवशी झालेला हिंसाचार ही “reaction” असणे आणि संपूर्ण प्रकरणास जबाबदार कोण हा प्रश्न.

 

maharashtra_bandh_bhimakoregaon_inmarathi
zeenews.india.com

त्या सर्व मुद्यांचा शांतपणे विचार करणं आवश्यक आहे.

माध्यमांनी १ जानेवारीला दलित बंधू भिगीनी, लहान मुली-वृद्ध स्त्रियांवर झालेल्या दगडफेकीचं वार्तांकन केलं नाही. परंतु ३ तारखेच्या बंदच्या दिवशी जो हिंसाचार झाला त्याची बित्तम्बातमी प्रसारित केली. हा आक्षेप अगदी बाळासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तीने विविध चॅनेल्सवर बोलून दाखवला आहे म्हटल्यावर त्याची गंभीर नोंद घेणं क्रमप्राप्त आहे. नोंद घेताना, सेक्युलर पुरोगामी वर्तुळात १५ वर्ष सतत ज्या घटनेचे दाखले दिले जातात त्या २००२ च्या गुजरात दंगलीचं उदाहरण पाहू.

काय घडलं होतं त्यावेळी?

गोध्रा स्टेशनवर कारसेवकांची बोगी जाळली गेली. त्यानंतर गुजरातभर हिंसाचार झाला.

मीडियाने काय दाखवलं? काय ‘लपवलं’ ?

वार्तांकन हिंसाचाराचंच झालं. बोगी जाळण्याचं नाही.

आणि – ते तसं करणंच योग्य होतं.

फार कमीवेळा माध्यमांकडून अशी समज दाखवली जाते. अश्या प्रक्षोभक घटना घडतात तेव्हा त्यांना शक्य तितकं कमी हायलाईट करणं योग्यच नव्हे आवश्यक असतं. अन्यथा परिस्थिती चिघळण्याची शक्यता असते. गोध्रा असो वा भीमा कोरेगावला झालेली दलित बंधू भगिनींवरील दगडफेक असो, माध्यमांनी ह्या घटना दाखवल्या नाही तरी ह्या बातम्या दूरवर पसरल्या आणि त्याचे परिणाम जे झाले ते आपण बघत आहोत. गुजरात मध्ये रक्तपात घडला. महाराष्ट्रात तर कधीही भरून निघणार नाही इतकी रूंद सामाजिक दरी पडली.

म्हणून अश्या घटनांच्या बातम्या किमान त्याक्षणी त्यावेळी पसरू नं देण्यातच शहाणपण असतं.

चिकित्सा, दोषींवर टीका, त्यांच्यावर कडक कार्यवाहीची मागणी अत्यंत आवश्यक असते. परंतु हे सगळं काही काळानंतर, प्रक्षुब्ध जनमानस शांत झाल्यावर करावं.

गोध्राला जे घडलं आणि भीमा कोरेगावला जे घडलं ते एक-दोन ठिकाणचं अघटित होतं. परंतु गुजरातची दंगल राज्यभर होती. ३ जानेवारीला महाराष्ट्रभर तोडफोड झाली. दोन्हींमधील व्यापकतेत मोठं अंतर होतं. म्हणून नंतरच्या घटनांच्या बातम्या होणं सहाजिकच होतं. त्या टाळल्या जाणं अशक्य होतं.

पुढचा मुद्दा आहे “action – reaction” चा.

पुन्हा गोध्राकडेच पाहू या.

 

godhra_train_burning_inmarathi
hindustantimes.com

गोध्रामधील कारसेवकांना जिवंत जाळण्याच्या नृशंस घटनेची “reaction” म्हणून गुजरातभर हिंसाचार उसळला आणि म्हणून तो “justified” आहे : हा तर्क कोणताही डोकं ठिकाणावर असलेला माणूस देणार नाही. गोध्राची reaction होती हे मान्य करायला हवंच. ते सत्यच आहे. पण ते “मान्य” करणं वेगळं आणि त्याला “समर्थन” देणं वेगळं.

कारणमीमांसा म्हणजे दुजोरा नसतो.

महाराष्ट्रभर घडलेल्या हिंसाचारास, तोडफोडीस भीमा कोरेगावला झालेली अमानवीय दगडफेकच कारणीभूत होती. पण म्हणून ती समर्थनीय ठरत नाही. लोक हाच तर्क आणखी मागे नेऊ शकतातच –

गेलं वर्षभर, मागच्या काही महिन्यांत तर अधिकच – भीमा कोरेगावच्या “दैदिप्यमान इतिहासाच्या रोमहर्षक आठवणी” सर्वत्र पसरवल्या जात होत्या. त्या आठवणी “इतरांच्या” भावना दुखावणाऱ्या नव्हत्याच असं कोणताही निष्पक्ष माणूस खात्रीशीरपणे म्हणू शकणार नाही. त्यामागची चिथावणी कोणतीही भावनाशील व्यक्ती नाकारणार नाही.

कारण – एका बाजूच्या जनतेस “रोमहर्षक” वाटणारी मांडणी – दुसऱ्या बाजूच्या जनतेस “भावना दुखावणारी” वाटू शकतेच.

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुरतेची लूट, आपल्यासाठी अगदी लॉजिकल आणि न्याय्य आहे. एवढंच काय, उत्तम राजकीय कूटनीतीचं ते उदाहरण म्हणून प्रत्येक मराठी माणूस ते अभिमानाने मिरवेल! पण, सुरतच्या एखाद्या समूहास ती उलट वाटू शकतेच. ते तसं वाटणं चूक की बरोबर आपण कोणत्या अंगाने विचार करतो त्यावर हे अवलंबून आहे. ते असो. मुद्दा हा की –

ही “चिथावणी” म्हणजे कारण आणि त्या कारणाची “reaction” म्हणून भीमा कोरेगावला झालेली दगडफेक : असं म्हणून दगडफेक समर्थनीय ठरते काय? ह्या दगडफेकीतून “बरी अद्दल घडली” चं विकृत मानसिक समाधान वाटून घेणं सभ्य इसमाला शोभेल काय?

शक्यच नाही! तुमच्या भावना दुखावल्या असतील तर ठीकाय. भावना मांडा. प्रतिवाद करा – दगडफेक “समर्थनीय” ठरूच शकत नाही. म्हणूनच – कारणमीमांसा काय करायची तरी करा : समर्थन करणं अत्यंत चूक आहे.

आता येऊ तिसऱ्या मुद्द्यावर. दोषी कोण – ह्या प्रश्नावर.

ह्या संपूर्ण घटनाक्रमास ७ दिवस घडून गेलेत. ह्या ७ दिवसांत “दोषींच्या” दोन बाजू आहेत. एक आहे आंबेडकरी संघटना, जिग्नेश मेवानी आणि इतर मंडळी. दुसरी आहे शिवप्रतिष्ठान, हिंदू एकता आघाडी व इतर हिंदुत्ववादी मंडळी. ब्राह्मणांनी पडद्यामागून महार-मराठे वाद पेटवला हा आरोपही होतो आहेच. ह्या संपूर्ण घटनेमागचं राजकारण काय आहे हा कुणाचा डाव आहे वगैरे भरपूर लिहिलं-बोललं गेलं आहे. ह्या दोन्हींपैकी प्रत्येकबाजू स्वतः निष्कलंक राहून दुसऱ्यावर संपूर्ण बालंट थोपवत आहे.

मात्र, एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या पांढरपेशा माणसासाठी खरा दोषी स्पष्ट आहे. सरकार. मुख्यत्वे महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस.

fadanvis_inmarathi
indianexpress.com

गेलं वर्षभर ३१ डिसेम्बरच्या कार्यक्रमाची आणि १ जानेवारीच्या मानवंदनेच्या मोर्चाची बित्तम्बातमी सर्वत्र उपलब्ध होत होती. ह्या सर्व कार्यक्रमांमध्ये कोणकोण सहभागी आहेत हे उघड होतं. सदर कार्यक्रमांमुळे कोणत्या लोकांच्या भावना दुखावल्या जाताहेत/जाऊ शकतात हे ही कळत होतं. समाजमाध्यमांवर खडाजंगी होत होती. कोणतेही रिसोर्सेस नसलेले सोशलमिडियावरचे लोक हे सर्वत्र बोलून दाखवत होते की काहीतरी घडण्याची शक्यता आहे.

हे सर्व गृहखात्याला माहिती नव्हतं असं समजून चालणं खुद्द गृह खात्याखाली असणाऱ्या संपूर्ण यंत्रणेचाच अपमान आहे. तुमच्या निगराणीत असणाऱ्या लोकांकडून हे असं काही घडू शकेल हेच तुम्हाला कळणार नसेल तर कसाब सारख्यांकडून आमच्या सुरक्षेची आशाच सोडलेली बरी. परंतु ती परिस्थिती नाही हे कळण्याइतके सुज्ञ आम्ही आहोतच. तुम्हाला खबर असणारच. तरी तुम्ही खबरदारी घेतली नाहीत – हा फडणवीसांचा प्रचंड मोठा गुन्हा आहे.

खरे दोषी कोण, ह्याचा नागरिक म्हणून, आम्हाला फरक पडत नाही. आंबेडकरी असो वा नक्षलवादी व हिंदुत्ववादी. समाजात व्हिलन आपापले हेतू साध्य करण्यासाठी असे वागतातच. तुम्हाला त्यासाठीच तर बसवलंय! अश्यांना ओळखणे आणि वेळीच रोखणे हेच तुमचं कर्तव्य आहे.

अधर्म करणे हाच खलनायकाचा मानलेला धर्म असतो. खलनायकाला वेळीच थांबवणे हा नायकाचा धर्म. नायकाचा धर्म नायकाने पाळावा, खलनायकाच्या नावाने रडत बसू नये.

 

sambajbhide_jigneshmevani_inmarathi

 

जिग्नेश मेवानी वाईट आहे की भिडे गुरूजी – हे यथावकाश बाहेर येईल. किंवा लोक आपापल्या सोयीने निष्कर्ष काढतील. परंतु हे सर्व पोस्टमार्टम आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुडदा तर पडलाच. घटनेच्या दोषींवर कार्यवाही होणं हा कायद्याच्या कक्षेत “न्याय” ठरेल कदाचित. त्याने ना दलितांवर पडलेले दगड धोंडे पुसले जातील ना तोडफोडीत जनतेचं नुकसान. ह्या घटना घडूच नं देणे – हा खरा न्याय असला असता. परंतु तो कुठेच दिसत नाहीये.

फडणवीसांना “सज्जन” आणि “कार्यक्षम” प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून ओळखलं जातं. त्यातील “कार्यक्षम” वर आता अनेकांच्या भुवया उंचावू शकतात. भीमा कोरेगाव प्रकरणात मतांच्या राजकारणापोटी फडणवीसांनी बघ्याची भूमिका घेतली हे उघड आहे. अश्या मुख्यमंत्र्यांना “सज्जन” तरी कसं समजावं हा मोठाच प्रश्न आहे.

सामान्य जनता राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनून बसलीये. प्रचार अपप्रचाराच्या राजकीय खेळात स्वतः खेळत बसलीये आणि खरे दोषी आपापले हेतू साध्य करत रहाताहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 171 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?