' मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांना नावं ठेवणं सोडून ह्या चुका सुधारायला हव्यात… – InMarathi

मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांना नावं ठेवणं सोडून ह्या चुका सुधारायला हव्यात…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : चेतन जोशी 

===

आपला महाराष्ट्र, आपली मराठी माती, आपला मराठी प्रेक्षक आणि गल्ला जमवतो हिंदी चित्रपट. ही एक प्रचंड मोठी शोकांतिका आहे.

बरं चूक कोणाची? मराठी प्रेक्षकांची? अर्थात मुळीच नाही! कारण जर तुमच्या चित्रपटाचे व्यावसायिक मूल्य शून्य असेल तर सुज्ञ प्रेक्षक तुमच्या चित्रपटाकडे का वळेल?

अनेक लाटांवर स्वार होत…काहीवेळा गटांगळ्या खात आजही मराठी चित्रपट टिकून आहे तो अल्प असलेल्या व्यावसायिक या मुल्यावरच.

२०१६ सालच्या सैराटपासून ही व्यावसायिकता मराठी चित्रपटांना एक नवी उभारी देऊन यशाच्या शिखरावर नेणार अशी एक आशा निर्माण झालेली आहे.

 

sairat-InMarathi
bollyarena.net

सैराटचं यश हे आणखी एक चित्रपट काढून फक्त नागराज मंजुळे यांनी टिकवायचं नसून ती जबाबदारी ही पूर्ण मराठी चित्रपटसृष्टीची आहे. सैराट हा एक मैलाचा दगड नसून अंधारात चमकलेला केवळ एक काजवा आहे.

मराठी चित्रपटसृष्टीला अधिक परिश्रम घेऊन नव्या व्यावसायिक सूर्यापर्यंत पोहोचायचे आहे. मराठी प्रेक्षक खरतर आतुरतेने मराठी चित्रपटाची वाट पहात असतो. पण त्यात त्याला हवी तशी व्यावसायिक मुल्ये सापडत नाहीत आणि तो मराठी चित्रपटापासून दूर जातो.

ही व्यावसायिक मुल्ये म्हणजे सुदृढ पटकथा, नाविन्यपूर्ण संगीत, आशयघन संवाद, परिपूर्ण दिग्दर्शन, कसदार अभिनय आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आकर्षक मार्केटिंग पद्धत ई. म्हणता येतील.

 

Rinku-Rajguru InMarathi

 

२०१७ संपलं. या वर्षामध्ये व्यावसायिकदृष्ट्या मराठी चित्रपटाने काय साध्य केलं ? याआधी २०१६ पूर्णपणे सैराटने गाजवलं. तरीही २०१६ साल हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०१७ पेक्षा अधिक यशस्वी होतं.

२०१७ साली आलेले आणि व्यावसायिक मूल्य असलेले चित्रपट म्हणजे ती सध्या काय करते, फास्टर फेणे, फु, हृदयांतर, चि व चिसौका, हलाल, बापजन्म, मुरांबा तसेच कलात्मक म्हणून कासव, दशक्रिया, कच्चा लिंबू ई. चित्रपट म्हणता येतील.

निव्वळ मनोरंजन देणारे तद्दन व्यावसायिक चित्रपट म्हणून ती सध्या काय करते, फास्टर फेणे, फु, चि व चिसौका, मुरांबा या चित्रपटांचा उल्लेख करता येईल.

मराठी चित्रपटाला या वर्षी इतर मागील वर्षांच्या तुलनेत जरा जास्त व्यावसायिक, प्रेजेंटेबल चित्रपट आणि पेक्षक देखील लाभले असं वाटतं.

तरीही एक म्हणता येईल की अजूनही श्वास चित्रपटापासून सुरु झालेली बालचित्रपटांची लाट काही ओसरलेली नाही. पण ती लाट व्यावसायिकतेकडे आणि निव्वळ तद्दन मनोरंजनाकडे वळते आहे हे देखील तितकेच खरे.

 

shwaas InMarathi

 

बालचित्रपट या एकाच एकखांबी तंबूभोवती मराठी चित्रपट पुन्हा एकदा गुदमरणार की काय अशी भीती वाटत होती पण तसं झालं नाही हे विशेष.

याआधी ‘विनोदी चित्रपट’ नावाच्या गिरणीत पिठाची गुठळी होईपर्यंत मराठी चित्रपट भरडला गेला होता. त्यानंतर माहेरची साडी या चित्रपटामुळे सुवर्णमध्यावर न जाता तो व्यावसायिकतेच्या थेट दुसऱ्या टोकावर जाऊन पोहोचला.

त्या लाटेने पुन्हा एकदा मराठी चित्रपटांच्या व्यावसायिक मुल्यांची अधोगती पहायला मिळाली.

व्यावसायिकतेचा सुवर्णमध्य म्हणजे तरुणाई. या तरुणाई पर्यंत आजचा मराठी चित्रपट काहीसा पोहोचतो आहे ही आनंदाची बाब आहे.

ऐतिहासिक चित्रपटांची लाट, तमाशापटांची लाट, विनोदी चित्रपटांची लाट, कौटुंबिक चित्रपटांची लाट, बालचित्रपटांची लाट अश्या अनेक लाटांमधून मराठी चित्रपट आता पूर्णपणे लाटविरहित व्यावसायिकतेच्या किनाऱ्याला लागतो आहे.

एकाच विषयावर चित्रपट न बनता अनेक विषयांवर ते बनवले जातात तेव्हाच त्या चित्रपटसृष्टीतली मरगळ ही झटकली जाते. तरीही आज मराठी चित्रपटाला पूर्णपणे व्यावसायिक न म्हणता सेमी-व्यावसायिक म्हणावे लागेल.

कारण अजून पुन्हा एकदा नव्याने रुजलेल्या मराठी चित्रपटाच्या बीजाला खऱ्या अर्थाने शतकोटीच्या गल्ल्याची व्यावसायिक पालवी फुटायची आहे. सैराटने ११५ कोटींचा व्यवसाय केला पण तो फॉर्म इतर चित्रपट राखू शकलेले नाहीत.

मराठी चित्रपटांचे २०१७ मधील १० कोटीच्या वरील बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहूयात.

 

marathi movie success in 2017 inmarathi

सूचना: वरील माहिती इंटरनेटवर मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. काही ठिकाणी यशस्वी असूनही हृदयांतर, फु या चित्रपटांचा उल्लेख देखील आढळत नाही. अगदी मराठी चित्रपटांसाठी पूर्णवेळ वाहिलेल्या वेबसाईटवर देखील.

गेल्यावर्षी म्हणजेच २०१६ साली १० कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवणारे तीन चित्रपट होते. नटसम्राट, व्हेंटीलेटर आणि सैराट. १० कोटी हा आकडा यासाठी निवडला आहे. कारण व्यावसायिक मूल्य असलेल्या मराठी चित्रपटाने महाराष्ट्रात तेवढा गल्ला हा जमवायलाच हवा.

 

natsamrat InMarathi

 

आज हिंदी चित्रपट हा दिल्लीच्या स्मॉल बजेट चित्रपटांमध्ये फरफटतो आहे त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.

या संधीचा फायदा हा मराठी चित्रपटांनी उचलून स्वतःचे स्थान निर्माण करीत व्यवसायिक झेंडा रोवण्याची सुवर्णसंधी सध्या खरतर मराठी चित्रपटसृष्टीकडे आहे.

२०१८ आणि त्यापुढील वर्षात मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्रात व्यावसायिकदृष्ट्या मोठी भरारी घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते फक्त दर्जा राखण्याची जबाबदारी मराठी तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्यावर आहे.

आहे पैसा म्हणून बनव चित्रपट, आहे सबसिडी म्हणून बनव चित्रपट, आहे हौस म्हणून बनव चित्रपट ही वृत्ती मराठी चित्रपटाची मोठी हानी करते. पुन्हा या अश्या टुकार चित्रपटात मराठीतील नावाजलेले दिग्गज काम करतात हे विशेष.

मराठी कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी स्वतःचा दर्जा राखला तरच मराठी चित्रपटाचा दर्जा राखला जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाकडून मराठी चित्रपटांना अनुदान दिले जाते.

मराठी चित्रपटाच्या व्यावसायिक भविष्यासाठी हे अनुदान त्वरित बंद करणे आवश्यक आहे. या अनुदानप्रकारामुळे हौशेगौशे यांचाच फायदा होतोय पण चित्रपटाचा दर्जा मात्र खालावतोय.

पुन्हा हे अनुदान मिळवण्यासाठीच्या अटी या मराठी चित्रपटाच्या व्यावसायिकतेला मारक आहेत. त्याऐवजी मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे कशी मिळतील यावर हा खर्च व्हायला हवा. मराठी चित्रपट दाखवणाऱ्या चित्रपटगृहांना खरतर हे अनुदान देण्याची गरज आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

आणखी महत्वाचे म्हणजे मराठी चित्रपटांनी स्वतःचे मार्केटिंगचे बजेट वाढवले पाहिजे.

सध्या हिंदी चित्रपटांचे मार्केटिंगचे बजेट हे चित्रपटाच्या लीड एवढे असू शकते. परंतु मराठी चित्रपट मात्र त्यात काहीसा मागे वाटतो.

चित्रपटाचे व्यावसायिक मूल्य जास्त असल्याची अजून आपल्या निर्मात्यांची खात्री पटत नाही त्यामुळे हे बजेट कदाचित कमी असू शकते. व्हिडियो गेमपासून ते रियालिटी शो पर्यंत मार्केटिंगचे अनेक फंडे उपलब्ध आहेत.

अनेक मार्केटिंग व्यावसायिक त्यासाठी कार्यरत असतात त्यांची मदत मराठी चित्रपटसृष्टी घेऊ शकते.

 

marathi movies collage inmarathi

 

मराठी चित्रपटाला व्यावसायिक व्हायचं असेल तर आमची शाखा कुठेही नाही सारखे प्रगती खुरटणारे हट्ट सोडून नवे मार्ग अवलंबावे लागतील. अर्थात जसा जसा काळ पुढे सरकतोय तसा त्यात बदल होतो आहेच.

मराठी चित्रपटाचा कोंडलेला श्वास हळूहळू मोकळा होतोय. मराठी चित्रपट व्यावसायिकतेकडे अधिक वेगाने प्रवास करतोय हे खूपच सकारात्मक आहे आणि त्याहीपेक्षा सकारात्मक ही गोष्ट आहे की मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटाकडे वळतोय.

मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे वळत असल्याने मराठी चित्रपटसृष्टीची जबाबदारी वाढली आहे.

दर्जेदार तसेच मनोरंजन देणारे चित्रपट हे मोठ्या प्रमाणात पडद्यावर येऊन मराठी चित्रपटाची स्पर्धा ही हिंदी चित्रपटाशी न होता खुद्द मराठी चित्रपटाशी होईल. तो दिवस हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस असेल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?