'बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग १

बिटकॉईन (आणि क्रिप्टोकरन्सी) मागचे तंत्रज्ञान – भाग १

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर कन्सल्टंट असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि IoT एक्स्पर्ट आहेत.

===

७ वर्षात ०.३९ डॉलर ते १८००० डॉलर! ही झेप आहे बिटकॉईनच्या किमतीची.

डिसेंबर २०१७ मध्ये बिटकॉईनच्या किमतीने पुन्हा एकदा गरुडभरारी घेतल्यानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये बिटकॉईनबद्दल परत एकदा क्रेझ निर्माण झाली. त्याआधीपर्यंत बिटकॉईन हे चलन (किमान भारतात तरी) काही टेक्नोसॅव्ही लोकांच्या चर्चांपुरतं सीमित होतं. गेल्या महिनाभरात मात्र हे चलन नाक्या-नाक्यावरच्या चर्चांचा भाग झालेलं आहे. अगदी पानटपरी पासून ते मोठ्या मोठ्या CA लोकांच्या चर्चेत, फेसबुक पोस्ट्स मध्ये बिटकॉईन आणि त्या अनुषंगाने क्रिप्टोकरन्सी हे विषय डोकावू लागलेले आहेत.

यातल्या बहुतांश लोकांचे सूर हे बिटकॉईन बद्दल काहीसे बिचकणारे आणि बिटकॉईनकडे संशयाने बघणारे आहेत आणि त्यात काही गैरही नाही.

bitcoin-marathipizza01
thesun.co.uk

बिटकॉईन ची गरुडभरारी ही काही पहिल्यांदा घडत नाहीये. अर्थात १८००० डॉलरची किंमत बिटकॉईनने पहिल्यांदा गाठलेली असली तरी याप्रकारची अचानक उंची बिटकॉईनने याआधी देखील काही वेळा मारलेली आहे. एवढेच नाही तर प्रत्येक वेळेस ही उंची गाठून बिटकॉईन गडगडून खाली देखील पडलेला आहे. त्यामुळे या चलनाविषयी असणारी साशंकता अपेक्षितच आहे. पण –

या चलनावर अविश्वास दाखवताना अधिकांश लोक यामागच्या तंत्रज्ञानाला दोषी धरत आहेत आणि तिथेच नेमकी गल्लत सुरु होते.

bitcoin_chip_pixabay_inmarathi
gadgets.ndtv.com

बिटकॉईन हे तंत्रज्ञानाचे एप्लीकॅशन आहे खुद्द तंत्रज्ञान नाही. हे एप्लीकॅशन चुकू शकते, उलटू शकते, घोळ करू शकते. पण त्यामागचे तंत्रज्ञान मात्र सॉलिड आहे आणि ते पूर्णपणे समजल्याशिवाय त्या तंत्रज्ञानावर ताशेरे ओढणे अपरिपक्वतेचे लक्षण ठरेल.

बिटकॉईन मागच्या तंत्रज्ञानाला दोषी धरण्यामागे देखील काही महत्वपूर्ण कारणं आहेत. त्यातले सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मानवाचा एकूणच तंत्रज्ञानाविषयी असलेला अविश्वास. हा अविश्वास अगदी आदिमकाळापासूनचा आहे. कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाकडे माणसाने नेहमीच साशंकतेने बघितलेले आहे. याच्या मानसशास्त्रीय कारणांविषयी बोलता येईल पण तो या लेखाचा विषय नाहीये त्यामुळे त्या विषयाला इथेच थांबवूया.

दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हे तंत्रज्ञान समजून घेण्यामागची उदासीनता.

बिटकॉईन किंवा एकूणच क्रिप्टोकरन्सी हा विषय दोन शास्त्रांचा संगम आहे – तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र. हे त्याच्या नावातून देखील दिसून येतं जे bit आणि coin या संगणकशास्त्र आणि अर्थशास्त्रातल्या दोन संकल्पनांनी बनलेलं आहे.

अर्थात याची एप्लीकॅशन अर्थशास्त्र असल्यामुळे सगळेच अर्थशास्त्री याच्या भल्या बुऱ्या उपयोगाचे आकलन करण्याबद्दल कमालीचे उत्सुक आहेत. पण यातल्या बहुतांश अर्थशास्त्र्यांना यामागच्या तंत्रज्ञानाबद्दल कमालीचे औदासीन्य आहे आणि हीच खरी मेख आहे. २१व्या शतकात ज्ञानाची कुठलीही शाखा तंत्रज्ञानाशिवाय आत्मसात केल्या जाऊ शकत नाही हे सत्य मान्य करण्याची वेळ आलेली आहे. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी. सध्या आपल्या हाताशी विषय आहे क्रिप्टोकरन्सीचे तंत्रज्ञान आणि ते समजून घेण्यासाठी आधी आपल्याला क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमके काय हे समजून घेणे आवश्यक आहे.

नेमके काय आहे क्रिप्टोकरन्सी आणि bitcoin?

फारसं अर्थशास्त्रात न शिरता समजून घ्यायचं झाल्यास चलन हे साधारणतः “धनाच्या दळणवळणाचे सरकारमान्य साधन” या अर्थाने परिभाषित केले जाते. म्हणजेच – रुपया, डॉलर, युरो, येन हे वेगवेगळ्या देशाच्या सरकारने ठरवलेले आणि मान्य केलेले धनाच्या दळणवळणाचे साधन आहेत – हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहित असतेच. पण यातला एक महत्वाचा घटक आपण बरेचदा दुर्लक्षित करतो तो म्हणजे सरकार.

एखाद्या पैश्याच्या चलनाला तोपर्यंतच महत्व असते जोपर्यंत एखादी मोठी संस्था (साधारणतः सरकार, बँका इत्यादी) त्या चलनाला मान्यता देते. (नोटाबंदी आठवा…!) पण या केंद्रीय सत्तेचे चलनावर असलेल्या नियंत्रणालाच बऱ्याच लोकांचा, विचारवंतांचा सुरुवातीपासून विरोध राहिलेला आहे. क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉईनची पाळमूळ या विचारात दडलेली आहेत. हा विरोधाचा प्रवास फ्रेडरिश हायक पर्यंत मागे जातो.

 

friedrich hayek inmarathi

हायकचे म्हणणे होते कि –

ज्याप्रकारे नियोजनावर केंद्रिय नियंत्रण असू नये तसेच चलनावर सुद्धा असे नियंत्रण असू नये.

हायकने त्याच्या Denationalization of money या पुस्तकात या विषयावर विस्ताराने लिहिले आहे. पण हायकच्या काळात ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे कठीण होते. इंटरनेटच्या क्रांतीमुळे मात्र हा विचार प्रत्यक्षात उतरवणे सोपे झाले.

नेमकं काय कठीण होतं हा विचार उतरवण्यात?

मुळात चलन केंद्रिय नियोजनाच्या नियंत्रणात असणे (currency to be under the control of central authorities) बऱ्याच दृष्टीने फायद्याचे असते. किती चलन निर्माण करायचे, चलनाचे मूल्य, त्याचे व्यवहार ह्या गोष्टी नियंत्रित करायला सोप्या जातात. फक्त तुमचा त्या केंद्रिय संस्थेवर विश्वास असायला हवा. आणि तो असण्याशिवाय पर्याय ही नसतो. पण तो विश्वास तसा नसला तर काय…? आपण इथे “केंद्रिय दृष्टीकोन” बरोबर का “विकेंद्रित” यावर चर्चा करणार नाही आहोत. पण समजा – “विकेंद्रित दृष्टीकोन” बरोबर – असं गृहीत धरलं तर तो नेमका अमलात कसा आणायचा?

जर कोणीच तटस्थ संस्था तुम्हाला चलन सांभाळायला नको असेल तर हे नियंत्रण नेमके करावे कसे? “क्रिप्टोकरन्सी” किंवा बिटकॉईन याच विकेंद्रित चलनाचे (decentralized currency) ढळढळीत उदाहरण आहे. पण तरी क्रिप्टोकरन्सी हे विकेंद्रीकरण नेमके कसे करते हा प्रश्न उरतोच.

म्हणूनच बिटकॉईन / क्रिप्टोकरन्सी नेमकं काय आहे आणि काय नाही स्पष्टपणे समजून घेणं आवश्यक आहे.

तर – Bitcoin म्हणजे एखादा कंप्यूटर अल्गोरिदम नाही!

बऱ्याच लोकांना असे वाटते कि bitcoin म्हणजे एखादी अल्गोरिदम आहे. किंवा किमान त्यामागचे तंत्रज्ञान तरी. तर सर्वप्रथम हे नीट समजून घ्या की क्रिप्टोकरन्सी ही एखादी कॉम्प्युटर अल्गोरिदम नसून डिजिटल चलन किंवा व्यवहार प्रणाली (Digital Transaction System) आहे. तसेच त्यामागचे तंत्रज्ञान ज्याला आपण ब्लॉकचेन (Blockchain) म्हणतो ते सुध्दा एखादी अल्गोरिदम नसून सॉफ्टवेयर चे आर्किटेक्चरल डिझाईन आहे. अर्थात ब्लॉकचेन एखाद्या केंद्रिय संस्थेच्या अभावामुळे चलन प्रणालीत येणाऱ्या समस्यांवर मात करणारे उत्तर आहे. नेमक्या काय आहेत या समस्या?

कुठलीही चलन प्रणाली दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक चलनाचं निर्माण.

उदाहरणार्थ भारतीय चलन रुपया भारतीय रिजर्व बँक छापते. किती मूल्याच्या नोटा छापायच्या, किती नोटा व्यवहारात आणायच्या याचे निर्णय भारत सरकार आणि रिजर्व बँक घेते. विकेंद्रित चलन प्रणालीत हे निर्णय कोणी घ्यायचे हा मुद्दा येतो.

दुसरी समस्या आहे व्यवहारांची.

 

money cash transaction inmarathi
yesbank.com

म्हणजे ह्या चलनाचे व्यवहार कोणी कसे केले याची नोंदणी ठेवणे हा चलनाच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा असतो. साधारणतः सपाट चलनांमध्ये (Flat currencies) हा प्रश्न येत नाही. समजा माझ्याकडे १०० रुपयाच्या १० नोटा आहेत. त्यातली एक नोट मी भाजी विकत घेताना भाजीवाल्याला दिली. तर माझ्या कडे ९०० रुपयेच अर्थात १००च्या ९ नोटाच उरतात.

हे व्यवहाराच्या दृष्टीने सोप्पे पडते कारण या चलनाचे भौतिक अस्तित्व आहे. म्हणजे मी १००ची एक नोट भाजीवाल्याला देताना त्याचे भौतिक अस्तित्व माझ्याकडून भाजीवाल्याकडे जाते. डिजिटल व्यवहारांमध्ये हे भौतिक अस्तित्वच नसते. त्यामुळे डिजिटल व्यवहार करताना या व्यवहारांची नोंदवही ठेवावी लागते. हे काम साधारणतः बँका करतात. म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेतून मित्राला पैसे पाठवले तर तुमच्या अकौंट मधून तेवढे पैसे गेल्याची नोंद बँका करतात. हेच PayTM सारख्या डिजिटल वॉलेट बद्दल.

पण क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत अशी नोंदवही ठेवणारी कुठली केंद्रिय संस्थाच अस्तित्वात नाहीये. कारण मुळात ही विकेंद्रित peer to peer टेक्नोलॉजी आहे. त्यामुळे ही नोंदणी हा व्यवहार ज्या दोघांमध्ये होणार आहे त्या दोघांनी स्वतःकडे करणे अपेक्षित असते.

आता – इथे परत प्रश्न येतो विश्वासाचा.

मुळात विकेंद्रित प्रणाली राबवण्यामागे विचार असतो की तुम्हाला कुठल्या व्यक्ती किंवा संस्थेवर विश्वास ठेवून व्यवहार करायचा नसतो. परत दोघांच्या व्यवहारात दोघांनीच नोंद ठेवावी हे तर संस्थेवर विश्वास ठेवण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे. समजा माझ्याकडे २० बिटकॉईन आहेत. यातले १० बिटकॉईन मी तुम्हाला एखाद्या वस्तूच्या बदल्यात दिले.

तुम्ही आणि मी दोघांनी आपापल्या नोंदवहीत या व्यवहाराची नोंद केली. आता माझ्याकडे फक्त १० बिटकॉईन असायला हवेत. पण मी लबाड आहे. मी माझ्या नोंदवहीतली तुम्हाला दिलेल्या बिटकॉईनची नोंद काढून टाकली. आता माझ्याकडे परत २० बिटकॉईन झाले. आणि तुमच्याकडे सुध्दा १० बिटकॉईन आलेत. म्हणजे एकूण २०च बिटकॉईन असताना त्याचे नोंदवहीत ३० बिटकॉईन झाले…

याला डबल स्पेंडिंग प्रॉब्लेम म्हणतात.

Flat currencies मध्ये हा प्रॉब्लेम सहसा येत नाही. त्याचे कारण म्हणजे एकतर एखादी केंद्रिय संस्था असते जी अशी लबाडी (किंवा चूक) करणार नाही हा विश्वास असतो किंवा भौतिक चलनात व्यवहार केला तर त्या चलनाचे (वर दिलेल्या भाजीवाल्याच्या उदाहरणाप्रमाणे) भौतिक अस्तित्व असतं. विकेंद्रित चलन प्रणालीचा पुरस्कार करणाऱ्यांसाठी डबल स्पेंडिंग प्रॉब्लेम हा बराच काळ डोकेदुखी होता.

२००८ मध्ये सातोशी नाकोमोतो या उपनाम धारण केलेल्या व्यक्तीने (किंवा व्यक्तींने कारण सातोशी नाकोमोतो नेमका कोण आहे किंवा किती लोक आहेत याची आजतागायत कोणालाच कल्पना नाही) यावर एक शोधनिबंध लिहून या समस्येचे उत्तर मांडले आणि विकेंद्रित चलन प्रणालीच्या जगात एकच खळबळ उडाली. हे उत्तर होते ब्लॉकचेन आणि ब्लॉकचेनचे डिझाईन समजवण्यासाठी त्याने दिलेले उदाहरण होते bitcoinचे.

ब्लॉकचेन नेमके डबल स्पेंडिंग प्रॉब्लेमला कसे हाताळते त्याच बरोबर सातोशीचा शोधनिबंध चलननिर्माणावर (Creation of currency) काय उत्तर सुचवतो हे फार इंटरेस्टिंग आहे. पण हा एका लेखाचा विषय नाही. त्यामुळे या विषयावर बोलूयात पुढच्या भागात.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?