'"बिटकॉइन" : "मेगा बाईट" प्रश्न !

“बिटकॉइन” : “मेगा बाईट” प्रश्न !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : संजीव चांदोरकर. लेखक TISS मध्ये प्राध्यापक आहेत.

===

गेल्या काही दिवसात एका “बिटकॉइन” ची किंमत बारा महिन्यात ८०० डॉलर्स वरून २०,००० डॉलर्स वर गेली आणि साऱ्या गावात त्याची चर्चा सुरु झाली. तरुणांमध्ये तर आहेच, पण मुंबई सारख्या शहरात सामान्य लोकांमध्येही बिटकॉइन असा काही तरी प्रकार आहे याची चर्चा आहे.

एका बाजूला “हे सगळे सट्टेबाज भांडवलशाहीतील प्रकार आहेत” अशा कंमेंट्स डावीकडून. तर “चलन प्रसृत करण्याची सरकारची एकाधिकारशाही संपुष्ठात आणण्याच्या दृष्टीने हे स्वागतार्ह पाऊल आहे” अशी मांडणी उजव्या बाजूने होत आहे. विषय गुंतागुंतीचा आहे. पण जेव्हढे वाचतोय तेव्हढे प्रश्न आक्राळ होताहेत. इथे फक्त काहीच प्रश्न नोंदवतोय.

 

bitcoin-marathipizza02
bitcoinclix.com

First Point:

बिटकॉइन हा पैशाचा एक प्रकार आहे असे सांगितले जाते. पैशाची प्रायः खालील कार्ये असतात.

(१) संपत्तीचा साठा करणे (मी घरात नोटांची बंडले ठेवू शकतो; अर्थात कायद्याला धरूनच):

सोने खरेदी करतात तसे बिटकॉइन खरेदी करून तुम्ही तुमची संपत्ती त्यात साठवू शकता. मान्य.

(२) आपल्याकडील पैसे खर्च करून उत्पादक व दुकानांतून वस्तूमाल व सेवा खरेदी करणे हे दुसरे कार्य:

आजच्या घडीला बिटकॉईन्सचा वापर करून वस्तुमाल-सेवा खरेदी विक्री होत असेल तर त्याचे डॉलर्स मधील मूल्य काय? जगात वस्तुमाल-सेवांचा जो व्यापार चालतो त्यातील किती टक्के हिस्सा बिटकॉईन्स मधून होणाऱ्या व्यापाराचा आहे?

भविष्य काळात बिटकॉईन्स मधून होणारा वस्तुमाल-सेवांचा विनिमय वाढेल म्हणतात, तो किती वाढेल ? त्या गृहीतकांना काय आधार? बिटकॉईन्स येऊन आठ वर्षे झाली, या आठ वर्षात वस्तुमाल-सेवांची बिटकॉईन्स मधून होणारी खरेदी विक्री वाढली का?

(३) सगळे उद्योग आपापल्या हिशोब वह्या त्या त्या चलनात ठेवतात. उदा. जमाखर्च, ताळेबंद (बॅलन्स शीट). किती उद्योग आपल्या खत वह्या बिटकॉईन्स मध्ये ठेवत आहेत? विचार करीत आहेत?

(४) स्थानिक संस्था (म्युनिसिपालिटी), राज्य व केंद्र सरकारे आपापल्या देशाच्या चलनातून (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) कर गोळा करतात. कोणत्या सरकारने बिटकॉइन मधून कर संकलन करण्याची तयारी दाखवली आहे का? सार्वभौम सरकारे एव्हढी मूर्ख आहेत का?

जेपी मॉर्गन चे मुख्याधिकारी Jimmie Demon म्हणतात कि –

सार्वभौम सरकारे बिटकॉइन डोईजड वाटायला लागले कि त्याला एका फटक्यात चिरडून टाकतील कारण त्यातून त्यांच्या राजकीय सत्तेला आव्हान मिळण्याची शक्यता तयार होते.

bitcoin-marathipizza01
thesun.co.uk

Second Point:

बिटकॉइनला कोणतीही मध्यवर्ती यंत्रणा नाही. बिटकॉइनचे प्रवर्तक सांगतात कि “ब्लॉक चेन” तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बिटकॉइनच्या व्यवहारात कोणताही भ्रष्टाचार, हॅकिंग होणार नाही.

सगळे कॉम्प्युटरच्या आज्ञ-प्रणालीवर विसंबून आहे तर हॅकर्स आज ना उद्या बिटकॉइन ची यंत्रणा हॅक करणारच नाहीत याची शाश्वती काय?

bitcoin-marathipizza03
enisa.europa.eu

 

bitcoin-marathipizza03
s-media-cache-ak0.pinimg.com

दक्षिण कोरियात कालच बिटकॉइन ची खरेदी विक्री करणारे “यु-बिट” हे एक्स्चेंज हॅकिंग मुळे बंद पडले. त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली आहे. एका बिटकॉइनची किंमत २०,००० डॉलर (तेरा लाख रुपये) असणार असेल तर हॅकर तन-मन अर्पून हॅकिंगच्या मागे लागतील. बिटकॉइनची किंमत जेव्हढी जास्त तेव्हढे हॅकर्स ना प्रोत्साहन.

मध्यवर्ती यंत्रणा असेल (उदा. रुपयांसाठी रिझर्व्ह बँक) तर कोणी तरी उत्तरदायी असते. भले त्यांच्याकडून देखील चुका होऊ शकतील. पण मन पकडायला समोर कोणी तरी आहे तरी बिटकॉइनचे व्यवहारच मुळात विकेंद्रित पद्धतीने चालणार, मग कोणाला उत्तरदायी ठरवायचे ? समजा उद्या एखाद्या संस्थेला बिटकॉइन साठी उत्तरदायी ठरवले तर, बिटकॉइनच्या तत्वज्ञानाचा पायाच उध्वस्त होतो.

Third Point:

नवीन बिटकॉइन तयार कसे होते? तर म्हणे त्याचे (सोन्यासारखे) खाणकाम (मायनिंग) केले जाते.

अतिशय गुंतागुंतीची फक्त कॉम्प्युटर्स च्या सहाय्याने सोडवता येतील अशी कोडी आहेत. ती सोडवली तर सोडवणाऱ्याला एक बिटकॉइन मिळते.

 

bitcoin-marathipizza04
mining.com

हे काय उफराटे आर्थिक तत्वज्ञान आहे? म्हणजे माणसाने एक टन अन्न पिकवले, विहीर खोदून पाणी उपलब्ध करून दिले, घर बांधून आत राहणाऱ्यांना ऊन, वारा, पाउसापासून संरक्षण मिळवून दिले तर त्या माणसाला व माणसांच्या ग्रुपला एक लाख रुपये दिले तर ते बुद्धीला पटू शकते.

पण कोडे सोडवले तर लाखो रुपये? हे म्हणजे कोणत्या स्पर्धेतील बक्षीस नाहीये. तर त्यातून तयार झालेले चलन तुम्ही आम्ही वापरावे अशी प्रवर्तकांची अपेक्षा आहे.

बरं या गणितातील कोड्यानी भौतिक व खगोल शास्त्रातील कूट प्रश्न सोडवायला मदत होणार आहे का? तर तसेही काही नाही. हे गणिती प्रश्न सोडवण्याचा मानवी समाजाला उपयुक्तता काय? बिटकॉइन यंत्रणेतील हे निर्णय कोणीतरी व्यक्ती व व्यक्तीच्या गटाने घेतले असणार ना? कोण आहेत त्या व्यक्ती? त्यांचे काय विचार आहेत या मागे ?

असे बरेच प्रश्न काढता येतील. पण सध्या एव्हढेच.

बिटकॉईन्स मागे दोन प्रवृत्तींची युती झाली आहे.

(एक) अर्थव्यवस्थेतील सर्व आर्थिक निर्णय ज्यांना कोणाला घ्यायचे आहेत त्यांना शंभर टक्के स्वातंत्र्य असले पाहिजे अशी एक विचारधारा आहे. त्यांना Libertarians असे म्हणतात.

शासन नाही, समाज नाही, कामगार कायदे नाहीत, कर नाहीत. प्रत्येक उत्पादक व ग्राहक सुटा सुटा. प्रत्येकाने आपापले हितसंबंध सांभाळावे. कोणाला इजा झाली, कोण बुडाले तर त्याची जबाबदारी त्याच्या स्वतःवर. या विचारधारेचा अमेरिकेतील नवीन पिढीतील उद्योजकांवर प्रभाव आहे. या “अराजक सदृश्य” प्रवृत्ती (Anarcho -Capitalism) कडे बिटकॉइनचे पितृत्व जाते.

(दोन) जागतिक भांडवलशाहीत अस्ताव्यस्त घोंगावणाऱ्या वित्त भांडवलाला स्वतःला कोठे गुंतवून घ्यायचे ते कळेनासे झाले आहे. कोठे लवकरात लवकर भरपूर परतावा मिळेल याच्या ते शोधात असते. बिटकॉइन सारखी वित्तीय प्रपत्र (Financial Instrument) त्याला आकर्षित करते आहे.

बिटकॉईन्स चे वाढणारे अवास्तव भाव म्हणजे जागतिक भांडवलशाहीतील अराजकवाद्यांची व सट्टेबाजांची झालेल्या युतीचा परिपाक आहे.

पण हे देखील तेव्हढेच खरे आहे कि बिटकॉइन हे काही फॅड म्हणून त्याला दुर्लक्षिता येणार नाही.

बिटकॉइन मागे एक निश्चित राजकीय आर्थिक विचारधारा आहे. जगातील तरुणांचा बिटकॉइनला प्रचंड पाठिंबा आहे. त्याची मुळे जगभर तरुणांच्यात भिनत चाललेल्या प्रस्थापित व्यवस्था विरोधात आहे. (त्याला डाव्या विचारसरणीचा गंध देखील नाही हे मुद्दामहून नमूद करण्याची गरज आहे). जागतिक अर्थव्यवस्थेत खूप मोठे बदल होऊ घातले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था कूस बदलते आहे. हा कॅनव्हास घेऊन बिटकॉइनचे अन्वयार्थ लावावे लागतील.

हा खरे तर मोठ्या लेखाचा विषय आहे. त्याबद्दल सविस्तर कधीतरी!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?